पतौडी महापंचायत: 'लव्ह जिहाद'चं प्रकरण नसतानाही इथं का झाली महापंचायत? - ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पटौदी (गुरुग्राम, हरियाणा) मधून
पतौडीमधील एका अरुंद गल्लीमध्ये आमची कार थांबली. त्यावेळी, "गाडीवर प्रेस लिहिलेलं पाहूनचं आमच्या लक्षात आलं होतं की, महापंचायत संदर्भात बोलण्यासाठी पत्रकार आले आहेत," असं एक तरुण म्हणाला.
"आम्ही महापंचायतबाबत अगदी खुलेपणानं बोलू, आमची मतं मांडू, पण आता इथं नाही, एकांतात..." असं गळ्यात भगवा रुमाल असलेला एक तरुण म्हणाला.
या किराणा दुकानाबाहेर सात-आठ तरुण चर्चा करत होते. त्यापैकी अनेकांच्या गळ्यात भगवे रुमाल आणि कपाळावर टिळा लावलेला होता. हे सर्व तरुण 4 जुलैला पतौडीच्या रामलीला मैदानात झालेल्या महापंचायतीमध्येही सहभागी झाले होते.
पतौडीमध्ये धर्म रक्षा मंचच्या वतीनं नुकतीच महापंचायत आयोजित करण्यात आली होती. त्यात पतौडी आणि आसपासच्या गावातील रहिवाशांबरोबर इतर ठिकाणांहून आलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि साधू-संतांचाही सहभाग होता. स्थानिक प्रशासनानं मात्र यासाठी परवानगी नाकारली होती.
हिंदुत्ववादी संघटनांनी महापंचायतसाठी परवानगी मागितली होती, पण ती नामंजूर करण्यात आली होती, असं उपजिल्हाधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितलं.
या पंचायतीमध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या विरोधात हिंसक आणि चिथावणी देणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
एका आयोजकाच्या मते, ही महापंचायत आयोजित करण्यामागचा उद्देश लव्ह जिहाद, जमीन जिहाद आणि धर्मांतराचा मुद्दा मांडणे आणि हिंदूंच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी लोकांना एकजूट करणं हा होता.
पतौडीतील सामाजिक स्थिती
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपासून सुमारे 60 किलोमीटर आणि गुरुग्रामपासून 30 किलोमीटर अंतरावरील पतौडी हे नवाबांच्या इतिहासामुळं सर्वांना परिचित आहे.
याठिकाणच्या 20 हजार लोकसंख्येपैकी बहुतांश हिंदू आहेत. एका अंदाजानुसार इथं चार-पाच हजार मुस्लीम राहत आहेत.
इंग्रजांच्या काळात स्थापन झालेल्या पतौडी या संस्थानामध्ये जवळपासची 52 गावं होती. त्यामध्ये बहुतांश लोकसंख्या हिंदूंची होती. मात्र इथली सत्ता नवाबांच्या हाती होती. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच नवाबांच्या कुटुंबाचा वंशज आहे.
स्वतंत्र भारतात संस्थानं खालसा झाली. पण पतौडीमध्ये असलेला धार्मिक सलोखा तेव्हापासून टिकून होता. हिंदु-मुस्लीम याठिकाणी अत्यंत एकोप्यानं राहतात. याठिकाणी कधीही धार्मिक हिंसाचार झाला नाही, असं पतौडीमधील लोक सांगतात.

