'ऑफिसमध्ये गॉसिप करणं आरोग्यासाठी चांगलं, पण...'

गॉसिप

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ब्रायन लुफ्किन
    • Role, बीबीसी

कोणी कामाच्या ठिकाणी गप्पाटप्पा करत असेल, तर सर्वसाधारणतः त्याबद्दल नापसंती व्यक्त केली जाते. पण ऑफिसात निरुपद्रवी गप्पाटप्पा करणं लाभदायकही ठरू शकतं, असं संशोधनातून समोर आलं आहे.

ऑफिसात काम करतानाच्या अनेक गोष्टींबाबत सध्या आपल्याला चुटपूट लागून राहिलेली असते- मोफत मिळणारी कॉफी, मोफत एअर कंडिशनिंग, घरच्या कपड्यांव्यतिरिक्त इतर वेगवेगळे कपडे घालण्यासाठीची कारणं मिळत राहणं, हे सगळे ऑफिसात जाण्याचे फायदे!

पण आपल्याला बहुधा लोक भेटत नसण्याची- आणि त्यांच्या सोबत गप्पा मारता येत नाहीत याची जास्त चुटपूट वाटत असावी. अमुकला आणखी एक मूल झालं, तमुकच्या फ्रिजमध्ये शिळं अन्न वास येईपर्यंत कसं ठेवलेलं असतं, आयटी हेल्प डेस्क कायम संथ गतीनेच काम का करत असतो आणि साहेबाने अमुकला पगार वाढवून दिला पण तमुकला काही पगारवाढ मिळाली नाही, अशा विषयांवरच्या गप्पांना सध्या वाव उरलेला नाही. थोडक्यात- गॉसिप करायला वाव नाही.

काही गॉसिपचे अर्थात गप्पाटप्पांचे विषय क्षुल्लक आणि अव्यवसायिक असू शकतात, पण इतर काही गप्पटप्पा गंमतीशीर, सर्वसाधारण स्वरूपाच्या, किंबुहना तब्येतीला पोषक आणि उत्पादकही असू शकतात.

इतरांविषयी त्यांच्या पाठीवर बोलणं हा काही अपराधी वाटून घेण्यासारखा भाग नाही- उलट, कामाच्या ठिकाणी खेळतं वातावरण राखून महत्त्वाची माहिती मिळवण्याचं ते एक उपयुक्त साधन असू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात.

गप्पाटप्पांची आश्चर्यकारक उपयुक्तता

"सर्वसाधारणतः गॉसिप करणं ही चांगली गोष्ट असते," असं फ्रिय विद्यापीठ, अॅमस्टरडॅम इथे संशोधक सहायक असणाऱ्या एलिना मार्टिनेस्क्यू म्हणतात.

त्यांनी गॉसिप पातळीवरील गप्पाटप्पांमागच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास केला आहे. "उत्क्रांतिनिष्ठ सिद्धान्तानुसार, गटामध्ये सहकार्य सुकर व्हावं यासाठी मानवांनी गॉसिपचा मार्ग विकसित केला."

इतर लोकांविषयी बोलून आपल्याला कोणाशी सहकार्य करायचं आणि कोणापासून अंतर राखायचं हे कळतं, यातून गटामध्ये एकत्र काम करायला मदत होते.

या अंगभूत वर्तनाचा लाभ आधुनिक कामाच्या ठिकाणी होतो, असं त्या म्हणतात, "कोणत्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवता येईल आणि कोणापासून सावध राहायला हवं, याबद्दलची जागरूकताही कामाच्या ठिकाणी तितकीच महत्त्वाची असते."

गप्पा

फोटो स्रोत, Getty Images

टोरान्टो विद्यापीठात व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक असणारे मॅथ्यू फेइनबर्ग यांनी गॉसिपवर अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गॉसिपचे वेगवेगळे प्रकार असतात.

"केवळ 'वायफळ बडबड' या प्रकारातलं गॉसिप असेल- उदाहरणार्थ, कोणाच्या तरी दिसण्यावर टिप्पणी केली जात असेल- तर त्यातून काही सकारात्मक उद्देश साध्य होत नाही, त्यामुळे अशा गप्पा नकारात्मक, विघातक आणि अडचणी वाढवणाऱ्या असतात." पण बहुतांश गॉसिप आल्हादाक असतं, असं संशोधनातून समोर आलं आहे.

उदाहरणार्थ, 2019 साली काही संशोधकांनी सुमारे 500 व्यक्तींची संभाषणं रेकॉर्ड केली, त्यातील बहुतांश- तीन चतुर्थांशांहून अधिक- लोक सकारात्मक अथवा नकारात्मक नव्हे, तर तटस्थ संभाषणं करत होते.

