धर्मगुरूंकडून 1950 पासून 2,16,000 जणांवर लैंगिक अत्याचार'

लैंगिक अत्याचार, चर्च, फ्रान्स, फ्रेंच

फोटो स्रोत, Getty Images

फ्रान्समध्ये 1950 पासून जवळपास 2 लाख 16 हजार लहान मुलं कॅथलिक पाद्र्यांच्या लैंगिक अत्याचाराचे बळी ठरले आहेत. चर्च सदस्यांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकानं याबाबत माहिती दिली.

चर्चच्या इतर सदस्यांनीही केलेल्या अत्याचारांचा समावेश केल्यास पीडितांची संख्या 3 लाख 30 हजारांपर्यंत जाऊ शकते.

जीन मार्क सोव हे या तपास पथकाचे प्रमुख आहेत. फ्रेंच कॅथलिक चर्चमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अहवाल प्रसिद्ध करताना ते बोलत होते.

चौकशी आयोगाचा अहवाल अडीच हजार पानांचा आहे.

या चौकशी आयोगाला अत्याचार करणाऱ्या 1 लाख 15 हजार पाद्री आणि इतर जणांपैकी 2900 ते 3200 जणांविरोधात पुरावे सापडले आहेत. पीडितांमध्ये किशोरवयीन मुलांचा अधिक समावेश असून, त्यांची सामाजिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे.

हा अहवाल म्हणजे फ्रान्सच्या इतिहासातील महत्त्वाचं वळण असल्याचं एका पीडितानं म्हटलं.

फ्रान्समधील या घटना म्हणजे रोमन कॅथलिक चर्चला मिळालेला नवा धक्का मानला जातोय. आधीच जगभरातील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी चर्चला धक्के बसलेच आहेत.

जीन मार्क सोव

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चौकशी आयोगाचे प्रमुख जीन मार्क सोव

फ्रेंच कॅथलिक चर्चनं 2018 साली ही चौकशी सुरू केली होती. कोर्ट, पोलीस आणि चर्च यांच्या नोंदी तपासून, पीडित आणि साक्षीदारांशी बोलून, हा अहवाल तयार करण्यात आला. या चौकशीला जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागला.

जीन मार्क सोव हे वरिष्ठ अधिकारी असून, त्यांनी सांगितलं की, "2000 सालापर्यंत कॅथलिक चर्चनं पीडितांप्रती अत्यंत उदासीन भावना दाखवली."

"कॅथलिक चर्च हे कुटुंब आणि मित्र परिवार वगळता, लैंगिक अत्याचाराची सर्वाधिक शक्यता असलेलं वातावरणाचं ठिकाण आहे," असंही या अहवालात म्हटलंय.

बीबीसीचे ह्युज शोफिल्ड सांगतात की, अहवालातील नोंदी पचवणं फार कठीण असेल आणि फ्रान्समधील लोकांना त्रासदायकही असतील.

यातली अनेक प्रकरणं फार जुनी असल्यानं फ्रेंच कायद्याअंतर्गत खटला चालवण्यात अडचणीच्या ठरू शकतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)