पाकिस्तानात गणेश मंदिरावरील हल्ल्यानंतर भोंग परिसरातून हिंदूंचं पलायन

    • Author, हुमैरा कंवल
    • Role, बीबीसी उर्दू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शरीफ परिसरात एका गणेश मंदिरावर संतप्त जमावाने हल्ला केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर या परिसरातून हिंदू नागरीक आपला जीव मुठीत धरून पलायन करत असल्याची माहिती मिळत आहे.

भोंग शरीफ परिसरात संतप्त जमावाने येथील गणेश मंदिरावर हल्ला करून तोड-फोड केली. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा बल तैनात करण्यात आलं आहे. पण तरीही येथील हिंदू नागरीक घाबरून येथून पळ काढत आहेत.

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये मोठ्या संख्येने काही लोक मंदिराच्या खिडक्या, दरवाजे मूर्ती यांची काठ्या, दगडं आणि वीटा यांच्या साहाय्याने तोड-फोड करताना दिसत आहेत.

दरम्यान, स्थानिक पोलिसांनी येथील धार्मिक नेत्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली. काही बोटांवर मोजता येतील इतके लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना उचकवणाऱ्या, त्या लोकांना या ठिकाणी आणणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे, अद्याप याप्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

दुसरीकडे, खासदार आणि मानवाधिकार विषयक संसदीय सचिव लाल मलही यांनी याविषयी ट्विट केलं.

भोंग परिसरातील हिंदू नागरीक मंदिरावरील हल्ल्यानंतर भीतीने आपलं राहतं घर सोडून पळून गेले आहेत, असं मलही म्हणाले.

पाकिस्तानच्या इमरान खान सरकारने हिंदू नागरीकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी मलही यांनी केली आहे.

भोंग परिसरात राहणाऱ्या एका हिंदू नागरीकांशी बीबीसीने संवाद साधला होता. त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की बुधवारी गोंधळ सुरू झाला, त्यावेळी हिंदू समाजातील नागरीक घाबरून आपल्या घरांमध्ये बंद झाले होते.

हल्लेखोरांनी आमच्या दुकानांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पण पोलिसांमुळे ते तिथंपर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोलीस जास्त वेळ त्यांना रोखून धरू शकले नसते. पण रेंजर्सचे जवान आल्यामुळे आमचा जीव भांड्यात पडला. आमची मुलं इथं सुरक्षित नाहीत, असं त्यांनी म्हटलं.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोठ्या संख्येने लोक मंदिराची तोडफोड करताना यामध्ये दिसू शकतात. लोक दगड-वीटांच्या साहाय्याने मंदिराच्या खिडक्या, दरवाजे, आतमधील मूर्ती यांची तोडफोड करताना यामध्ये दिसत आहेत.

याप्रकरणी पाकिस्तानातील एका न्यायालयात शुक्रवारी (6 ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

भारतीय परराष्ट्र खात्याकडून प्रतिक्रिया

भारताच्या परराष्ट्र खात्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे, "पाकिस्तानच्या पंजाबमधील रहीम यार खान येथे गणेश मंदिरावर जमावाकडून झालेल्या हल्ल्याचे वृत्त सोशल मीडियावर दिसत आहे. हे धक्कादायक आहे. जमावाने मंदिरावर हल्ला केला."

"मूर्तीची तोडफोड केली आणि परिसरात जाळपोळ केली. जमावाने परिसरात राहणाऱ्या हिंदू वसतीवर देखील हल्ला केला," असं भारतीय परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी जवान तैनात

सादिकाबादच्या भोंग शरीफ परिसरात सध्या पोलीस तपास सुरू आहे, असं रहीम यार खान जिल्ह्याचे DPO असद सरफराज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

परिसरात कडेकोट सुरक्षा बल आणि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असंही ते म्हणाले.

या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ही घटना घडलेल्या परिसरात हिंदू समाजातील नागरिकांची 80 घरे आहेत. आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश परिसर मुस्लीम बहुल आहे.

पण यापूर्वी अशा प्रकारची घटना याठिकाणी कधीच घडली नव्हती, असं पोलीस प्रशासनाने म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि देशातील हिंदू काऊंसिलचे संरक्षक डॉ. रमेश कुमार यांनी या घटनेची माहिती बीबीसीला दिली.

ते म्हणाले, "या परिसरात 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली होती."

भोंग पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांनीही (ASI) बीबीसीला या घटनेविषयी सांगितलं.

या परिसरातील एका व्यापाऱ्याने एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. हिंदू आणि मुस्लीम नागरीक याठिकाणी एकत्र जेवण करतात. हे थांबवलं पाहिजे, असा या पोस्टचा आशय होता.

ASI नी दिलेल्या माहितीनुसार, ही पोस्ट करण्यात आल्यानंतर या परिसरात भांडणं सुरू झालं. आजूबाजूच्या परिसरातील काही समाजकंटकही त्याठिकाणी दाखल झाले.

त्यानंतर संतप्त जमावाने येथील मंदिरावर हल्ला करून त्याठिकाणी तोड-फोड केली. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. पण त्यांच्यावरही तुफान दगडफेक करण्यात आली.

आतापर्यंत या घटनेप्रकरणी कोणताही FIR दाखल करण्यात आलेला नाही. शिवाय, कोणालाही अटक करण्यात आली नाही. पण सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली असून ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केला आहे.

ईशनिंदेशी संबंधित प्रकरण

पाकिस्तान हिंदू काऊंसिलचे संरक्षक डॉ. रमेश यांनी बीबीसीला सांगितलं, "ही घटना 23 जुलै रोजी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. त्यावेळी एका 8 वर्षांच्या मुलावर ईशनिंदेचे आरोप लावण्यात आले होते.

24 तारखेला पोलिसांनी एका 8 वर्षीय मुलाविरुद्ध FIR दाखल केली होती.

या मुलाने मदरशाच्या वाचनालयात जाऊन लघुशंका केल्याचा आरोप येथील मदरसा प्रशासनाने केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या 8 वर्षीय मुलाला अटक केली.

ASI नुसार, मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला 295 A कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाऊ शकत नाही. न्यायाधीशांनी 28 तारखेला मुलाला जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले होते.

डॉ. रमेश यांनी सांगितलं, "रहीम यार खान जिल्ह्याच्या DPO नी मुलाला अटक केलं आणि पोस्ट डिलीट केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. पण मुलगा बाहेर येताच याठिकाणी पुन्हा घडामोडींना सुरुवात झाली.

संध्याकाळी चारच्या सुमारास जवळपास 25 जणांनी येथील सी-पॅक रस्ता बंद करून टाकला. याची माहिती आम्ही अतिरिक्त महानिरीक्षकांना दिली होती. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संतप्त जमावाने मंदिरावर हल्ला केला. त्यांनी लोकांच्या घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिसरात सुरक्षा बल तैनात करण्यात आलं आहे. आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे."

डॉ. रमेश यांनी मुख्य न्यायाधीशांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेतील दोषी व्यक्तींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)