You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
12 वर्षाच्या मुलानं घरी बसून असे कमावले 2 कोटी रुपये
लंडनमध्ये 12 वर्षाच्या एका मुलानं तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशी कामगिरी केली आहे.
शाळेच्या सुट्यांच्या काळात 12 वर्षांच्या बेन्यामिन अहमदनं 'वीयर्ड व्हेल्स' नावाचं पिक्सलेटेड आर्टवर्क तयार केलं. ते विक्री करून त्यानं तब्बल दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे.
बेन्यामिननं हे डिजिटल फोटो एनएफटी (नॉन फंजिबल टोकन्स) इथून विकले. त्याठिकाणी या कलाकृतीसाठी त्याला जवळपास दोन कोटी 93 लाख रुपये मिळाले.
एनएफटीच्या माध्यमातून एखाद्याची कलाकृती 'टोकन' करता येते. त्यामुळं एक डिजिटल सर्टिफिकेट तयार होतं आणि त्यानंतर कलाकृतीची खरेदी किंवा विक्री केली जाऊ शकते.
साधारणपणे यात खरेदी करणाऱ्याला प्रत्यक्ष कलाकृती किंवा त्याचे कॉपीराईट देत नाहीत.
बेन्यामिन अहमदला एथेरियम (क्रिप्टो करंसी) च्या रुपात मोबदला देण्यात आला आहे. म्हणजेच त्याच्या कलाकृतींची किंमत वाढूही शकते अथवा कमीदेखील होऊ शकते.
अभिमानाचा क्षण
बेन्यामिनबरोबर शिकणाऱ्या मुलांना कदाचित अद्याप हे माहितीही नसेल की, त्यांच्या एका मित्रानं घर बसल्या दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. बेन्यामिन त्याचे छंद, आवड-नावड याच्याशी संबंधिक अनेक व्हीडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो.
12 साल वर्षांच्या बेन्यामिनला स्विमिंग, बॅडमिंटन खेळणं आणि तायक्वांदोचा सराव करायला आवडतं.
"ज्या इतर मुलांना या क्षेत्रात येण्याची इच्छा असेल त्यांनी कुणाच्या दबावात येऊन किंवा बळजबरीनं कोडींग करू नये, असा माझा सल्ला आहे. कदाचित तुम्ही इतरांच्या दबावात असू शकता. पण आपल्या क्षमतेप्रमाणेच ते करा," असं बेन्यामिन सांगतो.
बेन्यामिनचे वडील इम्रान एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. त्यांनीच बेन्यामिन आणि त्याचा भाऊ यूसफ यांना पाच आणि सहा वर्षांचे असल्यापासून कोडींग करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
"मुलांना या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलून आणि त्यांच्या सल्ल्यामुळं मदत झाली हे खरं आहे. पण तसं असलं तरी ते हे करू शकले ही अभिमानाची बाब आहे," असं इम्रान म्हणाले.
गांभीर्यानं शिकले
"हे सर्व काहीतरी गमतीशीर शिकायचं म्हणून सुरू झालं होतं. पण मुलांना ते आवडत आहे आणि ते गांभीर्यानं शिकत असल्याचं लवकरच माझ्या लक्षात आलं. ते वेगानं पुढं जात होते," असं इम्रान सांगतात.
"मुलाचं पाहून आम्हीदेखील गांभीर्यानं त्यांना शिकवू लागलो. त्यानंतर आजचा दिवस उगवला जो आपल्या सर्वांसमोर आहे. पण तुम्ही याचं मुल्यांकन करू शकत नाही. मी तीन महिन्यांत कोडींग शिकणार आहे, असं तुम्ही म्हणू शकत नाही."
दोन्ही मुलांनी रोज 20 ते 30 मिनिटं कोडिंगचा सराव केला आणि सुटीच्या दिवशीही त्यांनी ते सुरू ठेवलं, असं त्यांनी सांगितलं.
'वीयर्ड व्हेल्स' हा बेन्यामिनचा दुसरा डिजिटल-कला संग्रह आहे. यापूर्वी त्यानं Minecraft ची प्रेरणा घेऊन कलाकृती तयार केली होती. पण तिची फार चांगली किंमत मिळू शकली नव्हती.
यावेळी त्यानं लोकप्रिय पिक्सलयुक्त व्हेल मीममधून प्रेरणा घेतली. त्यानं त्याच्या प्रोग्रामद्वारे 3,350 प्रकारचे इमोजी सारखे व्हेल तयार केले.
"ते सर्व हॅच करताना पाहणं रंजक होतं कारण हळूहळू ते माझ्या स्क्रीनवर तयार होत होतं," असं बेन्यामिननं म्हटलं आहे.
बेन्यामिननं सध्या त्याच्या सुपरहिरो-थीम असलेल्या तिसऱ्या संग्रहावर काम करायला सुरुवात केली आहे.
मुलानं कॉपीराइटचा कोणताही कायदा मोडला नसेल याची इम्रान यांना खात्री आहे. ते सध्या या कामचं 'ऑडिट' करण्याबरोबरच डिझाईनचे ट्रेडमार्क करण्याबाबत कायदेशीर सल्लाही घेत आहेत.
मात्र कला जगतातील लोकांचं एनएफटीमधील या चलनाबाबत संमिश्र मत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)