Mumbai Rain : टोकियोकडून 'ही' गोष्ट शिकल्यास मुंबईमध्ये पावसाचं पाणी तुंबणं टाळता येईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिएगो अर्ग्यूदस ओर्टीझ
- Role, बीबीसी फ्युचर
(मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला की, ठिकठिकाणी पाणी साचतं. रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प होते. अनेकदा दुर्घटनाही होतात. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा ही खरंच एवढी मोठी समस्या आहे का, असा प्रश्नही मुंबईकरांना पडतो. टोकियोमधले लोक कदाचित याचं उत्तर नकारार्थी देतील. जपानची राजधानी टोकियोमध्ये एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे पाणी साचत नाही.)
जपानमधील उल्लेखनीय आणि चमत्कारिक स्थापत्य नमुन्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत कॅथेड्रल वॉटर टँकचं ते महाकाय स्वरूप सिसीला टोर्टाजादा यांना अजूनही आठवतं. हे वॉटर टँक संपूर्ण टोकियो शहराला पुराच्या पाण्यापासून वाचवण्याचं काम करतात.
जमिनीच्या पोटात बांधकाम करण्यात आलेल्या या कॅथेड्रलमध्ये तब्बल पाच-पाचशे टन वजनी कित्येक अजस्त्र खांब उभे करण्यात आलेले आहेत. या गुहेत गेल्यानंतर सिसीला हरखून गेल्या होत्या.
सिंगापूरच्या ली कुआन यू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीज इंन्स्टीट्यूटमध्ये जलसंवर्धन तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या सिसीला तोर्तजादा म्हणतात, "त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही या महाकाय यंत्रणेतील अत्यंत छोटा भाग असल्याचं तुम्हाला कळून येतं. टोकियो कोणत्याही संकटाचा सामना करण्यास किती सुसज्ज आहे, याची जाणीव तुम्हाला तिथं गेल्यावर नक्की होईल."
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी जपान हे एक तीर्थक्षेत्र असल्यास हे कॅथेड्रल त्यातील प्रमुख मंदिरांपैकी एक असेल, असं सिसीला यांना वाटतं.
फ्लडवॉटर कॅथेड्रल हे जमिनीच्या खाली 22 मीटर खोल बांधण्यात आलं आहे. टोकियोच्या मेट्रोपोलिटन एरिया आऊटर अंडरग्राऊंड डिस्चार्ज चॅनेल (MAOUDC) चा ते एक भाग आहे.
या यंत्रणेत तब्बल 6.3 किलोमीटर लांबीचे बोगदे आणि सिलेंड्रिकल चेंबर्सचा समावेश आहे. त्यांच्या मदतीने उत्तर टोकियोला पुरापासून वाचवण्यात येऊ शकतं.
या कॅथेड्रलच्या मदतीने गेल्या काही दशकांत विविध प्रकारच्या वादळांमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात जपानला यश आलं आहे. येथील पूरनिरोधक यंत्रणा जगभरात एक आश्चर्य ठरली आहे. पण हवामान बदलामुळे या यंत्रणेसमोर काही आव्हानंही आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
टोकियोचा पुरांविरोधातील लढा नवा नाही. शहर परिसराला पाच जलवाहिन्यांच्या यंत्रणांनी वेढलेलं आहे. मोठ्या प्रमाणात झालेलं नागरीकरण, वेगाने होणारं औद्योगिकीकरण आणि जलनिचरा व्यवस्थापनाअभावी शहराच्या काही भागात नेहमीच पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.
गेल्या 20 वर्षांपासून जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या टोर्टजादा म्हणतात, "इथं टोकियो वसवायचा निर्णय कुणाचा होता, हे मला माहीत नाही."
जपान गेल्या कित्येक शतकांपासून महापुरांना तोंड देत असलं तरी टोकियोचं सध्याचं स्वरूप खऱ्या अर्थाने युद्धोत्तर काळानंतर आकाराला आलं.
टायफून कॅथलिन हे वादळ 1947 साली जपानवर धडकलं होतं. त्यावेळी 31 हजार घरं उद्ध्वस्त झाली. तर 1100 नागरिकांचा त्यात मृत्यू झाला होता.
