क्युबामध्ये हजारो नागरिकांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली?

    • Author, बीबीसी मुंडो
    • Role, लंडन

क्युबामध्ये सध्या गेल्या काही दशकांमधलं सर्वात मोठं बंड सुरू आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये प्रथमच हजारो नागरिक कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरले आहेत.

क्युबा बेटावरच्या गावा - शहरांतले हजारो नागरिक स्वातंत्र्याची आणि हुकुमशाही संपुष्टात आणण्याची मागणी करत रस्त्यांवर उतरले आहेत.

आंदोलकांची संख्या आणि विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष मिगेल दियाज कनेल यांनी राष्ट्रीय टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना संबोधित केलं आणि त्यांनाही रस्त्यावर उतरून आंदोलकांचा सामना करण्याचा संदेश दिला.

"क्रांतिकाऱ्यांना रस्त्यावर उतरुन लढण्याचा आदेश दिला आहे," असं राष्ट्रपतींनी म्हटलं. या संकटासाठी अमेरिकेचे निर्बंध आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारनं उचललेली पावलं जबाबदार असल्याचंही राष्ट्राध्यक्ष कनेल यांनी म्हटलं.

हे आंदोलन हवानाच्या दक्षिण पश्चिमेला असलेल्या सॅन अँटारियो डी लॉस बॅनोस शहरातून सुरू झालं. त्यानंतर देशातील इतर भागांमध्ये ते वेगानं पसरलं.

"हे आंदोलन लोकांच्या स्वातंत्र्यासाठी आहे. आम्ही आता आणखी सहन करणार नाही. आम्हाला कशाचीही भीती नाही. आम्हाला बदल हवा आहे. आता आम्हाला हुकूमशाहीची गरज नाही," असं सॅन अँटारियोमधून एका आंदोलकानं बीबीसी मुंडोला फोनवरून सांगितलं.

पिनार डेल रियोमध्येही आंदोलन सुरू आहे. सोशल मीडियावर सॅन अँटारियोमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत समजल्यानंतर त्यांच्या प्रांतातही आंदोलन सुरू झालं, असं या ठिकाणचे आंदोलक अॅलेक्झांड्रो यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना म्हटलं.

"आम्ही सोशल मीडियावर आंदोलन पाहिलं तर लोक बाहेर पडले. आता आम्हाला सहन होत नाही. तो दिवस आता आला आहे. आमच्याकडे अन्न नाही, औषध नाही आणि स्वातंत्र्यही नाही. त्यांना आम्हाला जगू द्यायचंच नाही," असंही ते म्हणाले.

बीबीसी मुंडोनं याबाबत सरकारची बाजू जाणून घेण्यासाठी इंटरनॅशनल प्रेस सेंटर या अधिकृत संस्थेशी संपर्क केला. पण त्यांच्याकडून काहीही उत्तर मिळालं नाही.

सोशल मीडियावर समोर येणारे व्हीडिओ आणि अनेक नागरिकांच्या वक्तव्यांनुसार क्युबामध्ये रविवारी (11 जुलै) झालेल्या आंदोलनाला पूर्णपणे दडपण्यात आलं. सरकारच्या विरोधात आंदोलनाची परवानगी नसणं, ही क्युबासाठी अभूतपूर्व अशी बाब आहे.

अशा परिस्थितीत क्युबाचे हजारो नागरिक देशाच्या विविध भागांमध्ये रस्त्यावर कसे उतरले?

बीबीसी मुंडोनं तीन मुद्द्यांद्वारे याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.

1. कोरोना व्हायरसचं संकट

क्युबामध्ये झालेलं आंदोलन हे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना कोरोनामुळं आलेला थकव्याचा परिणाम असू शकतं. आरोग्य आणि आर्थिक बाबींचा विचार करता गेल्या काही महिन्यांत देशानं मोठ्या संकटाचा सामना केला आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर क्युबाला संकटाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारचं संकट क्युबासमोर उभं राहिलं आहे.

कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेली गंभीर स्थिती आणि आर्थिक बाबींसंदर्भात सरकारनं उचललेली पावलं यामुळं या आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे. कारण या सर्वामुळं क्युबातील नागरिकांचं जीवन अधिक संघर्षमय बनलं आहे.

2020 च्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये क्युबानं कोरोना संकटावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळवलं होतं. पण गेल्या काही महिन्यांत येथील कोरोनाच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाची प्रकरणं क्युबामधून समोर येत आहेत.

