You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅझटेक : मॅक्सिकोतील 'ही' जमात खरंच रक्तपिपासू आहे?
पंधराव्या शतकादरम्यान मॅक्सिकोच्या मध्य भागात प्रभुत्व राखून असलेले अॅझटेक लोक निर्घृण व रक्तपिपासू असल्याचं चित्रण अनेकदा केलं जातं.
अलीकडेच सापडलेल्या 'मानवी कवट्यांच्या मनोऱ्या'ने या लोकांची पूर्वापार झालेली ख्याती पुन्हा ठळकपणे समोर आली.
सर्वसाधारणपणे अॅझटेक या नावाने ओळखली जाणाऱ्या संस्कृतीमध्ये टेनोशटिट्लान शहरातील नहुआट्ल भाषक मॅक्सिकन लोकांचा समावेश होतो. आता या ठिकाणी मॅक्सिको सिटी आहे.
टेनोशटिट्लानवासीयांचं प्रभुत्व असलेल्या साम्राज्यासाठी ही संज्ञा अनेकदा वापरली जाते. या साम्राज्यात टेनोशटिट्लानसोबतच टेक्सकोको व टलाकोपान ही दोन नगर-राज्यंही होती.
चौदाव्या शतकारंभी मॅक्सिका लोक मॅक्सिकोच्या मध्य भागात आल्याचं मानलं जातं. टेक्सकोको सरोवरातील दलदलीच्या बेटावर त्यांनी टेनोशटिट्लान नगर वसवलं. या नगरावर लोकनियुक्त टलाटोअनी ('बोलणारा' अशा अर्थी) राज्य करत असे.
कृत्रिम बेटांवर मक्याच्या लागवडीची प्रगत कृषिव्यवस्था मॅक्सिका लोकांनी विकसित केली होती आणि त्यांच्यात सैनिकी वैशिष्ट्यंही ठळकपणे होती.
पंधराव्या शतकामध्ये हे तिहेरी आघाडीने शेजारच्या नगर-राज्यांवर विजय मिळवून अॅझटेक साम्राज्य निर्माण केलं. उत्कर्षाच्या शिखरावर असताना टेनोशटिट्लानची लोकसंख्या दोन लाख ते तीन लाख रहिवाश्यांपर्यंत पोचली असावी.
मोठमोठ्या पायऱ्या असणाऱ्या पिरॅमिडच्या आकाराच्या 'टेम्प्लो मेयर'चा (महामंदिर) या शहरावर पगडा होता. या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात मानवी बळी दिले जात- मेसोआमेरिकेतील अनेक संस्कृतिंमध्ये ही परंपरा आढळते.
अॅझटेक लोकांचं प्रभुत्व कसं संपुष्टात आलं?
हेर्नान कोर्टेसच्या नेतृत्वाखाली 1521 साली चाल करून आलेल्या स्पॅनिश आक्रमकांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न टेनोशटिट्लानचा राजा दुसरा मोक्तेझुमा याने केले, पण तरीही स्थानिक लोकांचा पूर्ण पराभव झाला आणि स्पॅनिश आक्रमकांनी टेनोशटिट्लान साम्राज्य नामशेष केलं.
तिथल्या अवशेषांमधून मॅक्सिको सिटीची उभारणी करण्यात आली. या संघर्षामुळे, आणि वसाहतवाद्यांसोबत आलेल्या देवी व गोवर या रोगांमुळे तिथली देशी जनता मरण पावली आणि अॅझटेक लोकांचं प्रभुत्व संपुष्टात आलं.
अॅझटेक साम्राज्यात मानवी बळी का दिला जात असे?
ईश्वराने आपल्याला काही दिलेलं असल्यामुळे आपण त्याचा परतावा द्यायला हवा, अशी अॅझटेक लोकांची धारणा होती.
मानवतेच्या निर्मितीसाठी देवांनी स्वतःचा बळी दिल्याचं अॅझटेक लोकांच्या मिथकात्मक इतिहासामध्ये नोंदवल्याचं आढळतं. उदाहरणार्थ- टलालटेसुहट्ली या पृथ्वीवरच्या महाकार मगरीची कहाणी पाहता येईल.
