Cannabis : खरंच जगभरात गांजाची सर्रास विक्री सुरू होईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मानसी दाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
जगभरातील अनेक देशांमध्ये गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली जात आहे. याचवर्षी अमेरिकन काँग्रेसमध्ये गांजाला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वाचं विधेयक सादर करण्यात आलं.
मे 2021 मध्ये सादर करण्यात आलेल्या मारिजुआना अपॉर्च्युनिटी रिइनव्हेस्टमेंट अँड एक्सपंजमेंट अॅक्ट म्हणजेच मोर अॅक्ट अंतर्गत केंद्रीय स्तरावर गांजाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे विधेयक आधी डिसेंबर 2020 मध्ये सादर करण्यात आलं होतं. पण त्यावेळी ते सिनेटमध्ये मंजूर होऊ शकलं नव्हतं.
नुकताच मनोरंजनासाठी गांजाचा वापर हा गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्यात आला आहे. उरुग्वेनं 2013 मध्ये, कॅनडानं 2020 आणि दक्षिण आफ्रिकेच्या सुप्रीम कोर्टानं 2018 मध्ये याच्या वापराला मंजुरी दिली.
न्यूझीलंडमध्येही याबाबत चर्चा सुरू आहे. लेसोथोनंही याची शेती करण्यास परवानगी दिली आहे. तर मोरोक्कोमध्ये याच्या वैद्यकीय वापरास मंजुरी मिळाली आहे.
गांजाच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्यास विरोध करणारे यामुळं व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता आणि मानसिक आरोग्यावर परिणाम अशी ठोस कारण देत आहेत. याच गांजाच्या व्यवसायावर आपण चर्चा करणार आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
जास्तीत जास्त देश गांजा गुन्हेगारीच्या श्रेणीतून वगळत आहेत का? आणि आता संपूर्ण जगात सहजपणे गांजा उपलब्ध होणं शक्य होईल का? - असा आमचा प्रश्न असा आहे.
या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
गांजा व्यवसाय गुंतागुंतीचा
गेल्या दशकभरात अमेरिकेच्या 17 राज्यांनी मनोरंजनासाठी आणि 36 राज्यांनी वैद्यकीय वापरासाठी गांजाच्या वापराला परवानगी दिली आहे. म्हणजे त्या राज्यांमध्ये आता सहजपणे गांजा खरेदी करता येऊ शकतो.
अमेरिकेत गांजाच्या बाजाराचा विस्तार करण्यात कॅलिफोर्निया सर्वात आघाडीवर आहे. 1996 मध्ये याठिकाणी गांजाच्या वैद्यकीय वापराला आणि नंतर 2016 मध्ये मनोरंजनासाठीच्या वापराला परवानगी मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images
व्हॅन बट्सिक अमेरिकेच्या बर्केले कॅनबिस रिसर्च सेंटरचे सह-समन्वयक आहेत. त्यांच्या मते, कॅलिफोर्नियामध्ये मनोरंजनासाठी गांजाला परवानगी देणाऱ्या कायद्यात 'प्रौढांसाठी' असा उल्लेख आहे. पण त्याचा वापर कशाप्रकारे होईल, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
"याचा अर्थ, तुमचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये राहत असाल तर कायद्यानं तुम्हाला गांजा घरी नेण्याची परवानगी आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी याच्या वापरावर निर्बंध आहेत. उत्पादन आणि विक्रीचा विचार करता त्यासाठी राज्याच्या प्रशासनाची परवानगी (परमिट) गरजेची आहे," असं त्यांनी सांगितलं.
मात्र हे परमिट मिळणं सोपं नाही. जर एखाद्या शहराला त्यांच्या शहरात गांजाची विक्री खुलेआम नको असेल तर ते परमिट देण्यावर आणि त्यांच्या हद्दीत गांजाच्या विक्रीवर बंदी लावू शकतात.
म्हणजे काही ठिकाणी गांजा अगदी सहजपणे मिळतो तर काही ठिकाणी त्याच्या विक्रीवर बंदी आहे. मग असा परिस्थितीत लोक गांजाची खरेदी कशी करतात? शिवाय बेकायदेशीर मार्गाऐवजी कायदेशीररित्या गांजा खरेदी करण्याचा फायदा काय?