केवळ गेल्या रविवारचे आकडे पाहिले तर क्युबामध्ये कोरोनाचे नवे 6750 रुग्ण आढळले आणि 31 जणांचा मृत्यूदेखील झाला होता. पण अनेक विरोधी संघटनांनी सरकार आकडे लपवत असल्यानं सरकारी आकड्यांवरून देशाची खरी स्थिती समोर येत नसल्याचा दावा केला आहे. कोरोनामुळं होणारे अनेक मृत्यू इतर कारणं दाखवून लपवले जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये क्युबानं रोजच्या कोरोना रुग्णांच्या आकड्याचा नवा विक्रम केला. अनेक रिपोर्ट्सनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळं आरोग्य केंद्रांमध्येदेखील यंत्रणा कोलमडली आहे.

बीबीसी मुंडोने गेल्या काही दिवसांत क्युबाच्या अनेक लोकांशी चर्चा केली. त्यात अनेक नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांचा घरातच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यांना उपचारच मिळू शकले नाही. औषधांच्या अभावामुळं अनेकांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लिसवेलिस इचेनिक हे या सर्वांपैकीच एक आहेत. रुग्णालयात बेड मिळाला नाही म्हणून त्यांच्या 35 वर्षांच्या भावाचा घरीच मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. लेनियर मिगेल पेरेज यांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळं त्यांच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

सोशल मीडयावर गेल्या काही दिवसांत लोकांनी अशाप्रकारच्या परिस्थितीचं वर्णन केलं आहे. #SOSCuba हॅशटॅगचा वापर केलेल्या मेसेजचा सोशल मीडियावर खच आहे. लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतही मागितली आहे. कोरोना विषाणूमुळं निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता, त्यांनी दखल देण्याची मागणीही केली आहे.

क्युबाच्या हजारो नागरिकांनी या मोहिमेत सहभागही घेतला आहे. सुविधांचा अभाव असलेल्या अनेक रुग्णालयांचे व्हीडिओदेखील व्हायरल होत आहेत.

रविवारी (11 जुलै) जनतेला दिलेल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाले की, देशातली सध्याची स्थिती ही इतर देशांसारखीच आहे. विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आल्यामुळं कोरोना क्युबामध्ये उशिरानं पोहोचला असंही ते म्हणाले.

क्युबानं कोरोना विषाणूच्या विरोधात स्वतःची लस बनवल्याचंही त्यांनी प्रामुख्यानं सांगितलं. मात्र बहुतांश प्रांतांमध्ये लसीचे डोस हे अत्यंत मोजक्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

2. आर्थिक स्थिती

क्युबाच्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख केंद्र हे पर्यटन आहे. पण कोरोनामुळं देशातील पर्यटन ठप्प झालेलं आहे. क्युबाच्या एकूणच सामाजिक आणि आर्थिक स्थितिवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं देशात महागाई वाढली आहे. वीजेमध्ये सातत्यानं कपात होत आहे. तसंच अन्नधान्यांच्या कमतरतेबरोबरच औषधं आणि जीवनावश्यक वस्तुंचीही कमतरता निर्माण झाली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला सरकारनं आर्थिक सुधारणांसाठी नव्या पॅकेजचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात वेतन वाढवण्याचा मुद्दाही होता. पण त्यामुळं वस्तुंच्या किमती अचानक वाढल्या. कॅली के जवेरियाना युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्रज्ञ पॉवेल विदाल यांनी, आगामी काही महिन्यांमध्ये दरांमध्ये 500 ते 900 पट वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

क्युबामध्ये विदेशी चलनाचा तुटवडा आहे. ते पाहता सरकारनं गेल्या वर्षापासून इतर चलनांमध्ये खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टोअर्स सुरू करायला सुरुवात केली आहे. या स्टोअर्समध्ये देशातील बहुतांश लोकांना पगार ज्या चलनातून मिळत नाही, अशा चलनाद्वारे (इतर देशांच्या) खाद्यान्न आणि इतर वस्तुंची विक्री केली जात आहे.

या साथीमुळं दुकानांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. वीज कपात ही तर अगदी सामान्य बाब बनली आहे.

औषधांच्या दुकानांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये औषधं मिळेनासी झाली आहेत. अनेक भागांमध्ये तर गव्हाच्या पीठाच्या कमतरतेमुळं भोपळ्यापासून तयार होणाऱ्या ब्रेडची विक्री केली जात आहे.

