You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: हॉस्पिटलची भलीमोठी बिलं भरण्यासाठी आरोग्य विमा अपुरा ठरतोय का?
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या आक्रमणानंतर मागच्या वर्षभरात आपल्या सगळ्यांवर दुहेरी ताण पडला. एक म्हणजे कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे साथ पसरण्याची आणि आरोग्य संकट उभं राहण्याची भीती. दुसरीकडे साथ आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावावं लागलं त्यामुळे पडलेला आर्थिक ताण. ही परिस्थिती गरीब आणि मध्यमवर्गासाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार अशीच होती.
आधीच रोजगारावर परिणाम झालेला आणि त्यातच ज्यांच्यावर कोरोना संसर्ग झेलण्याची वेळ आली त्यांना रुग्णालयांनी लावलेल्या वारेमाप बिलांचा भुर्दंड पडला. केंद्र सरकारने लोकांकडे सध्या असलेल्या मेडिक्लेम किंवा आरोग्य विम्यामध्येच कोव्हिड उपचारांचा समावेश करणं विमा कंपन्यांसाठी सुरुवातीला अनिवार्य केलं. त्यानंतर काही कंपन्यांनी स्वत:हून 'कोव्हिड रक्षक' आणि 'कोव्हिड कवच' अशा विमा योजना बाजारात आणल्या.
पण, त्यानंतरही लोकांना रुग्णालयात झालेला सगळा खर्च मिळालेला नाही. तर काही जणांना कॅशलेस म्हणजे स्वत: एकही पैसा न भरता विमा कंपनीकडून रुग्णालयाला परस्पर बिल चुकतं होण्याचा फायदा मिळालेला नाही.
लोकांच्या तक्रारी आहेत त्या खरं तर प्रकरणानुसार बघायला हव्या. पण, सध्या आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं बघूया आणि सर्वसामान्यपणे कोव्हिड उपचारांसाठी आपण कुठलं विमा कवच घेतलं पाहिजे, विम्याबद्दल तक्रारी असतील तर त्याचं निराकरण कुठे होतं, हे बघूया…
हॉस्पिटल बिलांबद्दल लोकांच्या काय तक्रारी आहेत?
अंकित हा 27 वर्षांचा एका नावाजलेल्या कंपनीत काम करणारा तरुण आहे. दीड महिन्यांपूर्वी कोरोनाने त्यांना गाठलंच. आणि त्यांना रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला मिळाला. आपल्याकडे कंपनीने दिलेला आरोग्य विमा आहे असं म्हणत अंकित यांनी जवळचं मोठं खाजगी रुग्णालय निवडलं.
तीन दिवसांच्या उपचारांनंतर रुग्णालयाने त्यांना सांगितलं की हे तुमचं प्रोव्हिजनल बिल आहे आणि यातले अठरा हजार तुम्हाला आताच भरावे लागतील. तर पुढचे उपचार मिळतील.
पूर्ण रक्कम काय आताचे अठरा हजार रुपये भरणंच अंकित यांच्यासाठी कठीण होतं. तरुण वय आणि कौंटुबिक जबाबदाऱ्या यामुळे बचत फारशी नव्हती आणि पुढचा खर्च बघून त्यांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.
कोव्हिड असताना रुग्णालयातून पळाले म्हणून मुंबई महानगरपालिकेनं उलट त्यांच्यावर कारवाई केली.
दुसरं उदाहरण आहे प्रशांत या मध्यमवयीन इसमाचं. कोरोनाची पहिली लाट संपता संपता त्यांना संसर्ग झाला. कंपनीच्या आरोग्य विम्यात कुठल्या रुग्णालयात कॅशलेस सोय होईल, त्या रुग्णालयाचा साधारण खर्च किती असेल याचा अंदाज घेऊन त्यांनी रुग्णालयाची निवड केली.
पण, रुग्णालयातल्या चौदा दिवसांचं बिल होतं 4 लाखांच्या घरात आणि यातले 60% पैसेच विमा कंपनीने देऊ केले. ते देण्यासाठी दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लावला. मध्ये प्रशांत यांना स्वत:ला रुग्णालयात दीड लाख रुपये जमा करावे लागले.
या दोन्ही उदाहरणांमध्ये नावं बदलण्यात आली आहेत आणि ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. पण, आतापर्यंत अनेकांनी कोव्हिड उपचारांनंतर विम्याचे पैसे मिळवताना आलेल्या अडचणींबद्दल तक्रारी केल्या आहेत.
