You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धूप की दीवार : हिंदू प्रियकर - मुस्लीम प्रेयसी असलेल्या वेबसीरिजवरून पाकिस्तानात का वाद झालाय?
"लेखिकेला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये असणाऱ्या तणावाबद्दल माहीत नाही का? हिरो पाकिस्तानी मुलगा असू शकत नव्हता का?
भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानच्या प्रसिद्ध नाटककार उमैरा अहमद यांची वेबसीरिज 'धूप की दीवार' चा प्रोमो रिलीज झाल्यानंतर अनेक पाकिस्तानी सोशल मीडिया यूजर्स हा प्रश्न विचारत आहेत.
काही लोकांनी लेखिका देशद्रोही असल्याचंही म्हटलंय. कारण ही सीरिज पाकिस्तानात नाही तर भारतातल्या वेब स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म 'झी फाईव्ह' वर प्रसारित होणार आहे.
यावरून पाकिस्तानातल्या सोशल मीडियावर इतका वाद झाला की लेखिकेला भलं मोठं स्पष्टीकरण लिहावं लागलं.
काय आहे सीरिजचा विषय?
या वेबसीरिजच्या प्रोमोमध्ये दाखवलं आहे की एक भारतीय मुलगा आणि एक पाकिस्तानी मुलगी यांच्यातले द्वेषाचे संबंध हळूहळू प्रेमात कसे बदलतात.
दोघांचे वडील भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात असतात आणि दोघे भारत पाकिस्तान तणावादरम्यान मारले जातात.
सुरुवातीला नायक-नायिका दोघं आपल्या वडिलांच्या शौर्याचे किस्से सांगतात, एकमेकांच्या विरोधात सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देऊन चर्चेत येतात.
पण हळूहळू त्यांच्यातला शत्रुत्व कमी कमी होतं जातं आणि त्यांची मैत्री होते. त्यांना वाटतं की दोन्ही देशांमध्ये असलेल्या दुष्मनीचा सर्वसामन्य माणसाशी काहीही संबंध नाही.
या दोघांना जे दुःख भोगावं लागतं त्याला 'युनायटेड ग्रीफ' म्हटलं गेलंय. पण त्या दोघांनाही आपल्या कुटुंबांकडून पराकोटीचा विरोध सहन करावा लागतो.
या सीरिजमध्ये अहद रजा मीर आणि सज्जल अली यांची प्रमुख भूमिका आहेत. प्रोमोच्या शेवटी भारतीय मुलगा पाकिस्तानी मुलीसाठी एक इंग्लिश गाणं म्हणतो ज्याचा अर्थ आहे, 'सारा रागवू नकोस नाहीतर संपूर्ण भारत आणि पाकिस्ताना उदास होतील.'
ही सीरिज अजून रिलीज झालेली नाही.
लेखिकेचं स्पष्टीकरण
उमैरा अहमद आजघडीला पाकिस्तानात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या लेखकांपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक कलाकृती गाजल्या आहेत.
भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी वेबसीरिज लिहिल्याबद्दल त्यांना 'देशद्रोही' आणि 'देशाची शत्रू' असंही म्हटलं गेलं.
यावर स्पष्टीकरण देताना उमैरा अहमद यांनी म्हटलं की त्यांनी जानेवारी 2019 साली 'धूप की दीवार' या वेबसीरिजवर काम सुरू केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की सगळी कथा पाकिस्तानी सैन्याचा जनसंपर्क विभाग आयएसपीआरला पाठवण्यात आली होती म्हणजे यात काही आक्षेपार्ह भाग असेल तर तो काढून टाकता येईल.
लेखिकेचा दावा आहे की या विषयाला 'आयएसपीआरने मान्यता दिली होती आणि त्यांना रावळपिंडीला बोलवून त्यांच्याबरोबर मीटिंग केली आणि असं सांगितलं की 'भारत-पाकिस्तान संबंधांबाबत सैन्याचा दृष्टीकोनही असाच आहे."
या कथेला खरंच हिरवा कंदील मिळाला होता का, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने आयएसपीआरशी संपर्क केला पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
'भारतीय चॅनलसाठी नव्हती लिहिली कथा'
या सीरिजविषयी आक्षेप नोंदवताना पाकिस्तानी सोशल मीडिया यूजर्सनी म्हटलं की पाकिस्तानी चॅनल्स असताना लेखिकेने भारतीय चॅनलसाठी कथा का लिहिली?
याचं उत्तर देताना उमैरा म्हणतात, "मी ही कथा भारतीय चॅनलसाठी लिहिली नव्हतीच."
त्या पुढे म्हणतात की मी 'धूप की दीवार' सकट तीन कथा ग्रुप एम नावाच्या एका प्रोडक्शन कंपनीसोबत साईन केल्या होत्या. ही एक पाकिस्तानी कंटेंट कंपनी आहे.
