कोरोना व्हायरस : 'चीनचं उडतं रॉकेट आणि भारतातल्या जळत्या चिता' अशा आशयाच्या पोस्टवरून वाद

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने एका सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टची सर्वत्र चर्चा होतेय. या पोस्टमुळे झालेला वाद आणि नंतर झालेल्या टीकेमुळे ही पोस्ट आता डिलीट केली आहे.

सोशल मीडिया साईट वीबोवर टाकलेल्या या पोस्टमध्ये एक फोटो होता त्यात एकीकडे चीनचं उडतं रॉकेट तर दुसरीकडे भारतातल्या जळत्या चिता दाखवल्या होत्या.

या फोटोवर लिहिलं होतं - "चीनमध्ये लावली जाणारी आग विरुद्ध भारतात लावली जाणारी आग"

या पोस्टमध्ये चीनच्या नव्या अंतराळ मोहिमेचा फोटो टाकला होता. चीनने 29 एप्रिलला अंतराळात आपलं कायमचं स्पेस स्टेशन बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आणि एक महत्त्वाचं मॉड्यूल अंतराळात रवाना केलं.

ही पोस्ट शनिवारी, 1 मेला, दुपारी टाकली होती आणि आता डिलीट केली आहे. पण याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले जात आहेत.

असं म्हटलं जातंय की हा कोलाज केलेला फोटो चीनची एक सरकारी संस्था - कम्युनिस्ट पक्षाची राजकीय आणि कायदेशीर गोष्टींशी संलग्न आयोग सीपीएलए - च्या एका अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.

सीपीएलए चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा एक सामर्थ्यवान विभाग आहे जो पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी आणि कोर्टांच्या कामावर लक्ष ठेवतो.

चीनमधली लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साईट वीबोवर असलेल्या सीपीएलएच्या या अकाऊंटचे लाखो फॉलोअर आहेत.

आक्षेप आणि चीनची प्रतिक्रिया

या पोस्टनंतर अनेक युझर्सनी या फोटोवर आक्षेप घेतला आणि म्हटलं की हे 'चुकीचं आहे' आणि चीनने भारताला सहानुभूती दाखवायला हवी.

चीनी माध्यम समूह ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजिन यांनी लिहिलं की, "अशा प्रसंगी मानवतेचा ध्वज उंच धरायला हवा. भारताबद्दल आपण सहानुभूती दाखवायला हवी आणि चिनी समाजासाठी नैतिकतेचे उच्च मापदंड प्रस्थापित करायला हवेत."

या वादग्रस्त पोस्टच्या एक दिवस आधीच, 30 एप्रिलला, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पाठवला होता आणि भारतातल्या कोरोना संकटाबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती.

त्यांनी म्हटलं होतं की ते भारताची मदत करू इच्छितात आणि भारताला सहकार्य करू इच्छितात.

वैश्विक साथ आणि गेल्या वर्षी झालेला सीमावाद यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा हा संदेश दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेला पहिला संवाद होता.

यानंतर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही आपल्या समकक्ष असणाऱ्या एस जयशंकर यांना फोन केला आणि मदत करण्याची इच्छा दर्शवली.

चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या संदेशानंतर एकाच दिवसांनी अशी वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली गेल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय.

भारताच्या सरकारी प्रसारण सेवेवर प्रसारित केलेल्या एका बातमीत म्हटलंय की चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही.

असं म्हटलं की जेव्हा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतीत विचारलं तेव्हा त्यांनी फक्त इतकंच म्हटलं त्यांना वीबो अकाऊंटवर अशी कुठलीही पोस्ट दिसली नाही.

चीनच्या मंत्रालयाने हेही म्हटलं की त्यांना आशा आहे भारत या चर्चेकडे लक्ष देण्यापेक्षा चीन सरकार आणि चीनच्या मुख्य विचारधारेच्या मताकडे लक्ष देईल ज्यात म्हटलंय की या साथीला परतवून लावण्यासाठी चीन भारताची मदत करेल.

भारत सरकारने या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)