"कॅलिफोर्नियामध्ये गांजाच्या बाजारावर नियामकाची नजर असते. परवाना असलेल्या दुकानांमधून गांजा खरेदी करण्याचा अर्थ, त्याच्या उत्पादनात सर्व उच्च मानकांचं पालन करण्यात आलं आहे, तसंच शुद्धता आणि दर्जाच्या संदर्भात त्याच्या चाचण्या झाल्या आहेत असा होतो. तसंच यात हानिकारक असे धातू किंवा किटकनाशकांचे कण नसल्याची खात्री असते, असं व्हॅन बट्सिक सांगतात.
ग्राहकांसाठी हा विषय सरळसाधा असला तरी उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी तो गुंतागुंतीचा आहे. त्याचं कारण म्हणजे संपूर्ण देशात कायदेशीर मान्यता नसल्यानं बँका या व्यवसायासाठी कर्ज देण्यास लगेच तयार होत नाहीत.
"अनेक राज्यांनी गांजाच्या वापरावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच त्याच्यावर नियंत्रण राहण्यासाठी यंत्रणाही उभारली आहे. पण केंद्रीय सरकारनं याबाबत काही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं गांजा उत्पादनाच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याबाबत बँकांमध्ये संशयाचं वातावर आहे,'' असं बट्सिक म्हणाले.
कंपन्यांसाठी व्यवसाय वाढवणंही कठीण आहे. कारण राज्याबाहेर गांजा विकण्याची परवानगी त्यांना नाही. तसंच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं हादेखील गुन्हा आहे. इतर राज्यांत प्रौढांना गांजाच्या वापराची परवानगी असली तरीही हा नियम आहेच.
"म्हणजे ओरेगॉन, कॅलिफोर्नियाचा शेजारी तर आहे, पण कॅलिफोर्नियामधील गांजा इथं विकता येत नाही. अशा स्थितीत उत्पादक आणि विक्रेते दोघांनाही गांजा केवळ राज्यातच विकता येतो. त्याचा थेट परिणाम व्यवसायातून मिळणारा नफा आणि कंपनीच्या प्रगतीवर होतो,'' असं बट्सिक म्हणतात.
सोबतच कॅलिफोर्नियाचे गांजा उत्पादक देशामध्ये गांजा विक्री करण्याऐवजी दक्षिणेतील मेक्सिकोच्या बाजाराकडं वळण्याचा धोकाही असतो. राष्ट्रीय पातळीवर गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता देणारा मेक्सिको हा पहिला देश होता. पण याठिकाणी प्रचंड स्पर्धा आहे.
बाजारावर ताबा मिळवण्याची लढाई
गुएरमो द्रापर हे बुसक्वेडा नावाच्या साप्ताहिकाशी संलग्न असून, 'मारिजुआना ऑफिसियो क्रोनिका डे उन एक्पेरिमेन्तो उरुग्वायो' या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.
त्यांच्या मते, उरुग्वेनं सर्वात आधी 1974 मध्ये गांजाच्या वैयक्तिक वापराला परवानगी दिली. पण गांजा घरी उगवण्याची परवानगी नव्हती आणि कायदेशीररित्या त्याच्या खरेदीचीही परवानगी नव्हती.
2013 मध्ये लॅटिन अमेरिकेत नशेखोरीच्या बेकायदेशीर व्यवसायाला आळा घालण्यासाठी तत्कालिन राष्ट्रपति खोसे मुचिका यांनी याला पूर्णपणे कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, Getty Images
"तस्करांचा सामना बंदुकांनी नव्हे तर डॉलरचा वापर करून करायला हवा, त्यांचे ग्राहक त्यांच्यापासून दूर करून त्याला कायदेशीर मान्यता द्यायला हवी. स्थानिक पातळीवर अंमली पदार्थांची तस्करी आणि त्याच्याशी संबंधित गुन्हे कमी करण्यासाठी असं करण्यात आलं आणि लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला," असं गुएरमो सांगतात.
एक मोहीम राबवण्यात आली आणि बेकयादेशीर बाजार बंद पाडण्यासाठी म्हणून गांजाची कायदेशीर अशी बाजारपेठ तयार झाली. साहजिकच गांजाच्या या व्यवसायावर उरुग्वे सरकारचं प्रचंड नियंत्रण आहे.
