कोरोना : मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे काय? कोव्हिड-19च्या उपचारात त्यांची किती मदत होते?

खेळणाऱ्या लहान मुलांचा जर्मनीतला पुतळा

फोटो स्रोत, Getty Images

जर्मनीमध्ये कोव्हिड-19वरच्या लशींचा तुटवडा आहे. पण मोनोक्लोनल अँटीबॉडीजवर आधारीत एका नव्या औषधाचा वापर करत लशींची ही उणीव भरून काढणार असल्याचं जर्मनीने जाहीर केलंय.

जर्मन सरकारने या नवीन औषधाचा मोठा साठा विकत घेतला असून हे औषध वापरणारा जर्मनी हा युरोपियन युनियनमधला पहिला देश असेल, असं जर्मनीचे आरोग्य मंत्री जेन्स स्फान यांनी सांगितलंय.

पण हे औषध काम कसं करतं?

मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे काय?

अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंड म्हणजे आपल्या शरीरात असणाऱ्या रोग प्रतिकारक शक्तीमधले विषाणूंशी लढणारे योद्धे.

जेव्हा कोरोना व्हायरस किंवा इतर कोणता विषाणू आपल्या शरीरात शिरकाव करतो, त्यावेळी अँटीबॉडीज या विषाणूंच्या स्पाईक्सना म्हणजे काटेरी टोकांना चिकटतात आणि आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये हा विषाणू शिरण्यापासून रोखतात.

कोरोना व्हायरसवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीजचं कल्पना चित्र

फोटो स्रोत, Science Photo Library

फोटो कॅप्शन, कोरोना व्हायरसवर हल्ला करणाऱ्या अँटीबॉडीजचं कल्पना चित्र

पण आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होत असतात. यातल्या सर्वात प्रभावी प्रतिपिंडांना 'न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज' (neutralising antibodies) म्हणजे रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना (Pathogen) निकामी करणाऱ्या अँटीबॉडीज म्हटलं जातं.

म्हणूनच मग विषाणूच्या स्पाईकवर चिकटून तो निकामी करण्यासाठी सर्वोत्तम अँटीबॉडी कोणती, याचा संशोधकांनी शोध घेतला.

निवडण्यात आलेल्या या अँटीबॉडीच्या अनेक आवृत्ती प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्या आणि त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यात आली.

एका प्रतिपिंड पेशीचं कोल्निंग करून त्याच्या अनेक आवृत्या तयार केल्या जात असल्याने या अँटीबॉडीजना म्हणतात - मोनोक्लोनल अँटीबॉडीज.

यांनाच mAbs किंवा moAbs असंही म्हटलं जातं.

या सगळ्या अँटीबॉडीज व्हायरसच्या एकाच भागाला चिकटतात आणि यांच्या मूळ अँटीबॉडी पेशीचा मागोवा काढणं शक्य असतं.

म्हणूनच जर समजा एखादा विशिष्ट व्हायरस वा त्याचा विशिष्ट भाग ओळखतील अशा अँटीबॉडीज तयार करायच्या असतील तर मोनोक्नोनल अँटीबॉडीज तयार केल्या जातात.

रुग्णांच्या शरीरात या अँटीबॉडीज सोडण्यात आल्यानंतर त्यामुळे लगेचच त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीत सुधारणा होते.

पण अशा प्रकारच्या मोनोक्लोनल अँटीबॉडीजची निर्मिती करणं हे बहुतेकदा अतिशय महागडं आणि वेळखाऊ असतं. कारण क्लोन करण्यासाठीची योग प्रतिपिंड पेशी नेमकी शोधून वेगळी काढावी लागते.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विषाणूच्या स्पाईकवर चिकटून तो निकामी करण्यासाठी सर्वोत्तम अँटीबॉडी कोणती याचा संशोधकांनी शोध घेतला.

कोव्हिडसाठी वापरण्यात येत असलेल्या कॉन्व्हलेसंट प्लाझ्मा सेल सीरम उपचार पद्धतींपेक्षा ही मोनोक्लोनल अँटीबॉडीज पद्धत अगदी वेगळी आहे.

प्लाझ्मा पद्धतीमध्ये कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील प्लाझ्मा (रक्तातल्या पिवळसर घटक) वेगळा काढून तो कोरोना व्हायरसच्या संसर्गाशी लढणाऱ्या रुग्णांना दिला जातो. यामध्ये व्हायरसच्या विविध भागांवर हल्ला करणाऱ्या सगळ्याच अँटीबॉडीज वापरल्या जातात.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज पद्धत यापूर्वी वापरण्यात आली आहे का?

काही प्रकारच्या कॅन्सरसोबतच इतर अनेक व्याधींवरील उपचारांमध्ये 1980च्या दशकांपासून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा क्लिनिकली वापर केला जातो.

