हमीद करझाईंनी तालिबान, मुजाहिदीन आणि अमेरिका या तिघांशीही कसं जुळवून घेतलं?

फोटो स्रोत, AFP
- Author, ग्रिगोर एटानेस्यान,
- Role, बीबीसी न्यूज
तालिबानी काबूलमध्ये दाखल होण्यापूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देश सोडून गेले. पण गेली दोन दशकं अफगाणिस्तानातील सर्वांत लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जाणारे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई मात्र काबूलमध्येच आहेत.
तालिबानने अनेक वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे, या पार्श्वभूमीवर करझाईंनी तिथेच थांबणं महत्त्वाचं ठरतं. गतकाळात करझाईंना लक्ष्य करणाऱ्या तालिबानी हल्ल्यांमध्ये त्यांचे अनेक जवळचे सहकारी मरण पावले आहेत.
ऐंशीच्या दशकात करझाई सोव्हिएत फौजांशी लढले. नव्वदीच्या दशकात ते मुजाहिदिनांच्या सरकारमध्ये सामील झाले. नंतर त्यांनी तालिबानचंही समर्थन केलं होतं. पण तालिबानने त्यांच्या वडिलांची हत्या केल्यावर त्यांची भूमिका बदलली.
तालिबानचा पराभव झाल्यावर अमेरिकेच्या पाठिंब्यावर करझाईंनी अफगाणिस्तानमधील कारभाराची धुरा सांभाळली. पण कालांतराने ते अमेरिकेच्या मनातून उतरले.
काही दिवसांपूर्वी, 15 ऑगस्टला तालिबानी काबूलमध्ये प्रवेश करत होते, तेव्हा परदेशी सैनिक व नागरिक, राजनैतिक अधिकारी व मोठ्या संख्येने अफगाणी लोक घाईगडबडीने विमानतळाकडे जाऊन देश सोडण्याच्या प्रयत्नात होते.
या विमानतळाला माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचं नाव देण्यात आलेलं आहे.
पण स्वतः करझाईंनी मात्र त्याच शहरात व देशात राहण्याचा निर्णय घेतला.
तालिबान व मुजाहिदीन यांची संगत
हमीद करझाई पुश्तूंमधील दुर्रानी कबिल्यामधील आहेत. या कबिल्याला पोपलझाईसुद्धा म्हणतात. अफगाणिस्तानच्या एकीकरणामध्ये त्यांच्या कबिल्याची प्रमुख भूमिका राहिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या कबिल्याचे नेते अहमद शाह दुर्रानी हे अफगाणिस्तानावर राज्य करणाऱ्या दुर्रानी साम्राज्याचे पहिले राज्यकर्ते होते. त्यांनी 1747 ली कंदहार इथे त्यांच्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.
हमीद करझाई यांचे वडील अब्दुल अहद करझाई शेवटचे अफगाणी बादशाह जाहीर शाह यांचे जवळचे सहकारी होते. ते अफगाणी संसदेचे उपाध्यक्षसुद्धा होते. हमीद करझाई यांचा कल राजेशाहीच्या दिशेने होता. सत्तेत आल्यावर त्यांनी राजेशाहीचा झेंडा पुन्हा प्रस्थापित केला आणि जाहीर शाह यांना 'राष्ट्रपिता' हा दर्जा दिला.
सोव्हिएत फौजा अफगाणिस्तानात पोचल्या तेव्हा करझाई कुटुंबीय पाकिस्तानातील क्वेटा शहरात निघून गेले. तिथून त्यांनी सोव्हिएत संघाला विरोध सुरू ठेवला.
कालांतराने हमीद करझाई मुजाहिदीनांच्या एका संघटनेमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष लढाईत सहभाग घेतला नाही, पण ते या संघटनेसाठी माध्यम-सचिव व दुभाषा अशी भूमिका पार पाडत असत. त्यांचं शिक्षण भारतात झालं. हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, फ्रेंच, पुश्तू व दारी या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे.
