टोकियो ऑलिंपिकची डायरी : 'इकेबाना'नं दिलेला विचार

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

टोकियो बिग साईट ही इमारत सध्या इथे माझं दुसरं घरच बनली आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांत मी माझ्या हॉटेल रूमशिवाय इतका वेळ इथे असलेल्या मेन प्रेस सेंटरमध्ये घालवते आहे.

या इमारतीत अनेक दालनं आहेत आणि दोन मुख्य दालनांना जोडणाऱ्या भागात कॅफे, ऑलिंपिकचं गिफ्ट शॉप आणि एक छोटं सुपरमार्केटही आहे.

पण या प्रांगणासारख्या भागात एक गोष्ट आल्या दिवसापासून माझं लक्ष वेधून घेते आहे. इथे ठेवलेलं 'इकेबाना'चं मॉडेल. इकेबाना म्हणजे जपानी शैलीची पुष्परचना.

आज ही पुष्परचना जगात जपानची ओळखही बनली आहे. पण या इकेबानाचं थेट भारताशी नातं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतातून बौद्ध धर्म जपानमध्ये आला आणि इथल्या मुख्य प्रवाहात मिसळत त्यानं स्वतःचं वेगळं रूप घेतलं. या बौद्ध धर्मासोबतच भारतातल्या संस्कृतीची काही वैशिष्ट्यही जपानमध्ये पोहोचली. मंदिरांमध्ये देवतांच्या मृर्तींना फुलांनी सजवण्याची परंपरा त्यातलीच एक आहे.

पण जपानमध्ये या पूजेचं कलेत आणि एक प्रकारच्या कलासाधनेत रूपांतर झालं आहे. इकेबाना पुष्परचना करण्याचा अनुभव हा एक प्रकारच्या ध्यानधारणेसारखाही असल्याचं काहींना वाटतं.

म्हणजे बघा ना, फुलांसारख्या नाजूक, ठराविक मोसमात येणाऱ्या आणि काही काळाचंच आयुष्य असलेल्या वस्तूकडे एरवी आपण किती वेळा निरखून पाहतो? इकेबाना पुष्परचना करताना मात्र फुलं, पानं, फांद्या यांच्याकडे बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. मग तुम्ही आपोआपच प्रत्येक डहाळीच्या नैसर्गिक सौंदर्याचं कौतुक करू लागता.

शाळेत असताना इकेबानाविषयी वाचलं होतं, मग एका शिबिरात त्याविषयी जुजबी धडेही घेतले होते. पण इकेबाना असं थोडक्यात शिकता येत नाही. वर्षानुवर्षांची ती साधना आहे, असं ही पुष्परचना करणारे सांगतात.

पण फुलांच्या सुंदर रुपापेक्षा मला इकेबानाचं एक वेगळं वैशिष्ट्य जास्त भावलं. एरवी पुष्पगुच्छ म्हणजे भरगच्च फुलांनी भरलेला असतो. पण इकेबानाचं तसं नाही. इथे फुलं जणू निसर्गतः तशीच उमलली आहेत असं वाटतं.

इकेबानामध्ये ठराविक संख्येतच फुला पानांची रचना केली जाते आणि त्यात 'रिकाम्या जागा' अतिशय महत्त्वाच्या आहेत. या रिकाम्या जागा फुलांच्या बारकाव्यांकडे लक्ष वेधून घेतात. आयुष्यातही अशा रिकाम्या जागा महत्त्वाच्या असतात, नाही का?

गोष्टींची उणीवच त्यांचं महत्त्व आणि परिस्थितीचं गांभीर्य जाणवून देत असते. अगदी ऑलिंपिकच्या सामन्यांना सुरुवात होईल तेव्हाही स्टेडियममधल्या रिकाम्या जागा हेच काम करतील, असं दिसतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)