You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन खास ट्रेनने पोहोचले चीनला
उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जाँग-उन यांनी बीजिंगमध्ये पोहोचले असून त्यांच्या चीन दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांच्या आमंत्रणानंतर हा दौरा आखण्यात आला आहे.
10 जानेवारीपर्यंत किम आणि त्यांची पत्नी रि सोल-जू चीनमध्ये असतील, असं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
किम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या बैठकीसाठी वाटाघाटी सुरू असतानाच किम यांनी चीन दौरा साधला आहे. याआधी किम ट्रंप यांची जून महिन्यात सिंगापूरमध्ये भेट झाली होती.
किम चीनच्या भेटीला जाण्याची शक्यता सोमवारीच वर्तवण्यात आली होती. एक रेल्वे उत्तर कोरियाची सीमा ओलांडून चीनमध्ये गेल्याचं वृत्त दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योन्हापने दिल्यानंतर ही शक्यता बळावली होती.
चीनच्या सीमेवरी डांगडोंग गावातील रेल्वे स्टेशनजवळील सर्व रस्ते सुरक्षा वाहनांनी बंद केले होते. तसेच डांगडोंगमधील हॉटेलमध्ये राहाणाऱ्या पाहुण्यांना सीमेच्या दिशेकडे तोंड असणाऱ्या खोल्यांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली.
आज किम जाँग-उन यांचा वाढदिवसही असल्याचं सांगितलं जातं. मात्र त्यांच्या वाढदिवसाची अधिकृत तारिख कधीच प्याँगयांगने सांगितली नाही.
उत्तर कोरियातून येणाऱ्या ट्रेनकडे कुणी पाहू नये, यासाठी ही व्यवस्था केल्याचं क्योडो वृत्तसंस्थेने स्पष्ट केलं.
मंगळवारी सकाळी बीजिंग स्टेशनवर हिरव्या-पिवळ्या रंगाची रेल्वे आल्याचं दोन्ही देशांच्या माध्यमांनी सांगितलं.
हीच रेल्वे किम जाँग यांनी यापूर्वीच्या चीनभेटीसाठी वापरली होती. तसेच त्यांचे वडिल किम जाँग- इल यांनी 2011 साली चीन आणि रशिया भेटीसाठी अशाच रेल्वेचा वापर केला होता.
किम जाँग-उन यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल बीजिंग स्टेशनवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.
त्यांच्याबरोबर अनेक अधिकारीही आहेत. वर्षभराच्या काळातील ही त्यांची चौथी चीन भेट आहे.
आज त्यांचा 35 वा वाढदिवस असल्याचेही सांगण्यात येते. मात्र त्यांची नक्की जन्मतारिख कोरियाकडून कधीच स्पष्ट करण्यात आली नाही.
राजनैतिकदृष्ट्या उत्तर कोरियासाठी चीन अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच व्यापार आणि मदतीसाठीही चीन महत्त्वाचा आहे.
"चीन आणि अमेरिका देत असलेल्या पर्यायाशिवाय आर्थिक आणि राजनयिक पर्याय आपल्याकडे आहेत, याची आठवण ट्रंप प्रशासनाला करून देण्यासाठी किम उतावीळ आहेत," असं Defense Studies at the Centre for the National Interest चे संचालक हॅरी जे काझिनीस यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
2011 साली उत्तर कोरियाच्या प्रमुखपदी आल्यापासून किम जाँग-उन यांनी पहिल्या सहा वर्षांमध्ये जिनपिंग यांची भेट घेतली नव्हती. मात्र गेल्या वर्षभरात ही त्यांची तिसरी भेट आहे. यापैकी कोणत्याही भेटीला पूर्वप्रसिद्धी देण्यात आली नव्हती, असं बीबीसी प्रतिनिधी लॉरा बिकर यांनी सांगितलं.
या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या भेटीमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यात दुसरी चर्चा परिषद लवकरच होण्याची शक्यता वाढेल, असं बिकर यांनी सांगितलं.
लवकरच दुसऱ्या चर्चा परिषदेचं ठिकाण जाहीर करण्यात येईल, असं ट्रंप यांनी या आठवड्यात सांगितलं होतं.
उत्तर कोरियाशी चांगला संवाद सुरू आहे, मात्र उत्तर कोरियातील निर्बंध कायम ठेवण्यात येतील, असं ट्रंप यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं.
"उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्त होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत," असं किम यांनी वर्षारंभीच्या भाषणात देशाला संबोधित करताना सांगितलं होतं. "मात्र अमेरिकेने लादेलेलेल निर्बंध कायम राहिले तर या धोरणात बदल होईल," असेही सांगण्यास ते विसरले नव्हते.
ट्रंप आणि किम यांच्यामधील सिंगापूर येथे चर्चा संपन्न झाल्यानंतर त्यापुढे कोणतीही राजनैतिक प्रगती झालेली नाही. या भेटीमध्ये दोन्ही देशांनी कोरियन द्विपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्याचा निर्धार केला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)