रवांडा : इथं लोक दूध पिण्यासाठी 'बार'मध्ये जातात, कारण

    • Author, ग्लोरी इरिबगिझा
    • Role, बीबीसी ट्रॅव्हल

रवांडाची राजधानी किगाली इथल्या न्यारुगेन्ज जिल्ह्यात एका सर्वसामान्य बारमध्ये सकाळी दहा वाजताच गर्दी झाली होती. बारसमोर मोटरसायकलींची रांग लागलेली होती.

बाहेर धुळीने भरलेला रस्ता आणि आत नेहमीच्या उत्साही ग्राहकांची गर्दी यांच्या मधला पांढरा पडदा बाजूला सारून मी आत घुसले, तेव्हा बारचे चश्मिश मालक युसुफ गटिकाबिसी यांनी माझ्याकडे पाहून विशाल स्मित केलं आणि 'म्वारमुत्से!' (किन्यारवांडा भाषेत 'सुप्रभात') म्हणाले.

बारमधल्या चार टेबलांपाशी तरुण बाइकस्वार खेळीमेळीने बोलत होते आणि काही पालकमंडळी त्यांच्या लहानग्यांना पकडून उभी होती. काही जण डाळ आणि चपात्या खात होते. इतर काही लोक केक किंवा डोनट यांवर ताव मारत होते.

पण विशेष म्हणजे सगळे एकच गोष्ट पीत होते- आणि हे पेय बीअर किंवा वाइन यापैकी नव्हतं. कुरुहिम्बी आणि रवांडातील अशा इतर शेकडो बारमध्ये केवळ एकच पेय मिळतं ते म्हणजे दूध.

रवांडामधील या अनन्य स्वरूपाच्या दुग्धालयांमुळे आमच्या या देशातील अनेक समुदाय एकमेकांशी जोडले गेले आहेत. नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एकत्र येण्याकरता, भिन्न पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये मिसळण्याकरता या दुग्धालयांचा उपयोग होतो.

भल्यामोठ्या धातूच्या पिंपातून ग्लासमध्ये ओतलेलं थंडगार फेसाळ 'इकिवुगुटो' (आंबवलेलं दूध) आणि त्यावर घातलेला मध वा साखर, किंवा मग कपातून समोर आलेलं गरम 'इन्श्युश्यू' (उकळवलेलं कच्चं दूध)- हे इथलं पेय.

या संदर्भात अनभिज्ञ असलेल्यांना इथले बार म्हणजे नाक्यावरच्या अड्ड्यासारखे वाटू शकतात, पण रवांडातील संस्कृतीमध्ये अंगभूत महत्त्व असलेल्या गाय व दूध या घटकांबाबतचं फारसं ज्ञात नसलेलं सत्य सांगणाऱ्या या खुणा आहेत. रवांडातील 70 टक्के लोकसंख्या शेती क्षेत्रामध्ये सक्रिय आहे, त्यामुळे ग्रामीण भागात गाय हे आर्थिक संपत्तीसोबतच सामाजिक स्थानाचंही चिन्ह ठरतं.

रवांडामध्ये कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर, 'गिरा इन्का' (तुम्हाला गाय मिळो) किंवा 'अमाश्यो' (तुम्हाला हजारो गायी लाभोत) असं म्हटलं जातं. यावर प्रतिसाद म्हणून 'अमाशोन्गोरे' (तुम्हाला शेकडो गायी मिळोत) असं म्हटलं जातं. खूप कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर रवांडामध्ये 'न्गुहायेत इन्का' (मी तुम्हाला गाय देते) असं म्हटलं जातं.

रवांडातील अनेक पारंपरिक नृत्यप्रकार गायींपासून स्फूर्ती घेणारे आहेत. रवांडातील बॅले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमुशयायो या नृत्यप्रकारामध्ये स्त्रिया गायींच्या सौम्य हालचालींचं अनुकरण करतात, आणि गायींचं सौंदर्य व डौलही यात दाखवला जातो. इकिन्येमेरा, इगिशकाम्बा व इतर काही नृत्यप्रकारांमध्ये गाय-बैलांची शिंग दाखवण्यासाठी स्त्री-पुरुष त्यांचे हात वर ताणून धरतात.

गायींना इथे इतका आदर दिला जातो की लोक त्यांच्या मुलांची नावंही गायींवरून ठेवतात. आज रवांडामध्ये 'मुन्गान्यिन्का' (गायीइतकी मूल्यवान), कन्याना (गाय वासरू), आणि 'गिरामता' (दूध घ्यावं) ही लोकप्रिय नावं आहेत. दुग्धालयांमध्ये, बाजारपेठांमध्ये किंवा इतरत्र स्त्रियांना 'उफिते अमासो नकायइन्याना' (तुझे डोळे वासरासारखे आहेत) असं म्हटलं तर त्यांच्या चेहऱ्यांवर लाली चढते.

