इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष: 'इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादचा कमांडर ठार

इस्रायलच्या सैन्याने इस्लामिक जिहादच्या कमांडरला मारल्याचा दावा केला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादच्या उत्तर गाझा तुकडीच्या कमांडरचा मृत्यू झाल्याचा दावा सैन्याने केला आहे. याची माहिती इस्रायलच्या सैन्याने ट्वीटद्वारे दिली आहे.

इस्रायलच्या विरोधात अनेक अँटीटँक क्षेपणास्त्र हल्ल्यात अबू हरमीद सहभागी होता. त्याचा मृत्यू झाला आहे असं या ट्वीटमध्ये म्हटलंय. इस्लामिक जिहादनं याबाबत काहीही स्पष्ट कलेलं नाही.

रॉयटर्सने एका सूत्राच्या आधारे हवाई हल्ल्यात अबू हरमीदचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. गाझामधील माध्यमांनीही अबू हरमीद मेल्याची बातमी दिली आहे.

रविवार (16मे) हा इस्रायलसोबत संघर्ष सुरू झाल्यानंतरचा सर्वांत घातक दिवस होता, असं गाझामधील पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

इस्रायली हवाई हल्ल्यात गाझामधील 40 हून अधिक लोक ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इस्रायलच्या लष्कराचे म्हणणे आहे की पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांनी गेल्या आठवडाभरात इस्रायलवर 3 हजारहून अधिक रॉकेटचे हल्ले केले आहेत.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी लढाई अशीच सुरू राहिली तर हा प्रदेश "अनियंत्रित संकटात" सापडू शकतो असा इशारा दिला आहे.

सुरू असलेला हा "अत्यंत भयानक" हिंसाचार त्वरित थांबवण्याची विनंतीही त्यांनी केली.

सोमवारी (17 मे) पहाटे इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीतल्या अनेक भागांवर 80 हवाई हल्ले केले, त्यानंतर लगेचच हमासच्या कट्टरवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर रॉकेट सोडले.

संयुक्त राष्ट्रांनी गाझामध्ये इंधनाच्या कमतरतेचा इशाराही दिला आहे, ज्यामुळे रुग्णालय आणि इतर सुविधांसाठी वीज कमी पडू शकते.

मध्यपूर्व शांतता प्रक्रियेसाठी संयुक्त राष्ट्रांचे डेप्युटी स्पेशल को-ऑर्डिनेटर लिन हेस्टिंग्ज यांनी बीबीसीला सांगितले की, संयुक्त राष्ट्रांना इंधन आणण्याची परवानगी देण्याचं आवाहन त्यांनी इस्रायली अधिकाऱ्यांना केलं होतं परंतु ते सुरक्षित नसल्याचं सांगण्यात आलं.

गाझाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रविवारी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात 16 महिला आणि 10 मुलांसह 42 जणांचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी (10 मे) संघर्ष सुरू झाल्यापासून इस्रायलवर झालेल्या रॉकेट हल्ल्यात दोन मुलांसह दहा जण ठार झाले आहेत, असं इस्रायलने म्हटलं आहे.

गाझामध्ये एकूण मृतांची संख्या आता 188 वर पोहचली आहे. ज्यात 55 मुलं आणि 33 महिलांचा समावेश आहे. तसंच 1,230 लोक जखमी झाले आहेत, असं हमासच्या नियंत्रणाखाली असलेल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. इस्रायलचं म्हणणं आहे की मृतांमध्ये अनेक कट्टरवाद्यांचा समावेश आहे.

रविवारी (16 मे) काय घडलं?

इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे रविवारी मध्यरात्रीनंतर गाझामधील एका वर्दळ असलेल्या रस्त्यावर हल्ला झाला. यात किमान तीन इमारती कोसळल्या आणि डझनभर मृत्यू झाले.

हमासने रात्रभर आणि दुपारी दक्षिण इस्रायलच्या दिशेने रॉकेट सोडले.

सायरन सुरू होताच लाखो लोक इस्रायली सुरक्षित खोल्या किंवा आश्रयस्थानांमध्ये घुसले. पॅलेस्टिनींनीही खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला, पण गर्दी असलेल्या आणि कमी संसाधन असलेल्या गाझा पट्टीत अनेकांना कुठेही जाता येत नव्हतं.

रियाद एश्कुंताना यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं की, त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या घराच्या एका खोलीत झोपवलं. त्यांना वाटलं की स्फोटांपासून ते दूर आहेत. पण त्यांची सहा वर्षांची सुझी ही एक मुलगी फक्त रात्री वाचली. त्यांची पत्नी आणि इतर तीन मुलांचा मृत्यू झाला.

ते म्हणाले, "मी मुलींना पाहण्यासाठी धावलो. माझ्या पत्नीने बाहेर उडी मारली. तिने मुलींना खोलीतून बाहेर नेण्यासाठी त्यांना मिठी मारली. पण खोलीत हवाई हल्ला झाला. छत उद्ध्वस्त झालं आणि मी ढिगाऱ्याखाली होतो."

इस्रायली लष्कराने नंतर सांगितले की, या भागातील कट्टरवाद्यांची यंत्रणा असलेल्या बोगद्यांवर हल्ले करण्यात आले आहेत. बोगदे कोसळल्यामुळे वरील घरंही कोसळली, ज्यामुळे अनपेक्षित नागरी जीवितहानी झाली.

हमासशी संबंधित नेते आणि सुविधांना लक्ष्य करत असल्याचं इस्रायलच्या लष्कराने सांगितलं. यावेळी असंही सांगण्यात आलं की हमासचे नेते याह्या सिनवार आणि त्यांचा भाऊ महंमद सिनवार यांच्या घरावरही हल्ला झाला आहे. त्यांनी चळवळीसाठी रसद पुरवल्याचा आणि ते मनुष्यबळ प्रमुख असल्याचा उल्लेख इस्रायली लष्कराकडून करण्यात आला आहे.

असोसिएटेड प्रेस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यावेळी ते घरी असण्याची शक्यता नव्हती.

गाझामधील कामगारांनी ढिगाऱ्याखालून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की "मृतांमध्ये एका डॉक्टरांचाही समावेश आहे. ते शिफा रुग्णालयाचे औषधप्रमुख आणि कोरोना व्हायरस टीमचे सदस्य डॉ. अयमान अबू अल-ऊफ होते. इस्रायलमध्ये हमासचे रॉकेट्स अॅश्केलॉन, अश्दोड, नेटिव्होट आणि मध्य आणि दक्षिण इस्रायलच्या इतर भागांवर कोसळले. अद्याप जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही."

इस्रायली लष्करानुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या रॉकेट हल्ल्यांचं प्रमाण आतापर्यंतचं सर्वाधिक आहे. आयर्न डोम संरक्षण यंत्रणेने त्यापैकी बरेच हल्ले अडवले आहे. पण काही हल्ल्यात गाड्या आणि इमारतींचे नुकसान झालं.

ज्यात अॅश्केलॉनमधील याद मायकेल सिनेगॉगचा समावेश होता. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, कोणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही आणि स्थानिक लोक नुकसान दूर करण्यासाठी त्वरीत पुढे सरसावले जेणेकरून शब्बाथची सेवा सुरू राहील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)