अमेरिकेतल्या नर्सिंग होम्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार प्रयोगशाळेतल्या नियंत्रित वातावरणात मोठ्या संख्येने निर्मिती करण्यात आलेल्यामोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी केला जाऊ शकतो.

ऑक्टोबर 2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर उपचार करण्यासाठी अमेरिकन औषध उत्पादक कंपनी एली लिलीने तयार केलेल्या कोव्हिड -19 मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा आणि रीजेनरॉन या बायोटेक कंपनीने तयार केलेल्या दोन अँटीबॉडीजच्या कॉकटेलचा वापर करण्यात आला होता.

मोनोक्लोनल अँटीबॉडीजचं मॉडेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकाच प्रतिपिंड पेशीच्या क्लोनिंगने जेव्हा अनेक आवृत्त्या तयार केल्या जातात तेव्हा त्याला मोनोक्लोनल म्हणतात. हे आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीजचं मॉडेल.

या अँटीबॉडीज व्हायरसवरच्या वेगवेगळ्या भागातल्या स्पाईक्सना चिकटतात. म्हणूनच जर व्हायरस म्युटेट झाला, म्हणजेच व्हायरसमध्ये बदल झाला तरी यातली एका प्रकारची अँटीबॉडी तरी प्रभावी ठरते.

यापूर्वी रिजेनरॉन कंपनीने ईबोलावरच्या उपचारांसाठी मोनोक्लोनल अँटीबॉडीज तयार केल्या होत्या.

पण कोव्हिड -19वर प्रभावी सिद्ध झालेल्या विविध लशी आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजचं उत्पादन करण्यासाठीचा मोठा खर्च यामुळे या पर्यायाला पहिलं प्राधान्य देण्यात आलं नाही.

जर्मनी मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधांचा पर्याय का स्वीकारत आहे?

लस निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांनी युरोपियन युनियनमध्ये जितके डोस देण्याची हमी दिली आहे, तितके ते पुरवू शकणार नसल्याची चिंता व्यक्त केली जातेय. यामुळे सध्या सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेत लशींच्या तुटवड्यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

लस उत्पादनात येणाऱ्या अडचणींमुळे आपण अपेक्षित प्रमाणात लस देऊ शकणार नसल्याचं लस निर्मिती करणाऱ्या अॅस्ट्राझेनका आणि फायझर-बायोएनटेक या कंपन्यांनी म्हटलंय.

"या भागात लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना इतर देशांना लस निर्यात करायची असेल तर त्याचा बराच काळ आधी त्यांना याविषयीची माहिती द्यावी लागेल," असं युरोपियन युनियनच्या हेल्थ कमिशनर स्टेला कयरियाकीड्स यांनी म्हटलंय.

अॅस्ट्राझेनका लोगो

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, अॅस्ट्राझेनका देणार असलेल्या लशीच्या डोसची संख्या 60%नी कमी होणार असल्याचं काही माध्यमांनी म्हटलंय.

जर्मनीने पुढाकार घेत मोनोक्लोनल अँटीबॉडीज औषधाचा साठा करून ठेवायचं ठरवलं आहे. त्यांनी 487 दशलक्ष डॉलर्सना एकूण 2 लाख डोसेस खरेदी केल्याचं डॉईश वेल या जर्मनी वृत्तवाहिनीने म्हटलंय.

तर पुढच्या आठवड्यापासून या मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर सुरू होणार असल्याचं वृत्त जर्मन वर्तमानपत्राने दिलंय.

विद्यापीठांच्या क्लिनिकमध्ये यासाठीच्या पहिल्या ट्रायल्स होतील.

लस असतानाही मोनोक्लोनल अँटीबॉडीजची गरज आहे का?

सध्या जगभरात विविध लशी उपलब्ध आहेत. पण असं असलं तरी लशींसाठी असणारी मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे आहे आणि नजिकच्या भविष्यात लशीचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जातेय.

या दरम्यानच्या काळात जगभरातल्या कोव्हिड रुग्णांची संख्या वाढू शकते.

डेक्सामेथासॉन आणि हायड्रोकॉर्टिसोन या स्टीरॉईडखेरीज इतर कोणतंही औषध कोव्हिड -19वर प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध झालेलं नाही. म्हणूनच रुग्णांसाठी नवीन पर्याय शोधणं महत्त्वाचं आहे.

रिजेनरॉनच्या लिया लिपसिच सांगतात, "लोकसंख्येतले असे काही घटक, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहेत, जे वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांच्या शरीरामध्ये लशीनंतर पुरेशी रोगप्रतिकार शक्ती तयार होणार नाही आणि त्यांना उपचारांची गरज असेल. आम्हाला असं ठामपणे वाटतं ही या अँटीबॉडीज अतिशय प्रभावी आहेत आणि यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती सुधारेल आणि जरी लस उपलब्ध असली तरी या अँटीबॉडीजचीही गरज असेल."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)