कोरोना : गोव्यात अचानक कोव्हिड संसर्गाचा उद्रेक का झाला?

गोव्यातली कोव्हिड परिस्थिती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयुरेश कोण्णूर, बीबीसी मराठी
    • Role, मनस्विनी प्रभुणे-नायक, बीबीसी मराठीसाठी

महाराष्ट्राचा शेजारी असणाऱ्या गोव्यामध्ये कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या भयावह कथा प्रत्येक दिवशी येत आहेत. ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी झाल्याने गोव्यातल्या सगळ्यांत मोठ्या कोव्हिड रुग्णालयात, गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी 26 रुग्णांचा तर बुधवारी पहाटेही 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गोव्याने बुधवारी एका दिवसात 75 कोविड मृत्यूंची नोंद केली जी आजपर्यंत एका दिवसातली सर्वाधिक नोंद आहे. ऑक्सिजन आणि कोव्हिड रुग्ण व्यवस्थापनावरून गोव्यातला असंतोष वाढतो आहे.

ऑक्सिजन पुरवठा ही गोव्याची सर्वांत मोठा चिंता बनलेली असून आता मुंबई उच्च न्यायालयानेही त्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे.

तर गोवा मेडिकल कॉलेजमधल्या ऑक्सिजन पुरवठाविषयक अडचणींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करत असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आता अनेक याचिका आल्या आहेत. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने असंही म्हटलं की, "आमच्यासमोर जी कागदपत्रं ठेवण्यात आली आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे की रुग्ण अक्षरश: तडफडताहेत आणि काही वेळेस ऑक्सिजनच्या अभावामुळे त्यांना प्राणही गमवावे लागले आहेत."

दुसरीकडे या कोलमडलेल्या स्थितीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या परस्परविरोधी दाव्यांचा वाद गोव्याला पाहावा लागतो आहे.

ऑक्सिजनची कमतरता आणि व्यवस्थेवरचा ताण

गोव्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये झालेल्या मृत्यूंचं कारण ऑक्सिजनची कमतरता आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या तुलनेत संसर्गाचे आकडे कमी राहिल्यानं गोव्यातली परिस्थिती नियंत्रणात आहे असं सांगितलं गेलं.

पण गेल्या आठवड्यापासून गोव्यातले आकडे वाढायला लागले. निर्बंधांची घोषणाही केली गेली. बघता बघता हॉस्पिटल्समधली गर्दी वाढत गेली आणि बेड्सची कमतरता भासू लागली.

ऑक्सिजनसाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यांवर अवलंबून असलेल्या गोव्यात त्याचीही कमतरता भासू लागली. गोव्याला सध्या 26 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. त्यातला जवळपास 40 टक्के साठा हा कोल्हापूरहून जातो. पण आता हा साठा दुप्पट करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

पण गोव्यातल्या हॉस्पिटल्समधून अनेक भयावह कहाण्या आणि दृष्यं समोर येत आहेत. वाढलेली रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणा यांच्या व्यस्त प्रमाणामुळे व्यवस्थेवर ताण आल्याचे अनुभव तिथून पुढे येताहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजला 11 मे रोजी भेट दिली होती.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजला 11 मे रोजी भेट दिली होती.

ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याने जे राज्यातलं सर्वात मोठं हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं त्या गोवा मेडिकल कॉलेज - 'जीएमसी' हॉस्पिटलमध्ये त्यांना आलेला अनुभव शिरसई गावचे रहिवासी असणाऱ्या हेमंत कांबळी यांनी 'बीबीसी मराठी'ला सांगितला.

त्यांच्या बहिणीचे पती पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांच्या उपचारासाठी ते या हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळेस जे त्यांना दिसलं त्याचं रेकॉर्डिंगही त्यांनी केलं. त्यांच्या नातेवाईंकांचा मृत्यू झाला, पण इतरांचीही पाहिलेली परिस्थिती ते विसरु शकत नाहीत.

