ओठांवर आल्यासारखा वाटणारा शब्द आठवत का नाही?

शब्द, स्मरणशक्ती, विज्ञान

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, शब्द आठवेनासे का होतात?
    • Author, रॉजर क्र्यूझ व रिचर्ड रॉबर्ट्स
    • Role, एमआयटी प्रेस रीडरमधून

एखादा शब्द किंवा नाव ओठांवर आल्यासारखं वाटत असतानाही पटकन आठवत नाही, हे स्मरणशक्ती कमी असल्याचं लक्षण असेलच असं नाही- आणि असे प्रसंग टाळण्याचा सोपा मार्ग आहे.

तुम्हाला कोणाचं नाव आठवताना अडचण आली आहे का? बहुधा आपल्याला त्या व्यक्तीचा चेहराही मनात दिसत असतो, आणि कोणी मित्रमैत्रिणीने ते नाव सुचवलं, तर आपल्याला तात्काळ लक्षात येतं. नावांच्या बाबतीत असं अनेकदा घडत असलं, तरी हे कोणत्याही शब्दाला लागू होईल. आपल्याला ती संकल्पना आठवत नसते असं नाही, पण त्यासाठीची शब्दखूण आपल्याला सापडत नाही.

योग्य शब्द न आठवणं, ही बोधात्मक अडचण मध्यमवयीनांमध्ये व वृद्धांमध्ये सर्रास आढळते. अगदी अत्यंत परिचित शब्द व ओळखीच्या व्यक्तींची नावं यांबाबतही अचानक विसर पडणं शक्य असतं. विशेषनामं व वस्तूंची नावं, हे सर्वांत त्रासदायक शब्द असल्याचं संशोधकांना अभ्यासान्ती आढळलं आहे.

शब्दाचा विसर पडलेली ही अवस्था एखादा क्षणभर, किंवा काही मिनिटं किंवा काही तासांपर्यंत लांबू शकते आणि अनेकदा यामुळे माणूस संतापून थकतो. किंबहुना, वृद्धापकाळातील कटकटींबाबत विचारणा केली असता, शब्द न आठवण्याची समस्या वृद्ध व्यक्ती अनेकदा नमूद करतात.

आपण शोधत असलेला शब्द आपल्याला माहीत आहे, अशी संबंधित व्यक्तीला खात्री असते. तो शब्द अगदी तिच्या ओठांवर असल्यासारखं वाटतं, पण काही कारणामुळे तिला तो उच्चारता येत नाही, किमान त्या क्षणी तरी तो तिच्या तोंडातून बाहेर पडत नाही. मानसशास्त्रज्ञ अशा अनुभवांना इंग्रजीत 'टिप-ऑफ-द-टंग' (जिभेच्या टोकावर आलेलं असूनही न आठवणं) अर्थात 'टीओटी' असं संबोधतात. पण ही खरंच वाटते तितकी गोंधळाची अवस्था असते का?

ओठांवर असल्यासारखा वाटणारा शब्द तोंडातून बाहेर फुटत नाही, ही स्थिती कशी व का उद्भवते, याचा अभ्यास करताना मानसशास्त्रज्ञांना काही आव्हानांना सामोरं जावं लागतं.

या गमतीशीर परिस्थितीची साधर्म्य अवकाशातल्या सुपरनोव्हाशी आहे असं सांगितलं जातं. सुपरनोव्हा म्हणजे असा तारा जो स्फोट होण्याआधी प्रचंड चमकदार होतो आणि मग त्याचा स्फोट होतो.

सुपरनोव्हाचा अभ्यास करणाऱ्या अंतराळ वैज्ञानिकांप्रमाणेच मानसशास्त्रज्ञांना हे माहीत असतं की, ओठांवर आलेला शब्द बाहेर न फुटणारी स्थिती कधीतरी उद्भवेल, पण असं कधी होईल याचा अंदाज कोणालाच नसतो. या अनिश्चिततेमुळे या गोष्टींचा अभ्यास दोन भिन्न मार्गांनी केला जातो. नैसर्गिक पद्धतींद्वारे आणि शब्द शोधण्यात अडचणी येतील अशी परिस्थिती मुद्दामहून तयार केली जाते.

शब्द, स्मरणशक्ती, विज्ञान

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, वयामुळे शब्द आठवत नाहीत असं होतं का?

अशी स्थिती किती वेळा उद्भवते आणि त्यांचं निवारण होण्याची शक्यता किती असते- म्हणजे बाहेरून सहकार्य न घेता (शब्द एखाद्या स्त्रोतामध्ये शोधणं किंवा मित्रमैत्रिणीकडून पर्याय सुचवले जाणं, हे न करता) संबंधित व्यक्तीला उस्फूर्तपणे तो विशिष्ट शब्द सापडतो असं घडण्याची शक्यता किती असते- या दोन पैलूंचं मोजमाप करून संशोधक सदर घटिताचा अभ्यास करतात.