रवांडा कल्चरल हेरिटेज अकॅडमीमध्ये इतिहास व मानवशास्त्राचे संशोधक असणारे मॉरिस मुगाबोवागहुन्दे यांच्या मते, रवांडामध्ये कुटुंबातील अत्यंत महत्वाच्या घटनांची खूण म्हणून गायींची देवाणघेवाण करण्याची पूर्वापार पद्धत आहे.

पारंपरिकरित्या स्त्रीच्या कुटुंबाला हुंडा म्हणून गायी दिल्या जात असत, आणि यातील एखादी गाय वासराला जन्म देईल तेव्हा ते वासरू नवदाम्पत्याला भेट म्हणून दिलं जात असे, जेणेकरून त्या वासराच्या मदतीने त्या जोडप्याला स्वतःचा संसार सुरू करता येईल.

आता ही परंपरा देशातील मोजक्याच भागांमध्ये पाळली जात असली, तरी रवांडातील प्रत्येक पारंपरिक लह्नामध्ये वरपक्षाकडील मंडळी आजही असं म्हणतात, "तुबाहये इश्यो" (आम्ही तुम्हाला हजारो गायी देतो) किंवा "तुबाहये इम्ब्येयी नियायो" (आम्ही तुम्हाला एक गाय आणि तिचं वासरू देतो). हे शब्दशः घडणार नसलं, तरी तसं म्हणायची पद्धत आहे.

पंधराव्या शतकापासून 1954 सालापर्यंत रवांडामध्ये (म्हणजे आजचा रवांडा जिथे आहे त्या प्रदेशामध्ये) गायींचा वापर चलन म्हणूनसुद्धा होत होता, आणि 1954 साली राजा मुटारा तिसरा रुदहिग्वा याने ही पद्धत बंद केली. श्रीमंत कुटुंबांच्या घरांमध्ये काम करणारे 'अबागरागू' (सेवक) आणि 'अबाजा' (सेविका) त्यांच्या गायींची काळजी घेत असत आणि दूध आंबवण्याचं व इतर कामही करत असत. त्यासाठी मोबदला म्हणून सेवक-सेविकांना गायी मिळायच्या.

रवांडामध्ये पूर्वीपासूनच गायीचं दूध प्यायलं जात असलं, तरी इतिहासकाळी दूध ही अत्यंत मूल्यवान गोष्ट असल्यामुळे ते निषिद्ध मानलं जात होतं आणि त्याची विक्री करणं 'शरमे'ची बाबही होती, असं मुगाबोवागाहुन्दे सांगतात.

"सर्वसाधारणतः रवांडामध्ये एक गाय दर दिवशी एक ते दोन लीटर दूध देत असे. तेवढं दूध एका कुटुंबाला पुरण्यासारखं नव्हतं. गायी पोट भरण्यासाठी केवळ गवतावरच विसंबून होत्या, शिवाय आजच्यासारखं गायींना अधिक दूध निर्माण होण्यासाठी इतर काही पूरक अन्न मिळत नव्हतं, हे यामागचं प्रमुख कारण होतं."

त्यामुळे राजा मिबावब्वे गिसानुरा यांच्या आदेशानुसार सतराव्या शतकारंभी गायी व दूध राखून असणारी उच्चभ्रू कुटुंबं त्यांच्याकडील दूध गरीब शेजाऱ्यांसोबत वाटून घेऊ लागली. रवांडामध्ये विसाव्या शतकारंभी दूध विकायला सुरुवात झाली.

त्या वेळी इथे जर्मन साम्राज्याची वसाहत होती. रवांडावासीयांना जर्मन पूर्व आफ्रिकेचा भाग म्हणून रस्ते, शाळा व चर्च बांधम्याकरता दीर्घ अंतर चालत जाणं भाग पडत असे. जर्मनांसोबत प्रवास केलेले युगांडा व टांझानिया इथले व्यापारी मजुरांना दूध विकू लागले.

कामाच्या ठिकाणांजवळ राहणाऱ्या स्थनिकांकडून हे व्यापारी दूध विकत घेत असत आणि आपल्या घरांपासून दूर असणाऱ्या मजुरांना पोषण मिळवण्यासाठी दुधाचा उपयोग होत असे. दूध विकत घेणं किंवा विकणं निषिद्ध नसल्याचं रवांडावासीयांच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी एकमेकांना दूध विकायला सुरुवात केली.