यापैकी दोन प्रोजेक्ट 'अलिफ' आणि 'लाल' पाकिस्तानच्या एका खाजगी चॅनलने खरेदी केले आणि दोन प्रोजेक्ट आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर विकण्याचा प्रयत्न केला. या प्लॅटफॉर्म्समध्ये झी फाईव्ह, नेटफ्लिक्स आणि इतर काही प्लॅटफॉर्म्स होते.
त्यांच्या अनेक सीरिज लवकरच पाकिस्तानातही रिलीज होणार आहेत, असंही उमैर म्हणाल्या. त्यांच्यामते जर कोणत्याही पाकिस्तानी लेखकाच्या कामाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे.
त्या म्हणतात, "लेखकाने लिहिलेल्या गोष्टी कुठे चालतील याचा निर्णय लेखक नाही घेऊ शकत. हे ठरवणारे निर्माते आणि चॅनल असतात. मला आशा आहे की हे आता स्पष्ट झालं असेल की ही कथा स्थानिक पाकिस्तानी कंपनीसाठी लिहिली होती, भारतीय चॅनलसाठी नाही. दुसरं म्हणजे ही कथा जेव्हा लिहिली होती तेव्हा भारत-पाकिस्तानचे संबंध इतके बिघडले नव्हते. काश्मीर संदर्भात जे घटनात्मक बदल केले गेलेत तेही झाले नव्हते."
बीबीसीने या संदर्भात 'धूप की दीवार' मालिकेच्या प्रोडक्शन टीमशी संपर्क साधला पण काही उत्तर आलं नाही.
'पाकिस्तानी लेखक भारतासाठी लिहू शकत नाही का?'
पाकिस्तानात पटकथा लेखकांच्या अधिकारांसाठी बनवण्यात आलेल्या संस्थेचे सदस्य आणि नाटककार इनाम हसन यांनी बीबीसी उर्दूशी बोलताना म्हटलं की,
"मला वाटतं जर एखाद्या लेखकाकडे कोणती कथा असेल तर त्यांना ती कथा ऐकवता यायला हवी. आणि ती कथा प्रेमाची असेल तर जरूर ऐकवली जावी. कथांमध्ये फक्त द्वेष पेरावा हे गरजेचं नाही ना."
ते पुढे म्हणतात, "कोणाला देशद्रोही म्हणण्यात मला कोणतीही देशभक्ती दिसत नाही."
हसन यांच्यामते जर कोणताही लेखक भारताविषयी काही लिहित असेल तर ती कथा पाहिल्याशिवाय त्याबद्दल काही मत बनवणं त्या लेखकाच्या अधिकारांचं उल्लंघन आहे.
ते म्हणतात, "भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या कलाकारांनी सीमेपलीकडे जाऊन काम करावं की नाही याचा निर्णय देशांच्या परराष्ट्र धोरणावरून ठरतो. पण उमैराच्या बाबतीत असं म्हणता येईल की त्यांनी पाकिस्तानच्या प्रोडक्शन हाऊससाठी काम केलं."
"भारतातल्या प्रत्येक कामासाठी देशद्रोहाचं सर्टिफिकेट लागत असेल तर संपूर्ण पाकिस्तानात भारतीय गाणी आणि मनोरंजनाच्या कंटेंटवर बंदी घातली पाहिजे."
सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया
उमैरा अहमद यांच्यानुसार काही लोकांनी त्यांची कथा भारतीय ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसिद्ध होणार आहे, यावरून टीका केली तर काही लोकांनी पाकिस्तानी लेखिकेचं काम आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं यासाठी कौतुक केलं आहे.
एक फेसबुक युजरने लिहिलं की, "जेव्हा ते (टीकाकार) भारतीय चित्रपट पाहातात आणि त्यांच्या गाण्यांवर नृत्य करतात तेव्हा त्यांना आठवत नाही की भारत आपला शत्रू आहे."
अजून एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं की "या मालिकेविषयी वेळेआधीच निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल."
या सोशल मीडिया युजर्सपैकी एक आहेत जुवैरिया. त्या लिहितात, "मी लोकांना सांगू इच्छिते की थोडा संयम राखा आणि आपआपल्या अंदाजानुसार निष्कर्ष काढू नका. याची पटकथा उमैरा अहमद यांनी लिहिली आहे. त्यांनीच एक अध्यात्मिक नाटक 'असिफ', नौसेनेकडून बनवली गेलेली टेलीफिल्म 'लाल' लिहिल्या आहेत तसंच 'पीर-ए-कामिल' आणि 'आब-ए-हयात' सारख्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत."
पण अनेक सोशल मीडिया यूजर्सनी या गोष्टीला हरकत घेतली की मालिकेत युद्धात दोन्ही देशांच्या मारल्या गेलेल्या सैनिकांना 'शहीद' म्हटलंय आणि याला इस्लाम मान्यता देत नाही.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)