तालिबान आणि इस्लामिक स्टेट यांच्यातील साम्य आणि फरक नेमका काय आहे?

अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानने कब्जा मिळवला. त्यानंतर अफगाण नागरिक विमानतळावरून जीव मुठीत धरून देशाबाहेर पडण्याच्या प्रयत्नात असल्याचे व्हीडिओ आपण सोशल मीडियामधून पाहिले आहेत.

हे व्हीडिओ वणव्यासारखे जगभरात व्हायरल होत आहेत. या प्रकाराबाबत अरब देशांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर यासंदर्भात मतमतांतरं आढळून येतात. काही जण अफगाण नागरिकांना पाठिंबा दर्शवत असून काहींनी तालिबानच्या कृत्याचं उघड समर्थन केल्याचं दिसून येत आहे.

पाश्चिमात्य शक्तींवर मुस्लिमांनी मिळवलेला विजय अशा शब्दांत हे लोक या घटनेचं वर्णन करताना दिसत आहेत. त्यांच्या मते, तालिबान संघटना ही इस्लामचा दुरुपयोग करणाऱ्या इस्लामिक स्टेट या कथित कट्टरवादी संघटनेप्रमाणे क्रूर नाही.

अशा परिस्थितीत तालिबानच्या संदर्भात अरब देशांतून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जाण्याची काय कारणं असू शकतात? शिवाय, इस्लामिक स्टेट संघटना (ISIS) आता तालिबानसाठी धोका ठरू शकते का?

पंथ

तालिबान आंदोलन आणि तथाकथित इस्लामिक स्टेट या दोन्ही संघटनांचा जन्म सलाफी-जिहादी संघटनांमधूनच झाला आहे.

तालिबानचा उदय 90च्या दशकाच्या सुरुवातीला झाला होता. अफगाणिस्तानातून सोव्हिएत संघाचं सैन्य मागे परतल्यानंतर 1994 मध्ये उत्तर पाकिस्तानात ही संघटना बाळसं धरू लागली.

पण, तालिबानच्या निर्मितीतील आपला सहभाग पाकिस्तानने नेहमीच फेटाळून लावला आहे.

तज्ज्ञांच्या मते, हे आंदोलन सर्वप्रथम पाकिस्तानच्या रुढीवादी धार्मिक संघटनांमध्ये पाहायला मिळालं होतं.

अशा प्रकारच्या संघटनांना परदेशातून येणाऱ्या तसंच बेकायदेशीररित्या प्राप्त होणाऱ्या निधीतून पैसा पुरवण्यात येत असतो.

1990च्या दशकातील मध्यात अफगाणिस्तानात तालिबान संघटना सत्तेत आली. त्यावेळी फक्त 3 देशांनी त्याला मान्यता दिली होती. ते होते पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात. तालिबानचं नेतृत्व त्यावेळी मुल्ला उमर यांच्या हातात होतं.

मुल्ला उमर 2013 मध्ये मारले गेले. त्यानंतर मुल्ला मन्सूर यांनी संघटनेचं नेतृत्व सांभाळलं.

2016 मध्ये अमेरिकेच्या एका हल्ल्यात मन्सूर हेसुद्धा ठार झाले. त्यानंतर त्यांचे सहकारी नायब हेबतुल्ला अखुंदजादा यांनी तालिबानचं कामकाज सांभाळलं. अखुंदजादा हे कट्टर विचारसरणी मानतात, असं सांगितलं जातं.

कारनेगी एनडाऊनमेंटने केलेल्या अभ्यासानुसार, जाणकारांच्या मते इस्लामिक स्टेटच्या उदयामागे अनेक कारणं आहेत.

2003 मध्ये इराकवर अमेरिकेचा हल्ला. शिया मिलिशिया संघटनेला ईराणमध्ये पाठिंबा मिळणं, या भागात राजकीय घडामोडींमध्ये इस्लामची उपस्थिती या सर्व गोष्टी ISIS च्या कट्टरतेसाठी पोषक ठरल्या, असं म्हटलं जातं.