'अमुकची मुलगी मार्केटिंगमध्ये एम.ए. करतेय असं मी ऐकलं' किंवा 'तमुक सुट्टीसाठी महाबळेश्वरला गेला होता म्हणे' अशा प्रकारच्या अफवा किंवा क्षुल्लक माहिती या संभाषणांमध्ये एकमेकांना सांगण्यात आली.

आपण खूप गॉसिप करत असतो- किंबहुना एका दिवसात सरासरी 52 मिनिटं आपण अशा गप्पाटप्पांमध्ये घालवत असतो, पण आपण गृहित धरतो तितका त्यातील आशय सर्वसाधारणपणे हीन स्वरूपाचा नसतो.

"गॉसिप म्हणजे प्रत्येक वेळी काहीतरी नकारात्मक किंवा मत्सराने बोललेलंच असतं, कोणाच्या तरी पाठी त्या व्यक्तीविषयी वाईट बोललेलंच त्यात असतं, ही सर्वांत मोठी गैरसमजूत आहे," असं मला वाटतं.

"लोकांना आपल्या वातावरणाचा अंदाज बांधायचा असतो, एवढ्याच हेतूने लोक मुख्यतः गॉसिप करतात, असं सर्वेक्षणांमधून समोर आलेलं आहे," असं अमेरिकेतील सेंट्रील फ्लोरिडा विद्यापीठात व्यवस्थापन विषय शिकवणारे प्राध्यापक शेनन टेलर सांगतात.

गॉसिपमुळे "आपल्या भावनांना वैधता" मिळते आणि इतर लोकांची काय मतं आहेत इत्यादी गोष्टींचा अंदाज बांधायला आपल्याला मदत होते.

"इतर सहकाऱ्यांप्रमाणेच आपण जगाचं आकलन करून घेतो आहोत की नाही" हे शोधण्यासाठी गॉसिप आपल्याला सहायक ठरतं, असं ते सांगतात.

"एका अर्थी निव्वळ माहिती गोळा करण्याचा हा प्रकार असतो.' त्यामुळे "अमुकने अलीकडच्या काळात खूपदा आजारपणासाठी सुट्ट्या घेतल्या" असं काही कोणी कामाच्या ठिकाणी म्हणालं, तर त्यातून इतरांना आपापली मतं व्यक्त करण्यासाठी वाट मिळते.

उदाहरणार्थ, काम धड होत नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने आजारपणाच्या जास्त सुट्ट्या घेतल्या असंही कदाचित कोणी म्हणेल. अशा वेळी कितपत आजारपणाच्या सुट्ट्या तुमच्या सहकाऱ्यांना 'योग्य' वाटतात (औपचारिक धोरण काहीही असलं तरी), शिवाय अशी सुट्टी घेतलेल्याबद्दल कोण सहानुभूती राखून आहे, या गोष्टींचा अंदाज गॉसिपमधून बांधला जातो, असं टेलर सांगतात.

वर्तनात बदल?

पण गॉसिप म्हणजे काही केवळ माहिती गोळा करण्याचा प्रकार नसतो. सहकाऱ्यांबद्दलचं गॉसिप ऐकून आपल्याला अधिक आत्मचिंतन करावंसं वाटू शकतं, तर काही वेळा गॉसिपच्या विषयांमुळे लोकांना त्यांचं वागणं बदलण्याचीही इच्छा होऊ शकते.

गप्पा

फोटो स्रोत, Getty Images

मार्टिनेस्क्यू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2014 मध्ये केलेल्या एका अभ्यासात सहभागी व्यक्तींना एक प्रश्नावली भरायला सांगण्यात आलं.

इतरांविषयी नकारात्मक आणि स्तुती करणारं गॉसिप ऐकण्यासंदर्भातील ही प्रश्नावली होती. नकारात्मक गॉसिप ऐकताना आपण गॉसिपविषय ठरलेल्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असं ऐकणाऱ्या व्यक्तीला वाटू लागलं, त्यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वधारला, असं संशोधकांच्या लक्षात आलं.

शिवाय, आपल्याबद्दलही असं गॉसिप होण्याची शक्यता आहे, अशी असुरक्षितताही ऐकणाऱ्या व्यक्तीच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, स्तुतिपर गॉसिप ऐकल्याने आपल्यात कशा सुधारणा करायच्या याची कल्पना ऐकणाऱ्या व्यक्तीला येते, म्हणजे अशा वेळी गॉसिपविषय ठरलेल्या व्यक्तीसारखं कसं व्हायचं, याचा विचार ऐकणारी व्यक्ती करते.

