तालिबानच्या राजवटीत एका बाळाला जन्म देणं किती वेदनादायी?

    • Author, इलानी जंग, हाफिज़ुल्लाह मारूफ
    • Role, बीबीसी

राबियाने तिच्या नवजात बाळाला मांडीवर घेतलं आणि त्याला हळूहळू कुरवाळत आहे. अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील नंगरहार प्रांतातील एका छोट्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच राबियाने या बाळाला जन्म दिला.

राबिया म्हणाली, "हे माझं तिसरं मूल आहे, पण यावेळी अनुभव पूर्णपणे वेगळा होता. यावेळी सर्वकाही भीतीदायक होतं."

रबियाने ज्या रुग्णालयाच्या प्रसूती विभागात बाळाला जन्म दिला त्याठिकाणी आता मूलभूत सुविधाही नाहीत. बाळाच्या जन्माच्या वेळी राबियाला वेदना कमी करण्याची गोळी किंवा इतर कोणतंही औषध देण्यात आलं नाही. एवढंच नाही तर त्यांना अन्नही दिलं गेलं नाही.

रुग्णालयातील तापमान 43 अंश सेंटीग्रेडपर्यंत पोहोचलं होतं. वीज खंडित झाली होती आणि जनरेटर चालवण्यासाठी तेलही नव्हतं.

रबियाच्या बाळाच्या जन्मावेळी सोबत असलेली आरोग्य सेविका आबिदा सांगते, "अंघोळ करताना शरीरावरुन पाणी वाहतं त्याप्रमाणे आमच्या शरीरातून घाम गळत होता."

मोबाइल फोनच्या लाइट्समध्ये तिने बाळाच्या जन्मासाठीची वैद्यकीय प्रक्रिया केली. न थकता. न थांबता. अशा परिस्थितीतही राबियाने सुदृढ बाळाला जन्म दिल्याने तिला भाग्यवान मानलं जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बाळाला जन्म देताना प्रसूतीदरम्यान होणारा मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूच्या बाबतीत अफगाणिस्तानची परिस्थिती जगात सर्वाधिक वाईट आहे.

प्रति लाख मुलांच्या जन्मादरम्यान इथे 638 महिलांचा मृत्यू होतो. पूर्वी परिस्थिती आणखी वाईट होती. 2001 च्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर परिस्थिती सुधारली, पण आता पुन्हा अडचणी वाढत आहेत.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन्स फंडच्या (यूएनएफपीए) कार्यकारी संचालक नतालिया कनम सांगतात, "आता निराशा वाढत आहे. मी त्यांचं दु:ख समजू शकते."

तज्ज्ञांचा अंदाज

याठिकाणी महिला आणि मुलींना तत्काळ मदत केली गेली नाही तर 2025 पर्यंत प्रसूतीदरम्यान 51 हजार अतिरिक्त मृत्यू होऊ शकतात, असा अंदाज यूएनएफपीएने वर्तवला आहे. सुमारे 48 हजार मुली गरोदर राहू शकतात आणि याहून दुप्पट लोकांना कुटुंब नियोजनाच्या सुविधा मिळू शकणार नाहीत.

सार्वजनिक आरोग्य प्रमुख डॉ. वाहिद मजरूह म्हणाले, "संपूर्ण अफगाणिस्तानात प्राथमिक आरोग्य सेवा ढासळत आहे. दुर्दैवाने बाळंतपणाच्या काळात मृत्यूचे प्रमाण आणि मुलांचा मृत्यूदर वाढेल."

तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यापासून डॉ. मजरूह हे एकमेव अधिकारी आहेत ज्यांचं पद सुरक्षित राहिलं आहे. अफगाणिस्तानातील लोकांच्या आरोग्यासाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असल्याचं ते सांगतात. पण त्यांच्यासमोर डोंगराएवढ्या समस्या आहेत.

अफगाणिस्तान सध्या उर्वरित जगापासून दूर झाला आहे. परदेशी सैन्य परतल्यानंतर तालिबानने सत्ता मिळवली आणि अफगाणिस्तानला मिळणाऱ्या परदेशी मदतीवर बंदी घालण्यात आली.

