France Elections- Emmanuel Macron: एक्झिट पोलनुसार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष पराभूत होण्याच्या मार्गावर

मॅक्रॉन- ल पेन

फोटो स्रोत, EPA/Reuters

फ्रान्समध्ये झालेल्या प्रादेशिक निवडणुकांमध्ये देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन आणि त्यांच्या विरोधक मारिन ला पेन दोघेही आघाडी घेऊ शकलेले नाहीत असं एक्झिट पोल्सच्या सुरुवातीच्या कलांवरून दिसतंय.

दोघांचीही कामगिरी अपेक्षेइतकी झालेली नाही.

मॅक्रॉन यांचा सेंट्रिस्ट पक्षाला 10 टक्के मतं अधिक मिळवेल असं भाकित करण्यात आलं होतं. या मतांमुळे त्यांना या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याच सहभागी होता आलं असतं. पण त्यांना अपेक्षेएवढी मतं मिळाली नाहीत.

मारिन ला पेन यांच्या अतिउजव्या पक्षाची कामगिरी भव्यदिव्य झालेली नाही.

हे दोन्ही पक्ष फ्रान्सच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.

मॅक्रोन यांच्या पक्षाच्या खासदार ऑरोरे बर्ज यांनी आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीची वर्णन करताना, "ही आम्हा सगळ्यांसाठी लोकशाहीची चपराक आहे," असं म्हटलंय.

ला पेन यांचा नॅशनल रॅली पार्टी हा पक्ष रविवारी, 20 जूनला झालेल्या पहिल्या फेरीत आघाडी घेऊन पहिल्या क्रमांकावर राहिल असं वाटलं होतं. हा पक्ष कमीत कमी या भागात एक तरी जागा जिंकेल असं वाटलं होतं पण तसं न होता त्यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

मारिन ला पेन स्वतः निवडणूक लढवत नव्हत्या पण त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

या निवडणुकीत कमीत कमी मतदान होण्याचा रेकॉर्ड झाला. फक्त 34% मतदान झालं. 66 % लोकांनी मतदान केलेलं नाही. मारिन यांनी या कमी टक्केवारीचं 'नागरी आपत्ती' असं वर्णन केलं.

मतदान कमी होण्याचं खापर त्यांनी सरकारवर फोडलं. सरकार लोकांच्या मनात राजकीय प्रक्रियेबद्दल विश्वास निर्माण करू शकलं नाही म्हणून असं झाल्याचा आरोप त्यांनी केला.

मॅक्रॉन- ल पेन

फोटो स्रोत, Getty Images

मारिन म्हणाल्या, "आपण हे मान्य करायलाच हवं की, जे कधी झालं नाही ते आता झालं. 70 टक्के लोकांनी मतदान केलं नाही कारण त्यांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही. लोक हताश झालेत आणि त्यांना वाटतं की काही बदलू शकत नाही, त्यांच्या हातातून सगळं निसटलं आहे."

फ्रान्सच्या 12 प्रदेशांसाठी आणि कॉर्सिका बेटासाठी लोकप्रतिनिधी मंडळ निवडायला निवडणुका होत आहेत. त्याबरोबरीने 4 आंतराष्ट्रीय प्रतिनिधी मंडळं आणि 96 खात्यांसाठी निवडणुका होता आहेत. 4100 जागांसाठी 15700 उमेदवार रिंगणात आहेत.

या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण फ्रान्सच्या पुढच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका मतदारांचा कल निश्चित करतील असं समजलं जातंय.

Ipsos च्या एक्झिट पोलमधून समोर आलंय की फ्रान्सचा पुराणमतवादी पक्ष लेस रिपब्लिकन्स 27 टक्के मतं मिळवेल. दुसऱ्या क्रमांकावर 19 टक्के मतं जिंकून नॅशनल रॅली हा अतिउजवा पक्ष असेल. द ग्रीन्स, द सोशालिस्ट पार्टी आणि मॅक्रोन यांच्या ला रिपब्लिक एन मार्चे या सगळ्या पक्षांना 11 टक्के मतं मिळतील.

स्थानिक निवडणुकांमध्ये मॅक्रॉन यांचा पक्ष पहिल्यांदाच सहभागी होतोय. मागच्या निवडणुका 2015 साली झाल्या तेव्हा हा पक्ष अस्तित्वात नव्हता.

मॅक्रॉन यांच्या पक्षाला या निवडणुकांमध्ये यश मिळेल असं वाटत नाहीये. गेल्या महिन्यात एक मंत्री वृत्तसंस्था AFP शी बोलताना म्हणाले होते की, "सत्तेत असलेल्या पक्षासाठी या निवडणुका चांगल्या नसतात. याकाळात तुमच्यावर सडकून टीका होते."

असलं असलं तरी मॅक्रॉन यांचा पक्ष अधिकच गाळात रूतला आहे. त्यांना कोणत्याच प्रदेशात विजय मिळालेला नाही. याचा अर्थ पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यात नेत्यांना अपयश आलं आहे.

कोरोना साथीमुळे या निवडणुका 3 महिने पुढे ढकलल्या होत्या. या निवडणुकांची दुसरी फेरी आता 27 जूनला होणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)