कोरोना व्हायरस : संयुक्त राष्ट्रांकडून मदत स्वीकारण्यास भारताचा नकार

कोरोना व्हायरस साथीने भारतात धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) भारताच्या मदतीचा प्रस्ताव समोर ठेवला होता. पण भारताने संयुक्त राष्ट्रांकडून कोणतीही मदत स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती UN चे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी PTI वृत्तसंस्थेला दिली आहे.

कोरोना लस जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. अशा स्थितीत भारताने लसीकरणासाठी या देशांची मदत केली होती. त्यामुळे जगाने आता भारताची मदत करण्याची वेळ आली आहे, असं गुटेरस यांनी म्हटलं होतं. मात्र भारताने ही मदत नाकारल्याचं हक यांनी सांगितलं.

PTI शी बोलताना हक म्हणाले, "आम्ही कोव्हिड साथीशी संबंधित साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मदतीचा प्रस्ताव ठेवला होता. पण भारतात याची गरज नाही. इथं आधीपासून एक मजबूत यंत्रणा कार्यरत आहे, असं उत्तर आम्हाला मिळालं. पण आम्ही अजूनही मदत करण्यासाठी तयार आहोत. आमच्याकडून हा प्रस्ताव अजूनही खुला आहे."

संयुक्त राष्ट्रांकडून आवश्यक साहित्याचा पुरवठा भारताला करण्यात येणार आहे का, या प्रश्नाचं उत्तर देताना हक म्हणाले, "अजूनपर्यंत तसं काही ठरलेलं नाही. पण आमचे लोक त्या तयारीत आहेत. आम्ही भारतातील UN शी संबंधित लोकांच्या संपर्कात आहोत. गरज भासल्यास आम्ही मदत नक्की करू. भारतात कोरोना संकट खूप मोठं झालं आहे. आमची त्यावर नजर आहे."

अमेरिकन नागरिकांनी भारतातून तत्काळ परतावं, अमेरिकेचं आवाहन

भारतात असलेल्या अमेरिकन नागरिकांनी तात्काळ भारतातून मायदेशात परतावं, असं आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे.

अमेरिकेने यासंदर्भात ट्रॅव्हल 4 नामक एक सूचनापत्रक जारी केलं आहे. हेल्थ अलर्ट जाहीर करताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "भारतात कोरोनाबाधितांच्या तसंच मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे.

कोव्हिड 19 चाचणी करण्याची क्षमताही मर्यादित आहे. रुग्णालयात वैदयकीय गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे. नव्या रुग्णांसाठी बेडसुद्धा उपलब्ध नाहीत. भारतातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडली असून अमेरिकन नागरिकांनी तत्काळ भारतातून निघणारं विमान पकडून मायदेशी परतावं, अशी सूचना अमेरिकेने केली आहे.

देशात गुरुवारी (29 एप्रिल) 3 लाख 79 हजारपेक्षा जास्त रुग्ण, 3645 मृत्यू

भारतात गुरुवारी (29 एप्रिल) 3 लाख 79 हजार 257 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसंच गुरुवारी 3645 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान, बरे होणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 4 हजार 832 जणांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. तसंच आतापर्यंत 15 कोटी 20 हजार 648 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचं आरोग्य विभागाने कळवलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)