अफगाणिस्तानची आरोग्य सेवा प्रणाली (आरोग्य सेवा) केवळ बाहेरील मदतीच्या आधारे टिकून आहे.

अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देश आणि जागतिक आरोग्य संघटना यांसारखे समूह तालिबानला निधी पुरवणं आणि काबूल विमानतळावरील गोंधळाच्या परिस्थितीमुळे वैद्यकीय साहित्य पाठवणं कठीण असल्याचं सांगत आहेत.

कोरोना आरोग्य संकटामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. "कोव्हिडच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही कोणतीही तयारी नसल्याचं डॉ. मजरूह सांगतात.

आबिदा ज्या रुग्णालयात काम करते तिथे निधी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा सुरू नाहीत. त्यांच्याकडे तेल विकत घेण्यासाठीही पैसे नाहीत.

आबिदा सांगते, "काही दिवसांपूर्वी एका रात्री महिलेला अॅम्ब्युलन्सची गरज होती. त्यांना खूप वेदना होत होत्या. आम्ही टॅक्सीने जाण्यास सांगितलं पण गाडी मिळत नव्हती."

ती पुढे म्हणाली, "त्यांना गाडी सापडली तेव्हा खूप उशीर झाला होता. त्यांनी गाडीतच बाळाला जन्म दिला आणि कित्येक तास त्या बेशुद्ध होत्या. कडक उन्हाळा असल्याने त्यांना जास्त त्रास होत होता. त्या जीवंत राहणार नाहीत असंही आम्हाला वाटलं. बाळाची अवस्थाही नाजूक होती. आम्ही काहीच करू शकलो नाही."

सुदैवाने ती महिला आणि तिचं नवजात बाळ वाचलं. काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवलं आणि मग डिस्चार्ज देण्यात आला.

डॉ. कानम सांगतात, "आम्ही आरोग्य सेवा सुधारण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहोत, पण आम्हाला पैशांची गरज आहे. काही आठवड्यांपूर्वीच्या नाट्यमय घटनांआधीही दर दोन तासांनी प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू होत असे."

मदतीची गरज

यूएनएफपीएने अफगाण महिला आणि मुलींसाठी 2.92 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत मागितली आहे. आरोग्य सेवेसाठी आवश्यक असलेल्या वस्तू येण्याची परवानगी दिली जाईल आणि मोबाइल हेल्थ क्लिनिक तैनात केले जातील असा विश्वास संघटनेला वाटतो.

बालविवाह होण्याचं प्रमाण वाढल्याने मुलांच्या जन्मावेळी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आणखी वाढू शकतं अशी भीती सुद्धा यूएनएफपीएला आहे.

डॉ. कानम यांनी सांगितलं, "वय लहान असताना मुलगी आई झाली तर बरं होण्याची शक्यता कमी होते."

तालिबानची सत्ता येण्याआधीही याठिकाणी आरोग्य व्यवस्था बिकट होती पण महिलांवर आता नवीन निर्बंध लादल्याने परिस्थिती आणखी वाईट बनली आहे.

तालिबानने महिलांना नकाब आणि बुरखा घालून चेहरा झाकण्यास सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला रुग्णांचा उपचार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनीच केला पाहिजे असंही तालिबानने स्पष्ट केलं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका दाईंनी बीबीसीला सांगितलं की, एका महिला रुग्णावर पुरुष डॉक्टरने एकांतात उपचार केल्याने तालिबानने त्याला मारहाण केली.

त्यांनी सांगितलं, "एखाद्या महिलेवर उपचार करण्यासाठी महिला डॉक्टर उपलब्ध नसतील तर पुरुष डॉक्टर एक किंवा दोन जणांच्या उपस्थितीतच उपचार करू शकतो."

पुरुष नातेवाईकाला सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका असंही महिलांना सांगण्यात आलं आहे.