"गांजाची शेती कोण करणार? त्याच्या विक्रीला कशाप्रकारे मंजुरी मिळेल? आणि त्याचे दर काय? असतील हे सरकार ठरवतं. अगदी औषधाच्या दुकानांनाही नोंदणी करावी लागते. याठिकाणी गांजाचा मुक्त व्यापार नसून, प्रत्येक पातळीवर सरकारची करडी नजर आहे," असं गुएरमो सांगतात.
गांजा उत्पादक किंवा विक्रेत्यांना याच्या जाहिराती करण्याचीही परवानगी नाही. विक्रीबरोबरच याच्या खरेदीवरही सरकारचं नियंत्रण आहे.
गुएरमो यांनी दिलेल्या माहितीनुसार उरुग्वेमध्ये गांजा खरेदीचे तीन कायदेशीर मार्ग आहे. तुम्ही घरी गांजाच्या सिगारेट बनवाव्या, एखाद्या उत्पादक क्लबचे सदस्यत्व घ्यावं किंवा औषधाच्या दुकानातून खरेदी करावी.
"पण या सर्वासाठीच सरकारकडं नोंदणी करावी लागते. तुम्हाला त्यासाठी बोटांचे ठसे आणि ओळखपत्रं सादर करावी लागतात. त्यानंतरच तुम्हाला औषधाच्या दुकानातून एकावेळी 40 ग्रॅमपर्यंत गांजाची खरेदी करता येते."
या व्यवसायाबाबत उरुग्वे आणि अमेरिकेच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये सारख्याच अडचणी आहेत. कारण याठिकाणच्या बँका थेट अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्राशी संलग्न आहेत.
उरुग्वेमध्ये गांजासंबंधी कायदा तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सर्वकाही ठिक होतं. पण नंतर उरुग्वेच्या बँकांनी औषध दुकानदारांना, गांजा विक्री सुरू ठेवल्यास बँकेच्या सेवा बंद करण्याचा इशारा दिला. सध्यादेखील ही मोठी समस्या बनली आहे.
त्यामुळं गांजाला कायदेशीर मान्यता दिल्यानं त्याच्या मागणीवर खरंच परिणाम झाला आहे का? हे समजणं कठीण आहे.

फोटो स्रोत, Reuters
"सरकारकडून जारी करण्यात आलेले आकडे पाहता, गांजा उत्पादकांचा व्यवसाय वाढल्याचं दिसतं. 2012-13 च्या तुलनेत याला चांगला प्रतिसाद मिळत आहे,'' असं गुएरमो म्हणाले.
गेल्या काही वर्षांमध्ये कायदेशीररित्या उपलब्ध होणाऱ्या गांजाच्या मागणीत सातत्यानं वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॅटिस्टाच्या आकड्यांचा विचार करता 2014 मध्ये याचं बाजारमूल्य 3.3 अब्ज अमेरिकन डॉलर होतं. ते 2020 पर्यंत 20.6 अब्ज अमेरिकन डॉलर एवढं वाढलं. 2024 पर्यंत हा आकडा 42.7 अब्ज अमेरिकन डॉलरवर जाईल असा अंदाज आहे.
उरुग्वेमध्ये गांजाच्या वापराला कायदेशीर मान्य देण्याच्या पाच वर्षांनंतर कॅनडानंही यांच्या मनोरंजनासाठीच्या वापराला परवानगी दिली. असं करणारा जी-20 देशांपैकी हा पहिला देश ठरला.
वाढती मागणी पण अडचणी कायम
2018 मध्ये कॅनडानं प्रौढांना गांजाच्या वापराची कायदेशीर परवानगी दिली. त्यात प्रमुख उद्देश हा ग्राहकांचं संरक्षण हा असल्याचं, कॅनपी ग्रोथ कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि चीफ प्रोडक्ट ऑफिसर राडे कोवाचेविच म्हणाले.
"याचं ठोक (होलसेल) वितरण आणि ऑनलाईन विक्रीवर सरकारचं नियंत्रण आहे. जर मी ऑन्टोरियोमध्ये असेल आणि गांजा खरेदी करण्यासाठी एखाद्या वेबसाईटचा वापर करत असेल तर आधी मला प्रौढ असल्याची माहिती द्यावी लागते. तसंच गांजाची फुलं, सरबत किंवा इतर उत्पादनं खरेदी करण्याची कायदेशीर मान्यता असल्याचं स्पष्ट करावं लागतं, असंही राडे सांगतात.