पहिल्यांदा खुल्या मैदानातील बाजारपेठांमध्ये ही विक्री होत असे आणि सुमारे 1907च्या आसपास हेच काम पत्करलेल्या बंदिस्त दुकानांमध्ये दूधविक्री सुरू झाली. आधुनिक काळातील मिल्क-बारचे हे पूर्वसुरी होते.

"राजे रुदहिग्वा यांनी न्याबिसिन्दू दूध प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर दूधविक्रीचा व्यवसाय मोठा झाला. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प होता. ते लोकांकडून दूध विकत घेत, त्याचा साठा करत आणि विक्री करत. त्याचसोबत चीझ व दही यांसारखी इतर दुग्धजन्य उत्पादनही विकली जाऊ लागली," असं मुगाबोवागहुन्दे सांगतात. तरीही, विसाव्या शतकामध्ये बहुतांशाने दुधाचा तुटवडा होता.

1961 सालच्या जोसेफ रवान्यागहुतू यांनी केलेल्या अभ्यासात असं आढळून की, सर्वसामान्य रवांडावासी व्यक्ती वर्षाकाठी केवळ 12 लीटर दूध पिते, याकडे मुगाबोवागहुन्दे लक्ष वेधतात.

"हा तुटवडा 1980 च्या दशकाअखेरीला होलस्टेन फ्रायसियन गुरांसारख्या दुग्धोत्पादनासाठी उपयुक्त सुधारीत गायींची आयात सुरू झाल्यावर कमी होऊ लागला," असा मुगाबोवागहुन्दे म्हणतात. पण दुर्दैवाने 1994च्या जनसंहारात रवांडातील 90 टक्के गुरांची कत्तल झाली.

जनसंहारानंतर किगालीचं अधिकाधिक नागरीकरण झालं आणि राजधानीतील रहिवाशांकडे गायी ठेवण्यासाठी पुरेशी जागा उरली नाही, तेव्हा नागरी रहिवाशांसाठी दुकानांमधील दुधाच्या पावडरींना किंवा पाश्चराइज्ड दुधांना पर्याय म्हणून दुग्धालयं उदयाला येऊ लागली.

पारंपरिकरित्या रवांडावासीयांच्या पसंतीचं कच्च व उकळवलेलं दूध पवित्र मानलं जात असल्यामुळे दारूच्या खोलीपासून दूर ठेवलं जात असे. तर, 1990 च्या दशकाअखेरीला रवांडाने स्वतःची पुनर्उभारणी सुरू केली, तेव्हा आधुनिक दुग्धालयांमध्ये घट्ट असणारं इकिवुगुतो आणि पिवळसर रंगाचं इन्श्युशू हे दुधाचे प्रकार विकले जाऊ लागले आणि दारू मात्र दृष्टीस पडेनाशी झाली.

1998 ते 2000 या काळात दुग्धालयांची संख्या सर्वाधिक राहिली असावी, असा अंदाज मुगाबोवागहुन्दे वर्तवतात. परंतु, रवांडातील गायींबद्दलचं प्रेम दृढ असलं तरी आमच्या इथली ही स्वतंत्र दुग्धालयं हळूहळू लुप्त होत चालली आहेत, कारण अधिकाधिक लोकांनी पाणी मिसळलेल्या, पाश्चराइज्ड दुधांसाठी सुपरमार्केटकडे मोहरा वळवला आहे.

अर्धा लीटर आणि एक लीटर अशा पिशवीबंद रूपात मिळणारं हे दूध इकिवुगुटू आणि इन्श्श्यूपेक्षा जास्त काळ टिकतं. रवांडा सरकारने 2006 साली राष्ट्रव्यापी 'गिरिन्का' (शब्दशः अर्थ- 'तुम्हाला गायी मिळू देत') कार्यक्रम राबवला, त्यामध्ये गरीब कुटुंबांना बालकुपोषणाशी लढण्यासाठी गायी देण्यात आल्या. 2020 सालपर्यंत अंदाजे चार लाख गायींचं वाटप झालेलं होतं. याचा निःसंशयपणे लाभ होत असला, तरी यामुळे रवांडावासीयांच्या बाहेरील दुग्धालयांमधील फेऱ्या स्वाभाविकपणे कमी झाल्या.