जमीन निर्माण करण्यासाठी या मगरीचा अर्धं अंग कापण्यात आल्याचं सांगितलं जातं. मग तिला जगवण्यासाठी आणि मूळ ऋणाची परतफेड करण्यासाठी माणसांनी तिला रक्त पाजलं.
दुसऱ्या एका कहाणीमध्ये एक देव अधोविश्वात जातो आणि 'मृत्यूप्रदेशाच्या ईश्वरा'च्या नजरेआडून गतकाळातील एका पुरुषाची व एका स्त्रीची हाडं चोरतो. ही हाडं एका स्वर्गवत प्रदेशात आणली जातात.
तिथे पाट्यावर या हाडांची भुकटी केली जाते. मग पुरुष देव त्यांच्या लिंगांमधून रक्त काढून त्या भुकटीला ओलसर करतात आणि त्यातून लहान मानवी आकृती तयार केल्या जातात.
या टप्प्यापर्यंत जगात पाच युगं होऊन गेली होती आणि ते जगत असलेलं युग पाचवं होतं, अशी अॅझटेक लोकांची धारणा होती. मानवतेने पुनरावतार कसा घेतला, हे या कहाणीत सांगितलं आहे.
मानवी बळींविषयी अॅझटेक लोकांची धारणा काय होती?
जग निर्माण करण्यासाठी देवांनी त्यांच्यातलं रक्त बाहेर जाऊ दिलं, तेव्हा तयार झालेलं ऋण फेडण्यासाठी मानवी बळी दिले जात होते. सूर्याला रक्त अर्पण करून टिकवून ठेवलं नाही, तर जग संपुष्टात येईल, अशी अॅझटेक लोकांची श्रद्धा होती.
देवाला खाऊपिऊ घालण्याचाच हा प्रकार होता. इतर काही संस्कृतींमधील बळीप्रथांमध्ये एखाद्या मनुष्याची ताकद प्राप्त करण्यासाठी- श्रीमंत होण्यासाठी किंवा अधिक महत्त्व मिळवण्यासाठी किंवा अधिक मुलं हवीत यासाठी- मानवी बळी दिला जात असे.
पण अॅझटेक लोक वैयक्तिक लाभासाठी मानवी बळी देत नसत. असे बळी देणं ही त्यांच्यासाठी मूलतः एक परोपकाराची कृती होती- सर्व मानवतेसाठी मानवी बळ आवश्यक असल्याचं ते मानत. सामुदायिक ऋणासंबंधीचा हा सामूहिक प्रतिसाद होता.
मानवी बळी किती वेळा दिले जात?
किती वेळा बळी दिले जात, हे सांगणं अवघड आहे. आपण कोणते स्त्रोत किंवा कोणती सांख्यिकी आकडेवारी वापरतो, यावरून आपल्याला सापडणारी संख्या खूप जास्त किंवा खूप कमी असण्याची शक्यता आहे. पण मानवी बळी देण्याची पद्धत ठळकपणे अस्तित्वात होती आणि नियमितपणे तिचं पालन केलं जात असे, हे मात्र सुरक्षितपणे म्हणता येतं.
कोणाचा बळी दिला जात असे? लोक स्वेच्छेने बळी जायला तयार असायचे, हे खरं आहे का?
तत्त्वतः मानवी बळी जाण्यासाठी काही लोक स्वच्छेने तयार असल्याचं कळतं. वास्तवात मात्र असं घडत होतं का, हे सांगणं अवघड आहे. बहुतांश वेळा युद्धात पकडलेले लोक (त्यातही बहुतेकदा पुरुष, पण काही वेळा स्त्रिया व मुलंही) बळी दिले जात.
एका वेळी पाच लोकांना बळी देणं गरजेचं असेल, तर त्यातील काहींना सरसकट मारलं जात असे. काही जण देवाचे तोतये- त्यांना इक्सिप्त्ला असं संबोधलं जात असे- म्हणून बळी दिले जात.
ते ईश्वराचा झगा परिधान करत आणि ज्या देवाची तोतयेगिरी ते करत असतील त्या देवाच्या सन्मानार्थ त्यांचा बळी दिला जात असे. नेहमीच्या उत्सवांमध्ये या तोतयांचा प्रमुख सहभाग असायचा.
