महिलांसाठी मोठ्या गळ्याचे कपडे शिवायला पाकिस्तानी शिंपी का तयार नाहीत?

    • Author, सना आसिफ़ डार
    • Role, बीबीसी उर्दू, इस्लामाबाद

"ताई, हे खूप खोल होईल. मी तुम्हाला सांगतो हे चांगलं नाही दिसणार. या वयात स्लीव्हलेस सूट? एका बाजूला आणखी थोडं कापड लावून घ्या ना..."

अशी वाक्यं पाकिस्तानातल्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हायला लागली, जेव्हा एका महिलेनं एक फोटो शेअर करत म्हटलं की, तिला खोल गळ्याचा सूट शिवायची इच्छा आहे. पण आपल्या आईला कशाप्रकारे तयार करावं? हे तिला समजत नाहीये.

त्या महिलेला तिच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं नाही, पण प्रतिक्रियेत एका महिलेनं लिहिलंय, "आमच्या इकडचा शिंपीही अशापद्धतीचे गळे शिवायला तयार होत नाही."

हिना नावाच्या यूझरच्या या वाक्यानं असं वाटलं जसं तिनं ट्वीटरवरच्या महिलांच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलं.

यानंतर मात्र अनेक महिलांनी त्यांना त्यांच्या शिंप्याकडे कोणकोणते सल्ले मिळतात, याविषयी सांगायला सुरुवात केली.

एका महिलेनं म्हटलं की, त्यांचा शिंपी मागच्या बाजूनं मोकळ्या गळ्याचा सूट बनवायला तयार होईल, पण पुढच्या बाजूने अजिबात नाही.

एका दुसऱ्या यूझरनं आपल्या शिंप्याच्या स्टाईलमध्ये म्हटलं, "ताई हे खूप मोठं होईल. मी तुम्हाला सांगतो ताई, हे चांगलं दिसणार नाही."

"इथं आईपेक्षा अधिक चिंता शिंप्याला आहे," असं आशा नावाच्या एका यूझरनं सांगितलं.

एका यूझरनं लिहिलं, "मी माझ्या शिंप्याला जेव्हा छोटी कमीज बनवायला सांगितलं तेव्हा त्यांनी म्हटलं, "बाळा, तुम्ही सय्यद यांच्या कुटुंबातून येता. तुम्ही अशाप्रकारची डिझाईन बनवू नका. मी तरी हे बनवून देणार नाही."

रहीमा नावाच्या एका यूझरनं लिहिलं, "मी माझ्या शिंप्याला केप्री ट्राऊझर (गुडघ्यांच्या वरती) बनवायला सांगितलं, तर त्यांनी म्हटलं की इतकं छोटं चांगलं नाही वाटणार."

आमचा शिंपी स्लीव्हलेस सूट तर सोडाच शॉर्ट स्लीव्ह्स बनवायलाही तयार होत नाही, असं एका यूझरनं म्हटलंय.

तर एकाने म्हटलंय, "एका मित्राच्या बहिणीला लहंग्यासोबत चोळी बनवायची इच्छा होती, पण शिंप्यानं म्हटलं की निदान माझ्या दाढीची तरी थोडी लाज बाळगा."

हे सुरू असताना काही महिलांनी असंही म्हटलं की केवळ पुरुष शिंपीच नव्हे तर महिला शिंपीही अशाप्रकारचा सल्ला देतात.

माहिरा नावाच्या एका यूझरनं आपली अगतिकता व्यक्त करताना म्हटलं, " पुरुष शिंपी सोडा आम्ही तर आमच्या महिला शिंप्याकडेसुद्धा याविषयी बोलू शकत नाही."

एका यूझरनं लिहिलं, "जेव्हा मी माझ्या महिला शिंप्याकडे मोकळा गळा शिवण्यासाठी सांगितलं, तर त्यांनी माझ्या शरीराकडे पाहिलं आणि हसतहसत म्हटलं की, तुम्हाला अशाप्रकारची फिटिंग व्यवस्थित येणार नाही."

"माझी एक मैत्रीण बारीक आहे आणि तिचा शिंपी नेहमीच तिच्या आईला सांगतो की, तिच्यासाठी पूर्ण सूट का खरेदी करता, एक पीस घेत जा फक्त," बॉडी शेमिंगचा उल्लेख करत एका महिलेनं असं म्हटलं.

पण, या सगळ्या चर्चेत काही पुरुषही शिंप्याप्रमाणेच महिलांनी पुरुषांच्या सल्ल्यानुसार चालावं, अशी सूचना करताना दिसले.

अॅडव्होकेट अब्बावीस नावाच्या एका युझरनं सांगितलं, "शिंप्यानं मोकळा गळा शिवून दिला तरी हे लक्षात ठेवायचं की तो कपडा फक्त घराच्या चार भिंतीच्या आत नवऱ्यासमोरच घालायचा."

अब्दुल्लाह नावाच्या एका यूझरनं लिहिलंय, "यातून कळतं की शिंपी लोक त्यांच्या महिला ग्राहकांना त्यांची ताई समजतात. नाहीतर त्यांनी अशाप्रकारचे कपडे आनंदाने शिवले असते."

पण काही पुरुष युझर असेही आहेत ज्यांनी महिलांना पूर्णपणे साथ दिली आहे.

"तुमच्या शिंप्याला सांगा की हे जग स्वतंत्र आहे," असं शहझाद रब्बानी यांनी लिहिलं आहे.

दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय, "तुमचा शिंपी तुमच्या कुटुंबातील एक व्यक्ती का बनत आहे?"

हैदर नावाच्या एका युझरनं म्हटलंय, "तुमच्या शिंप्याला सांगा की, त्यानं त्यांच्या ठिकाणी राहावं, तुमचा पती व्हायचं काम करू नये."

पण तुम्ही जर या चर्चेला विस्तारानं वाचलं तर लक्षात येईल की, शिंप्याचा हा सल्ला फक्त महिलांसाठीच असतो असं नाही. तर कधीकधी पुरुषांनाही याप्रकारचा सामना करावा लागतो.

आदिल खान यांनी लिहिलंय, "माझा शिंपी माझा पैजामा छोटा शिवून देतो कारण तो घोट्यांच्या खाली जाता कामा नये."

फारूख अफ्रिदी यांनी लिहिलंय, "आम्ही जर शिंप्याला आमची पँट टाईट करायला सांगितली तर तो म्हणतो, मी असं करू शकत नाही, हे जास्त होत आहे."

पुरुषांना मिळणाऱ्या या सल्ल्याविषयी मी काही सांगू शकत नाही, पण ट्वीटरवरील या चर्चेत सहभागी झालेल्या महिलांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे, कारण माझ्या शिंप्यानेही मला अशाप्रकारचा सल्ला दिला होता. त्यानंतर मी दुसरा शिंपी शोधला.

त्यामुळे महिलांना माझा सल्ला आहे की, कधीच आशा सोडू नका आणि आपल्या पसंतीच्या शिंप्याचा शोध घेत राहा.

आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नेहमी तेच कपडे परिधान करा जे तुम्हाला पसंत असतील आणि स्वत:साठी चांगले वाटतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)