ऑफिसमधील गॉसिपमुळे 'स्वार्थी आणि अनैतिक व्यक्तींवर चाप राहतो,' असा एक फायदा फेइनबर्ग नोंदवतात. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2014 साली केलेल्या एका अभ्यासानुसार, "स्वार्थी किंवा अनैतिक पद्धतीने वागणाऱ्या लोकांबद्दल जास्त गॉसिप होतं, कारण त्यांच्या वर्तनाबद्दल अधिकाधिक लोकांना माहीत व्हावं असं इतरांना वाटत असतं," असं फेइनबर्ग सांगतात.

"परिणामी, असं गॉसिप ऐकणारी मंडळी अशा व्यक्तीशी बोलणं टाळू शकतात, मग गॉसिपचा विषय ठरलेली व्यक्ती बहिष्कृत होऊ शकते."

अस्थिरतेमुळे चालना

गॉसिप हा "कोणत्याही कार्यप्रक्रियेसाठी आवश्यक भाग" असतो, असं 2017 साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात म्हटलं होतं.

विशेषतः सध्याच्या साथीच्या काळात अस्वस्थतेला वाट काढून देण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून गॉसिपचा वापर प्रस्तुत ठरत असण्याची शक्यता आहे.

कामाच्या ठिकाणी गॉसिप करणं आपल्यासाठी चांगलं का असतं?

फोटो स्रोत, Getty Images

सध्या आपण एकमेकांविषयी सांगोवांगीच्या गोष्टी खुसफुसण्याकरता प्रत्यक्ष वॉटर-कूलरपाशी किंवा इतक कुठे कोपऱ्यात गोळा होत नसलो, तरी 'डीएम' करणं किंवा संदेशांच्या देवाणघेवाणीचे इतर मार्ग वापरून आपण ही प्रक्रिया करत असतो.

"खूप अस्थिरता असेल तर त्यातून गॉसिप उद्भवतं," असं टेलर सांगतात. "कोव्हिडपूर्व काळापेक्षा आता गॉसिपचं प्रमाण वाढलं असेल, तर मला आश्चर्य वाटणार नाही. या सगळ्या अस्थिरतेमुळे आपण इतर लोक काय विचार करतायंत आणि इतर लोक काय कसं करतायंत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत असतो."

घरून काम करत असताना अधिक लवचिक पद्धतीने काम करायला देणारी एखादी नवीन नोकरी तुमचं कोणी सहकारी शोधतं आहे का, याचा अंदाज घेण्यासाठी सध्या गॉसिप होऊ शकतं.

किंवा तुमच्यासारखेच पालक असणारे कोणी सहकारी साथीच्या काळात मुलांची काळजी कशी घ्यावी याबद्दल काही बोलू शकतात. असं करताना आपण वेगाने बदलत्या परिस्थितीमध्ये उपलब्ध असलेली माहिती पडताळत असतो, त्याचप्रमाणे आपल्यासारखीच परिस्थिती असणाऱ्यांशी बोलून या घडामोडींचा अंदाज घेत असतो.

परंतु, काही वेळा तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांविषयी किंवा रचनांविषयी मोकळेपणाने विरेचन करून घेण्यासाठीही गॉसिपचा उपयोग होतो.

कधी कोणी दडपशाही करणारा साहेब असतो किंवा एखादी टीम आक्रमकतेने काम करत असते, त्यांच्याबद्दल या गप्पा असू शकतात. पण या गप्पांमधूनही अनेक निरीक्षणं आणि धोक्याचे इशारे मिळत असतात. 'एच-आर'सारख्या पारंपरिक मार्गांबाहेरून अनौपचारिक आधारही यातून मिळतो.

"गॉसिपमुळे लोकांना धोकादायक व्यक्तींपासून सावधानतेचा इशारा मिळतो आणि गॉसिप करणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक बंधही उभारायला त्याची मदत होते," असं मार्टिनेस्क्यू म्हणतात.

"आपल्यात काही सामायिक मूल्यं आणि अनुभव आहेत, असं लोकांना गॉसिपच्या माध्यमातून कालांतराने लक्षात येतं आणि ते एकमेकांजवळ यायला त्याची मदत होते."

कोरोनाची साथ उद्भवण्याच्या कितीतरी आधीपासून गॉसिपरूपातल्या गप्पाटप्पा अस्तित्वात आहेत, आणि या साथीच्या काळातही त्या टिकून आहे आणि बहुधा कायमच त्या टिकून राहतील, हे लक्षात घेता आपण त्याबद्दल अपराधी वाटून घेऊ नये.

इतर लोकांच्या जगण्याविषयी अधूनमधून गप्पा माराव्याशा वाटण्यात काही गैर नाही. त्यात काही अहितकारक, मत्सरी हेतू नसेल, तर त्याचे अनेक व्यावहारिक आणि सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)