एकतर कोव्हिडचे उपचार खर्चिक आहेत, औषधं महाग आहेत. सॅनिटायझेशन, मास्क आणि पीपीई किट यांचा अतिरिक्त खर्च रुग्णालयांना करावा लागत आहे आणि ते पैसे शेवटी रुग्णाकडून वसूल केले जात आहेत. या खर्चाचे पैसे विमा कंपनीकडून मिळवताना लोकांच्या मात्र नाकी नऊ येत आहेत.
उपचारांचा खर्च भागवायला आरोग्य विमा पुरेसा आहे का?
पहिलं जे उदाहरण आहे त्यासाठी आर्थिक नियोजन सल्लागार देवदत्त धनोकर माहितीचा अभाव आणि आर्थिक निरक्षरता या गोष्टींना दोष देतात.
कुटुंब चालवताना आकस्मिक येणाऱ्या संकटांसाठी निधीची तरतूद करणं आणि कुटुंबाच्या सहा महिन्यांचा खर्चाची व्यवस्था लगेच पैसे उपलब्ध होतील, असा प्रकारे करणं ही आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे, असं धनोकर सांगतात. त्यामुळे अचानक येणाऱ्या खर्चासाठी कुटुंबाने तयार असलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे.
तर आरोग्य विमा घेताना तो माहितगार माणसाकडून घ्यावा असा त्यांचा सल्ला आहे.
"आरोग्य विमा घेताना तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि हा तज्ज्ञ स्थानिक असावा जे वेळेवर कुठल्या यंत्रणेकडे दाद मागायची हे सांगणारा असेल. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण आरोग्य विम्याच्या अटीच माहिती करून घेत नाही. त्यात हॉस्पिटल रुमसाठी 3000 रुपयांची मर्यादा असेल.
"आपण तेवढाच हप्ता भरत असू तरी माहितीच्या अभावी आपण विमा आहे म्हणून रुग्णालयात मोठी आणि आरामदायी रुम निवडतो. पण, विम्याचे पैसे मिळताना तुम्हाला फक्त 3000 रुपयेच मिळणार हे उघड आहे. तेव्हा तज्ज्ञ व्यक्तीकडून आपल्या विम्याची पूर्ण माहिती करून घ्यावीआणि अगदी रुग्णालयात भरती होतानाही एकदा तज्ज्ञांशी बोलावं," धनोकर यांनी मोलाचा सल्ला दिला.
आधीचा आरोग्य विमा पुरेसा?
आता कोव्हिड उपचारांवर होणारा खर्च बघता त्यासाठी तुमचा आधी असलेला आरोग्य विमा पुरेसा आहे का?
तर याचं उत्तर आरोग्य विमा तज्ज्ञ मिलिंद बने यांच्या मते नाही असं आहे. त्यांना वाटतं की, कोव्हिड उपचारांसाठी सुरक्षा देऊ करणारा विमा तुमच्याकडे असला पाहिजे.
"कोव्हिडसाठी रक्षक आणि कवच असा दोन प्रकारचे विमा अस्तित्वात आहेत. यातला कोव्हिड कवच विमा रुग्णालयात भरती व्हावं लागलं तर त्यापासून संरक्षण देतो. आणि कोव्हिड रक्षक विम्यात तुम्हाला 50,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंत संरक्षण मिळतं. त्यामुळे तुमच्याकडे आधीचा आरोग्य विमा असेल तर अशा लोकांनी रक्षक विमा घ्यावा," असा सल्ला बने यांनी दिला आहे.
म्हणजे आधीच्या विम्यात रुग्णालयाचा खर्च भागेल आणि रक्षक विम्यातून कोरोना उपचारांचा खर्च निघू शकेल.
आताचे आरोग्य विमा पुरेसे का नाहीयेत यावर बोलताना मिलिंद बने म्हणतात, "आरोग्य विमा घेताना तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी किती रक्कम मिळणार याची हमी दिलेली असते. म्हणजे आपल्यासाठी विम्याची रक्कम. पण, विमा नियामक प्राधिकरणाचा एक नियम असं सांगतो की, या एकूण रकमेतला ठरावीक हिस्साच हॉस्पिटल रुमचं भाडं किंवा डॉक्टरांचे चार्ज यासाठी दिला जावा. हे रेट कार्ड प्रत्येक विमा कंपनी स्वत: पुरतं ठरवते आणि त्यानुसार तुम्हाला हॉस्पिटल रुमचं भाडं किंवा डॉक्टरांची फी दिली जाते.
"जर पूर्ण खर्च हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शनल कव्हरचे अतिरिक्त पैसे भरावे लागतात. पण, हप्ता वाढेल म्हणून अनेकदा आपण हे पैसे भरायचं नाकारतो.''