या परिसरात ISIS ची वाढ आणि विस्तार होत होता. त्याच दरम्यान सीरियातील गृहयुद्धाने त्या आगीत आणखी तेल ओतलं.

ढोबळमानाने इस्लामिक स्टेट आणि तालिबान या दोन्ही संघटना आपण इस्लामचे सच्चे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.

पूर्वजांनी पालन केलेल्या इस्लामच्या स्वरुपाचा स्वीकार दोन्ही संघटनांकडून केला जातो.

त्यामुळे इस्लामच्या अत्यंत वेगळ्या अशा कट्टरवादी विचारसरणीचा अनुनय ते करताना दिसतात.

आपल्या हिंसक कृत्यांना योग्य ठरवण्यासाठी दोन्ही संघटना इब्न तैमियाह सारखी कट्टरवादी मौलवींची पुस्तके, त्यातील संदर्भ, तसंच इस्लामी इतिहासातील सुरुवातीच्या काळातील हदीस या पुस्तकाचा आधार ते घेतात.

पाश्चिमात्य संस्कृतीसंदर्भात भीती दाखवण्याचं धोरण

या दोन्ही संघटना क्रूर पद्धतीवरच विश्वास ठेवतात. त्यांच्या मते, कोणत्याही गोष्टीबाबत परिणाम महत्त्वाचा आहे. युद्ध हा फक्त तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे.

दोन्ही संघटनांच्या मते, ते 'अल्लाहचं पुस्तक आणि प्रेषित पैगंबर यांची सुन्नत' यांमध्ये सांगितलेल्या गोष्टी लागू करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं कृत्य योग्यच आहे.

त्यामुळे त्यांचा विरोध करणं म्हणजे अल्लाह आणि पैगंबर यांचा विरोध करण्याप्रमाणे आहे.

याच आधारावर विरोधींना संपवण्यासाठी किंवा त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या संसाधनाचा उपयोग करण्याचा अधिकार आहे, असं त्यांना वाटतं.

हत्येसाठी सार्वजनिकरित्या फाशी देणं, व्यभिचार करणाऱ्याला दगडांनी ठेचून मारणं, चोरी करणाऱ्या व्यक्तीचा हात छाटणं अशा प्रकारच्या शिक्षा यांचंच उदाहरण आहेत.

दोन्ही संघटना पाश्चिमात्य देशांमधील लोकशाही सिद्धांत, म्हणजेच पुरुष आणि महिलांमधील समानता, विविधतावाद, मानवाधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर आधुनिक विचार यांचा विरोध करतात.

आपल्याविरुद्ध होत असलेला विरोध किंवा विद्रोह सुरुवातीच्या टप्प्यातच चिरडून टाकायचा, या विचाराने त्यासंदर्भात कठोर पावलं ते उचलतात.

आपण काफिर आणि पाखंडींविरुद्ध लढत आहोत, असा दावा दोन्ही संघटनांकडून केला जातो.

त्यासाठी धार्मिक पुस्तकं आणि संदर्भांचा आधार घेण्यात येतो.

पण इतकी सारी साम्यं असूनही तालिबान आणि इस्लामिक स्टेट या दोन संघटनांमध्ये काही महत्त्वपूर्ण फरकसुद्धा आहे.

सामाजिक जीवन आणि महिला

दोन्ही संघटनांच्या मते, महिलांची भूमिका मुलं जन्माला घालणं, त्यांची देखभाल करणं इतकीच आहे. त्यांना घरगुती कामापुरतंच मर्यादित ठेवलं पाहिजे असं त्यांना वाटतं.

दोन्ही संघटना महिलांना हिजाब आणि नकाब वापरण्यासाठी भाग पाडतात. तसंच पुरुषांनी दाढी वाढवलीच पाहिजे, असं ते सांगतात.

तालिबान आणि IS दोघांच्याही मते मनोरंजक टीव्ही शो, संगीत आणि सिनेमा पाहण्यावरही प्रतिबंध आहेत.

