You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरकाचा दरवाजा : सतत आग धगधगत असलेल्या 'या' ठिकाणाचं रहस्य काय?
- Author, एंड्रियन हार्ट्रिक, डॉमिनिका ओजिन्स्का,
- Role, बीबीसी ट्रॅव्हल
पूर्वी सोव्हिएत संघात सहभागी असलेल्या तुर्कमेनिस्तान देशाच्या उत्तरेकडे एक बराच मोठा खड्डा आहे. या खड्ड्याला तिथं गेट्स ऑफ हेल म्हणजेच नरकाचं द्वार म्हणून संबोधण्यात येतं.
तुर्कमेनिस्तान देशाचा 70 टक्के भूभाग काराकुम वाळवंटाने व्यापला आहे. याची लांबी तब्बल साडेतीन लाख चौरस किलोमीटर इतकी आहे. या वाळवंटाच्या उत्तरेकडे गेट क्रेटर नामक एक मोठा खड्डा आहे.
या ठिकाणाविषयी अधिक माहिती देताना कॅनडा येथील जाणकार जॉर्ज कोरोनिस सांगतात, "मी पहिल्यांदा याठिकाणी गेलो. या खड्ड्याच्या भोवताली असलेल्या जमिनीवर मी पाय ठेवलं त्यावेळी खड्ड्यातून येणारी उष्ण हवा थेट माझ्या चेहऱ्याकडे येत होती. एखादा सैतान स्वतः हातात शस्त्र घेऊन निघाला की काय, असं मला त्यावेळी वाटलं."
69 मीटर लांब आणि 30 मीटर खोल असलेल्या या खड्ड्यात गेल्या कित्येक दशकांपासून आग धगधगत आहे. पण याचं कारण कोणताही सैतान नसून नैसर्गिकरित्या येथून बाहेर पडणारा मिथेन वायू हे आहे.
2013 मध्ये नॅशनल जिओग्राफीक चॅनेलवरील एका कार्यक्रमासाठी संशोधकांचं एक पथक या खड्ड्याचा अभ्यास करण्यासाठी तुर्कमेनिस्तानात दाखल झालं होतं. जॉर्ज कोरोनिस याच पथकातील सदस्य होते.
या खड्ड्यात वर्षानुवर्षे अखंड धगधगत असलेल्या या आगीचं रहस्य काय, ती मुळात कधीपासून सुरू आहे, ही माहिती मिळवण्याचे प्रयत्न या पथकाकडून केले जात होते.
मात्र या संशोधनातून त्यांना उत्तरं मिळण्याऐवजी त्यांच्यासमोर इतर अनेक प्रश्नांची यादीच तयार झाली.
ही आग नेमकी लागली कधी?
खड्ड्यातील आगीची कहाणी ऐंशीच्या दशकात सुरू होते. इथं प्रचलित असलेल्या एका दंतकथेनुसार, 1971 मध्ये सोव्हिएत संघाचे भूशास्त्रज्ञ काराकुम वाळवंटात कच्च्या तेलाच्या शोधात फिरत होते.
इथं एका ठिकाणी त्यांना नैसर्गिक वायूचा साठा मिळाला. पण संशोधनादरम्यान येथील जमीन खचली आणि त्याठिकाणी तीन मोठ-मोठे खड्डे बनले.
या खड्ड्यांमधून मिथेन गॅस बाहेर पडण्याचा धोका होता. हा वायू वातावरणात मिसळण्याचीही शक्यता होती.
एका 'थिअरी'नुसार, वायूगळती रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्यापैकी एका खड्ड्यात आग लावली. काही आठवड्यांत मिथेन वायू संपेल आणि आग आपोआप विझेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता.
पण या कथेचा पुरावा मानला जातील, असे कोणतेच दस्तऐवज कोरोनिस यांच्या पथकाला सापडले नाही, असं त्यांनी सांगितलं.
2013 मध्ये आपल्या पहिल्या दौऱ्यात कोरोनिस यांनी स्थानिकांकडून या विस्तवाबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. पण कुणालाय याविषयी काहीही माहिती नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
ते सांगतात, "या खड्ड्याबाबत अधिक माहिती उपलब्धच नाही, याचंच आश्चर्य वाटतं. त्या देशात जाऊनसुद्धा तुम्हाला याविषयी अधिक माहिती मिळू शकत नाही."
मी या खड्ड्याविषयीचे अहवाल आणि इतर दस्तऐवज शोधले. काही वृत्तपत्रांमध्ये याचा उल्लेख आहे. पण ती माहिती पुरेशी नव्हती.
तुर्कमेनिस्तानमधील भूशास्त्रज्ञांच्या मते, हा विशाल खड्डा 1960 च्या काळात बनला होता. पण 1980 च्या दशकातच यामध्ये आग लागली.
कोरोनिस सांगतात, "या खड्ड्यात आग कशी लागली याबाबतही अनेक वादविवाद आहेत. काही लोकांच्या मते ही आग जाणूनबुजून लावण्यात आली. तर काहींच्या मते, तो एक अपघात होता. शिवाय वीज पडल्यामुळे ही आग लागल्याचंही काहींना वाटतं."
दुसऱ्या एका थिअरीनुसार, भूशास्त्रज्ञांकडून फ्लेअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असू शकतो. नैसर्गिक वायू बाहेर काढण्यासाठी साधारणपणे हेच तंत्रज्ञान वापरलं जातं. यामध्ये सुरक्षिततेच्या कारणासाठी किंवा गॅस वाचवण्यासाठी जाणूनबुजून आग लावण्यात येत असते.