"तिथे गेल्यावर जे भयाण दृश्यं मला दिसलं, ते बघून माझ्या पायाखालची जमीन हादरली. प्रत्येक पेशंटबरोबर त्याचा जवळचा नातेवाईक त्याला संभाळत होता. गोमेकोकडे पेशंटना बघण्याची, त्यांची काळजी घेण्याची सोय नाहीये. इथे एवढ्या प्रमाणावर पेशंट अ‍ॅडमिट आहेत की त्याप्रमाणात नर्स उपलब्ध नाहीत. पेंशटना घेऊन जायला स्ट्रेचर नाहीये. स्ट्रेचरचे पाय मोडलेत. अशा परिस्थितीत पेशंटला एकटं कसं सोडायचं? त्याला काही झालं तर, या भीतीने त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांची सुश्रूषा करताना मला दिसले.

काय वाईट परिस्थिती आली आहे आमच्यावर. मुख्यमंत्र्यांनी या वॉर्डमध्ये पाय तरी टाकून दाखवावा. त्यांनी इथल्या रुग्णांची परिस्थिती तरी बघावी. इथलं भयाण दृश्य बघून माझ्या पोटात गोळा आला. आमचा माणूस गेला. त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. पण माझ्या गोव्यातल्या लोकांचे डोळे उघडावे. खरी परिस्थिती सर्वांना कळावी या उद्देशाने मुद्दाम मी रेकॉर्डिंग करून ठेवलं," कांबळी सांगतात.

'जीएमसी' हॉस्पिटलमध्ये 26 जणांचा मृत्यू होण्याच्या काही दिवस अगोदर ऑक्सिजनच्या कमतरतेकडे निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं लक्ष वेधलं होतं. पण तरीही पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. या हॉस्पिटलमध्ये सर्जरी डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या कोव्हिड ड्यूटी करणाऱ्या डॉ. प्रतिक सावंत यांच्याशी आम्ही बोललो. ते गोव्याच्या निवासी डॉक्टर्सच्या संघटनेचे अध्यक्षही आहेत.

"परिस्थिती भयानक आहे आणि डॉक्टर्स दमलेले आहेत," डॉ प्रतिक सावंत सांगतात.

"इथला पॉझिटिव्हिटी रेट 45 ते 50 टक्के आहे आणि ते चिंताजनक आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये 700 बेड्स आहेत आणि शिवाय सुपरस्पेशालिटी विभागात गंभीर रुग्ण आहेत. पण तेही कमी पडतंय. मंगळवार आणि बुधवारच्या घटना होण्याअगोदर एक आठवडा आम्ही आमच्या अधिष्ठात्यांना पत्र लिहून ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल सांगितलं होतं. आता उच्च न्यायालयानं हस्तक्षेप केला आहे, पण तरीही हवा इतका पुरवठा होत नाही. हे सगळे मृत्यू पहाटे 2 ते 6 दरम्यान झाले आहेत. त्याची कारणंही आम्ही शोधतो आहोत," डॉ सावंत म्हणाले.

वाढणारे आकडे आणि मुख्यमंत्री- आरोग्यमंत्र्यांचं भांडण

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सावधान राहिलेल्या आणि दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यातही कमी आकडे असणाऱ्या गोव्यासारख्या छोटेखानी राज्यात आता एवढी भीषण परिस्थिती का व्हावी?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजला 11 मे रोजी भेट दिली होती.

फोटो स्रोत, ANI

या कोव्हिड परिस्थितीत काम करणाऱ्या डॉक्टर्सशी आम्ही बोललो तेव्हा समजलं की गोव्याच्या कोरोना प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. डॉ ऑस्कर रिबेलो हे अनेक हॉस्पिटल्सशी संबंधित आहेत. त्यांनाही गोव्यावर अचानक आलेली ही परिस्थिती अनाकलनीय वाटते.