गांजाच्या व्यापारावर सरकारचं नियंत्रण आहे. मात्र तसं असलं तरीही याठिकाणी या व्यापारात खासगी क्षेत्रालाही पाय पसरण्याची मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"आजच्या घडीला अलबर्टो सारख्या प्रांतामध्ये दारुची जेवढी दुकानं आहेत तेवढीच गांजाचीही आहेत. त्यापैकी बहुतांश दुकानं ही खासगी असून ती विविध प्रकारची उत्पादनं विकतात," असं कोवाचेविच म्हणतात.
गांजाच्या प्रमाणाबाबत कॅनडा आणि उरुग्वेमध्ये सारखेच कायदे आहेत. कॅनडामध्ये एका वेळी कायदेशीररित्या 30 ग्रॅमपर्यंत गांजा खरेदी करण्यास परवानगी आहे.
याठिकाणी संपूर्ण देशात गांजाबाबत एकसमान कायदा आहे. त्यामुळं इथं या व्यवसायात गुंतवणूक करायला बँकांना काहीही धोका वाटत नाही. पण अमेरिकेत मात्र असं नाही.
"इतर व्यवसायाप्रमाणे गांजाच्या व्यवसायात गुंतवणुकीसाठी कॅनडाच्या कंपन्या, बँक किंवा फॉरेन क्रेडिट कॉर्पोरेशन सारख्या सरकारी संस्थांकडून कर्ज घेऊ शकतात. खासगी संस्थांचीही मदत घेऊ शकतात. कंपन्या स्थानिक स्टॉक एक्सचेंज, नॅसडॅक आणि युरोपियन स्टॉक एक्सचेंजमध्येही त्यांची कंपनी लिस्ट करू शकतात,'' असंही कोवाचेविच म्हणाले.
कॅनाडामध्ये गांजा कंपन्यांचीही इतर व्यवसायांप्रमाणे भरभराट होत आहे. पण त्यांच्यासाठी हा मार्ग तेवढा सोपाही नाही. नफ्याचा विषय तर लांबच पण कॅनपी ग्रोथ कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांना आता खर्चामध्ये कपात करावी लागत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर
शार्लोट बॉयर हॅनवे असोसिएट्समध्ये हेड ऑफ कन्सल्टिंग आहेत. त्या युरोपात कायदेशीररित्या व्यवसाय करण्याबाबत गांजा कंपन्यांना सल्ला देतात.
त्यांच्या मते, 2018 मध्ये जेव्हा कॅनडाने गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेतला तेव्हा उत्पादक आणि गुंतवणूकदार दोघांमध्येही चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. नव्वदच्या दशकातील डॉट कॉम बूमप्रमाणंच गांजाच्या शेअरचे दर वेगानं वाढले. पण त्यानंतर काही काळातच अडचणी समोर यायला सुरुवात झाली.

फोटो स्रोत, PRESS ASSOCIATION
या क्षेत्रासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे अनेक देश गांजासंदर्भातील नियम शिथिल करायला तयार नाहीत. 2020 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आयोग (कमिशन ऑन नार्कोटिक ड्रग्स) नं गांजाला धोकादायक आणि अधिक व्यसनाधीनतेच्या यादीतून वगळलं. पण त्याच्या बिगर वैद्यकीय आणि बिगर शास्त्रीय वापराला मात्र अवैधच ठरवलं आहे, असं त्या म्हणाल्या.
त्यामुळं आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार सदस्य देश गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता देऊ शकत नाही.
"ज्या सदस्य देशांनी मनोरंजनासाठी गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली आहे, ते एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन आहे. त्यांच्यासाठी एकप्रकारचं संकट आता समोर उभं राहिलं आहे. त्यामुळं त्यांना सदस्यत्व मागं घ्यावं लागू शकतं," असं शार्लोट म्हणाल्या.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण युरोपमध्ये सध्या याबाबत काहीही करता येणं शक्य नाही.
नेदरलँड्समध्ये कॉफीच्या काही दुकानांवर गांजा मिळतो, पण हा गांजा त्यांना काळ्या बाजारातून आणावा लागतो. त्याचं कारण म्हणजे याठिकाणी गांजाची शेती करणं अवैध आहे. अशा प्रकारचे नियम बाजारासाठी अडथळे निर्माण करू शकतात.