फोटो स्रोत, UGC
"पतौडी हे शांत शहर आहे. याठिकाणी जवळपास 25 टक्के मुस्लीम आहेत. हिंदु आणि मुस्लिमांमध्ये बंधुभाव आहे. नवाबांचा इतिहासही हिंदू-मुस्लीम ऐक्याची साक्ष देणारा आहे. पतौडीमध्ये रामलीलाही येथील नवाबांनी सुरू केली होती. याठिकाणी कधीही मोठी धार्मिक दंगल झाली नाही,'' असं ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश यांनी सांगितलं.
04 जुलैला झालेली महापंचायतही याच मैदानात झाली होती.
"पतौडीचा एक इतिहास सांगतो की नवाबांनी इथं रामलीला सुरू केली होती. पण सध्या अशी स्थिती आहे की, हिंदूंच्या हितांच्या संरक्षणासाठी इथं महापंचायत करावी लागत आहे. पण महापंचायतीनंतरही इथं कोणतीही घटना घडली नाही, हाच याठिकाणी अजूनही धार्मिक सलोखा कायम असल्याचा पुरावा आहे," असं या महापंचायतमध्ये सहभागी झालेल्या एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानं म्हटलं.
हिंदुत्ववादी तरुणांच्या एका घोळक्याजवळ एक वृद्ध महिलाही बसली होती. "याठिकाणी सगळे एकोप्यानं राहतात. हिंदू-मुस्लीम याचं एकमेकांच्या घरी येणं जाणं आहे. लग्नांमध्येही आम्ही एकमेकांना बोलावतो. त्यांना आमची काही अडचण नाही आणि आम्हालाही त्यांची काही अडचण नाही," असं त्या आजी म्हणाल्या.
महापंचायतीनंतर मुस्लिमांना भीती
पतौडीमध्ये मुस्लीम लोकसंख्या ही शहरातील जामा मशीद परिसराच्या आसपास आहे. याठिकाणचे लोक कॅमेरा पाहून बोलायलाही कचरतात.
"पतौडीमधील वातावरण चांगलं आहे. महापंचायतीनंतरही काहीही घडलेलं नाही. आम्ही काही बोललो तर यामुळं वातावरण बिघडेल,'' असं एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले.
70 वर्षीय मेहमूद हे पतौडीचे मूळचे निवासी नाहीत. ते बाहेरून येऊन इथं स्थायिक झाले. त्यांचं कपड्याचं दुकान आहे. त्यांच्या मते, "महापंचायतमध्ये थेट धमक्या देण्यात आल्यानं मुस्लीम घाबरलेले आहेत. मुस्लिमांना बाहेर काढा. त्यांना दिलेली दुकानं-घरं रिकामी करायला लावा. असं हिंदूंना सांगण्यात आलं आहे."

"फक्त पतौडीमध्येच मुस्लीम राहतात. आजूबाजूची सर्व गावं हिंदूंची आहेत. आज हिंदू मुस्लिमांना बाहेर काढण्याबद्दल बोलत आहेत. हा मुस्लिमांवर अन्याय आहे, पण त्या विरोधात आम्ही करणार तरी काय? घोषणाबाजी झाल्यानं आम्हाला फार वाईट वाटलं, पण आम्ही शांत राहिलो, आम्ही काहीही केलं नाही," असं मेहमूद म्हणाले.
याठिकाणी सगळे लोक मिळून मिसळून राहत आहेत. पण महापंचायतीनंतर तणाव वाढला आहे, असं मेहमूद सांगतात. गेल्या काही दिवसांत जवळपासच्या हिंदुबहुल गावांमध्ये गेलेल्या फेरीवाल्या किंवा इतर कामानं गेलेल्या मुस्लीमांना मारहाण आणि अडवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

"मुस्लीम जर आसपासच्या गावात काही सामान विकण्यासाठी गेले तर त्यांच्यावर आरोप केले जातात. जर व्यापाऱ्यांनी मुस्लिमांकडून काही सामान उधारीवर घेतलं असेल तर, आता त्यांना पैसे मागायला जाता येणार नाही. जर फेरीवाल्यांना आसपासच्या गावात जाता आलं नाही, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल," असं मेहमूद सांगतात.
"पतौडीमध्ये अनेक शतकांपासून सलोखा आहे. हिंदू-मुस्लीम एकमेकांच्या अडचणीच्या काळात उभे राहतात. त्यामुळं मग महापंचायतचं आयोजन कशासाठी करण्यात आलं हे समजलंच नाही,'' असं भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू खान म्हणाले.
"या पंचायतमधून बाहेर आलेल्या लोकांनी चिथावणीखोर घोषणा दिल्या होत्या. तरीही पतौडीमध्ये शांतता आहे," असंही ते म्हणाले.

"बाहेरचे लोक येऊन इथलं वातावरण गढूळ का करत आहेत हे माहिती नाही. पतौडीतील हिंदुंनी कधीही आम्हाला त्रास दिला नाही. याठिकाणी घोषणाबाजी झाली असली तरी आम्हाला भीती नाही. कारण येथील लोकांवर आमचा विश्वास आहे," असं मत 70 वर्षीय हाजी अब्दुल रशीद यांनी मांडलं.
भारतात 'लव्ह जिहाद'ची प्रकरणं वाढत आहेत का?
भारतात हिंदुत्ववादी संघटनांनी लव्ह जिहादबाबत आरोप केले आहेत. मुस्लीम तरुण धार्मिक ओळख लपवून हिंदु असल्याचं सांगतात आणि हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. त्यानंतर त्यांचं शोषण केलं जातं. हिंदू संघटना यालाच 'लव्ह जिहाद' म्हणतात. पण अशा प्रकरणांबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही.
पतौडीमध्ये हिंदू धर्म रक्षा संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेली महापंचायतही याच्याच विरोधात होती. पतौडीमध्ये अशी अनेक प्रकरणं समोर आली असल्याचा दावा, महापंचायतीतील काही वक्त्यांनी केला.
पतौडीसह आसपासच्या गावात अशी 18 प्रकरणं समोर आल्याचं सांगण्यात आलं.

