'परफेक्ट' कॉन्डम बनवण्यासाठी काय काय करावं लागलं? तुम्हाला माहिती आहे का?

कंडोम

फोटो स्रोत, Behrouz Mehri/AFP/Getty Images

    • Author, शरमैन ली
    • Role, बीबीसी फ्युचर

लैंगिक आजारांपासून संरक्षण पुरवणारं औषध आतूनच लावलेलं असणं, स्वतःहून तेलकटपणा येणं, अशी वैशिष्ट्यं कॉन्डममध्ये येऊ लागली आहेत. भविष्यातील गर्भनिरोधकावर काम सुरू झालेलं आहे.

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या युरोपातील आरंभिक व महान सभ्यतांमध्ये क्रीटची गणना केली जाते. एका आख्यायिकेनुसार, क्रीटचा राजा मायनसला एक त्रास होता- त्याचं वीर्य विषारी होतं. राजाशी संभोग केल्यानंतर त्याच्या जनानखान्यातल्या अनेक स्त्रिया मरण पावत असत, कारण त्याच्या लिंगातून संभोगावेळी 'साप आणि विंचू' बाहेर पडायचे, असं म्हटलं जातं.

या काहीशा असाधारण लैंगिक आजारातूनच एक नवीन शोध लागला. या शोधाचं अपत्य होतं- कॉन्डम. उपलब्ध नोंदींनुसार, राजा मायनस हा कॉन्डम वापरणारी पहिली व्यक्ती ठरला.

त्या वेळी वापरलं गेलेलं संरक्षक आच्छादन बकऱ्याच्या मूत्राशयापासून बनवलेलं होतं, आणि राजाच्या सोबतिणींना संभोगावेळी सुरक्षित ठेवण्यासाठी त्याची मदत झाली (ही वस्तू राजा घालत असे की त्याच्या सोबतिणी घालायच्या, याबद्दल काही वादविवाद आहेत).

आज एका वर्षात जगभरात सुमारे 30 अब्ज कॉन्डम विकले जातात. 1990 सालापासून कॉन्डमच्या वापरामुळे अंदाजे चार कोटी 50 लाख एचआयव्ही संसर्ग थोपवण्यात आल्याचं संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या यूएन-एड्स या संस्थेची आकडेवारी सांगते.

पण आजही दररोज दहा लाखांहून अधिक लैंगिक संसर्ग होत असतात, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. दर वर्षी जगातील अंदाजे आठ कोटी गर्भधारणा अहेतूकपणे होत असतात.

आजारांचा प्रसार थांबवण्यामध्ये व कुटुंबनियोजनामध्ये कॉन्डमची भूमिका अधिक व्यापक असायला हवी, असं अनेक सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ नमूद करतात. पुरुषांनी वापरायचे आधुनिक रबरी कॉन्डम बहुतांश लैंगिक संक्रमणशील आजारांपासून 80 टक्के किंवा अधिक संरक्षण पुरवतात.

पुरुषांच्या कॉन्डमचा चुकीचा व असातत्यपूर्ण वापरही या आकडेवारीमध्ये गृहित धरलेला आहे. योग्य वापर केला, तर या कॉन्डममुळे एचआयव्हीच्या संक्रमणाला 95 टक्क्यांपर्यंत प्रतिबंध करणं शक्य असतं, असं अभ्यासांमधून आढळलं आहे.

पण लोकांना कॉन्डमचा योग्य वापर करायला शिकवणं हे अजूनही एक मोठं आव्हान आहे, असं विल्यम यार्बर म्हणतात. ते ब्लूमिंग्टनमधील इंडियाना विद्यापीठात 'रुरल सेंटर फॉर एड्स/एसटीडी प्रीव्हेन्शन'चे वरिष्ठ संचालक आहेत.

