मुस्लीम झालेली शीख महिला पाकिस्तानातून गायब

बैसाखी साजरी करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेल्या शीख यात्रेकरूंमधील किरण बाला 16 एप्रिलपासून गायब झाल्या आहेत. त्यांचे भारतातील कुटुंब चिंतेत आहे. पाकिस्तानात त्या संकटात सापडल्या असाव्यात अशी भीती त्यांना वाटते आहे.

होशियारपूरच्या किरण बाला 33 वर्षांच्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर, 2005 सालापासून त्या 8 वर्षांची मोठी मुलगी आणि दोन लहान मुलांसोबत सासरी रहात आहेत. 12 एप्रिल रोजी, त्या 1800 शीख यात्रेकरूंसह पाकिस्तानमध्ये गेल्या.

लाहोर गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सचिव गोपाल सिंग चावला यांच्याशी बीबीसीचे अमृतसरमधले प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांनी संपर्क साधला. चावला म्हणाले की, "किरण त्या शीख यात्रेकरूंसोबत होत्या. पण सध्या त्यांचा काही ठावठिकाणा नाही. यासंदर्भातली तक्रार योग्य त्या अधिकाऱ्यांकडे नोंदवावी लागेल. आमची त्यात काही भूमिका नाही. त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आहे, असं कळलं आहे. आमचा त्याला विरोध आहे."

किरण यांचे सासरे, तारसेम सिंग हे होशियापूरमधल्या एका गुरुद्वारात पुजारी (ग्रंथी) आहेत. ते म्हणाले की, "तीन दिवसांपूर्वी मी तिच्याशी बोललो. तेव्हा आपण परतणार नसल्याचं तिनं सांगितलं."

"सुरुवातीला मला ती थट्टा वाटली. पण आता तिनं लाहोरमध्ये धर्मांतर केल्याचं कळलं तेव्हा धक्काच बसला. तिनं परत यावं आणि मुलांचा सांभाळ करावा," असं तारसेम सिंह यांनी स्पष्ट केलं.

तारसेम सिंग यांना किरण संकटात सापडल्या असाव्यात असं वाटतं. ते म्हणाले, "गुप्तचर संस्थेनं तिला फसवलं असावं. ती शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीबरोबर (एसजीपीसी) गेली आहे. त्यांनी तिला परत आणावं. त्यासंदर्भात, एसजीपीसीचे सचिव दलजीत सिंग म्हणाले, "एसजीपीसीला अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. यात्रेकरू परतल्यावर असं काही आढळलं तर आम्ही सरकारला त्याच्याविषयी माहिती देतो."

इस्लामाबादमधील जामिया नीमिया मदरशाचे व्यवस्थापक राघीब नईमी यांनी बीबीसीच्या पाकिस्तानातल्या प्रतिनिधी शुमेला जाफरी यांना सागितलं की, "16 एप्रिल रोजी एक शीख महिला मदरशात आली आणि तिनं इस्लामचा स्वीकार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या महिलेस कादिर मुबाशेर यांनी इस्लाममध्ये धर्मांतरित करुन घेतलं. त्या महिलेवर कोणताही दबाव नसल्याची खात्री आम्ही केली होती."

इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांनी याबद्दल काहीच अधिकृत माहिती नसल्याचं रविंदर सिंग रॉबिन यांना सांगितलं. "पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सामान्यपणे अशी माहिती आमच्याकडे येते. तशीही काही माहिती आलेली नाही," असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.

भारतातल्या पाक उच्चायुक्तालयाचे प्रवक्ते ख्वाजा माज तेह यांनी सांगितलं की, "पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. किरण बाला यांना यात्रेकरू म्हणून नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तलयानं व्हिसा दिला आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)