सन 1992 मध्ये रशियाचे राष्ट्रपती बोरीस येल्तसिन यांनी अफगाणिस्तानच्या तत्कालीन कम्युनिस्ट राजवटीला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवला, त्यानंतर मुजाहिदीनांनी काबूलवर ताबा मिळवला.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नजीबुल्लाह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात आश्रय घेतला. तालिबानने त्यांची हत्या करून त्यांचं शव राष्ट्राध्यक्ष भवनाच्या बाहेर सिग्नलपाशी लटकावलं होतं.

फोटो स्रोत, Reuters
मुजाहिदीनांच्या सरकारमध्ये हमीद करझाई उप-परराष्ट्र मंत्री होते. पण वेगवेगळ्या गटांमध्ये वाद झाल्यामुळे करझाईंना काबूल सोडून जावं लागलं.
1996 साली तालिबान्यांनी सत्ता काबीज केली तेव्हा करझाई पाकिस्तानात त्यांच्या वडिलांच्या घरी होते. अफगाणिस्तानातील नवीन राज्यकर्त्यांबाबत त्यांना सहानुभूती वाटत होती. एका टप्प्यावर त्यांना तालिबानचे संयुक्त राष्ट्रांमधील अनौपचारिक राजदूत म्हणून पाठवण्याचाही विचार झाला.
हमीद करझाई यांनी 1998 साली म्हटलं होतं की, "तालिबानमध्ये काही चांगले लोक आहेत. अनेक उदारमतवादी व देशभक्त लोक त्यांच्यात आहेत. पण अरबांनी व पाकिस्तान्यांनी त्यांना बिघडवलं."
तालिबान्यांविरोधात पाश्चात्त्य शक्तींना दिलेली साथ
1999 साली करझाई यांच्या वडिलांची हत्या झाली. या हत्येमागे तालिबानचा हात असल्याचं सांगितलं गेलं. तोवर हमीद करझाई यांचा मोठा भाऊ अमेरिकेत स्थायिक झाला होता. तिथे त्यांची अनेक अफगाणी उपहारगृहं आहेत.
हमीद करझाई यांना त्यांच्या कबिल्याचा नवीन नेता म्हणून निवडण्यात आलं. पुढील काही वर्षं त्यांनी पाश्चात्त्य देशांशी संपर्क प्रस्थापित करण्यात घालवली. इस्लामाबादमध्ये काम केलेल राजनैतिक अधिकारी सांगतात त्यानुसार, हमीद करझाई पाश्चात्त्य देशांच्या दूतावासांमध्ये जाऊन तालिबानविरोधात समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत होते.

अमेरिकेने 2001 साली अफगाणिस्तानवर आक्रमण केलं, तेव्हा करझाई त्यांच्या निष्ठावान लढाऊ साथीदारांसोबत मायदेशात परतले. तोवर त्यांना अमेरिकेचा पाठिंबा मिळाला होता, असं मानलं जातं. विशेषतः इस्लामाबादमधील सीआयएच्या विभागाने त्यांना मदत केली.
त्याच वर्षी 5 डिसेंबरला त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर चुकून अमेरिकी सैनिकांनी गोळीबार केला. यात स्वतः करझाई यांना सौम्य स्वरूपाच्या जखमा झाल्या, पण त्यांचे अनेक साथीदार या हल्ल्यात मरण पावले.
त्याच दिवशी जर्मनीतील बॉन या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात अफगाणिस्तानच्या राजकीय प्रतिनिधीमंडळाने सहभाग घेतला होता. या परिषदेमध्ये हमीद करझाई यांना हंगामी सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. ही माहिती त्यांना बीबीसीच्या एका प्रतिनिधीने दिल्याची आठवण करझाई सांगतात.