दोन्ही संघटनांनी दुकान मालकांना महिलांसंदर्भात फॅशनचं प्रदर्शन न करणं, दुकानांमध्ये लक्षवेधी महिलांच्या प्रतिकृती न ठेवणं, असल्यास त्यांचा चेहरा झाकणं या गोष्टींबाबत सूचना केलेली आहे.

तालिबानने 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींच्या शाळेत जाण्यावर बंदी घातली होती.

पण, दुसरीकडे काही बाबतीत महिलांबाबत तालिबानच्या धोरणापेक्षा अगदी उलट इस्लामिक स्टेटचं धोरण आहे.

संघटनेच्या सेवेत आलेल्या महिलांना प्रशिक्षित करणं, त्यांना प्रपोगंडा आणि इतर मुलींना संघटनेत ऑनलाईन सहभागी करून घेणं यांसाठी प्रशिक्षित करणं यासाठी प्रशिक्षण देण्यात येतं.

त्यासाठी महिलांना डॉक्टर, नर्स आणि शिक्षक तसंच कर्मचारी यांच्या स्वरुपात करण्याची परवानगी त्यांनी दिली होती. काही महिलांनी तर इथं सुरक्षा दलांमध्ये बंदोबस्तासाठीही काम केलं आहे.

इराकच्या मोसूल आणि सीरियातील राक्का शहरांवर नियंत्रण मिळवल्यानंतर IS ने याठिकाणी एका महिला पोलीस बटालियनची स्थापना केली होती. त्याचं नाव अल-खानसा ब्रिगेड असं ठेवण्यात आलंं.

दोन्ही संघटनांचा शत्रू एकच आहे का?

नाही.

ISIS ही एक विस्तारवादी संघटना आहे. जी देशांच्या सीमेपलिकडे जाऊन काम करते, तर तालिबान हे एक प्रादेशिक आंदोलन आहे. पश्तुन नागरिकांच्या परिसराबाहेर ते सक्रिय नाहीत. या संघटनेतील बहुतांश नेते पश्तूनच आहेत.

इस्लामिक स्टेटच्या मते, इस्लामचे सर्वात मोठे शत्रू बाहेर नसून धर्मांतर्गतच आहेत. अंतर्गत शत्रूंवर हल्ला करून बाहेरच्या शत्रूंनाही ते आपल्या बाजूने वळवू शकतात, असं त्यांना वाटतं. पाश्चिमात्य देशांसोबत संबंधन ठेवणार्या मुस्लीम देशांची सरकारे आणि इस्लाममधील इतर संप्रदायांनाही ते शत्रू मानतात.

सीरिया आणि इराकमध्ये हेच पाहायला मिळालं. याठिकाणी ISIS ने अनेक युरोपीय देशांना युद्धात खेचलं होतं.

IS संपूर्ण जगालाच आपला शत्रू मानतो. याचं कारण म्हणजे, इतरांची धार्मिक आस्था अल्लाहच्या पुस्तकावर आधारित नसून वेगळी आहे.

अमेरिका आणि युरोपीय देशांनी ISIS ला एक दहशतवादी संघटना मानलेलं आहे. पण तालिबान हे एक दहशतवादी आंदोलन असल्याचं त्यांना वाटत नाही.

तालिबानी आंदोलन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या विशिष्ट भूभागापुरतं मर्यादित आहे. स्थापनेपासूनच यांची एक कबायली संस्कृती राहिली आहे.

पण दुसरीकडे तालिबानच्या उलट ISIS ने सुरुवातीपासूनच जगभरातील विविध जातीसमूह आणि राष्ट्रीयतेच्या लोकांना आपल्यासोबत येण्याचं आवाहन केलं होतं.

त्यांनी आपल्यासोबत अरब, कुर्द, तुर्क, चेचन, उझबेक, कझाक, ताजिक तसंच विगर समुदायातील लोकांना आपल्यासोबत जोडण्यात यश मिळवलं.

ISIS च्या नेत्यांनी अक्स, अल-कायदा यांच्या कबायली संस्कृतीमुळे त्यांच्यावर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय सीमांच्या बंधनांच्या पलिकडे आपली विचारसरणी असल्याचा दावा IS कडून केला जातो.

