You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अंतराळात जाणारा हा तरुण तुर्क कोण आहे?
अठरा वर्षांचा ऑलिव्हर डायमेन जगातील सर्वात तरुण अंतराळ पर्यटक बनण्याच्या मार्गावर आहे. अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्यासमवेत 20 जुलै रोजी त्यांच्या अंतराळ कंपनीच्या पहिल्या मानवी उड्डाणातून तो अंतराळात प्रवास करणार आहे.
खरं तर ऑलिव्हर डायमेनला ही संधी एका अज्ञात व्यक्तीच्या जागी मिळाली आहे. या अज्ञाताने सार्वजनिक लिलावात 28 दशलक्ष डॉलर्सची शेवटची बोली लावली होती.
जेफ बेझोस यांची अंतराळ कंपनी 'ब्लू ओरिजिन'ने सांगितलं की, या लिलावात सर्वात जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीकडे वेळेची मर्यादा असल्याने ते या मिशनवर जाऊ शकत नाहीत.
ऑलिव्हर डायमेन हे वित्तीय कंपनी 'सॉमरसेट कॅपिटल पार्टनर्स'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जोस डायमेन यांचे पुत्र आहेत.
'ब्लू ओरिजिन'ने दिलेल्या वृत्तानुसार, जोस डायमेन यांनी दुसऱ्या उड्डाणासाठी जागा राखीव केली होती, परंतु जेव्हा पहिल्या विजेत्याने माघार घेतली तेव्हा त्यांना संधी देण्यात आली आणि जोस डायमेन यांनी त्यांच्याजागी आपल्या मुलाला पाठवण्याचा निर्णय घेतला.
'ब्लू ओरिजिन'चे निवेदन
ऑलिव्हर डायमेन हा भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. ऑलिव्हरसोबत 82 वर्षीय वॉली फंक असतील, जे सहलीनंतर अंतराळात जाणारे सर्वाधिक वृद्ध व्यक्ती ठरतील. तर 'न्यू शेपर्ड' रॉकेटचे इतर दोन प्रवासी जेफ बेझोस आणि त्यांचे भाऊ असणार आहेत.
अंतराळात जाण्यासाठी स्लॉटच्या लिलावातील विजेत्यांच्या नावाची कोणतीही माहिती अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. इतकंच नाही तर विमानाची तारीख जवळ आली तरी त्याचा उल्लेखही केलेला नाही.
कंपनीने हेही सांगितलं नाही की लिलाव विजेत्याला ऐनवेळी असे काय काम आले की त्यांना माघार घ्यावी लागली. शिवाय ऑलिव्हर डायमेन यांच्या तिकिटासाठी त्यांच्या वडिलांनी किती पैसे मोजले याची माहिती सुद्धा 'ब्लू ओरिजिन'ने उघड केलेली नाही.
कंपनीने म्हटलं आहे की, "या उड्डाणाच्या माध्यमातून ऑलिव्हरचे वयाच्या चौथ्या वर्षापासूनचे अंतराळ, चंद्र आणि रॉकेटबाबतचे स्वप्न पूर्ण होईल."
आपल्या प्रवाशांना पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर नेण्याची जिथे त्यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (जिथे गुरुत्वाकर्षण कमी असेल) जाणवू शकेल अशी 'ब्लू ओरिजिन'ची योजना आहे.
हा प्रवास दहा मिनिटांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. प्रवासी पॅराशूटद्वारे पृथ्वीवर परतणार आहेत.
जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. 2000 साली त्यांनी 'ब्लू ओरिजिन' ही कंपनी सुरू केली. गेल्या महिन्यात त्यांनी या उड्डाणाची घोषणा केली होती. आपण आणि आपला भाऊ या उड्डाणासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
गेल्या आठवड्यात अब्जाधीश उद्योगपती सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या यशस्वी उड्डाणानंतर जेफ बेझोस यांचे आता अंतराळात उड्डाण होणार आहे. सर रिचर्ड ब्रॅन्सन यांचे 'व्हर्जिन गॅलेक्टिक रॉकेट' विमान अंतराळाच्या शेवटपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)