शब्द ओठांवर आहे असं वाटूनही न आठवणं, असं घडल्यावर प्रत्येक वेळी लिहून ठेवलं की, त्यातून तयार होणाऱ्या डायरींचा अभ्यास काही संशोधक करतात आणि त्यातून असा प्रसंग उद्भवण्याची वारंवारता व निवारण होण्याचा दर यांचं अनुमान बांधता येतं.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशी स्थिती अनुभवायला मिळते, तर साठीमध्ये किंवा सत्तरीच्या आरंभिक वर्षांमध्ये असलेल्या लोकांना अशा स्थितीला थोडं जास्त वेळा सामोरं जावं लागतं. परंतु, या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या ऐंशीहून अधिक वर्षं वय असलेल्या व्यक्तींना महाविद्यालयींनी विद्यार्थ्यांहून जवळपास दुप्पट वेळा अशी स्थिती अनुभवावी लागत होती, असं या प्रयोगातून स्पष्ट झालं.

अशा स्थितीचं निवारणही होण्याची शक्यता असते, असं रोजनिश्यांच्या अभ्यासातून दिसून आलं. हा पेच यशस्वीरित्या सुटल्याचे प्रसंग जवळपास 90 टक्क्यांहून अधिक वेळा घडल्याचं अभ्यासांमधून दिसतं.

परंतु, अशा नैसर्गिक स्वरूपाच्या माहितीचा अर्थ लावताना आपण सावध राहणं गरजेचं असतं. आपल्या विस्मरणाबद्दल अधिक चिंता असणारे वृद्ध लोक संबंधित प्रसंगांची नोंद ठेवण्याची शक्यता जास्त असते.

असे प्रसंग लिहून ठेवण्याबाबत ते अधिक जागरूक असू शकतात. संशोधनात सहभागी झालेल्या तरुणतरुणींहून या वृद्धांचं आयुष्य कमी धकाधकीचं असल्यामुळे हे घडू शकतं. शिवाय, शब्द न आठवलेल्या प्रसंगांपेक्षा न सापडणारा शब्द सापडल्याचे प्रसंग संबंधित व्यक्ती लिहून ठेवण्याची शक्यताही जास्त असू शकते.

शब्द, स्मरणशक्ती, विज्ञान

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, शब्दस्मृती

अशा प्रकारे शब्द आठवण्यात अडचण येणारे प्रसंग प्रायोगिक स्तरावर मुद्दाम निर्माण करून अभ्यास करणं, ही दुसरी पद्धत आहे. ही पद्धत मानसशास्त्रज्ञ रॉजर ब्राउन व डेव्हिड मॅकनील यांनी हार्वर्ड विद्यापीठात ते एकत्र असताना विकसित केली.

नेहमीच्या वापरात नसलेल्या इंग्रजी शब्दांच्या शब्दकोशांमधील व्याख्या सहभागींना दिल्याने शब्द शोधण्यातील अडचणीची स्थिती उद्भवते, असं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांच्या अभ्यासातील एक दाखला असा होता: "कोनीय अंतर, विशेषतः सूर्य, चंद्र व तारे यांची समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी समुद्री प्रवासात वापरलं जाणारं उपकरण."

(या दाखल्यामुळे तुम्हालाही संबंधित शब्द आठवला नसेल, तर त्याला इंग्रजीत 'सेक्स्टंट', म्हणजे 'कोणादर्श' असं म्हणतात.)

या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्यांना अनेकदा संबंधित शब्द कोणत्याही अडचणीविना सांगता आला. काही वेळा संबंधितांना नक्की कोणत्या शब्दाचं वर्णन आपल्या समोर केलं जातं आहे याचा काहीच अंदाज आला नाही.

परंतु, त्यांची अशी अवस्था झाली, तर ब्राउन व मॅकनील त्यांना अधिकचे काही शब्द विचारत असत. अशा स्थितीमध्ये संबंधित शब्द सहभागी लोकांना आठवत नसेल तरी त्याबद्दलची अंशतः माहिती ते सांगू शकत होते, असं संशोधकांना आढळलं.

उदाहरणार्थ, त्या शब्दामध्ये किती व्यंजनांत अक्षरं आहेत किंवा सुरुवातीचं अक्षर काय असेल, याचा अंदाज बांधताना सहभागी लोक चांगली कामगिरी करत होते. आणि स्वाभाविकपणे त्यांच्या चुका होतानाही साधारण सारखा अर्थ असणारेच शब्द ते सांगत होते. "कोणादर्शा"ची व्याख्या दिल्यानंतर, सहभागी लोकांनी काही वेळा "उन्नतांशमापी" तर काही वेळा "होकायंत्र" असे शब्द सांगितले. पण काही वेळा त्यांनी सांगितलेले शब्द केवळ उच्चाराने मूळ शब्दाजवळ जाणारे होते. इथे "कोणादर्श"/"सेक्स्टंट" या शब्दाची व्याख्या दिल्यावर त्यांनी "सेक्स्टेट" व "सेक्स्टन" असे शब्दही सुचवले.

