अफगाणी महिलांना चारचौघांत स्वतःचं नाव सांगण्यासाठी का करावा लागतोय संघर्ष?

    • Author, महजूबा नौरोजी
    • Role, बीबीसी अफगाण सर्व्हिस

अफगाणिस्तानात महिलांचा एक वेगळाच संघर्ष सुरू आहे. परपुरूषाला स्वतःचं नाव सांगण्याचं स्वातंत्र्य या स्त्रियांना हवंय.

ऐकायला विचित्र वाटेल पण अफगाणिस्तानात स्त्रियांनी परपुरुषाला स्वतःचं नाव सांगणं संस्कृतीविरोधी मानलं जातं. याविरोधात तिथल्या महिलांनी WhereIsMyName? ही मोहीम उघडली आहे.

राबिया (नाव बदललेलं आहे). अफगाणिस्तानातल्या पश्चिमेकडच्या हेरत प्रांतात राहणाऱ्या राबियाला ताप होता. ती डॉक्टरांकडे गेली.

तिला कोव्हिड-19 आजार झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं.

तापाने फणफणलेली आणि अंगदुखीने बेजार राबिया घरी परतली. डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन नवऱ्याच्या हातात ठेवत औषधं आणायला सांगितली.

नवऱ्याने प्रिस्क्रिप्शन बघितलं तर त्यावर राबियाचं नाव लिहिलं होतं. तिचं नाव बघून नवरा भलताच संतापला आणि त्याने राबियाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

राबियाचा गुन्हा एवढाच की, तिने तिचं नाव डॉक्टरला म्हणजे एका परपुरूषाला सांगितलं होतं.

अफगाणिस्तानात स्त्रियांनी स्वतःचं नाव परपुरषाला सांगू नये, अशी प्रथा आहे. या कुप्रथेविरोधात अफगाणिस्तानात आता विरोधाचे स्वर उमटू लागले आहेत.

#WhereIsMyName?

ही समस्या मुलीच्या जन्मासोबतच सुरू होते. मुलीच्या जन्मानंतर अनेक वर्ष तिला नावच नसतं. लग्नाच्या वेळी लग्न पत्रिकेवर वधूचं नाव छापलं जात नाही. ती आजारी पडली तर डॉक्टरांच्या प्रिस्किप्शनवर तिचं नाव नसतं. इतकंच कशाला स्त्रिच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यू प्रमाणपत्रावर आणि तिच्या कबरीवरही तिचं नाव लिहिलं जात नाही.

मात्र, मोकळेपणाने आपलं नाव वापरता यावं, यासाठी अफगाणिस्तानातल्या काही स्त्रियांनी Whre is my name? या नावाने मोहीम उघडली आहे. अफगाणिस्तानात अनेक ठिकाणी WhereIsMyName? ची पोस्टर्स दिसतात. सोशल मीडियावरही या मोहिमेची चर्चा आहे.

खोट्या प्रतिष्ठेचा पगडा

राबिया राहते त्याच भागात राहणाऱ्या एका महिलेशी आम्ही बोललो. तिनेही स्वतःचं नाव सांगायला नकार दिला. ती या प्रथेचं समर्थन करते.

बीबीसीशी बोलताना ती म्हणाली, "मला कुणी माझं नाव विचारतं तेव्हा मला माझ्या भावाच्या, वडिलांच्या आणि नवऱ्याच्या प्रतिष्ठेचा विचार करावा लागतो आणि मग मी नाव सांगत नाही."

"मी माझ्या कुटुंबाला नाराज का करू? नाव सांगण्यात काय अर्थ आहे?"

"माझ्या वडिलांची मुलगी, माझ्या भावाची बहीण, भविष्यात नवऱ्याची बायको आणि मुलांची आई, हीच माझी ओळख मला प्रिय आहे."

ऐकून आश्चर्याचा धक्का बसतो. पण, ही एखाद-दुसऱ्या स्त्रीची कहाणी नाही. इथे अनेकींना असंच वाटतं.

अफगाणिस्तानातल्या अनेक भागात स्त्रीने स्वतःचं नाव सांगणं तुच्छ किंवा कुटुंबाचा अनादर करणारं मानलं जातं.

अनेक पुरूषसुद्धा चारचौघात आई, बहीण, मुलगी किंवा बायकोचं नाव घेत नाहीत. घरातल्या स्त्रीचं नाव घेणं कुटुंबाचा अपमान मानलं जातं.

मग एखाद्या स्त्रीविषयी बोलायचं असेल तर काय म्हणतात? अफगाणिस्तानात एखाद्या स्त्रीला संबोधायचं असेल तर कुटुंबप्रमुखामाची मुलगी, बायको, बहीण अशा नावाने तिला हाक मारली जाते.

