You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियात अन्नधान्याची टंचाई, किम जाँग-उन यांची कबुली
उत्तर कोरिया अन्नधान्याच्या प्रचंड टंचाईचा सामना करत असल्याचं देशाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी पहिल्यांदाच मान्य केलं आहे.
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी म्हटलं की, नागरिकांसाठीच्या अन्नधान्याची स्थिती आता तणावपूर्ण होत आहे.
किम यांनी म्हटलं, गेल्या वर्षी पूर आल्यामुळे कृषी क्षेत्र पुरेशा प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करू शकलं नाही.
देशातील अन्नधान्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. उत्तर कोरियाची वृत्तसंस्था एनके न्यूजच्या बातमीनुसार, देशात केळी 3 हजार रुपये प्रती किलो या दरानं विकली जात आहे.
कोरोनाच्या साथीमुळे उत्तर कोरियासमोरील हे संकट अधिक गडद झालं आहे. कारण उत्तर कोरियानं कोरोनाच्या काळात शेजारील देशांबरोबरची सीमा बंद केली होती.
यामुळे चीनसोबचा व्यापार कमी प्रमाणात झाला. उत्तर कोरिया अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि इंधनासाठी चीनवर अवलंबून आहे.
याशिवाय देशातील आण्विक चाचण्यांमुळे लावण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामनाही उत्तर कोरिया सध्या करत आहे.
किम जाँग-उन यांनी देशातल्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीच्या बैठकीत देशातल्या अन्नधान्याच्या टंचाईविषयी चर्चा केली. ही बैठक या आठवड्यात राजधानी प्याँगयांग येथे सुरू झाली आहे.
उत्तर कोरियातलं कृषी उत्पादन कमी झालेलं असलं, तरी गेल्या वर्षाशी तुलना केल्यास देशातील औद्योगिक उत्पादन वाढल्याचं किम यांनी म्हटलंय.
या बैठकीत अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंधांविषयी चर्चा होणार होती, पण याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीये.
आपला देश अनेक अडचणींचा सामना करत आहे, असं किम यांनी एप्रिल महिन्यात मान्य केलं होतं. त्यावेळेस ही एक दुर्मीळ बाब असल्याचं बोललं गेलं.
आपल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एका The Arduous March (अवघड मार्ग) अवलंब करावा लागेल, असं त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
या शब्दाचा उच्चार देशात नव्वदच्या दशकात करण्यात आला होता. यावेळी देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सोव्हियत संघाचं विभाजन झाल्यानंतर उत्तर कोरियाला मिळणारी मदत बंद झाली होती.
त्या दुष्काळात नेमका किती जणांचा मृत्यू झाला, याची स्पष्ट अशी माहिती नसली तरी जवळपास 30 लाख जणांचा जीव गेला होता, असं मानलं जातं.
किम जाँग-उन यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? - विश्लेषण
लॉरा बीकर, बीबीसी प्रतिनिधी, सोल
किम जाँग-उन यांनी सार्वजनिकरित्या देशातील अन्नधान्याच्या कमतरेची गोष्ट स्वीकारणं ही एक असामान्य बाब आहे. पण, हे ते नेते आहे ज्यांनी आपल्या आर्थिक योजना अपयशी ठरल्याचं यापूर्वीच मान्य केलं आहे.
किम यांनी जेव्हा त्यांच्या वडिलांकडून सत्ता मिळवली, तेव्हा त्यांनी लोकांना एक समृद्ध भविष्य देण्याचं वचन दिलं होतं. तुमच्या जेवणाच्या टेबलवर मांसाहारी खाद्यपदार्थ असतील आणि घरात वीज असेल, असं म्हटलं होतं. पण, असं काही झालं नाही. आता मात्र अधिक कठोर पावलांसाठी तयार असलं पाहिजे, असं ते लोकांना सुचवू पाहत आहेत.
सध्याच्या संकटाला ते कोरोना साथीशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी माध्यमाच्या मते, त्यांनी पक्षाच्या अधिकाऱ्यांना म्हटलंय की, जगभरात स्थिती अतिशय वाईट होत चालली आहे.
सध्या उत्तर कोरियात ज्या प्रकारची परिस्थिती आहे, तिथं बाहेरून येत असलेल्या माहितीला ज्याप्रमाणे थांबवलं जातं, यातून त्यांना हे दाखवायचं आहे की, अडचणी फक्त आपल्या देशात नसून प्रत्येक ठिकाणी आहेत.
कोरोनाचा सामना करण्याच्या प्रयत्नांना त्यांनी एक मोठी लढाई असं नाव दिलं आहे. त्यामुळे सीमा इतक्यात सुरू होणार नाहीत, म्हणजेच बाहेरून येणाऱ्या लोकांवर निर्बंध कायम राहतील, असा यातून संदेश मिळतो.
बऱ्याच मदतकार्य करणाऱ्या संस्थांसाठी हाच चिंतेचा विषय आहे. सीमा बंद असल्यामुळे देशात अन्नधान्य आणि औषधं पोहोचवणं अवघड होत आहे. या बंदीमुळे देशातल्या बहुसंख्य बिगर-शासकीय संस्थांना देशातून बाहेर पडावं लागलं. कारण या संस्थांना सामान आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करताना अडचण येत होती.
देशात सगळ्यांनी आत्मनिर्भर बनायला हवं, असं उत्तर कोरिया नेहमीच म्हणत आला आहे. यामुळे उत्तर कोरियानं आपल्याला सगळ्यांपासून वेगळं केलं आहे. अशात इतर देशांपासून मदत मागितली जाईल, ही शक्यता धुसर आहे.
इथून पुढेही उत्तर कोरिया आंतरराष्ट्रीय मदत नाकारत राहिला, तर याची किंमत देशातल्या लोकांना मोजावी लागू शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)