"कंपन्यांना युरोपियन बाजारामध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे, पण याठिकाणी बहुतांश देशांमध्ये मनोरंजनासाठी गांजाच्या वापरावर बंदी आहे. कंपन्यांना त्यांचा व्यवसाय वेगानं वाढावा अशी इच्छा आहे. पण कठोर निर्बंधांमुळं अडचणी जास्त आहेत," असं शार्लोट म्हणतात.
तंबाखू आणि दारु कंपन्यांनाही गांजाच्या व्यवसायात प्रयत्न करायचे आहेत. त्यांना सरकारी नियम आणि निर्बंधांसह अत्यंत नियंत्रित अशा बाजारपेठांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. पण तसं असलं तरी त्यांच्यासाठी मार्ग सोपा नाही.
बेकायदेशीर गांजाच्या बाजारातून ग्राहक या कायदेशीर बाजाराकडे कसे वळवले जाऊ शकतील आणि नव्या ग्राहकांना कसं या बाजारापर्यंत आणलं जाईल, यावर बरंच काही अवलंबून आहे.
"उदाहरण द्यायचं झाल्यास कॅनडाच्या बाजारपेठेचं देता येईल. काळ्या बाजाराच्या तुलनेत याठिकाणी कायदेशीर बाजारपेठेत ग्राहकांसाठी अनेक नवी उत्पादनं उपलब्ध आहेत. उत्पादक गांजाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करतात आणि त्याच्या किमतीबाबत ठाम असतात. त्यामुळं याठिकाणी काळ्या बाजारावर अवलंबून असलेलेदेखील कायदेशीर बाजाराकडं आकर्षित झाले आहेत," असं शार्लोट म्हणतात.
हे झालं कॅनडाबाबत, पण संपूर्ण जग खरंच गांजाच्या कायदेशीर बाजारपेठेसाठी तयार आहे का?
अनेक देश या दिशेनं काम करत आहेत. नेदरलँड्समध्ये सरकार काही गांजा उत्पादकांच्या मदतीनं याच्या नियंत्रित अशा कायदेशीर व्यापाराची शक्यता पडताळून पाहत आहेत. लक्समबर्ग लवकरच याला कायदेशीर मान्यता देण्याची शक्यता आहे. स्वित्झरलँड आणि इस्रायलही याबाबत पायलट योजना तयार करत असल्याचंही, बॉयर म्हणाल्या.

फोटो स्रोत, Reuters
तर दक्षिण कोरिया आणि थायलंडसारखे देश केवळ गांजाच्या वैद्यकीय वापराला परवानगी देत आहेत.
"अनेक देश याच्या शेती आणि वैद्यकीय वापराला परवानगी देत आहेत. पण मनोरंजनासाठी वापरावर बंदी घालत आहेत. असे देश आता कायदेशीर मार्गानं आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं शार्लोट म्हणाल्या.
मग, आता गांजाचा कायदेशीर व्यवसाय जागतिक स्तरावर पाळंमुळं रोवू शकतो का?
अमेरिकेची अनेक राज्यं, मेक्सिको, उरुग्वे आणि युरोपच्या काही मोजक्या देशांनी याला कायदेशीर मान्यता दिली आहे. अनेक देशांमध्ये या व्यवसायात गुंतवणूकही वाढली आहे.
याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांनी गांजाला कायदेशीर मान्यता देण्याचे संकेत दिले होते. "ड्रग्जच्या वापरासाठी कोणालाही तुरुंगात पाठवता कामा नये. अशा प्रकरणांत त्यांना सुधारगृहात पाठवलं जावं,'' असं ते म्हणाले होते.
पण सर्वांच्या नजरा सध्या अमेरिकेकडं आहेत. ते पुढं काय पाऊल उचलणार? नवा कायदा आणून देशातील सर्व राज्यांमध्ये गांजाच्या कायदेशीर वापरावर शिक्कामोर्तब करणार का? याकडं सर्वांचं लक्ष आहे. तसं झाल्यास या निर्णयाचा परिणाम संपूर्ण जगावर आणि भविष्यात गांजाच्या व्यवसायावरही पडेल.
गांजा नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे, त्यामुळं त्याचा व्यवसाय दीर्घकालीन होऊ शकतो. पण दारुप्रमाणं गांजाही व्यसनाधीनतेचं कारण बनू शकतो असं, गांजाचा विरोध करणारे म्हणतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