मुलीच्या जन्मदाखल्यावरही केवळ वडिलांचंच नाव टाकण्याचा दंडक आहे. कायदाही जन्मदाखल्यावर केवळ पित्याचंच नाव टाकायला सांगतो.

वडील म्हणून जबाबदारी पार पाडतात का?

नाव न सांगण्याने व्यावहारिक जीवनात अडचणी तर येतातच. मात्र, याचे भावनिक पडसादही उमटत असतात.

फरिदा सदात… अफगाणी स्त्री. खूप लहान वयात फरिदाचं लग्न झालं. 15 व्या वर्षी आई झाली. पुढे या जोडप्याला चार मुलं झाली. मात्र, त्यानंतर तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. आज ती आपल्या चार मुलांसोबत जर्मनीत राहते.

फरिदा सांगते तिचा नवरा त्याच्या मुलांच्या आयुष्याचा भाग कधीच नव्हता. वडील म्हणून शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या त्याने मुलांसोबत कधीच वेळ घालवला नाही.

त्यामुळे मुलांच्या कुठल्याही प्रकारच्या ओळखपत्रावर वडील म्हणून नाव लिहिण्याचा त्याला अधिकार नाही, असं फरिदाचं म्हणणं आहे.

"माझ्या मुलांचं संगोपन मी एकटीने केलं आहे. मला दुसरं लग्न करता येऊ नये, म्हणून माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट द्यायलाही नकार दिला होता."

"आता मी माझ्या मुलांच्या ओळखपत्रांवरून त्याचं नाव काढलं आहे. अफगाणिस्तानात माझ्या नवऱ्यासारखे अनेक पुरुष आहेत ज्यांना एकाहून जास्त बायका आहेत. पण वडील म्हणून मुलं सांभाळायाची त्यांचीही जबाबदारी असेत, हे त्यांच्या गावीही नाही."

"मी अफगाणिस्तानच्या अध्यक्षांना पत्र लिहून कायदा बदलण्याची आणि यापुढे मुलांच्या जन्म दाखल्यावर आणि इतर ओळखपत्रांवर आईचं नाव टाकण्याची विनंती केली आहे."

स्त्री हक्काची मोहीम

तीन वर्षांपूर्वी 28 वर्षांच्या एका तरुणीला वाटलं, "हे असंच सुरू राहू शकत नाही."

लालेह ओसमानी असं तिचं नाव. लालेहदेखील हेरत प्रांतातलीच. नाव न सांगण्याच्या प्रथेचा तिला इतका तिटकारा वाटला की तिने WhereIsMyName? ही मोहीमच सुरू केली.

स्वतःचं नाव मोकळेपणाने सांगता येणं अत्यंत मूलभूत अधिकार असल्याचं ती म्हणते.

बीबीसी अफगाण सेवेशी बोलताना लालेह म्हणाली आम्हाला अफगाणिस्तानातल्या स्त्रियांसमोर केवळ एकच प्रश्न उपस्थित करायचा होता. अफगाणिस्तानच्या स्त्रियांना त्यांची ओळख का नाकारली जाते?

"बाळाच्या जन्मदाखल्यावर वडिलांसोबतच आईचंही नाव टाकण्यासाठी अफगाण सरकारचं मन वळवण्याच्या आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी सुरू केलेली ही मोहीम एक-एक पाऊल पुढे सरकत आहे."

लालेह सांगते, "बीबीसी अफगाण सेवेने नुकतंच याविषयी जे वार्तांकन केलं त्याची दखल घेत अफगाणिस्तान संसदेतल्या प्रतिनिधी मरियम सामा यांनी सभागृहात या मोहिमेविषयी माहिती दिली."

जन्मदाखल्यावर आईचंही नाव जोडावं, अशी मागणी मरियम सामा यांनी सभागृहात केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यास अनेकांनी होकार दिल्याची माहिती त्यांनी ट्वीटवरून दिली.

विरोधाचा सामना

लालेह ओसमानीने बीबीसीला दिलेली मुलाखत फेसबुकवर अपलोड केल्यावर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. यातल्या काहींनी लालेहच्या मोहिमेचं समर्थन केलं. मात्र, बऱ्याच जणांनी तिच्यावर टीका केली.

यापुढे नातलगांची नावंही जन्मदाखल्यावर टाकण्याची मागणी ओसमानी करेल, अशी थट्टाही काहींनी केली.