त्यानंतर दहा वर्षांनी टायफून कानोगावाने (ईडा) टोकियोत धुमाकूळ घातला होता. त्यावेळी एका आठवड्यात तब्बल 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्याचा फटका रस्ते, घरे आणि व्यापारी भागाला बसला होता.
या परिस्थितीनंतर जपानच्या सरकारने या समस्येतून मार्ग काढण्याचं ठरवलं.

फोटो स्रोत, Getty Images
1950 आणि 1960 च्या दशकात दुसऱ्या महायुद्धाच्या नुकसानीतून सावरत असताना जपानने आपल्या अर्थसंकल्पातील 6-7 टक्के भाग आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात खर्च करण्याचं ठरवलं, असं मिकी इनाओका सांगतात.
मिकी या जपानच्या इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमध्ये (JICA) आपत्ती व्यवस्थापन तज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
टोकियोच्या रचनाकारांनी विविध प्रकारच्या पुरांचा सावधगिरीने विचार केला असला पाहिजे. मुसळधार पावसानंतर नदी आपली पूररेषा ओलांडून धोक्याच्या पातळीवरून वाहण्याची शक्यता असते. तसंच शहराला वादळं, त्सुनामी किंवा भूकंप यांसारख्या आपत्तींचाही धोका होता.
या सर्व बाबींचा विचार करून टोकियोने पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. या सर्व धोक्यांच्या नाकावर टिच्चून जपानमध्ये कित्येक धरणं, जलाशय आदी डौलाने उभ्या आहेत.
टोकियो शहराचं खोदकाम पाहिल्यास तुम्हाला कित्येक मेट्रो लाईन आढळून येतील. त्यानंतर शहराला इंधन पुरवणाऱ्या गॅस पाईपलाईन तुम्हाला दिसतील. पण त्याचसोबत मोठाल्या बोगद्यांचं एक चक्रव्यूहसुद्धा तुमच्या नजरेस पडेल.

फोटो स्रोत, Getty Images
MAOUDC अंतर्गत फ्लडवॉटर कॅथेड्रल 2 अब्ज डॉलर खर्चून बनवण्यात आलं आहे. हा शहरातील सर्वांत प्रभावी स्थापत्य अभियांत्रिकींपैकी एक नमुना म्हणून संबोधता येईल.
सुमारे 13 वर्षांच्या अविरत प्रयत्नानंतर 2006 मध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं होतं. ही जगातील सर्वांत मोठी पाणीनिचरा यंत्रणा म्हणून ओळखली जाते.
'जपान हा देश शिकण्यावर विश्वास ठेवतो, तसंच इथं खूप काही शिकायला मिळतं.' असं टोर्टजादा सांगतात.
टोर्टजादा यांनी MAOUDC ला 2017 साली भेट दिली होती.
येथील छोट्या नद्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास तातडीने ते पाणी ईडो या मोठ्या नदीत वळवलं जातं. हे पाणी सामावून घेण्याची नदीची क्षमता असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात नाही.
एखादी नदी पातळीबाहेर वाहू लागल्यास ते पाणी येथील अजस्त्र अशा 70 मीटर उंच पाण्याच्या टाक्यांमध्ये जमा होतं. 6.3 किलोमीटर लांबीच्या बोगद्यांनी हे वॉटर टँक एकमेकांशी जोडलेले आहेत.
पाणी ईडो नदीकडे जात असताना फ्लडवॉटर कॅथेड्रल त्या पाण्याचा उपसा करून ते पाणी अतिशर जोरकसपणे नदीकडे ढकलतं. प्रतिसेकंद 200 टन पाणी ढकलण्याची या टँकची क्षमता आहे.
हे एक सुविधानिर्माणाचं सायन्स फिक्शन म्हणता येईल, असं इनाओका यांना वाटतं.
जगभरातील विकसनशील देशांपर्यंत जपानचं तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी समन्वय साधण्याची जबाबदारी इनाओका यांच्याकडेच आहेत.