कंडोम

फोटो स्रोत, Behrouz Mehri/AFP/Getty Images

"आमच्या संशोधनानुसार असं आढळलं आहे की, अनेकांना कॉन्डम वापरायचे असतात, पण कॉन्डमच्या वापरातून त्यांना नकारात्मक अनुभव आलेले असतात, त्यांनी कॉन्डमची 'वाईट ख्याती' ऐकलेली असते, किंवा त्यांना कॉन्डमचा योग्य वापर कसा करायचा आणि आनंद उपभोगताना कॉन्डम कसा वापरायचा हे माहीत नसतं," असे ते म्हणतात.

लोक कॉन्डमचा वापर करायला का इच्छुक नसतात, यामागची कारणं अनेक आहेत. धार्मिक संदर्भ, लैंगिक शिक्षण नसणं आणि कॉन्डम घालण्याबद्दलची नावड, अशी ही कारण दिसतात. कॉन्डम तुटणं किंवा निसटणं, हा गोष्टी सर्वसाधारणतः दिसत नाहीत. पण अशा गोष्टी 1 ते 5 टक्के प्रकरणांमध्ये घडतात आणि त्याचा संबंधित व्यक्तीच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो व कॉन्डम वापरायचा की नाही याबद्दलही लोक साशंक होतात.

त्यामुळे साधे कॉन्डम अभिनव सामग्रीसह व तंत्रज्ञानासह तयार करून अधिकाधिक वापरांना ते वापरणं शक्य व्हावं, याकरिता संशोधक कार्यरत आहेत.

एका प्रकारच्या सक्षम कॉन्डमसाठी ग्राफीनचा वापर केला जातो. कार्बनच्या अणूचा हा अत्यंत पातळ थर असतो. युनायटेड किंगडममधील मँचेस्टर विद्यापीठात 2004 साली नोबेल पुरस्कारविजेत्या वैज्ञानिकांनी हा थर पहिल्यांदा शोधला.

मँचेस्टर विद्यापीठातील राष्ट्रीय ग्राफीन संस्थेतील पदार्थ वैज्ञानिक अरविंद विजयराघवन यांच्या मते, कंडोमची वैशिष्ट्यं सुधारण्यासाठी "जगातील सर्वांत पातळ, सर्वांत हलकी, सर्वांत सक्षम व उष्णता वाहून नेण्यात सर्वोत्तम असणारी सामग्री" आदर्श ठरू शकते.

विजयराघवन यांच्या टीमला बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने 2013 साली निधी पुरवला. कॉन्डमची अभिनव डिझाइन विकसित करण्याच्या अभियानाचा भाग म्हणून हा निधी देण्यात आला होता. पण ग्राफीनचा स्वतंत्रपणे वस्तूनिर्मितीसाठी उपयोग करता येत नाही, त्यामुळे विजयराघवन व त्यांचे सहकारी लॅटेक्स व पॉलियुरेथेन यांच्याशी ग्राफीनचा संयोग साधायचा प्रयत्न करत आहेत.

कंडोम

फोटो स्रोत, Alamy

"ग्राफीन हा नॅनो स्तरावरील पदार्थ आहे, त्याची जाडी केवळ एका अणूएवढी असते आणि तो थोडेसेच मायक्रोमीटर रुंद असतो," असं ते सांगतात. "पण इतक्या सूक्ष्म स्तरावरचा हा पदार्थ जगातील सर्वांत मजबूत आहे.

हा मजबूतपणा नॅनो स्तरावरून मॅक्रो स्तरावर आणणं हे आव्हान आहे, त्यासाठी आम्ही वास्तव जगातील वस्तू वापरतो आहोत. यासाठी आम्ही मजबूत ग्राफीनचे कण रबराचे लॅटेक्स किंवा पॉलियुरेथेन यांसारख्या कमकुवत पॉलिमरमध्ये मिसळतो. त्यानंतर ग्राफीन त्याच्यातील मजबूतपणा दुबळ्या पॉलिमरमध्ये टाकतो आणि नॅनो स्तरावर त्या पदार्थाला मजबूत करतो."