मात्र बीबीसीनं हिंदुत्ववादी संघटनांकडून अशा प्रकरणांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर एकाही प्रकरणाची माहिती देण्यात आली नाही.
मानेसरचे पोलिस उपायुक्त वरुण सांगला यांनीही, "गेल्या काही महिन्यांत पतौडी आणि जवळपासच्या परिसरात अशी एकही तक्रार दाखल झालेली नाही," अशी माहिती बीबीसीबरोबर बोलताना दिली.
गुरुग्राम पोलिसांनी लव्ह जिहादची काही प्रकरणं दाखल केली आहे का? असं आम्ही त्यांना विचारलं. त्यावर, "आमच्याकडे अशा प्रकारचा काहीही डाटा नसतो," असं ते म्हणाले.
हिंदू धर्म रक्षा मंचशी संलग्न असलेले संजीव यादव जानौला यांनी या महापंचायतचं आयोजन केलं होतं.
"महापंचायतमध्ये केवळ पतौडी नव्हे तर इतरही लांबच्या गावांतील लोक आणि साधू-संत आले होते. पतौडी परिसरात वाढणारे लव्ह जिहाद, जमीन जिहाद आणि धर्मांतरासारखे वाईट प्रकार दूर करण्यासाठी याचं आयोजन करण्यात आलं होतं," असं जानौला यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
"पतौडी परिसरात अनेक वर्षांपासून शांततेचं वातावरण आहे. ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न जिहादींनी करू नये असा इशारा आम्ही दिला आहे," असंही ते म्हणाले.
याठिकाणी झालेल्या घोषणाबाजीबाबतही जानौला यांना आम्ही विचारणा केली. त्यावर "अशा प्रकारची घोषणाबाजी चुकीची होती. आम्ही कार्यक्रमापूर्वीच ठरवलं होतं की, याठिकाणी केवळ हिंदुंचं हित आणि सौहार्दाविषयी चर्चा केली जाईल. कुणाला कापणं किंवा जाळणं हे आमचं काम नाही," असं ते म्हणाले.
पतौडीच्या परिसरात त्यांच्या टीमला लव्ह जिहादची 18 प्रकरणं आढळली असल्याचा दावा, जानौला यांनी केला आहे. पण एकाही प्रकरणाबाबत त्यांना ठोस माहिती देता आली नाही.
आम्ही त्यांना अशा घटनांमधील पीडित कुटुंबांबाबतही विचारणा केली. त्यावर त्यांनी, "ज्यांच्या कुटुंबातील मुलगी किंवा बहिणीबरोबर अशी घटना घडते ते मागे हटतात. ते आमच्यासमोर अशा घटना घडल्याचं सांगतात. पण सार्वजनिकरित्या ते स्वीकारण्यास तयार नसतात," असं सांगितलं.
मात्र ज्या मुद्द्यावर महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्यामुळं परिसरातील शांततेला धोका निर्माण झाला आहे, त्याचं एकतरी उदाहरण देण्याचा आग्रह आम्ही केला.
त्यावर "अशा प्रकारच्या प्रकरणांचा पूर्ण अहवाल आमच्या समितीकडं आहे. वेळ आली की तोही सर्वांसमोर मांडू. पण हिंदू समाजातील पीडित समोर यायला घाबतात. समाजाच्या भीतीनं ते बोलत नाहीत," असं जानौला म्हणाले.