बीबीसी मुंडोनं गेल्या आठवड्यात या ठिकाणच्या अनेक लोकांशी चर्चा केली. क्युबामध्ये स्कॅबिज (खरुज) आणि इतर संसर्गजन्य रोग नेहमी पसरत असतात, मात्र तसं असूनही औषधांच्या दुकानांमध्ये ताप कमी करणाऱ्या अॅस्पिरिन सारख्या साध्या औषधाचीही उपलब्धता नसल्याचं त्यांनी सांगितलं.

गेल्या महिन्यात क्युबाच्या सरकारनं काही काळासाठी डॉलर्सच्या रुपात रोख स्वीकारण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. क्युबामध्ये बाहेरून जो पैसा येतो तो त्यांना डॉलर्समध्येच मिळतो. अर्थतज्ज्ञांच्या मते, सरकारचं हे पाऊल अमेरिकन चलनावर लावलेली मोठी बंदी आहे. यापूर्वी फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारनं असं केलं होतं.

क्युबाच्या सरकारनं अमेरिकेच्या निर्बंधांचा संबंध देशातील बिघडलेल्या आर्थिक स्थितीशी जोडला आहे.

यामुळंच देशातील लोकांच्या प्रगतीला धोका निर्माण झाला असून आरोग्याचं संकट निर्माण झालं आहे, असं रविवारी टीव्हीद्वारे दिलेल्या संदेशात राष्ट्रपती दियाज कनेल यांनी म्हटलं.

3. इंटरनेट

या पूर्वी क्युबामध्ये सर्वात मोठं आंदोलन ऑगस्ट 1994 मध्ये फीडेल कॅस्ट्रो यांच्या क्रांतीच्या सुरुवातीनंतर झालं होतं. ते ऐतिहासिक आंदोलन हवानामध्ये झालं होतं. पण हवानामध्ये नेमकं काय झालं? हे इतर प्रांताच्या लोकांना समजलंही नव्हतं.

या घटनेच्या 30 वर्षांनंतर आता स्थिती अगदी वेगळी आहे. फीडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारच्या काळातही क्युबामध्ये इंटरनेटचं जाळं मर्यादीत प्रमाणातच होतं, पण हे खरं असलं तरी राऊल कॅस्ट्रो यांनी ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळं क्युबाला अधिक कनेक्टिव्हिटी मिळाली.

तेव्हापासून क्युबाच्या नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर हा सरकारविरोधातील नाराजी दर्शवण्यासाठी केला आहे. अनेकदा अधिकाऱ्यांना त्याचं उत्तरही द्यावं लागलं आहे.

सध्या क्युबाची बहुतांश लोकसंख्या (त्यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे) फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम चा वापर करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सरकारी मीडियापेक्षा इतर वेगळी माहितीही मिळते.

इंटरनेटमुळं क्युबामध्ये मोठ्याप्रमाणावर स्वायत्त अशा माध्यमांचा उदय झाला आहे. ज्या मुद्द्यावर सरकारी माध्यमातून माहिती मिळत नाही, त्यावर याद्वारे माहिती मिळते.

आंदोलन हा अधिकारांचा भाग असल्याचा दावा करणारे कलाकार, पत्रकार, आणि बुद्धिजीविंसाठीही सोशल मीडिया हे व्यासपीठ बनलं आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आणखी एक आंदोलन झालं होतं. तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं होतं. पोलिस उपोषण करणाऱ्या काही तरुण कलाकारांच्या घरात घुसले होते, त्यानंतर हे आंदोलन झालं होतं.

सॅन अँटारियोमधून सुरू झालेल्या आंदोलनांबाबतही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच माहिती मिळाली होती.

देशामध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी देशाचे शत्रू सोशल मीडिया नेटवर्कचा वापर करत असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. हे लोक अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही सरकारनं केला आहे.

अनेक लोकांसाठी हे आंदोलन महत्त्वाचं असलं तरी यातून पुढं काय येणार याबाबत अनिश्चिततेचं वातावरण आहे.

क्युबाचे नागरिक सध्या आंदोलन आणि पोलिसांच्या दडपशाहीचा सामना करत आहेत. आता आगामी काळात सरकार काय पावलं उचलणार आणि इथले नागरिक काय करणार हे पाहावं लागणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)