You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळात 'या' देशात राहणं सर्वाधिक सुरक्षित
- Author, टेसा वॉन्ग
- Role, बीबीसी न्यूज
भारतासह अनेक देशांमध्ये कोव्हिड संसर्ग वाढतोय. मात्र, आशियातलं एक छोटासा देश या जागतिक साथीच्या काळात सर्वात सुरक्षित मानला जातोय.
ब्लूमबर्गने सुरक्षित देशांची एक यादी तयार केली आहे. कोव्हिड काळातही जवळपास सामान्य आयुष्य जगता येऊ शकेल, अशा देशांची ही यादी आहे. या यादीत सिंगापूरने पहिलं स्थान पटकावलं आहे.
मात्र, यादीतला पहिला क्रमांक आणि वास्तविक परिस्थिती याचा आढावा घेणारा सिंगापूरमधल्या बीबीसी न्यूजच्या टेसा वॉन्ग यांचा हा रिपोर्ट...
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टमध्ये सिंगापूरने न्यूझीलंडला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. ही यादी कोव्हिडपासून ते प्रवास स्वातंत्र्य यासारखे अनेक निकष ठरवून तयार करण्यात आलेली आहे.
या रिपोर्टनुसार या यादीत सिंगापूरने पहिलं स्थान पटकावलं, याचं मुख्य कारण तिथली लसीकरण मोहीम आहे. न्यूझीलंडमध्ये लसीकरण मोहिमेचा वेग अत्यंत धीमा आहे.
तेव्हा जागतिक साथीच्या या काळात एका अशा देशात रहाण्याचा अनुभव कसा असेल जिथे सगळं जवळपास सामान्य आहे.
जवळपास सामान्य जनजीवन
सिंगापूरमध्ये एक चांगलं आयुष्य घालवता येतं, हे खरं आहे. अर्थात काही धोके आहेतच.
सिंगापूरमध्ये गेल्या काही दिवसात संसर्गाची काही प्रकरणं समोर आली. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवण्यात आलं. एखाद्या विशिष्ट भागात सगळीकडे संसर्ग पसरला आहे, अशी प्रकरणं जवळपास नाहीत.
सिंगापूरमध्ये प्रवासासाठीचे नियम कठोर आहेत. सीमेवरही कडक सुरक्षा व्यवस्था आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक सामानाची तपासणी होते. सिंगापूरमध्ये गेल्या वर्षी दोन महिन्यांसाठी लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन लावण्याची वेळ ओढावली नाही.
जनजीवन जवळजवळ सामान्य आहे. मी माझे कुटुंबीय, मित्रपरिवार यांना कधीही भेटू शकते. डिनरसाठी किंवा एखाद्या रेस्टोरंटमध्येही भेटू शकते. मात्र, एकावेळी आठपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. मास्क वापरणं बंधनकारक आहे. जेवताना किंवा व्यायाम करताना मास्क काढून ठेवता येतो.
आमच्यापैकी अनेकजण कामावरही परतलेत. मात्र, ऑफिसमध्ये सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं लागतं. सिनेमा बघायला किंवा शॉपिंगला जाण्याचीही मुभा आहे. मात्र, त्यासाठी मास्क आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप बंधनकारक आहे.
शाळाही सुरू झाल्या आहेत आणि विकेंडला मी माझ्या मुलांना बाहेर फिरायलाही घेऊन जाऊ शकते. मात्र, सगळीकडे संख्येवर मर्यादा असल्याने कुठे यायंच, हे ठरवणं एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही.
15% लोकसंख्येचं लसीकरण
सिंगापूरमध्ये जवळपास 15% जनतेला लसीचे पूर्ण डोस मिळालेत. कदाचित आमची लोकसंख्याच 60 लाख असल्यामुळे हे शक्य झालं असावं. मात्र, यात उत्तम प्रक्रिया, सरकार आणि लसीवर जनतेचा विश्वास या गोष्टींनीही महत्त्वाची भूमिका वठवली.
या सर्व कारणांमुळे आम्ही सुरक्षित आहोत आणि आपण सर्वोत्तम ठिकाणी रहातोय, असं इथल्या जनतेला वाटू लागलं आहे. मात्र, शेकडो प्रवासी कामगारांसाठी परिस्थिती अशी नाही.
त्यांना आजही त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा डोरमॅटरीमध्ये रहावं लागतं. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर ज्या जागा फारशा स्वच्छ नाही, अशा ठिकाणांसाठी हे निर्णय घेण्यात आले होते.
डोरमॅटरी सोडून जायचं असेल तर कामगारांना आपल्या कंपनीची परवानगी घ्यावी लागते. तसंच भेटीगाठीसाठी जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
देशातला इतर भाग सुरक्षित रहावा, यासाठी हे नियम करण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. सरकारच्या मते 'संसर्ग पसरण्याची मोठी जोखीम' आजही कायम आहे. मात्र, देशात एकीकडे समानतेच्या बाता होत असल्या तरी सिंगापूर आजही एक रुढीवादी देश आहे, हेच कटुसत्य यातून दिसतं.