भारताच्या संविधानानं प्रौढ नागरिकांना लग्नाचा अधिकार दिला आहे. विविध धर्मातील लोकांनाही एकमेकांशी लग्न करण्याचा अधिकार आहे. मग हिंदू रक्षा मंच सारख्या संघटना असा लग्नांचा विरोध का करतात, असंही आम्ही विचारलं. तेव्हा "भारताचं संविधान देशाला काय काय करण्याची परवानगी देतं माहिती नाही. पण हा जो भारताचा कायदा तयार झाला आहे, तो फक्त हिंदुंवरच का लागू होतो?" असा प्रतिप्रश्न जानौला यांनी मांडला.
"आंतरधर्मीय विवाहाला आम्ही विरोध करणारच. अगदी सर्वांना सांगून विवाह होत असले तरी आम्ही विरोध करणार. हिंदू मुलीचा विवाह हिंदूशीच होईल. हिंदू मुलगी आम्ही मुस्लिमांच्या घरात जाऊ देणार नाही," असंही ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
"मुस्लीम लोक हिंदू नाव सांगून गावामध्ये फिरतात. आमच्या भोळ्या-भाबड्या हिंदू तरुणींना जाळ्यात अडकवतात, आणि त्यांना स्वतःकडे आकर्षित करतात."
"हे जिहादी काही काळ त्यांना सोबत ठेवतात आणि मग सोडून देतात. आमीर खाननंही असंच केलं आहे. खालच्या पातळीपासून अगदी वरच्या पातळीपर्यंत एकाच प्रकारचा जिहाद सुरू आहे."
"हिंदू धर्मात एखाद्यानं पत्नीला सोडलं तर त्याला सहजपणे दुसरं लग्न करता येत नाही. पण मुस्लीमांमध्ये पत्नीला सोडून दुसरं लग्न करणं सोपं आहे," असंही जानौला म्हणाले.

"जर दोन जणांचं एकमेकांवर प्रेम असेल तर मी त्याला लव्ह जिहाद मानत नाही. पण लक्ष्य करून, धर्मांतर करायला लावून हिंदु मुलीला अडकवणं चुकीचं आहे. माझ्या माहितीनुसार पतौडीत अद्याप असं प्रकरण समोर आलेलं नाही," असं वरिष्ठ पत्रकार ओमप्रकाश म्हणाले.
"नुकतंच लव्ह जिहादसारखं एक प्रकरण समोर आलं होतं. पण त्यातही मुलगी आणि मुलगा यांच्यात आपसांत तडजोड झाली. तक्रारही दाखल झाली नाही. अशी प्रकरणं असल्याच्या चर्चा आहेत, पण मला त्याची माहिती नाही. इकडून तिकडून अशा बातम्या येत असतात. आता याबाबत एवढ्या चर्चा सुरू आहेत तर काही तरी होतच असेल," असंही ओमप्रकाश म्हणतात.
पतौडीमध्ये नवाबांच्या महालाच्या भींतींच्या सावलीत काही लोक पत्ते खेळत होते. त्याठिकाणी धर्मपाल बत्रा नावचे एक वृद्धही होते. ते म्हणाले, "मी महापंचायतमध्ये गेलो नाही. धर्म-धर्मांतर, लव्ह जिहाद याबाबत आमच्या 52 गावांची महापंचायत होती. पण आमच्या परिसरात तर असं काहीही घडलेलं नाही."
मुलगा आणि मुलगी यांच्यात काही बिनसलं की त्या प्रकरणाला 'लव्ह जिहाद' ठरवलं जातं असं धर्मपाल बत्रा म्हणतात.
"मुलगा-मुलगी दोघं एकत्र राहत असतात. पण त्यांचं जेव्हा जमत नाही आणि नात्यात कटुता येऊ लागते तेव्हा, त्याला लव्ह जिहाद म्हणतात," असं मत त्यांनी मांडलं.