नंगरहार प्रांतात राहणारी जर्मीना म्हणली, "माझा नवरा गरीब आहे. ते आमच्या मुलांचं संगोपन करण्यासाठी कामात असतात. मी त्यांना माझ्याबरोबर दवाखान्यात येण्यास का सांगू?"

उपचारासाठी केवळ पुरुषांना सोबत घेऊन येण्याच्या अटीमुळे अनेक महिलांना वेळेत आरोग्य सुविधा मिळू शकणार नाही असं आबिदा सांगतात. तसंच महिला आरोग्य कर्मचारी सुद्धा यामुळे कामावर पोहचू शकणार नाहीत.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अफगाणिस्तानात दर 10 हजार लोकांमागे 4.6 डॉक्टर, परिचारिका आणि दाई आहेत. आरोग्य तज्ज्ञांनुसार जो दर सर्वाधिक गंभीर मानला जातो त्या तुलनेतही आकडेवारी पाच पट कमी आहे.

तालिबानच्या सत्तेत हा आकडा आणखी खालवणार असं मानलं जात आहे. अनेकांनी तर आता काम करणंही बंद केलं आहे. तर अनेकजण देश सोडून बाहेर गेलेत.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तालिबानने महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितलं. डॉ. मजरूह सांगतात, "विश्वास प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागेल."

'अत्यंत वाईट परिस्थिती'

सरकारी आरोग्य सेविकांना तीन महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही. अबिदा त्यापैकी एक आहे. तरीही पुढील दोन महिन्यांपर्यंत विनावेतन काम करत राहण्याविषयी ती बोलते.

विमेन्स राइट्स विंग ऑफ ह्युमन राइट्स वॉच'चे सहयोगी संचालक हैदर बार सांगतात, "अफगाणिस्तानातील लोक संघर्षादरम्यान होणाऱ्या मृत्यूंबद्दल अनेकदा चर्चा करताना दिसतात परंतु प्रसूतीदरम्यान होणाऱ्या महिलांच्या आणि बाळाच्या मृत्यूविषयी फार चर्चा केली जात नाही. खरं तर अनेक मृत्यू टाळता येऊ शकतात."

त्यांनी मे महिन्यात काबूलचा दौरा केला. अनेक महिलांना बाळाला जन्मदेण्यापूर्वी सामान स्वत:लाच खरेदी करावं लागलं असं त्या सांगतात.

जर्मीना सांगते, आता तर परिस्थिती आणखी चिंताजनक आहे. "मी अनेक गरोदर महिलांना एका औषधासाठी दिवसभर दवाखान्याबाहेर उभं राहिलेलं पाहिलं आहे. रुग्णालयाऐवजी मी घरी आपल्या बाळाला जन्म देणं पसंत करेन. कारण रुग्णालयात काहीच सुविधा नाहीत."

28 वर्षीय लिना सांगते, "तालिबान सत्तेत येण्यापूर्वी डॉक्टरांनी मला मी कुपोषित असल्याचं सांगितलं. मी गरोदर आहे. माझ्यात रक्ताची कमतरता आहे."

तालिबान सत्तेत आल्यानंतर त्यांच्या पतीची नोकरी गेली. पैशांची कमी असल्याने आणि तालिबानची दहशत असल्याने त्या पुन्हा रुग्णालयात गेल्याच नाहीत.

काही काळाने प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिचा पती तिला 'गाढवावर बसवून दवाखान्यात घेऊन गेला.'

त्या सांगतात, "एका दाईंनी माझ्या बाळाला जन्म दिला. बाळाचं वजन कमी होतं."

लीना आता घरी परतल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पैशांचा अभाव असल्याने बाळाला कसं सांभळणार याची चिंता त्यांना सतावते.

अफगाणिस्तानातील जनतेला याची भीती आहे की देशाची आरोग्य व्यवस्था आता अशा टप्प्यावर येऊन पोहचेल जिथे सुधारण्याची शक्यताही धूसर होईल. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका गरोदर महिला, नवजात बालकं आणि लहान मुलांना बसू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)