स्थलांतरितांच्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या एका साामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, "हे लाजीरवाणं आणि भेदभाव करणारं आहे."
ते पुढे म्हणतात, "या यादीत न्यूझीलंडचं स्थानही वर आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या नागरिकांचे हक्क हिरावून घेतले नाही. केवळ काय मिळवलं हे महत्त्वाचं नाही तर ते कसं मिळवलं, हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे."
गरिबांसाठी ही साथ खूप वाईट ठरली. सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी लाखो डॉलर्स खर्च केले. यामुळे बेरोजगारीचा दर कमी आहे.
मात्र, आकडीवारी योग्य चित्र मांडत नाही. अनेकांचे पगार कमी झाले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यापैकी अनेकजण डिलिव्हरी बॉय किंवा ड्रायव्हर म्हणून काम करतात.
सामाजिक कार्यकर्ते पॅट्रिक व्ही यांच्या मते, "ही मोठी समस्या आहे. तुम्ही दिवसभरात किती कमवाल, याची कल्पना नसणं, खूप त्रासदायक असतं. तुमची जागा कुणीही घेऊन शकतं. त्यामुळे नोकरी जाण्याची भीतीही असतेच."
सोन्याचा पिंजरा
ज्यांना आपण स्वतंत्र आहोत, असं वाटतंय. ज्यांना ठरलेला पगार वेळच्यावेळी मिळतोय. त्यांच्यापुढेही अडचणी आहेतच. अशा देशात जिथे ठिकठिकाणी कॅमेरे लागलेले आहेत अशा ठिकाणी जी थोडीफार खाजगी स्पेस होती तीही या जागतिक साथीने नाहीशी केली आहे.
आम्ही जिथे कुठे जातो तिथे आम्हाला एक अॅप किंवा टोकनचा वापर करायचाच आहे, हे आम्ही गृहित धरलं आहे. याद्वारे आम्ही कुणाला भेटतो, ही माहिती सरकारकडे जमा होते. मात्र, या माहितीवरून तुमची ओळख उघड होत नाही, असा सरकारचा दावा आहे.
कोव्हिड-19 ने जणू गोपनीयतेची चर्चाच बंद केली आहे. या अवघड काळात हे गरजेचं असल्याचं अनेकांना वाटतं. मात्र, या डेटाचा चुकीचा वापर होऊ शकतो, असा धोक्याचा इशाराही अनेकांनी दिला आहे.
मात्र, सिंगापूरमध्ये प्रवास आणि क्वारंटाईनसंबंधी असलेल्या कठोर नियमांना जनता सोन्याचा पिंजरा म्हणते. याचा अर्थ तुम्ही परदेशात असणाऱ्या तुमच्या आप्त-स्वकियांना भेटू शकत नाही.
इथले लोक विकेंडला किंवा फिरण्यासाठी इंडोनेशियाच्या बेटांवर किंवा मलेशियाच्या सीमेवर वसलेल्या शहरांमध्ये जायचे.
मात्र, आता ते शक्य नाही. आज हजारो लोक जहाजावर चढतात. पण, ते जहाज कुठेही जाणार नसतं. मलेशियाच्या हायवेवर दिसणारे बाईक किंवा कारने फिरणारे आता या बेटाभोवतीच फिरताना दिसतात.
देश उघडावा लागेल
हाँगकाँगसोबत सिंगापूरमध्ये ट्रॅव्हल बबल उघडणार असल्याच्या बातमीने अनेकांना आनंद झाला. गेल्या वर्षीही असा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला.
सुधीर थॉमस वडाकेथ सिंगापूरमध्ये रहातात. त्यांचं कुटुंब भारतात आहे. त्यांना मायदेशी जाता येत नाही. यामुळे त्यांना एकप्रकारचं नैराश्य आलंय.
सुधीर म्हणतात, "अनेक देशात परिस्थिती वाईट आहे आणि आपण इथे ट्रॅव्हल बबलविषयी बोलतोय. आपण देश बंद करून आनंदात आयुष्य घालवतोय आणि इतर देशांमध्ये परिस्थिती अधिकाधिक खराब होत चालली आहे, हे मला योग्य वाटत नाही."
ते पुढे म्हणतात, "जागतिकीकरणानंतर सिंगापूरने बरीच प्रगती केली. इतर राष्ट्रांशी आपले संबंध बघता मला असं वाटतं की त्यांच्याप्रती आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे."
या परिस्थितीतही आपण अजून सुरक्षित असल्याने आपण सुदैवी आहोत, असं अनेकांना वाटतं. मात्र, फार दिवस नाही.
सिंगापूर सरकारने अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी देशातील व्यवहार सुरू करावे लागतील, यावर कायमच भर दिला आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियासोबत त्याची सुरुवातही झालीय. या दोन देशांमध्ये अनेक निर्बंधांसह प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे.
एक दिवस सिंगापूर जागतल्या इतर देशांसोबत पुन्हा एकदा चालू लागेल आणि तेव्हाच आमची कोव्हिडची खरी परीक्षाही सुरू होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)