जाणकारांच्या मते, सोव्हिएत संघाकरिता हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय होता. त्यामुळेच यासंबंधित सर्व अहवाल टॉप सिक्रेट घोषित करण्यात आले असावेत.
'गूढ'
इतिहासकार जेरोनिम पेरोविक सांगतात, नरकाच्या द्वाराबाबत अनेक तार्किक रहस्य आहेत.
त्यांच्या मते, "यामधून सोव्हिएत संघाच्या काळात काम कशा प्रकारे चालायचं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यावेळी फक्त यशस्वी ठरलेल्या मोहिमांबाबतच सार्वजनिकरित्या माहिती दिली जायची. अयशस्वी ठरलेल्या मोहिमांबद्दल लोकांना माहिती दिली जात नसे. जर स्थानिकांनी काही चुकीचं केलं असेल तर याची माहिती इतरांना व्हावी, असं त्यांना मुळीच वाटत नसेल."
आगीचा हा खड्डा वाळवंटात अशा ठिकाणी झाला आहे, जिथं कोणत्याही प्रकारची जिवित किंवा वित्त हानी होण्याची भीती नाही. शिवाय त्याचे इतर परिणाम होण्याची शक्यताही अत्यंत दुर्मिळ आहे.
सोव्हिएत काळात त्यांच्याकडे नैसर्गिक वायू किंवा इंधनाची अजिबात कमतरता नव्हती. ते दरवर्षी 7 लाख क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूचं उत्पादन करत होते. अशा स्थितीत या वायूला आग लावणंच त्यांच्यासाठी व्यावहारीक पर्याय ठरला असू शकतो.
जेरोनिम सांगतात, "स्वित्झर्लंडसारखा देश दरवर्षी 15 ते 16 हजार क्यूबिक मीटर नैसर्गिक वायूचा वापर करतो. याच्या चार पट वायू जाळून नष्ट करणंही सोव्हिएत संघाकरिता फार मोठी गोष्ट नव्हती. पाईपलाईनमधून येथील वायू दुसऱ्या ठिकाणी नेण्याऐवजी ते इथंच जाळून नष्ट करणं त्यांना फायद्याचं वाटलेलं असू शकतं. नैसर्गिक वायू इतर ठिकाणी नेण्यासाठी त्यांना इथं मोठ्या प्रमाणावर बांधकामं करावी लागली असती. व्यावहारीकदृष्ट्या त्यामुळे मोठा खर्च होण्याची शक्यता होती. म्हणूनच येथील वायू इथंच जाळण्याचा निर्णय घेण्यात आला असू शकतो."
कोरोनिस यांच्या संशोधन पथकात सहभागी असलेले मायक्रोबायोलॉजिस्ट स्टीफन ग्रीन सांगतात, "मिथेन अनियंत्रित प्रमाणात पर्यावरणात मिसळू देणं चुकीचं आहे. त्यामुळेच ते तिथंच जाळण्याच्या निर्णयामागील कारण आपण समजू शकतो."
ते सांगतात, "ते अत्यंत धोकादायक ठरू शकलं असतं. आग लागलेली असल्यास मिथेन एका ठिकाणी जमून राहणार नाही. त्यामुळे मोठा स्फोट होण्याचा धोका टळतो."
वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड सोडणं हानीकारक आहे. पण त्याहीपेक्षा मिथेन वातावरणात मिसळू देणं तुलनेने जास्त हानीकारक आहे. इराक, ईराण आणि अमेरिकेसारखे अनेक देश मिथेन वातावरणात मिसळू देण्याऐवजी जाळून टाकतात.
जेरोनिम पेरोविक म्हणतात, "आपण या समस्येतून अद्याप कोणताच मार्ग काढू शकलो नाही, हे आपलं दुर्दैव आहे."
आग पाहण्यासाठी येतात पर्यटक
तुर्कमेनिस्तानच्या अधिकाऱ्यांनी ही आग विझवण्याचा एकदा विचार केला होता. पण त्यांनी तसं केलं नाही.
नंतर त्यांनी विचार केला की हे ठिकाण एक चांगलं पर्यटनस्थळ बनू शकतं. यामधून देशातील पर्यटनाला चालना मिळू शकते. त्यामुळेच हा परिसर पुढे पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.
आता हे ठिकाण देशातील सर्वाधिक गर्दीच्या पर्यटनस्थळांपैकी एक बनलं आहे.
काराकुम वाळवंटात रात्रीच्या वेळीही हा खड्डा लांबून पाहता येऊ शकतो. अनेक पर्यटक याचं दर्शन घेण्यासाठी येत असतात.
या खड्ड्याच्या भोवताली उभं राहण्याचा आपला अनुभव सांगताना जॉर्ज कोरोनिस म्हणतात, "मी एक प्रोटेक्टिव्ह सूट घालून उभा होतो. एका अंतराळयात्रीप्रमाणेच मी त्यावेळी दिसत होतो. माझ्या समोर एका स्टेडियमच्या आकाराचा भलामोठा खड्डा होता. त्यात आग धगधगत होती. पृथ्वीवर राहून एका दुसऱ्याच जगात गेल्याचा भास मला त्याठिकाणी झाला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)