दुसरीकडे, हवामान बदलाची भीती त्यांनाही आहे. टोकियोच्या पायाभूत सुविधांना हवामान बदलाच्या परिणामांना सुसज्ज राहिलं पाहिजे, असं त्या म्हणतात.
इतिहासातील नोंदींचा अभ्यास करून प्रतितास 50 मिलीमीटर पावसातही शहरवासियांचं संरक्षण करण्याचं नियोजन प्रशासनाकडून केलं जात आहे.
विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात हे नियोजन करण्याचा त्यांचा विचार आहे. मात्र 50 वर्षांपूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही, हेसुद्धा वास्तव आहे.
जपानच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या 30 वर्षांत जपानमध्ये जोरदार पाऊस होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
21 व्या शतकात हे प्रमाण 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टोकियो मेट्रोपोलिटन गव्हर्नमेंट ब्यूरो ऑफ कन्स्ट्रक्शनने याचा विचार करताना प्रतितास 65 ते 75 मिलीमीटर पावसासाठीही सज्ज राहण्याची सूचना केली आहे.
पण, प्रशासन यावर चर्चा करण्यातच जास्त वेळ घालवत आहे, असं माजी स्थापत्य अभियंता नोबुकुयी त्सुचिया यांना वाटतं. त्यांच्या मते, "जपानमध्ये अद्याप हवामान बदलानुसार पूरनियंत्रण धोरण अजून तयार झालेलं नाही."
यासंदर्भात त्यांनी 2014 मध्ये शुतो सुईबोस्तू नामक एक पुस्तक लिहिलं होतं. टोकियो हवामान बदलाच्या धोक्यांसाठी अद्याप सज्ज नाही, असं त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
"टोकियोतील सखोल भागातील सुमारे 25 लाख नागरीक आगामी काही काळात पूरग्रस्त होऊ शकतात. त्यासाठी प्रशासनाने सुसज्ज असणं गरजेचं आहे," असं ते सांगतात.
2018 मध्ये जपानच्या पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शंभराहून अधिक नागरिकांचा बळी गेला होता. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका या परिसराला बसला होता. टोकियो शहरात हे घडू शकतं, ही शोकांतिका आहे, असं त्सुचिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
त्सुचिया यांच्या मते, "हवामान बदलामुळे केवळ टोकियोच नव्हे, तर न्यूयॉर्क, शांघाय, बँकाकसह, मुंबईसारखी इतर शहरांतसुद्धा पूरस्थिती निर्माण होऊ शकते. या सर्व शहरांमध्ये या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे."
उदाहरणार्थ, लंडनचा बहुतांश परिसर थेम्स नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. शहराच्या पूर्व भागात नदीवर मजबूत तटबंदी करून तो भाग संरक्षित करण्यात आला आहे. पण ही तटबंदीही कधीतरी बचाव करण्यात अपयशी ठरेल, याची कल्पना तज्ज्ञांना आहे.
अटलांटीक समुद्रकिनारीच वसलेल्या मियामी शहराची परिस्थितीही वेगळी नाही. समुद्राच्या पातळीमध्ये होणाऱ्या वाढीशी त्यांची लढाई याआधीच सुरू झालेली आहे.
सिंगापूरमध्ये सिसिला टोर्टजादा आणि इतर तज्ज्ञांचा याच विषयावर अभ्यास सुरू आहे. आगामी काळात समुद्रपातळीत वाढ झाल्यास त्याला कसं तोंड द्यावं यावर ते संशोधन करत आहेत.
याच धोक्याचा विचार करून लोकल बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑथरिटीने (BCA) नुकतेच एक अभ्यास सुरू केला आहे.
मात्र प्रत्येकाची नजर सध्या टोकियो शहरावर आहे. कारण या सर्व गोष्टींचा सामना ते कशा प्रकारे करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जपानसारखा सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेला देश या सर्व संकटांना तोंड देत असेल तर आपण त्याचं निरीक्षण नक्कीच केलं पाहिजे, असं टार्टजादा सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