या संयोगामुळे पॉलिमर पट्ट्याची मजबुती 60 टक्क्यांनी वाढू शकते किंवा कॉन्डम त्यांचा सध्याचा मजबूतपणा अबाधित राखत 20 टक्क्यांनी पातळ होऊ शकतात, असं विजयराघवन सांगतात. ग्राफीन कॉन्डम अजून उपलब्ध झाले नसले, तरी आपण तयार केलेला हा अभिनव, अधिक मजबूत रबर व्यापारी स्वरूपात आणण्यासाठी त्यांची टीम सध्या काम करते आहे.

कॉन्डममध्ये वापरली जाणारी सामग्री अधिक पातळी व मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड विद्यापीठामधला एक गटही कार्यरत आहे. इथे ऑस्ट्रेलियातील देशी स्पिनिफेक्स या गवतातून मिळणारं फायबर आणि लॅटेक्स यांच्यात संयोग साधून कॉन्डम विकसित करायचा संशोधकांचा प्रयत्न आहे.

ऑस्ट्रेलियातील आदिवासी समुदाय पूर्वीपासून स्पिनिफेक्सच्या राळीचा वापर चिकटवण्यासाठी करत आले आहेत. दगडी अवजारे व शस्त्रे तयार करतानाही त्याचा वापर होत आला आहे.

या गवताच्या गरामधून नॅनो सेल्युलोज काढले जातात आणि त्याच्याशी लॅटेक्सचा संयोग करणं शक्य असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आहे.

यामुळे लॅटेक्सच्या पट्ट्या 17 टक्के अधिक मजबूत व अधिक पातळ करणं शक्य झालं. यातून निर्माण झालेला कॉन्डम फुटण्याच्या चाचणीत 20 टक्के अधिक ताण पेलू शकला आणि व्यावसायिक लॅटेक्स कॉन्डमपेक्षा 40 टक्के अधिक फुगवता आला, असं संबंधित संशोधकांचं म्हणणं आहे.

कंडोम

फोटो स्रोत, Yasuyoshi Chiba/Getty Images

या प्रकल्पाची धुरा सांभाळणाऱ्यांपैकी एक, क्विन्सलँड विद्यापीठातील पदार्थ अभियंते नसिम अमिरालियन म्हणतात की, या पद्धतीचा वापर अधिक लाभदायक करण्यासाठी सध्या त्यांची टीम कॉन्डम उत्पादकांसोबत काम करते आहे.

अधिक मजबूत असलेले आणि बहुधा सध्याच्या कॉन्डमपेक्षा 30 टक्क्यांनी पातळ असणारे, त्यामुळे घातल्यावर पटकन निदर्शनास न येणारे कॉन्डम आपल्याला बनवता येतील, अशी या संशोधकांना आशा आहे.

या पदार्थाचे इतर उपयोगही होऊ शकतात. शल्यविशारदांना अधिक मजबूत, पण अधिक संवेदनाक्षम हातमोजे पुरवण्यासाठीही हा पदार्थ वापरता येणं शक्य आहे.

सध्या कॉन्डममध्ये लॅटेक्स हा पदार्थ अधिक सार्वत्रिक वापरला जात असला, तरी अनेक लोकांना त्याचा वापर अस्वस्थ करतो, त्यामुळे अनेकदा त्यांना इतर तेलकट पदार्थाची गरज भासते. शिवाय, लॅटेक्स तुलनेने महाग आहे, हा कॉन्डमच्या वापरातील वाढीव अडथळा ठरू शकतो.

जगातील सुमारे 4.3 टक्के लोकसंख्येला लॅटेक्सची ॲलर्जी येते, त्यामुळे लाखो लोकांना या प्रकारातील कॉन्डम वापरणं शक्य होत नाही. पॉलियुरेथेन किंवा नैसर्गिक पटलाचे कॉन्डमही पर्याय म्हणून उपलब्ध असले, तरी त्यांचे काही तोटेही आहे. लॅटेक्सच्या कॉन्डमपेक्षा पॉलियुरेथेन कॉन्डम अधिक सहज तुटतात, तर नैसर्गिक पटलाच्या कॉन्डममध्ये लहान भोकं असतात, त्यामुळे हेपटायटिस बी व एचआयव्ही यांसारख्या लैंगिक स्तरावर पसरणाऱ्या आजारांचे पॅथोजन या कंडोममधून थोपवले जात नाहीत.