कोणादर्श यंत्र हातात घेतलेले नाविक म्युझिक बॅंडमध्येही नसतात किंवा कबर खणणारेही नसतात, हे आपण गृहित धरत असू, तर आपलं शाब्दिक ज्ञान स्मृतीमध्ये कसं रचलं जातं याबद्दल काही महत्त्वाची गोष्ट सूचित होते. परंतु, वृद्धांच्याबाबतीत अशा न आठवणाऱ्या शब्दाविषयीची अंशतः माहिती- उदाहरणार्थ, आरंभिक अक्षर- आठवण्याची शक्यताही कमी असल्याचं, अभ्यासांमधून निदर्शनास आलं आहे.

बोधात्मक वृद्धत्वाशी संबंधित अनेक समस्यांप्रमाणे ही ओठांवर असल्यासारखा वाटणारा शब्द न आठवण्याची स्थितीदेखील 'पेला अर्धा भरलेला व अर्धा रिकामा' याच प्रकारची असते. एका बाजूला, संकल्पनांचे अर्थ आणि ते अर्थ दर्शवणाऱ्या शब्दांचं दीर्घकालीन स्मृतीमधील स्थान यांच्यातील जोड कमकुवत झाल्याचा हा पुरावा मानता येतो. वाढत्या वयानुसार शब्द सापडताना अधिकाधिक अडचणी येणं, यातून आणखी वेगळंच काहीतरी समोर येण्याचीही शक्यता असते.

शब्द, स्मरणशक्ती, विज्ञान

फोटो स्रोत, Buyenlarge

फोटो कॅप्शन, शब्दस्मृती

इंडियाना युनिव्हर्सिटी साउथईस्टमधील मानसशास्त्रज्ञ डोना डहलग्रेन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, यातील कळीचा प्रश्न वयाचा नसून ज्ञानाचा आहे. दीर्घकालीन स्मृतीमध्ये इतर प्रौढांनी खासकरून अधिक माहिती राखून ठेवली असेल, तर त्यांना शब्द न आठवण्याची स्थिती अधिक वेळा अनुभवावी लागू शकते.

ओठांवर आलेला शब्द न आठवण्याची स्थिती उपयुक्त ठरण्याचीही शक्यता असते- आपण शोधत असलेला शब्द आत्ता आठवत नसला, तरी तो ज्ञात आहे, असा संकेत या स्थितीमधून वृद्ध व्यक्तीला मिळू शकतो. अशी अधिबोधात्मक माहिती लाभदायक असते, कारण शब्द सापडत नसलेल्या स्थितीत तो शोधण्यासाठी अधिक वेळ घालवणं यशस्वी ठरू शकतं.

या दृष्टीने पाहिलं असता, ओठांवर आलेला शब्द न आठवण्याची स्थिती माहितीचा मूल्यवान स्त्रोत ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही वृद्धावस्थेत असाल, आणि तुम्हाला असं अनेकदा शब्दांचा विसर पडत असेल, तर वातापेक्षी स्वास्थ्य टिकवून ठेवल्यास असे प्रसंग कमी होण्याची शक्यता असते, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

शब्द, स्मरणशक्ती, विज्ञान

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

फोटो कॅप्शन, मराठी शब्द

तर, पुढच्या वेळी एखादा शब्द आठवताना तुम्हाला अडचण येत असेल, तर तुम्ही त्याने अस्वस्थ होऊ नका.

(*हा लेख मूळ द एमआयटी प्रेस रीडरमध्ये प्रकाशित झाला होता आणि इथे परवानगी घेऊन तो बीबीसी फ्युचरने पुनर्प्रकाशित केला आहे. रॉजर क्र्यूझ हे मेम्फिस विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत. रिचर्ड रॉबर्ट्स हे परराष्ट्र सेवेतील अधिकारी असून सध्या ओकिनावा, जपान इथे अमेरिकेचे वाणिज्यदूत म्हणून कार्यरत आहेत. सदर लेखकद्वयीने "चेन्जिंग माइण्ड्स: हाऊ एजिंग अफएक्ट्स लँग्वेज अँड हाऊ लँग्वेज अफेक्ट्स एजिंग" या पुस्तकाचं लेखन केलं असून त्यातूनच हा लेख घेतला आहे.)

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)