चिथावणीखोर घोषणाबाजीबाबत बोलताना त्यांनी, "त्याठिकाणी सर्व प्रकारचे लोक येतात. ते त्यांच्या पद्धतीनं बोलतात. त्यामुळं वातावरण खराब होतं. पण याठिकाणी फारसा काही परिणाम झाला नाही. पतौडीमध्ये सगळे एकत्र राहत आहेत," असं म्हटलं.
मग ही घोषणाबाजी का करण्यात आली असावी असं आम्ही त्यांना विचारलं. त्यावर "काही लोक नाव मोठं व्हावं यासाठी हे सर्व करत आहेत. पतौडी 52 गावांचं संस्थान आहे. त्यामुळं इथं ही महापंचायत झाली. आसपासच्या गावांमध्येही केवळ मुस्लीम इथंच आहेत, म्हणून इथं याचं आयोजन केलं असावं," अशी शक्यता त्यांनी मांडली.
मात्र तसं असलं तरी या महापंचायतीमुळं हिंदू मुस्लीम ऐक्याला धोका नसल्याचंही ते म्हणाले.
पोलिसांनी दाखल केली FIR
महापंचायतीत जामिया येथील सीएएविरोधातील आंदोलनात गोळीबार प्रकरणामुळं चर्चेत आलेले रामभक्त गोपाल नावाच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानंही हिंसक भाषण केलं. त्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत रविवारी त्यांना अटक केली आहे.
एका स्थानिक हिंदू व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रामभक्त गोपाल म्हणजेच गोपाल शर्मांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 153अ आणि 295अ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
या महापंचायतीमध्ये करणी सेनेचे प्रमुख आणि हरियाणा भाजपचे प्रवक्ते सूरजपाल अमू यांनीही चिथावणीखोर भाषण केलं होतं. पण त्यांच्या विरोधात अद्याप कारवाई झालेली नाही.
गुरुग्राम पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकन यांनी गोपाल यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला. "या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. संबंधित व्यक्तीला अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत," असं त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आम्ही गोपाल शर्मा यांचीही बाजू जाणून घेतली. तेव्हा, "माझ्या भाषणांत असे काही शब्द होते, ज्यांचा वापर मी करायला नको होता. पण तिथं प्रचंड उकाडा आणि गर्दी असल्यानं चुकून माझ्या तोंडून असे काही शब्द निघाले. उचलून आणायचं म्हणजेच मी लग्न करून आणायचं असं म्हणत होतो," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
"मी त्याठिकाणी मुस्लीम मुलींना सन्मानानं सनातन धर्मात आणावं असं म्हटलं. माझ्या रक्तात श्री राम आणि भगवान परशुराम यांचे संस्कार आहे. ते मला कोणत्याही माता-भगिनींच्या अपमानाची परवानगी देत नाहीत," असंही ते म्हणाले.
पण अशा भाषणामुळं हिंसाचार भडकण्याची शक्यता होती, असं बीबीसीनं त्यांना विचारलं. त्यावर "माझा भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास आहे. हिंसाचार हा तोडगा आहे असं मला वाटत नाही आणि मी त्याचं समर्थनही करत नाहीत. मी केवळ हिंदूंना स्वसंरक्षणाचा सल्ला देतो," असं त्यांनी सांगितलं.
गोपाल यांनी त्यांच्या भाषणात इशाऱ्यानं हिंदू तरुणांना शस्त्र बाळगण्याचं आवाहनही केलं.

"मी तरुणांना भगवा झेंडा हाती घेण्याचं आवाहन करत होतो. इतर सर्व तुम्हाला वाटत आहे. संविधानही आपल्याला स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देतं. शस्त्र आणि शास्त्र ही उत्तम जोडी आहे. स्वसंरक्षणासाठी मी हिंदूंना प्रोत्साहन देत राहील. मी केवळ देशहित आणि देशाच्या सन्मानाबाबत बोलतो," असंही गोपाल शर्मा म्हणाले.
तुम्हाला भीती वाटत नाही का? असंही आम्ही त्यांना विचारलं. त्यावर "मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. धमक्या मिळतात. पण जोपर्यंत युपीच्या गादीवर आमचे योगीजी आहेत तोपर्यंत मला काहीही भीती नाही. दिल्लीच्या गादीवरही ते बसावे यासाठी आम्ही प्रयत्न करू. योगीजी आहेत, तोपर्यंत रामभक्त गोपालला काहीही भीती नाही," असं उत्तर त्यांनी दिलं.
पतौडीमधील हिंदुत्ववादी तरुणांचा गोपाल यांना पाठिंबा असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. गोपाल यांनी म्हटलं ते योग्यच असल्याचं तरुण म्हणतात.

"आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात काम करत आहोत, आणि मुळापासून याला संपवू," असं जितेंद्र कुमार नावाच्या एका स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यानं म्हटलं.
वृद्ध महिलेची चिंता
ज्या हिंदुत्ववादी तरुणांनी आम्हाला मोकळेपणानं विचार मांडायचे असल्याचं सांगून बोलावलं होतं, ते त्याठिकाणी कुलूप लावून निघून गेले.
"पतौडीमधील वातावरण आता गढूळ झालं आहे. तरुण दुकानांवर घोळक्यानं उभे राहतात. मुलींना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यांना घरात कोंडून ठेवावं लागत आहे. दुकानांवर गर्दी करून सगळे उभे राहतात," असं शहरातील धार्मिक सलोख्यावर बोलणाऱ्या वृद्ध महिलेनं सांगितलं.
"मुलींना घराच्या बाहेरच पडता आलं नाही, त्या कोंडून राहिल्या तर त्यांचा विकास कसा होणार. सगळे निर्बंध मुलींवरच आहेत," अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