न्यूयॉर्करला दिलेल्या एका मुलाखतीत करझाई म्हणाले, "हॉस्पिटलमध्ये नर्स माझा रक्ताने माखलेला चेहरा साफ करत होत्या. इतक्यात फोनची रिंग वाजली. मी फोन उचलला, तर पलीकडून बीबीसी प्रतिनिधी लीस ड्यूसेट बोलत होत्या. बॉनमधली काहीतरी बातमी त्यांना सांगायची होती. त्या म्हणाल्या, तुम्हाला अफगाणी सरकारचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे."
त्यानंतरच्या उन्हाळ्यामध्ये त्यांना देशाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं.
करझाई यांचा दशकभराचा कार्यकाळ
हमीद करझाई यांनी 13 वर्षं देशाचा कारभार सांभाळला. 2001 सालच्या अखेरीला त्यांच्याकडे हंगामी राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं. 2004 साली ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकले आणि 2009 साली ते पुन्हा निवडून आले.

त्यांच्या काळात अफगाणिस्तानातील अनेक प्रदेशांमध्ये वाटण्या झाल्या आणि विविध ठिकाणी स्थानिक शक्तिशाली सत्ताधारी निर्माण झाले, ते आपापल्या नात्यातील निष्ठावान सहकाऱ्यांच्या बळावर सत्ता चालवू लागले.
करझाई यांच्या सत्तेचं क्षेत्र इतकं मर्यादित होतं की, काही जण थट्टेने त्यांना 'काबूलचा महापौर' असं संबोधत असत. अनेक दशकं सुरू असलेल्या यादवीमुळे अफगाणी प्रांतांवर सरदार लोकांचं वर्चस्व होतं, त्यांच्याकडे आपापल्या सेना होत्या.
अमेरिकेने 2001 साली याच शक्तींचा वापर करून तालिबानला हरवलं आणि युद्ध संपल्यानंतर करझाई यांच्यासोबत या टोळ्यांच्या सरदारांनाही सत्तेत वाटा मिळाला.
एके काळी युद्ध गुन्हेगारांच्या यादीत नाव असलेले कमांडर रशीद दोस्तम यांना करझाईंच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. करझाई राजकीय नेते होते, सेनाधिकारी नव्हे.
करझाईंच्या सत्तेचा आधार अमेरिका व नाटो देशांचे सैनिक हाच होता.
तीस वर्षांपूर्वी सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानात कळसुत्री बाहुल्यांचं सरकार आणून बसवलं, तसाच प्रकार अमेरिकेने केल्याचं अभ्यासक म्हणतात.
अधिकृत सरकारला समांतर सत्ता चालवणारे अमेरिकी सल्लागार व अफगाणिस्तान पुनर्रचना संघाचे लोक काबूलमध्ये गोळा झाले होते. अफगाणिस्तानातील घडामोडींचे तज्ज्ञ या लोकांना 'शॅडो गव्हर्नमेन्ट' असं संबोधत असत.
अमेरिकेला नवीन सरकारच्या प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवायचं होतं. अनेकदा जीवघेण्या हल्ल्यांमधून कसेबसे वाचलेले करझाई दीर्घ काळ राष्ट्राध्यक्ष भवनातून बाहेरही पडले नाहीत. एका खाजगी सैनिकी कंपनीमधील अमेरिकी अंगरक्षकांचा चमू त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेला होता.
त्यांची ही कृती आपल्याच लोकांवर विश्वास नसल्याची खूण म्हणून पाहिली गेली.
लवकरच परदेशातून मिळणारी मदत करझाईंवरील ताण वाढवणारी ठरली. पण अमेरिकेसोबतचे त्यांचे संबंध चांगले होते. करझाई यांचे मित्र व मूळचे अफगाणी असलेले अमेरिकी नागरिक जालमई खलिलझाद यांना अमेरिकेने अफगाणिस्तानातील राजदूत केलं. ऐंशीच्या दशकात खलिलझाद यांनी मुजाहिदीन व अमेरिका यांच्यातील मध्यस्थाची भूमिका निभावली होती.