कोरोना उपचारांच्या बाबतीतही रुग्णांचा हाच अनुभव आहे. पीपीई किट, रुम सॅनिटाईझ करणं या गोष्टींसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांनी लावलेले दर वेगवेगळे आहेत आणि तुमचा विमा मात्र या गोष्टींसाठी तुम्हाला ठरावीक रक्कमच देणार असतो. काही विमा योजनांमध्ये या खर्चाची तरतूदच नसते. म्हणूनच तुम्ही मागितलेले सगळे पैसे तुम्हाला विमा कंपनीकडून मिळत नाहीत.
कोरोना उपचार आणि त्याला विम्याचं संरक्षण याची सद्यस्थिती
कोरोना उपचार आणि त्यासाठी विमा संरक्षण हा सध्या वादाचा मुद्दा आहे. रुग्णालय आणि उपचारांचा पूर्ण खर्च न मिळणं आणि पैसे मिळायलाही दीड-दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणं या लोकांच्या मुख्य तक्रारी आहेत. अलीकडेच दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणाचा निवाडा करताना विमा कंपन्यांना कोरोनाविषयक विमा क्लेम लवकरात लवकर निकालात काढण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोना काळात आरोग्य विम्याविषयी तुम्हीही इतकी उलटसुलट प्रकरणं ऐकली असतील की, हा एकंदरीत क्लिष्ट प्रकार आहे असं तुमचं मत झालं असेल. पण, आपले दोन्ही तज्ज्ञ देवदत्त धनोकर, मिलिंद बने आणि विमा नियामक प्राधिकरणातील एक अधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर ताज्या परिस्थिती विषयी काही गोष्टी समोर आल्या त्या इथं नमूद करत आहे.
१. कोरोना वरील उपचारांसाठी रुग्णालयात भरती व्हावं लागलं तर त्यासाठी किती खर्च येईल याचा नेमका अंदाज रुग्णालयांकडून रुग्णांना मिळत नाही. प्रत्येक रुग्णालय त्यासाठी वेगवेगळा खर्च आकारतं आणि बिल अनेकदा लाखांच्या घरात असतं.
कोव्हिडच्या कोणत्या उपचारांसाठी किती बिल आकारण्यात यावं याचं सरकारी किंवा नियामक मंडळाचं दरपत्रक नाही. त्यामुळे बिलावर कुणाचं नियंत्रण नाही. अशावेळी विमा कंपनीकडून सगळे पैसे वळते करून घेणं कठीण जातं. भारतीय विमा नियामक मंडळाचंही या दरांवर नियंत्रण नाही.
२. कोरोना उपचारांचे पैसे कसे लागू करायचे याचीही काही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत. काही रुग्णालयं कॅशलेस सोय असताना उपचारांचे आगाऊ पैसे घेतात मगच उपचार सुरू करतात. दर तीन दिवसांनी रुग्णालयांची पैशासाठी भूणभूण सुरू होते. रुग्णाला हे टाळता येत नाही.
३. कोव्हिड उपचारांवरील विम्याचे क्लेम मान्य होत नाहीत अशी परिस्थिती नाही. मिलिंद बने यांच्या मते, व्यवस्थित असलेले 100% क्लेम मान्य होत आहेत. पण, त्यात काही खर्च धरले जात नाहीत. पीपीई किट, ग्लोव्ह्ज यांच्यावरील खर्चाला मर्यादा आहेत आणि काही रुग्णालय कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्याचा आणि हाऊस किपिंगचा वेगळा खर्च तुमच्याकडून वसूल करतात. तो खर्च रुग्णालयाने खोलीच्या भाड्यात धरला नसेल तर तो वेगळा मिळत नाही.
४. विमा कंपन्यांबद्दल तुमची काही तक्रार असेल तर ती सरकारी विमा कंपन्यांच्या बाबतीत तुम्ही तिथल्या तक्रार निवारण केंद्रात करू शकता. साधारण महिनाभरात त्यांचं उत्तर येतं आणि खाजगी विमा कंपन्यांच्या बाबतीत तुम्हाला नेमलेल्या लोकपालाकडे दाद मागावी लागते. यातून समाधान झालं नाही तर न्यायालयात जाण्याचा मार्ग आहे. पण, तिथं खूप वेळ लागतो.
थोडक्यात कोरोना काळ जसा कठीण आहे तसंच कोव्हिड विम्याच्या बाबतीतही काही अडचणी आहेत. पण, म्हणूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आरोग्य विमा घेण्याबरोबरच आपला क्लेम व्यवस्थित सादर करणंही महत्त्वाचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)