"हे कल्पनेच्या पलिकडचं आहे. नेमकं कारण समजत नाही. मुंबईतल्या धारावीपेक्षाही कमी संख्या असलेल्या या भागामध्ये एवढे आकडे का वाढावेत? त्याच्यामागचं वैज्ञानिक कारणही नेमकं कळत नाही आहे. इथं लोकसंख्येची घनताही जास्त नाही. तरीही घरांमागून घरं, गावांमागून गावं बाधित होत आहेत.

नव्या म्युटंटचा एक परिणाम तर आहेच. तो इथं वेगानं पसरला. पण त्या केवळ एका कारणानं वास्तवात असलेली भीषणता मला तरी उलगडून सांगता येत नाही," डॉ रिबेलो म्हणतात.

पण गोव्यानं या लाटेची तयारी मात्र करून ठेवली नव्हती असंही ते म्हणतात. "पहिल्या लाटेनंतर आम्ही सैल पडलो. पर्यटकांना गोवा खुलं झालं. अनेक सुपरस्प्रेडर इव्हेंट्स झाले. सरकारही हललं नाही. आता ऑक्सिजनची कमी भासते आहे. पण 'जीएमसी'सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्येही सप्लाय चेन दुरुस्त केली गेली नाही.

दिवसा सगळं सुरळीत असतं, पण रात्री ऑक्सिजन कमी पडू लागतो आणि रुग्णांचा जीव जातो, कारण उशीरा ऑक्सिजन येतो. गोव्याची एकत्र गरज कमी असली तरीही आजच्या स्थितीत ती अशक्य वाटू लागते," डॉ रिबेलो सांगतात.

पण त्याहीपेक्षा गोव्यातला या घडीच्या असंतोषाला एक परिमाण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यातल्या राजकीय वादाचंही आहे. एकाच सरकारमध्ये असून राजकीय वर्चस्वासाठीचं शीतयुद्ध जुनं आहे, पण आता बिकट कोरोनाकाळात ते सर्वांसमोर आलं.

जेव्हा 'जीएमसी'मध्ये 26 रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला तेव्हा दोघांमधले वाद गोव्यानं पाहिले. मुख्यमंत्री सावंतांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे ऑक्सिजन ची उपलब्धता आहे, पण त्याचं वितरण व्यवस्थित होत नाही आहे.

त्यांच्या या विधानाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्री बरोबर बोलत नाही आहेत, असं ते म्हणाले. राणे यांनी तर या मृत्यूंच्या न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली.

एका बाजूला गोव्यात मृत्यू वाढत होते आणि दुसऱ्या बाजूला हा वाद सुरु होता. तो एवढा टोकाला गेला की, अमित शहांनी बुधवारी दोघांशी बोलून सद्यपरिस्थितीत समेट घडवून आणल्याचं म्हटलं जातंय. तशा आशयाच्या बातम्या गोव्यातल्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिल्या.

"पहिल्या लाटेवेळेस या दोघांनीही चांगलं काम केलं. पण आता मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये जे भांडण चालू आहे ते अयोग्य आहे. त्याची काही गरज नाही. ते गोव्याला नको आहे. सध्याच्या काळात लोकांना हॉस्पिटलची गरज आहे, ऑक्सिजनची आहे, राजकारणाची नाही," डॉ रिबेलो म्हणतात.

गोव्याचं काय चुकलं?

देशभर कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्यावर्षी याच काळात गोव्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. पण कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी करावं लागणारं नियोजन मात्र कमी पडलं, असं इथल्या अनेकांचं मत आहे.

कोव्हिडची दुसरी लाट ही आणखी नुकसान पोहोचवणारी असणार, असं वारंवार सांगितलं जात असताना गोवा सरकारने या परिस्थितीशी लढण्यासाठी काहीच नियोजन केलं नव्हतं का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा मेडिकल कॉलेजला 11 मे रोजी भेट दिली होती.

फोटो स्रोत, ANI

सामूहिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांवर गोव्याने बंदी घातली नाही. गोव्यातील कोव्हिड परिस्थिती तशी आटोक्यात आली होती. पण शासनाने डिसेंबरपासूनच सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालायला हवी होती ती घातली नाही. 13 फेब्रुवारीला कार्निव्हलचं मोठे आयोजन करण्यात आलं.

