You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Tokyo Olympic डायरी : जपानच्या वेंडिंग मशीन का ठरताहेत आकर्षणाचं केंद्र?
- Author, अरविंद छाबडा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, टोकियोहून
भारतात काही ठिकाणी म्हणजे एअरपोर्ट, मेट्रो स्टेशन याठिकाणी आपण सर्वांनी वेंडिंग मशीन पाहिल्या आहेत. त्याठिकाणाहून आपण पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक खरेदी करू शकतो.
त्यामुळं जपानमध्ये पोहोचताच माझी नजर वेंडिंग मशीनवर गेली. पण ते पाहून मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. पण नंतर मला प्रत्येक गल्लीमध्ये वेंडिंग मशीन दिसू लागल्या. तिथून तुम्हाला रात्र असो वा दिवस कधीही खरेदी करता येते.
मला वाटलं कदाचित जपानच्या नागरिकांना दुकानांमधून खरेदी करण्याऐवजी यांचा वापर करायला अधिक आवडत असेल. त्यामुळंच या जागोजागी दिसत असतील.
मी विलगीकरणात असल्यानं सुरुवातीला काही दिवस मला याचा वापर करण्याची संधी मिळाली नाही. केवळ कारमधून येताना आणि जाताना मी या मशीन पाहत होतो.
आम्हाला तीन दिवस फक्त कोव्हिड चाचणीसाठी बाहेर जाण्याची परवानगी होती. त्यानंतर आम्हाला जेव्हा टोकियो बिग साईट (जपानमधीन सर्वांत मोठं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र) मध्ये तयार केलेल्या मेन प्रेस सेंटर म्हणजे एमपीसीमध्ये बसून काम करण्याची परवानगी मिळाली तेव्हा आम्हाला बाहेर येण्या जाण्याची संधी मिळाली.
एमपीसीमध्ये मला एकाच जागी पाच वेंडिंग मशीन दिसल्या. त्या मशीन जवळ काही लोकही होते. जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, जपानमधल्या या वेंडिंग मशीन केवळ भारतापेक्षाच नव्हे तर जगातील बहुतांश देशांपेक्षा वेगळ्या आहेत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अत्याधुनिक आहेत. दुसरी बाब म्हणजे यात तुम्हाला बहुतांश अशा वस्तू मिळतात ज्यांची कल्पना मी तरी वेंडिंग मशीनमधून मिळेल अशी केली नव्हती.
बहुतांश मशीनमधून थंड पाणी, ज्यूस, एनर्जी ड्रिंक, चहा आणि कॉफी अशा गोष्टी 100 ते 200 येनच्या मोबदल्यात मिळतात. 100 येन म्हणजे जवळपास 70 भारतीय रुपये.
या मशीनमधून साधारणपणे गरम आणि थंड पेयं मिळतात. पण काही वेंडिंग मशीनमधून आईस्क्रीम, इन्स्टंट नूडल्स अगदी तांदूळ आणि डिस्पोजेबल कॅमेऱ्यासारखं सामानही मिळतं. या मशीनमध्ये जपानचं चलन असलेल्या येनच्या नोटा आणि नाणी स्वीकारली जातात. तसंच कार्डद्वारेही पेमेंट करता येतं.
जपानमध्ये दर 40 लोकांसाठी एक वेंडिंग मशीन उपलब्ध असल्याचा दावा येथील काही वेबसाईटनं केला आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. सर्व छोटी मोठी शहरं आणि अगदी ग्रामीण भागांमध्येही या मशीन उपलब्ध आहेत. मी टोकियोच्या गिंजा परिसरात राहत आहे. माझ्या खिडकीतूनही तीन वेंडिंग मशीन दिसतात.
सध्या मेन प्रेस सेंटर म्हणजे एमपीसीमध्ये लावलेल्या वेंडिंग मशीनबद्दल आपण बोलू. ऑलिम्पिक स्पर्धांचं वृत्तांकन करण्यासाठी जगभरातून इथं आलेल्या पत्रकारांमध्येही या वेंडिंग मशीनबाबत उत्साह आणि आकर्षण आहे.
याठिकाणी वेंडिंग मशीनमध्ये ऑलिम्पिकच्या थीमवर सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यात चष्म्यापासून बॅग, टंबलर, बाहुल्या या विविध आकार, रंग आणि किमतींच्या पर्यायात उपलब्ध आहेत.
प्रत्येक साहित्य या ना त्या प्रकारे टोकियो ऑलिम्पिक 2020 शी संबंधित आहे. तसं नसलं तरी किमान त्यावर 'टोकियो 2020' लिहिलं असून ऑलिम्पिकचं पाच रिंगचं चिन्हं आहेच.
अनेकजण या वेंडिंग मशीनवर खरेदीच्या अनुभवाचा आनंद घेत आहेत. एखादी वस्तू निवडली, पैसे दिले अन् लगेच तुम्हाला वस्तू मिळते, हे अनेकांना आवडत आहे.
विक्री काऊंटरवर कुणाशी बोलायची गरज नाही. काही लोकांना कोव्हिडच्या काळात या मशीन म्हणजे सुरक्षित पर्याय वाटत आहे. कारण त्यामुळं कुणाच्या संपर्कात येण्याची गरज राहत नाही.
कोरोनाच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येनं लावलेल्या वेंडिंग मशीन या लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करण्याच्या उद्देशानंच लावण्यात आल्याचं, एका मशीनजवळ उभ्या असलेल्या सेल्समननं सांगितलं.
मात्र, सर्वच लोकांना वेंडिंग मशीनवर खरेदीचा हा अनुभव आवडतोय असं नाही. उदाहरण द्यायाचं झाल्यास माझ्याबरोबर असलेल्या एक महिला सहकारी ऑलिम्पिक मॅस्कोट विक्रीला असल्याचं पाहून अत्यंत उत्साही होत्या. त्यांनी लगेचच त्याची खरेदी केली.
"पण मॅस्कोट मशीनमधून बाहेर आला तेव्हा मला एवढा आनंद झाला नाही. कारण वस्तू कोणत्या आकाराची असेल हे यात समजत नाही. मी हा मॅस्कोट 8800 येन (जवळपास 6000 रुपये) पेक्षा अधिक खर्च करून विकत घेतला. मी जर एखाद्या दुकानात पाहिला असता तर किमतीच्या तुलनेत तो मला लहान वाटला असता. ही या मशीनची नकारात्मक बाजू आहे," असं माझ्या सहकारी म्हणाल्या.
पण तसं असलं तरी लंडनमध्ये काम करणाऱ्या माझ्या या सहकारी या वेंडिंग मशीनची प्रत्येक ठिकाणी असलेली उपलब्धता आणि वैविध्यावर माझ्या एवढ्याच प्रभावित आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)