टलालोक या पावसाच्या देवासाठी खासकरून मुलांचा बळी दिला जात असे. बहुतांशाने बळी दिली जाणारी मुलं अॅझटेक समुहातीलच असत- अॅझटेक साम्राज्याची प्राचीन राजधानी असणाऱ्या टेनोशटिट्लानमधील मुलांची यासाठी निवड केली जात असे. कोणाला जन्मतः केसांमध्ये दोन भोवरे असतील, तर अशा व्यक्तीचा विधिवत बळी जाण्याची शक्यता जास्त होत.
एखाद्या संस्कृतीत बालमृत्यूंचं प्रमाण जास्त असेल, तर अशा प्रकारच्या मुलांचा जन्म झाल्यावर त्यांच्यापासून मानसिकदृष्ट्या अंतर राखणं शक्य होत असावं, असंही काही वेळा म्हटलं जातं. पण सहानुभूतीजन्य जादूवर बळी प्रथा आधारलेली असल्याचंही आपण जाणतो. मुलांनी रडणं अभिप्रेत होतं, आणि लोकांनी त्यांच्या मृत्यूवर रडणंही अभिप्रेत होतं. या अश्रूंमधून पावसाला आवताण दिलं जात असे.
तलालोक या देवासाठी बळी दिली जाणारी मुलं शहरात मारली जात नसत, तर एखाद्या तलावामध्ये बळी देण्यासाठी त्यांना डोंगराळ भागात नेलं जात असे, ही एक लक्षणीय बाब आहे. शहरांपासून दूर जाऊन बळी देण्याची एक प्रमुख प्रथा अॅझटेक मुलांशी संबंधित होती, हेही अर्थपूर्ण आहे. लोकांना हा प्रसंगही तशाच रितीने पाहणं शक्य होत असेल का, याबद्दल शंका वाटते.
टेनोशटिट्लानभोवतीच्या इतर शहरांमध्येही बळी प्रथा पाळली जात असल्याचं आपण विसरता कामा नये. योद्धा म्हणून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या शहरातील सैन्याने ताब्यात घेतलं, तर तुमचाही बळी दिला जाऊ शकतो, ही बाब स्वीकारली जात होती.
बळी जाऊन मेल्याने किंवा युद्धात मरण आल्याने आपल्याला मृत्यूनंतर चांगलं जीवन मिळेल, अशीही सर्वसाधारण श्रद्धा होती. देवांसाठी मृत्यूला कवटाळून पुण्य प्राप्त करण्याच्या हौतात्म्याशी साधर्म्य सांगणारा हा प्रकार असतो.
मोठ्या संख्येने लोकांना मृत्यूनंतर मिक्टलान या ठिकाणी जावं लागेल, असं मानलं जात होतं. मिक्टलान म्हणजे अगदी नरकासारखी जागा नसली, तरी काळोखी, दमट व घाण अशाच स्वरूपात त्याचं वर्णन केलं जात होतं- तिथे अनंत काळापर्यंत हीन पातळीवर जगायला लागणं, ही बहुतांशांची नियती असते, अशी श्रद्धा होती.
पण बळी गेलेली व्यक्ती पुरुष असेल, तर तो पहिली चार वर्षं सूर्याची सोबत करेल आणि देवांना देदिप्यमान रितीने दिशा दाखवेल. त्यानंतर तो गुणगुणणाऱ्या सूर्यपक्षाचं किंवा फुलपाखराचं रूप घेतो, अशी धारणा होती. स्वर्गामध्ये मद्यपान करत, ऐहिक चिंतांपासून दूर जगायला मिळत असे. त्यामुळे हा पर्याय स्वाभाविकपणे आकर्षक होतं.
वास्तवात काही लोक त्यांच्या शहरांची व ईश्वराची स्तुती करत, यौद्धा म्हणून शूरपणे स्वतःचं भवितव्य स्वीकारत बळी जात असतील, आणि इतर काही लोकांना लाथाबुक्के मारत, किंचाळत बळी जावं लागत असेल, ही शक्यताच जास्त आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)