'पतीच्या मारेकऱ्याशी लग्न केलं आणि त्याची हत्या करून बदला घेतला'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अजिजुल्लाह खान
- Role, बीबीसी उर्दू, पेशावर
"मी पतीच्या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय केला होता. त्यासाठी मी मारेकऱ्याबरोबर मैत्री केली, त्यानंतर त्याच्याशी लग्न केलं आणि अखेर मी बदला घेतला."
पाकिस्तानच्या बाजौर जिल्ह्यात राहणाऱ्या या महिलेला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केलं. त्यानंतर या महिलेची रवानगी चकदरा तुरुंगात करण्यात आली आहे.
पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचं आरोपी महिलेनं सांगितलं. त्यासाठी त्यांनी अगदी संयमानं कट रचला होता, असंही त्यांनी सांगितलं.
दोन गोळ्या झाडल्या, एक डोक्यात लागली
हे एक गुंतागुंतीचं प्रकरण होतं, पण त्यासाठी प्रयत्न केला आणि यश मिळवल्याचं, बाजौर जिल्ह्याच्या इनायत कली येथील लुइसिम पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलायत खान यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
आरोपीच्या पतीचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पण त्यांची हत्या करण्यात आली की नैसर्गिक मृत्यू झाला, हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नव्हतं. आरोपीनं वैयक्तिकरित्या याबाबत माहिती मिळवली होती. त्यांच्या पतीचे मित्र गुलिस्तान यांनी त्यांना विष देऊन मारल्याचं त्यांचं म्हणणं होतं.
पोलीस ठाण्यात त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. या परिसरात तीन वर्षांपूर्वी पोलिस ठाणंच नव्हतं आणि शाह जमीन यांची हत्या झाल्याचे काहीही पुरावेही मिळाले नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
गुलिस्तान नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दोन दिवसांपूर्वी मिळाली होती.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या भागातील चेकपोस्टवरील पोलीस आणि सुत्रांना सूचना दिल्या. कोणत्याही व्यक्तीला तिथून जाऊ द्यायचं नाही, अशा सूचना देण्यात आल्या. काही वेळातच विलायत खानही त्याठिकाणी टीमबरोबर पोहोचणार होते.
"आम्ही त्याठिकाणी पोहोचलो तर मृतदेह अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. एक गोळी डोक्यात लागलेली होती, तर दुसरी शरीराच्या उजव्या भागात लागली होती. आरोपी महिला मृताबरोबर बसलेली होती. घराच्या बाहेर आणि आतही लोकांची गर्दी झालेली होती. आम्ही घटनास्थळी तपास सुरू केला आणि पुरावे गोळा केले," असं विलायत खान यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
प्रेमाचं नाटक
आरोपीनं सांगितलं की, त्यांचे पहिले पती अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील राहणारे अफगाण शरणार्थी होते. ते पेशावरमध्ये काम करत होते आणि अत्यंत आनंदात जीवन जगत होते. त्यांची एक मुलगीही होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
"माझ्या पतीची गुलिस्तान नावाच्या एका व्यक्तीबरोबर मैत्री होती. ते पेशावरमध्ये जे पैसे कमवत होते ते सर्व पैसे गुलिस्तानकडे ठेवण्यासाठी देत होते. गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडून परत घेऊ असं त्यांना वाटत होतं. गुलिस्तानबरोबर त्यांची पक्की मैत्री होती," असं आरोपींनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीचे पती काही दिवसांनंतर परत आले, तेव्हा त्यांनी गुलिस्तान यांना तब्येत ठीक नसल्याचं सांगत, त्यांच्याकडं जमा केलेले पैसे परत हवे असल्याचं सांगितलं. पण गुलिस्ताननं त्यांच्याकडं पैसे नसल्याचं सांगत पैसे दिलेच नाही.

फोटो स्रोत, Getty Images
"गुलिस्ताननं माझ्या पतीला पैसे दिले नाही. त्याउलट तुम्ही आजारी आहात तर मी तुम्हाला इनायत कली बाजारातून औषध आणून देतो, असं गुलिस्ताननं म्हटलं. त्यांतर गुलिस्तान दोन इंजेक्शन आणि काही गोळ्या घेऊन आला.
"गुलिस्तान खाननं नदीच्या किनाऱ्यावर शाह जमीन यांना एक इंजेक्शन दिलं आणि दुसरं इंजेक्शन घरी गेल्यावर घ्या आणि गोळ्या खा, त्यानं तुम्ही बरे व्हाल असं त्यानं माझ्या पतीला सांगितलं,'' असं आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं.
"इंजेक्शन घेतल्यानंतर माझ्या पतीची अवस्था आणखी खराब झाली. ते तिथंच जमिनीवर कोसळले. त्याठिकाणी असलेल्या लोकांनी माझ्या पतीला रुग्णालयात नेलं आणि नंतर मृतावस्थेत त्यांना घरी आणण्यात आलं," असंही त्यांनी जबाबात सांगितलं.