कर्निव्हलला झालेली तोबा गर्दी आणि त्या गर्दीत तोंडावर मास्क न घालता फिरणाऱ्या लोकांना बघून पुढे उदभवणाऱ्या परिस्थितीचा तज्ज्ञांनी अंदाज बांधला होता. प्रसारमाध्यमांनी त्यावेळीही सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले होते.

गोव्याने धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घातली नाही. गुड फ्रायडेच्या निमित्ताने होणाऱ्या सामूहिक प्रार्थना, गावागावातल्या जत्रा-उत्सव यावर सरकारने नियंत्रण ठेवायला हवं होतं ते ठेवले नाही.

लोकांनी गेल्यावर्षी जत्रा-उत्सव साजरे केले नसल्यामुळे त्यांनी यावर्षी उत्साहाने जत्रांमध्ये सहभाग घेतला. लग्नकार्यात होणाऱ्या गर्दीवरही नियंत्रण नव्हतं. दिवाळीनंतर गोव्यात मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे साजरे झाले. यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध पाळण्यात आले नाही.

मुख्य म्हणजे गोवा पर्यटकांसाठी खुला झाला.

गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून पर्यटकांनी गोव्यात यायला सुरुवात केली होती. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक महिने घरात कोंडून घेतलेल्यांचा गोव्याकडे ओढा होता.

31 डिसेंबर आणि नववर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला अपयश आलं. पर्यटक गोव्यात आल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली जात नव्हती. बिना मास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर कोणतीही कारवाई केली जात नव्हती.

समुद्र किनारे, वेगवेगळी रेस्टॉरंट्स, गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर पर्यटक राजरोसपणे बिनामास्क फिरत होते. यावर वेळोवेळी लोकांनी आवाज उठवला होता. गेल्यावर्षीचा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी पर्यटकांना मोकळं सोडलं आहे, असंच चित्र दिसत होतं.

कॅसिनोंवर बंदी नव्हती. नोव्हेंबर -डिसेंबरपासून गोव्यात प्रचंड झुंबड उडाली. रात्रीच्या वेळी कॅसिनोमध्ये जाण्यासाठी रस्त्यावर भली मोठी रांग लागलेली असायची. जगातून करोना नाहीसा झाला की काय? असं वाटणारं चित्र गोव्यात रंगू लागलं होतं. पर्यटकांचा गोवाभर सर्वत्र वावर होता.

हे इतकं कमी नव्हतं म्हणून की काय, वेगवेगळ्या दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांचं, वेबसिरीजचं, रखडलेल्या चित्रपटांचं चित्रीकरण गोव्यातल्या वेगवेगळ्या भागात सुरू झालं.

समुद्र किनाऱ्यावरील जवळ जवळ सगळ्या रिसॉर्टमध्ये हिंदी - मराठी मालिकांचं जोरात चित्रीकरण सुरू होतं. बिना मास्क फिरणाऱ्या कलाकार- तंत्रज्ञांबद्दल आरडाओरडा सुरु झाला. यातील अनेकांनी सरकारकडून चित्रीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती. मुंबई-दिल्ली वरून आलेल्या कलाकारांच्या माध्यमातून त्या त्या भागात करोनाचा फैलाव झाल्याचा अंदाज आहे.

गोव्यात आजच्या घडीला कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1804 इतकी झाली आहे. त्यातले दीडशे मृत्यू हे केवळ गेल्या दोन दिवसांतले आहेत, यावरून गोव्यात परिस्थिती कशी अचानक बिकट झाली हे समजतं. लसीकरणाबाबत गोव्यासारख छोटं राज्य अद्याप बरंच मागे आहे. त्यामुळे पुढचा काही काळ गोव्याचा संघर्ष मोठा आहे हे स्पष्ट आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)