परंतु, ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या एका संशोधक-गटाला लॅटेक्सऐवजी 'चिवट हायड्रोजेल' हा पदार्थ वापरायचा आहे. पाण्याने फुगणारे पॉलिमरचं जाळं असणारे बहुतांश हायड्रोजेल मऊ व ओलसर असतात, पण ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न तंत्रज्ञान विद्यापीठ व वॉलनगाँग विद्यापीठ इथे काम करणारे संशोधक रबरासारख्या मजबूत व ताणल्या जाणाऱ्या हायड्रोजेलवर काम करत आहेत.

या संशोधकांच्या चमूने यूडेमॉन नावाची कंपनी स्थापन केली असून 'जेलडोम'संबंधी आरंभिक संशोधन पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या कॉन्डममध्ये लॅटेक्सचा वापर नसल्यामुळे, त्यात पारंपरिक कॉन्डमबाबत येतो तसा ॲलर्जीचा प्रश्न नाही. शिवाय, हायड्रोजेल अधिक मानवी त्वचेसारख्या पदार्थाचे रूप घेऊ शकतात, त्यामुळे त्यात अधिक नैसर्गिकपणा आहे.

कंडोम

फोटो स्रोत, Behrouz Mehri/AFP/Getty Images

हायड्रोजेलमध्ये पाणी असतं, त्यामुळे त्यात आपोआप बुळबुळीतपणाही येतो, किंवा लैंगिक संक्रमणशील आजारविरोधी औषधाद्वारे तो निर्माण करता येतो. कॉन्डम वापरताना हा द्रव सोडला जाऊ शकतो.

वाढीव वंगणाचा वापर न करता कॉन्डमचा वापर करता येईल, अशी तजवीज करणं हे वैज्ञानिकांसमोरील आणखी एक आव्हान आहे. अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठामधल्या एका संशोधक-गटाने कॉन्डमवर लावण्यासाठीचा एक थर तयार केला आहे, हा थर कॉन्डमवर लावल्याने त्यात आपोआप तेलकटपणा येतो.

या संशोधकांनी अभिनव प्रयोगांसाठी हायड्रोग्लाइड कोटिंग्स ही कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक स्टॅसी चिन म्हणतात की, सर्वसाधारण कॉन्डम केवळ सुमारे 600 जोर पेलवू शकतो, तर स्वयंवंगणशील कॉन्डम किमान 1,000 जोर पेलू शकतो.

लॅटेक्स कॉन्डमवर वापरली जाणारी बहुतांश वंगणं चिकट असतात, त्यावर पाणी राहत नाही आणि वापरावेळी ती खराब होऊन जातात. परंतु, बॉस्टन विद्यापीठातील संशोधकांना लॅटेक्सच्या पृष्ठभागावर पाण्याशी स्नेहशील राहणाऱ्या पॉलिमरचा पातळ थर लावणं शक्य झालं आहे. त्यामुळे हे पॉलिमर पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्याचा स्पर्श बुळबुळीत होतो. म्हणजे शरीरातील द्रावांमधील ओलावा वापरून हे कॉन्डम बुळबुळीत राहू शकतात आणि वापरावेळी घर्षणही कमी करू शकतात.

"कॉन्डमच्या वापरात वंगणामुळे अडचण निर्माण होते, कारण वंगण पाण्याच्याबाबतीत स्नेहशील नसतं. आम्ही तयार केलेला थर संभोगावेळी लॅटेक्स कॉन्डमवर टिकून राहील, त्यामुळे सततचा तेलकटपणा मिळत राहील. कॉन्डम वापरण्यातली एक सर्वांत मोठी समस्या यातून सुटेल," असं चिन सांगतात.

