You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टोकियो ऑलिम्पिक : भारतीय हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रविवारी भारतीय हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या ग्रुप सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियानं 1-7 नं भारतीय संघाचा पराभव केला.
दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात विजयी कामगिरी केली होती. ओई हॉकी मैदानात झालेल्या या सामन्यात दोन्ही देश ग्रुपमध्ये स्थिती मजबूत करण्याच्या इराद्यानं उतरले होते.
शनिवारी (24 जुलै) भारतीय हॉकी संघानं न्यूझीलंडला अटीतटीच्या सामन्यात 3-2 नं पराभूत केलं होतं, तर ऑस्ट्रेलियानं त्यांच्या पहिल्या सामन्यात आयोजक जपानच्या संघाला 5-3 नं पराभूत केलं होतं.
मेरी कोमची विजयी सलामी
बॉक्सिंगपटू मेरी कोमने रविवारी (25 जुलै) डोमिनिक रिपब्लिकची खेळाडू मॅग्वेलिना हर्नांडेज हिचा पराभव करत पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
38 वर्षीय मेरी कोमने आतापर्यंत सहावेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिंपिकमध्ये मेरी कोमने पदकाची कमाई केली होती.
23 वर्षांच्या हर्नांडेजने 2019 मध्ये पॅन अमेरिकन स्पर्धेत ब्रॉन्झ पदक मिळवलं होतं.
मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल या युवा नेमबाजांना निराशानजक निकालाला सामोरं जावं लागलं. 10 मीटर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत मनूला बाराव्या तर यशस्विनीला तेराव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
मीराबाई चानूने पटकावलेल्या पदकाने भारतीय पथकासाठी ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात दणक्यात झाली.
पात्रता फेरीतील अव्वल आठ नेमबाजांना अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. मनू आणि यशस्विनीला ही संधी मिळणार नाही.
टोकिओहून वार्तांकन
बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे टोकिओमध्ये आहेत. मनूच्या प्रशिक्षकांसोबत त्यांनी बातचीत करून कारण जाणून घेतले.
"दुसऱ्या फेरीदरम्यान मनूच्या बंदुकीत तांत्रिक बिघाड झाला. तो बिघाड दुरुस्त करायला वेळ गेला. तिच्याकडे दुसरी बंदूक होती. मात्र त्या बंदुकीशी जुळवून घेण्यात वेळ गेला असता. बिघाड दुरुस्त होईपर्यंत वेळ गेला. मात्र मनूने त्यानंतर चांगली कामगिरी केली. पण शेवटच्या फेरीत तिला 95 गुणांचीच कमाई करता आली. दोन गुणांच्या फरकाने अंतिम फेरीतलं तिचं स्थान हुकलं", असं प्रशिक्षक रौनक पंडित यांनी बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांच्याशी बोलताना सांगितलं.
"तुम्ही अनेक वर्ष गाडी चालवता, अगदी सुरळीत सुरू असतं. अचानक एकेदिवशी टायर पंक्चर होतो. अशा प्रसंगाला तुम्हाला सामोरं जावं लागतं", असं नेमबाजी प्रशिक्षक रौनक पंडित यांनी मनू भाकेरच्या पिस्तूलासंदर्भात झालेल्या बिघाडाबद्दल सांगितलं.
"लिव्हरच्या माध्यमातून पिस्तूलाचं काम चालतं. त्यात बिघाड झाला तर नेम साधता येत नाही. पिस्तूल उघडून त्यात बदल करावा लागला. पर्यायी पिस्तूलातील भाग काढून घेण्यात आला. पर्यायी पिस्तुलाशी जुळवून घ्यायला वेळ गेला असता. पिस्तुलातील बिघाडामुळे सहा मिनिटं वाया गेली. मात्र तरीही मनूने चांगली कामगिरी केली. असा बिघाड होणं दुर्मीळ आहे. बाहेरून कोणताही बिघाड दिसत नव्हता. असं होत नाही. हे अतिशय दुर्देवी आहे", असं ते म्हणाले.
मनूची पात्रता फेरीत 98, 95, 94, 95, 98, 95 अशी कामगिरी होती. यशस्विनीच्या गुणांमध्ये 94, 98, 94, 97, 96, 95 अशी घट झाल्याने तिचीही अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकली.
मिश्र प्रकारात मनू सौरभ चौधरीच्या साथीने सहभागी होईल. त्यामुळे ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी या दोन्ही युवा नेमबाजांकडे आहे.
मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सहभागी होतील. पुरुषांमध्ये 10 मीटर एअर रायफल प्रकारात दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पनवर भारताचं प्रतिनिधित्व करतील.
सिंधूची विजयी सलामी
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियात विजयी सलामी दिली. सिंधूने इस्रायलच्या सेनिया पोलिकारापोव्हावर 21-7, 21-10 असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सिंधूची लढत हाँगकाँगच्या चेयुंग न्गान यीशी होणार आहे.
रोइंगपटू उपांत्य फेरीत
अर्जुन आणि अरविंद या जोडीने उपांत्य फेरी गाठली. रोइंग लाइटवेट डबल स्कल प्रकारात उपांत्य फेरी गाठणारी ही पहिली भारतीय जोडी आहे.
दिव्यंश-दीपकही माघारी
दिव्यंश पन्वर आणि दीपक कुमार या नेमबाजांना 10 मीटर एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र होता आलं नाही. दिव्यंशला 32व्या तर दीपकला 26व्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
सानिया-अंकिता पराभूत
युक्रेनच्या लियूडम्याला किचेनोक आणि नाडिआ किचेनोक या बहिणींनी सानिया मिर्झा आणि अंकिता रैनावर 0-6, 7-6, 10-8 असा विजय मिळवला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)