किगलीच्या आग्येयेकडील किसुकिरो जिल्ह्यात 'गिरा अमाता' दुग्धालय चालवणाऱ्या यवते मुरेकातेते यांच्या मते, हा व्यवसाय आता नफादायक उरलेला नाही. मुरेकातेते यांनी 2009 साली दुग्धालय सुरू केलं, पण आता ग्राहक दुकानांमधील पाश्चराइज्ड दुधाला पसंती देत असल्याचं त्या सांगतात. त्याचप्रमाणे रवांडातील इन्यान्ज इंडस्ट्रीजने

2013 सालापासून किगालीमध्ये सुरू केलेल्या दुग्धालयांच्या साखळीकडे ग्राहक वळले आहेत. अशा दुकानांची संख्या आता जवळपास 80 झाली आहे. कमी झालेल्या नफ्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक स्वतंत्र दुग्धालय मालकांनी अन्नपदार्ध विकायला आणि स्वतःला व्यवसाय सुपरमार्केटमध्ये किंवा कॉफी-शॉपमध्ये रूपांतरित करायला सुरुवात केली आहे, असं मुरेकातेते सांगतात.

आज सरकारकडून रवांडावासीयांना त्यांची गुरं निवासी भागांपासून दूर केवळ गुरांना वाहिलेल्या मोठ्या शेतांमध्ये पाळावीत यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. हरितवायू उत्सर्जन कमी करण्यासाठी ही शून्य-कुरण व्यवस्थेची तजवीज केली जाते आहे. आता मोजकेच लोक घरांमध्ये गायी पाळत असल्यामुळे दुधाची किंमत वाढली आहे. तरीही, मुरेकातेते व गतिकाबिसी यांच्यासारखे लोक सर्व गरजूंना दूध उपलब्ध होईल याची काळजी घेतात.

गटिकाबिसी रोज सकाळी सहा वाजता कुरुहिम्बी दुग्धालय उघडतात आणि नऊ वाजेपर्यंत ते जवळपास पूर्ण भरलेलं असतं. कच्च्या दुधाने भरलेली धातूची दोन पिंपं साकलवरून येतात तेव्हासुद्धा असंच घडतं. काही दूध किरुहिम्बीतल्या कूलरमध्ये ठेवलं जातं आणि ते दुसऱ्या दिवळी उकळवलं जातं. उर्वरित दूध मात्र लगेचच उकळवलं जातं. रात्रीपर्यंत थंड झालेल्या या दुधातील साय काढून ते कंटेनरमध्ये ठेवलं जातं.

दूध आंबवण्याकरता थोडसं आधीच आंबलेलं दूध (इम्वुझो) त्यात घातलं जातं. मग आंबण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी हे दूध रात्रभर उबदार जागी ठेवलं जातं. सकाळी घट्ट झालेलं इकिवुगुटो फ्रिजमध्ये ठेवलं जातं आणि ते ग्राहकांना थंडच स्वरपात दिलं जातं.

घरातील दूध ठेवण्याच्या कठड्याला "उरुहिम्बी" असं म्हणतात आणि आपल्याला कुरुहिम्बी दुग्धालयाचं नाव त्यावरूनच ठेवायचं होतं, असं गटिकाबिसी सांगतात. आपल्या दुग्धालयात कधीही आलं तरी ताजं दूध मिळतं, हे परिसरातील प्रत्येक व्यक्तीला कळावं, हा त्यांचा यामागील उद्देश होता.

गेली दोन वर्षं जवळपास रोज कुरुहिम्बीमध्ये येणारे पास्कल कुब्विमाना हे टॅक्सी-चालर म्हणतात की, ते कायम इथेच येत राहणार आहेत. "मला इथलं दूध आवडतं," असं सांगत ते चपाती आणि डाळ गरम दुधासोबत खातात. "नाश्त्याला हे खाल्ल्यावर मला दिवसभर बरं वाटतं. मी थोडं दूध संध्याकाळी घरीसुद्धा नेतो. माझ्या मुलांना ते आवडतं."

अशीच भावना कुरुहिम्बीमध्ये निमितपणे येणाऱ्या डोमिनिक दुशिमिमाना यांनीसुद्धा व्यक्त केली. दुग्धालयात वेळ घालवल्यामुळे आपल्याला कामाच्या दबावांपासून मुक्तता मिळते, असं ते सांगतात.

दुधात पाणी किंवा इतर काही घटक न मिसळल्यामुळे लोकांना इथलं दूध आवडतं, असं गटिकाबिसी मानतात. शिवाय, कुरुहिम्बीमध्ये चपाती व डोनटही तयार केले जातात, आणि ते थंड व आंबलेल्या इकिवुकुटोसोबत आणि उकळवलेल्या इन्श्युश्यसोबतही चालतात.

"दूध पवित्र आहे, त्यामुळे मला या व्यवसायात असल्याचा अभिमान वाटतो," असं गटिकाबिसी सांगतात. "मला काही खूप नफा कमावता येतो असं नाही, पण मला दुधाचा व्यवसाय करायला आवडतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)