फोटो स्रोत, EPA
अफगाणिस्तानात नवीन संविधान निर्माण करण्याच्या कामात खलिलझाद यांनी सहभाग घेतला. हे संविधान अमेरिकेची धोरणं अफगाणिस्तानात राबवण्याच्या दृष्टीने सोयीचं होतं, असं बोललं जातं.
पत्रकार मंडळी खलिलझाद यांना 'व्हाइसरॉय' म्हणायचे. राष्ट्राध्यक्ष करझाई आठवड्यातून तीन वेळा या अमेरिकी राजदूतांसोबत जेवत असल्याच्याही बातम्या आल्या होत्या.
2005 साली खलिलझाद यांना इराकमध्ये राजदूत करण्यात आलं. पण त्यांच्यानंतर अफगाणिस्तानात आलेल्या अमेरिकी राजदूतांसमोरची परिस्थिती बदलली होती. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांवरचा करझाईंचा विश्वास डळमळू लागला.
त्याच वर्षी करझाई अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी परदेशी सैनिकांचा नियंत्रण आपल्या हाती घेण्यासाठी बरीच खटपट केली. अमेरिकी सैनिकांनी दोन अफगाणी कैद्यांचा मारहाण करून जीव घेतला होता, या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रयत्न केले.
करझाई, ब्रिटन व अमेरिका
अफगाणिस्तानातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील लढा सर्वांत अवघड आहे, असं मानलं जातं. अमेरिकेने हेलमंद प्रांताची जबाबदारी ब्रिटनकडे सोपवली होती.
करझाई यांनी शेरा कबिल्याचे नेते मोहम्मद अखुंदझादा यांना हेलमंदचं गव्हर्नर केलं होतं. स्वतः अखुंदझादा अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील असल्याचा ब्रिटनला संशय होता. 2005 साली अखुंदझादा यांच्या घरून नऊ टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
ब्रिटनच्या सांगण्यावरून अखुंदझादा यांनी हेलमंदच्या गव्हर्नर पदावरून काढून टाकण्यात आलं. करझाईंनी त्यांना पुन्हा गव्हर्नर करण्याचा प्रयत्न केला, पण ब्रिटनने तसं घडून दिलं नाही. यानंतर लगेचच हेलमंदमध्ये आंतरराष्ट्रीय सैन्यदलं आणि तालिबान यांच्यात रक्तरंजित संघर्षाची सुरुवात झाली.
कालांतराने मोहम्मद अखुंदझादा यांनी हे मान्य केलं की, त्यांना आंतरराष्ट्रीय फौजांशी लढणं शक्य नसल्यामुळे त्यांनी स्वतःकडील 3000 जवानांना तालिबानकडे पाठवलं होतं. करझाई यांचे सावत्र बंधू अहमद वली यांचाही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचा पाश्चात्त्य देशांना संशय होता.
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार, अहमद वली यांचा अफू व हेरॉइनच्या तस्करीमध्ये हात होता. अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्यांना मिळालेले संदेश करझाई यांच्या कानावर घातले. अहमद वली यांच्यावर अमेरिकेत फौजदारी खटला सुरू होता. 2011 ली एका अंगरक्षकाने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
मोहम्मद अखुंदझादा व अहमद वली यांनी 2009 सालच्या अफगाणी निवडणुकांमध्ये अफरातफर केल्याचाही आरोप लावण्यात आला. याच निवडणुकीत करझाई दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.
अफगाणिस्तानात संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी राहिलेले पीटर गॉलब्रायथ यांनी 2009च्या निवडणुकांमध्ये फसवणूक झाल्याचा आरोप केला. पण हे विधान केल्यानंतर त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं.