शाळा आणि शिक्षण

तालिबान आपल्या राजवटीदरम्यान आधुनिक शिक्षणाची कट्टर विरोधक होती.

त्यांनी अनेक ठिकाणी शाळा उद्ध्वस्त करून टाकल्या. लोकांनी याला विरोध केल्यानंतरच त्यांनी शाळांना परवानगी दिली.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यासारखे वैज्ञानिक विषय कमी करून हदीस, न्यायशास्त्र यांच्यासारखे धार्मिक विषय शिकवणं त्यांनी सुरू केलं.

पण, इस्लामिक स्टेटने आधुनिक शिक्षणाचा निर्मूलन केलं नाही. पण त्यामधील आपल्याला अनुकूल नसलेल्या विषयांना त्यांनी संपवून टाकलं. उदा. संगीत.

त्यांनी विज्ञान, भाषा यांच्यासारखे आवश्यक विषय अभ्यासक्रमात कायम ठेवून त्यामध्ये अधिक धार्मिक विषय जोडले.

त्यांना मदत कशी मिळते?

कोणतीही प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय संस्था अधिकृतपणे ISIS चं समर्थन करताना दिसत नाही. IS ला मिळणाऱ्या मदतीचं प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे.

ISIS ने इराक आणि सीरियातील तेल व्यापारावर नियंत्रण मिळवलं होतं. या दरम्यान अमेरिका आणि युरोपीय सैन्याकडील शस्त्रास्त्रही त्यांनी हस्तगत केली होती.

तर, अफगाणिस्तानात बहुतांश भागातील अफूच्या शेती आणि पाकिस्तान यांच्याशी असलेले तालिबानचे संबंध कधीच लपून राहिले नाहीत.

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री नसीरुल्लाह बाबर आणि पाक इंटेलिजन्स चीफ असद दुर्रानी यांच्या वक्तव्यांमधून याचे संकेत मिळतात.

इस्लामिक स्टेटपासून तालिबानला धोका आहे का?

इस्लामिक स्टेट आता इराक आणि सीरियामध्ये नेस्तनाबूत झाला आहे. पण अफगाणिस्तानमधील खुरासान प्रांतात अद्यात त्याची पाळंमुळं आहेत.

2015 मध्ये पाकिस्तानी तालिबान (पंजाब तालिबान) आणि अफगाण तालिबान या दोन्ही संघटनांच्या दरबदलू कट्टरवाद्यांनी याची स्थापना केली होती.

ISIS च्या ताब्यात अफगाणिस्तान-पाकिस्तानचा खुरासान म्हणून ओळखला जाणारा सीमावर्ती भाग, ईराण, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, किरगिझस्तान, तिजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमधील काही भाग आहे. अफगाणिस्तानात ही संघटना अद्याप ISIS म्हणूनच ओळखली जाते.

तालिबानसोबत ISIS चे मतभेद स्पष्ट झाल्यानंतर अनेक सलाफी लोकही त्यामध्ये सहभागी झाले. तालिबान पाकिस्तानही गुप्तचर संस्थेचे एक एजंट बनून राहिल्याचा त्यांचा आरोप आहे.

ISIS संघटनेचा उद्देश आता खुरासान प्रांतात कोणत्याही माध्यमातून तालिबान, अल-कायदा किंवा सरकार यांच्याशी लढणं हा आहे.

ISIS ने पूर्वीही अफगाणिस्तानात अनेक हल्ले घडवून आणले. यामध्ये शेकडो लोकांचा बळी केला आहे.

खुरासान प्रांतात तालिबान आणि इतर सशस्त्र संघटनांच्या चकमकी सुरू असतात.

त्यामुळे आता परदेशी सैनिक आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेलं सैन्य बल अफगाणिस्तानातून निघून गेल्यानंतर या दोन्ही संघटना एकमेकांना कशा भिडतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आता इस्लामिक स्टेट पुन्हा आपलं डोकं वर काढेल की दोन्ही संघटना मिळून काम करतील हासुद्धा एक प्रश्न आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)