बदला घेण्यासाठी कट रचला
याबाबत आरोपी महिलेनं लोकांकडून माहिती घेतली त्यावेळी त्यांना समजलं की, गुलिस्ताननं त्यांच्या पतीला एक इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळं त्यांची तब्येत आणखी बिघडली होती. असं पोलिसांच्या जबाबातून समोर आलं.
गुलिस्तान खाननंच आपल्या पतीची हत्या केली असल्याचं आरोपीला वाटलं, त्यामुळं तेव्हाच त्यांनी पतीच्या हत्येचा बदला घेण्याचा निश्चय केला होता.
आरोपी महिला पाच-सहा महिने पतीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी गुलिस्तानच्या जवळ जाऊन बदला घेण्यासाठी एक कट रचला होता, असं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
त्यानंतर आरोपी महिलेनं गुलिस्तान यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी संदेश पाठवले. गुलिस्तान आधीच विवाहित होते आणि त्यांना एक मुलगाही होता. तरीही या महिलेनं गुलिस्तान खान यांना आमीष दाखवत राजी केलं होतं, अशी माहिती जबाबात समोर आल्याचं पोलीस म्हणाले.
"माझ्याकडे पैसे आहेत. त्यातून तुम्ही गाडी खरेदी करा आणि त्यात फिरा. तुम्ही तुमच्या प्रांतात काम करा आणि आपण आनंदात जीवन जगू," असं आरोपी महिलेनं मृत गुलिस्तान यांना म्हटलं होतं.
गेल्या वर्षी बडी ईद (रमजान ईद) च्या पूर्वी त्यांनी निकाह केला होता. त्यानंतर सहा महिने ते इकडं तिकडंच राहिले. यादरम्यान गुलिस्तानच्या बहिणीच्या घरीही राहिले. त्यानंतर आरोपी महिलेनं गुलिस्तान यांना किती दिवस इतरांच्या घरी राहणार असं म्हणत, भाड्यानं घर घेण्यासाठी राजी केलं. महिलेनंच पोलिसांना ही माहिती दिली.

फोटो स्रोत, PuneetBarnala/BBC
"त्यांनी इनायत कली इथं तीन हजार रुपये महिना भाडं असलेलं एक घर भाड्यानं घेतलं. त्यानंतर आरोपी महिला म्हणाली की, आपण इथं एकटे राहतो, चोर येऊ नये म्हणून सुरक्षेसाठी घरात पिस्तुल असायला हवं. त्यानंतर गुलिस्ताननं साडे तेरा हजारांचं एक पिस्तुल खरेदी केलं होतं," अशी माहिती पोलिसांनी महिलेच्या जबाबावरून दिली.
"माझ्या पहिल्या पतीचा मृत्यू तीन वर्षांपूर्वी झाला. दोन वर्ष मी बदला कसा घ्यायचा याच प्रयत्नात होते. घरात पिस्तुल आल्यानंतर त्याचा वापर कधी करता येणार याची वाट मी पाहत होते," असंही आरोपी महिलेनं म्हटलं.
घटनेच्या दिवसाबाबतही आरोपी महिलेनं पोलिसांना माहिती दिली. "मी रात्री जागीच होते. रात्री एक वाजेच्या सुमासार मी दुसऱ्या खोलीत गेले आणि पिस्तुलमध्ये गोळ्या भरल्या. त्यानंतर गुलिस्तानच्या खोलीत गेले. ते झोपले होते, मी त्याच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण गोळीच सुटत नव्हती, पिस्तुल तेव्हा काम करत नव्हतं."
त्यामुळं आरोपी महिला पुन्हा दुसऱ्या खोलीत गेली आणि पिस्तुल चेक केलं. त्यानंतर पुन्हा गुलिस्तानच्या खोलीत आल्या आणि पहिली गोळी डोक्यावर आणि दुसरी शरीरावर उजव्या बाजुला झाडली. गोळी झाडल्यानंतर दिवस उजाडेपर्यंत त्या तिथंच बसून राहिल्या. त्यानंतर त्यांनी लोकांना कुणीतरी तिच्या पतीला मारलं असल्याचं सांगितलं. त्यानंतर लोक गोळा झाले आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
आरोपी महिला सुरुवातीला हत्या केलीच नाही, असंच सांगत होती. पण पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर त्यांनी सर्व काही मान्य केलं आणि पोलिसांना सगळं सांगितलं. त्यांनी पेटीमध्ये असलेल्या पिस्तुलाबाबतही सांगितलं. पोलिसांनी गुलिस्तानच्या मुलाच्या उपस्थितीत ते पिस्तुल जप्त केलं, अशी माहिती पोलीस अधिकारी विलायत खान यांनी दिली.
स्थानिकांच्या मते गुलिस्तान चांगल्या स्वभावाचे व्यक्ती होते. ते स्थानिक पातळीवर काम करत होते. आरोपी महिलेला कोर्टात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