याच्या एक वर्ष आधी अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. अमेरिकेतील नवीन सरकारशी करझाई यांचे संबंध आधीसारखे नव्हते. काबूलमध्ये झालेल्या त्यांच्या शपथविधी समारंभाला ओबामा सरकारचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
हिलरी क्लिंटन यांनी 2008 साली अफगाणिस्तानला 'ड्रग स्टेट' असं संबोधलं आणि करझाई यांचं सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला.
यानंतर करझाई अमेरिकेचे टीकाकार झाले. त्यांनी अमेरिका व ब्रिटन यांच्यावर साम्राज्यवादी धोरणं राबवल्याचा आरोप केला.
पाश्चात्त्य देश लपूनछपून तालिबानशी संगनमत साधत असल्याचं करझाई म्हणाले.
काबूलचा पाडाव
सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर करझाई काबूलमध्येच एका सरकारी इमारतीत सुरक्षाकवचामध्ये राहू लागले. अमेरिका व नाटो देशांबद्दलच्या त्यांच्या तक्रारी सुरू राहिल्या.
अल-कायदाने कधीच अफगाणिस्तानातून कारवाया केल्या नव्हत्या आणि 11 सप्टेंबरचा हल्ला अफगाणिस्तानच्या भूमीवरून करण्यात आला नव्हता, असं ते म्हणाले.
इस्लामिक स्टेट ही संघटना अमेरिकेच्या हातातील अस्त्र आहे आणि अमेरिका व इस्लामिक स्टेट यांच्यात काही फरक नाही, असंही करझाई म्हणाले होते.
2018मध्ये करझाई यांनी ट्रम्प सरकार व तालिबान यांच्यातील चर्चेचं समर्थन केलं. याचमुळे बहुधा त्यांचे जुने मित्र खलिलझाद यांच्यावर या चर्चेची जबाबदारी देण्यात आली होती.
करझाई यांनी तालिबानशी संपर्क प्रस्थापित करण्याचाही प्रयत्न केला. 2019मध्ये ते मॉस्कोला झालेल्या अफगाणिस्तानच्या भवितव्याबद्दलच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले. तालिबानचे नेतेही या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
त्या वेळी हमीद करझाई म्हणाले, "तालिबानीसुद्धा अफगाणी आहेत. इतर अफगाणी लोकांप्रमाणे त्यांनाही बरंच काही गमवावं लागलं आहे. त्यांच्याही मुलांचे जीव गेले आहेत. तेसुद्धा बेघर झाले आहेत. त्यांच्यावरही बॉम्बवर्षाव करण्यात आला. त्यांच्यावरही गोळीबार झाले. त्यांच्याही घराची छाननी करण्यात आली."
तालिबानी काबूलमध्ये दाखल झाले आणि राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देश सोडला, त्यानंतर करझाई तिथेच थांबले. त्यांचे राजकीयविरोधक अब्दुल्ला अब्दुल्लासुद्धा काबूलमध्येच आहेत.
समावेशक स्वरूपाचं सरकार तयार करण्यासाठी तालिबानी करझाई व अब्दुल्ला या दोघांशीही चर्चा करत आहेत. अलीकडेच करझाई यांनी त्यांच्या घराबाहेरून एक व्हिडिओ-संदेश रेकॉर्ड केला होता.
त्यात ते स्वतःच्या मुलींसोबत उभे होते. आपण काबूल सोडणार नाही आणि सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण रितीने व्हावं यासाठी प्रयत्न करू, असं अभिवचन त्यांनी या संदेशात दिलं.
तालिबानने हक्कानी नेटवर्कचे अनस हक्कांनी आणि करझाई यांच्या सोबत झालेल्या बैठकीची छायाचित्र प्रसृत केली आहेत.
करझाई व अब्दुल्ला अब्दुल्ला यांना आपापल्या घरांमध्ये स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा सीएनएन वाहिनीने केला आहे. पण लगेचच या बातमीचं खंडन करण्यात आलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








