You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीनः व्हीडिओ गेम खेळण्याचं व्यसन मोडून काढण्यासाठी चीन इतका गंभीर का आहे?
चीनमधील व्हीडिओ गेम रेग्युलेटर यंत्रणेने 18 वर्षांखालील मुलांच्या गेमिंगवर निर्बंध आणले आहेत. शुक्रवारी, शनि-रवि आणि सुट्ट्यांच्या दिवशी या मुलांना दिवसातून एक तासच गेमिंग करता येईल.
द नॅशनल प्रेस आणि पब्लिकेशन अॅडमिनिस्ट्रेशन यांनी सरकारप्रणित वृत्तसंस्था झिनुआला सांगितलं की 18 वर्षांखाली मुलांना रात्री 8 ते 9 या वेळेतच गेमिंगची परवानगी असणार आहे.
मुलांना निर्धारित वेळेपलीकडे खेळू नये यासाठी नियंत्रकांनी गेमिंग कंपन्यांना सूचना केली आहे.
सरकारच्या माध्यम विभागाने गेमिंग म्हणजे एक प्रकारची नशा असल्याचं म्हटलं होतं.
गेमिंग कंपन्यांच्या कारभाराचं परीक्षण केलं जाईल, जेणेकरून मुलं दिलेल्या वेळेपल्याड खेळत असतील तर ते रोखता येईल.
आधीच्या नियमानुसार मुलांना दरदिवशी दीड तास गेमिंगची परवानगी होती. सुट्टीच्या दिवशी तीन तास खेळण्याची मुभा होती.
सातत्याने गेमिंगचा मुलांवर काय परिणाम होतो यासंदर्भात अनेकदा झालेल्या मंथनातून हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
महिनाभरापूर्वी सरकारप्रणित इकॉनॉमिक इन्फॉर्मेशन डेली या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार, तरुण मुलामुलींना गेमिंगचं व्यसन लागलं आहे. त्याने त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होतो.
या लेखानंतर चीनमधील गेमिंग कंपन्यांच्या शेअरमध्ये झपाट्याने घट झाली होती.
जुलै महिन्यात चीनमधील टेन्सेट या गेमिंग क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने मुलांनी रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेत गेमिंग करू नये यासाठी फेशिअल रेगनिकशन यंत्रणा कार्यान्वित केल्याचं सांगितलं.
मुलं घरातील मोठ्यांचे आयडी वापरून गेमिंग करत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
स्पिरिच्युअल ओपियमवर अंकुश
झायोन फेंग, बीबीसी न्यूज
चीनमधल्या हजारो तरुण गेमर्ससाठी हंगामाचा शेवट निराशाजनक झाला आहे.
गेमिंगच्या व्यसनासंदर्भात तसंच ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या हानीकारक गोष्टींबाबत चीन प्रशासन सतर्क झालं होतं.
तरुण मुलामुलींच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत काळजी वाटत असल्याने यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. चंगळवादाची चलती आणि तंत्रज्ञान यांचं एकत्र येणं घातक ठरू शकतं असं चीन सरकारला वाटतं.
चीनमधल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील अलिबाबा, टेन्सेट, डिडी यासारख्या बलाढ्य कंपन्यांवर सरकारने निर्बंध लागू केले आहेत. सेलिब्रेटी फॅन कल्चर तसंच प्रायव्हेट ट्यूटरिंग सारख्या अनिष्ट प्रथा तरुण मुलामुलींमध्ये बळावू यासाठी गेमिंग क्षेत्रामध्ये नियमावली लागू करण्यात आली आहे.
युवा मंडळींमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल अशी चीन सरकारला आशा आहे. चांगली मूल्यं कुठली यासंदर्भात तरुणांना मार्गदर्शन केलं जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं.
चीनमधील अनेक पालकांनी गेमिंगसंदर्भातील नियमावलीचं कौतुक केलं आहे. मात्र त्याचवेळी सरकारने गेमिंगबाबत जारी केलेले नियम हे अनाठायी आणि दंडेलशाही स्वरुपाचे आहेत असं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
'मी कधी जेवायचं, कधी प्रसाधनगृहात जायचं, कधी फिरायला जायचं हेही तुम्हीच ठरवा', अशी उपरोधिक कमेंट एका नेटिझनने केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)