या संदर्भात करण्यात आलेल्या 33 व्यक्तींच्या छोटेखानी सर्वेक्षणात सदर थरामुळे वंगणहीन लॅटेक्सच्या तुलनेत 53 टक्के घर्षण कमी झालं. व्यावसायिक स्तरावर उपलब्ध असलेल्या वंगणांच्या बाबतीतही या थराने अशीच कामगिरी केली. डोळे बंद करून काही व्यक्तींना हा थर हाताळायला सांगितला असता 70 टक्के व्यक्तींनी नेहमीच्या कॉन्डमपेक्षा नवीन थर असलेला कॉन्डम पसंत केला.

सध्या या उत्पादनाला व्यापारासाठी तयार केले जाते आहे, त्यामुळे अधिक तपशील उघड करता येणार नाहीत, असं चिन म्हणाल्या. तर, हे नवीन स्वतःहून वंगणक्रिया करू शकणारे कंडोम कधी उपलब्ध होतील, हे आत्ताच सांगता येणार नाही.

कॉन्डम योग्यरितीने बसणं, हीसुद्धा एक महत्त्वाची बाब असते. अमेरिकेती एका कॉन्डम उत्पादक कंपनीने 60 आकारांमधील कॉन्डम विक्रीला ठेवलेले आहेत. इंडियाना विद्यापीठाने 2014 साली केलेल्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेतील 1,661 लैंगिकदृष्ट्या सक्रिय पुरुषांच्या लिंगांची ताठरलेल्या स्थितीतील लांबी 4 सेंटिमीटर ते 26 सेंटिमीटरपर्यंत असल्याचं आढळलं, तर त्यांचा घेर 3 सेंटिमीटर ते 19 सेंटिमीटर या रेंजमध्ये होता. पुरुषांच्या कंडोमची सरासरी लांबी 18 सेंटिमीटर असते.

या पार्श्वभूमीवर ग्लोबल प्रोटेक्शन कॉर्पोरेशन 10 भिन्न लांबीचे व नऊ भिन्न घेर असलेले कॉन्डम विकते. साउदम्प्टन विद्यापीठातील लैंगिक व प्रजननविषयक आरोग्य या विषयाच्या प्राध्यापक आणि इंडियाना विद्यापीठातील किन्से इन्सिट्यूटमध्ये कंडोमविषयक संशोधन करणाऱ्या चमूतील संशोधक सिन्थिआ ग्राहम यांनीही कॉन्डम अधिक सहजतेने वापरण्यासाठी कोणते मार्ग असतील याबद्दल मूल्यमापन केले आहे.

स्पर्श न करता कॉन्डम घालता यावा यासाठी आतच एक ॲप्लिकेटर बसवलेला नवीन प्रकारचा कॉन्डम त्यांनी तयार केला असून त्याची सध्या चाचणी सुरू आहे.

हा कॉन्डम ज्या आवरणात ठेवलेला असतो, त्याला ओढण्यासाठी एक कळ असते, तिथूनच ते आवरण फाडता येतं. नेहमीच्या गुंडाळलेल्या कॉन्डम आवरणापेक्षा इथे कॉन्डमची हानी टाळावी असा प्रयत्न आहे. इथे कॉन्डम पूर्णतः मोकळा झाल्यानतर दोन पट्ट्या लावलेल्या असतात त्या बाजूला होतात आणि कॉन्डम वापरासाठी योग्यरित्या लिंगावर बसेल अशी खातरजमा करतात. पण निधीअभावी या उत्पादनाची वैद्यकीय चाचणी अजून झालेली नाही.

कॉन्डम वापराच्या मार्गात इतरही काही मूलभूत अडचणी आहेत. "कॉन्डम न वापरणं सर्रास आढळतं. लोक कॉन्डम वापरतात तेही गर्भधारणा टाळण्यासाठी लैंगिक संक्रमणशील आजार थोपवण्यासाठी नव्हे. यातील बहुतांश आजारांवर उपचार आहेत, असं अनेक तरुण लोकांना वाटतं, त्यामुळे त्यांना याची फिकीर नसते," असं ग्रॅहम सांगतात.

अधिक मजबूत, अधिक पातळ व अधिक सुखकारक कॉन्डम असले तरी या सगळ्याला अधिक जागरूकतेची जोडही गरजेची आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)