तर कुटुंबातली शांतता सर्वात महत्त्वाची असल्याचं म्हणत एकाने, 'तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम तपासा,' असा सल्ला दिला.

तर काहींनी अतिशय खालच्या थराला जाऊन टीका केली.

ही मुलगी बाळाच्या जन्मदाखल्यावर आईच्या नावाचा आग्रह धरतेय कारण तिच्या बाळाचे वडील कोण, हे तिलाच माहिती नाही, अशी घाणेरडी टीकाही अनेकांनी केली.

अशा प्रतिक्रियांमुळे ओसमानी काहीशी दुखावली आहे. तिला दुःख याचं नाही की लोक तिला वाईट-साईट बोलले. पण, अफगाणिस्तानातली तरुणपिढी जी तुलनेने जास्त शिकलेली आणि सुशिक्षित समजली जाते त्या पिढीचे हे विचार निराश करणारे असल्याचं तिचं म्हणणं आहे.

सेलिब्रिटींचा पाठिंबा

अफगाणिस्तानतल्या काही लोकप्रिय कलावंत आणि सेलिब्रिटीजने ओसमानीच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. गायक आणि संगीतकार फरहाद दारिया आणि गायिका-गीतकार आरियाना सईद यांनी तर अगदी सुरुवातीच्या काळापासून या मोहिमेचं समर्थन केलं आहे.

या मोहिमेला पाठिंबा देताना फरहाद दारिया म्हणतात, "एखाद्याची आई, बहीण, मुलगी किंवा बायको असणं ही भूमिका आहे. ही काही व्यक्तीची ओळख असू शकत नाही."

"आपण एखाद्या स्त्रिला तिच्या नात्यामुळे ओळखतो तेव्हा तिची स्वतःची खरी आणि वास्तविक ओळख हरवून जाते."

तर आपण या मोहिमेला पाठिंबा दिला असला तरी ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता फार मोठा आणि खडतर असल्याचं गायिका आणि स्त्री हक्क कार्यकर्त्या आरियाना सईद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

'सूर्य आणि चंद्रानेही तिला बघितलेलं नाही'

अफगाणिस्तानातले समाजशास्त्रज्ञ अली कावेह सांगतात, "अफगाणिस्तानातला समाज हा पितृसत्ताक आहे. इथे पुरूषी प्रतिष्ठा स्त्रिला केवळ तिचं संपूर्ण शरीर लपवून ठेवायला बाध्य करत नाही तर स्वतःचं नाव लपवण्यासही भाग पाडते."

ते पुढे सांगतात, "अफगाणी समाजात उत्तम स्त्री म्हणजे अशी स्त्री जिला कधीही कुणी ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं नाही. तशी एक म्हणही आहे - 'सूर्य आणि चंद्रानेही तिला बघितलेलं नाही.'"

"अफगाणी समाजात कठोर आणि कणखर पुरुषांकडे आदराने बघितलं जातं. मात्र, घरातली स्त्री उदार मतांची असेल तर त्यांना लबाड आणि अप्रामाणिक मानलं जातं."

मूळच्या अफगाणिस्तानच्या असणाऱ्या वैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि युकेतल्या सरे टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये आपल्या अभिनव प्रयोगासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शखारदोख्त जाफरी यांच्या मते अफगाणिस्तानातल्या स्त्रीला आर्थिक, सामाजिक आणि भावनिक स्वातंत्र्य मिळालं तरच तिला स्वतःची ओळख मिळू शकते.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रात महिलांना त्यांची ओळख नाकारणाऱ्यांविरोधात सरकारने कारवाई करायला हवी."

अफगाणिस्तानात जवळपास दोन दशकांपूर्वी तालिबानचा पाडाव झाला. तेव्हापासून अफगाणिस्तानातल्या स्त्रिला सार्वजनिक जीवनात स्थान मिळावं, यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायांकडून प्रयत्न सुरू आहेत. असं असलं तरी राबियासारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांना डॉक्टरला स्वतःचं नाव सांगितलं म्हणून नवरा बेदम मारहाण करतो.

जाफरी यांच्या मते अफगाणिस्तानसारख्या अत्यंत रुढीवादी आणि पुरुषसत्ताक समाजात नागरी चळवळीतून बदल घडू शकत नसेल तर सरकारने पुढे येत स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कठोर कायदेशीर पावलं उचलायला हवी.

अफगाणिस्तानच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, त्याला सर्व सदस्य पाठिंबा देतात का आणि त्यानुसार अफगाणी स्त्रीला स्वतःचं नाव मोकळेपणाने वापरण्याचं स्वातंत्र्य मिळतं का, हे बघावं लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)