You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी वाढ कशी झाली?
कोरोना साथीच्या उद्रेकानंतर चीनच्या GDP मध्ये विक्रमी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
2021 च्या पहिल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था गेल्या वर्षीच्या तुलनेत 18.3 टक्क्यांनी वाढल्याचं नोंदवण्यात आलं आहे.
चीनने 1992 सालापासून प्रत्येक तिमाहीची नोंद ठेवणं सुरू केलं होतं. तेव्हापासून आजतागायत देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये (GDP) झालेली ही उच्चांकी वाढ आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या अंदाजानुसार चीनची अर्थव्यवस्था 19 टक्क्यांनी वाढेल, असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात ही वाढ अपेक्षेपेक्षा थोडी कमीच राहिली.
गेल्या वर्षी चीनवर मोठं आर्थिक संकट आलं होतं. त्याच्याशी तुलना करता हे आकडे जास्त असल्याचं दिसून येईल. पण ही वाढ अपेक्षेनुसार नसल्याचं म्हटलं जात आहे.
2020 च्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये राष्ट्रीय लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्या कालावधीत चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. त्यावेळी चीनचा GDP घसरून 6.8 टक्क्यांवर आला होता.
चीनची गेल्या वर्षातली परिस्थिती ही मुळातच अत्यंत बिकट होती. त्यामुळे आता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चीनचं पुनरागमन झाल्याचं वाटत आहे.
मार्च महिन्यापर्यंत गेल्या वर्षभरातील औद्योगिक उत्पादनात 14.1 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. तसंच किरकोळ विक्रीचं प्रमाणही 34.2 टक्क्यांनी वाढलं आहे.
चीनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात निर्यातीवर अवलंबून आहे. सध्या कारखान्यांनी परदेशातील उत्पादनांच्या ऑर्डरवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे, त्यामुळे वरील चित्र दिसून आल्याचं म्हटलं जातं.
तसंच देशांतर्गत व्यवसाय हळूहळू वाढत चालला आहे. यामुळे कोरोनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघत असल्याचं काही तज्ज्ञांना वाटतं.
xm.com या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे पीटर मॅकगायर यांनी चीनच्या आर्थिक स्थितीबाबत विस्ताराने माहिती दिली.
ते सांगतात, "कोरोना साथीच्या पूर्वीपासूनच चीन सरकार अर्थव्यवस्थेत वृद्धी आणण्याचा प्रयत्न करत होतं. त्यासाठी नागरिकांचा वैयक्तिक वापरावर होणारा खर्चाचा टक्का वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यामध्ये त्यांना काही प्रमाणातच यश आलं. कोरोना साथीनंतर तर सरकारसमोरील अडचणी आणखीनच वाढल्या."
2020 च्या अखेरच्या तिमाहीत चीनचा आर्थिक वृद्धीदर 6.5 टक्के होता. तोच वेग चीनने कायम राखल्याचंही या आकडेवारीतून दिसून येत आहे.
कोरोना साथीचा फटका बसल्यानंतर चीनच्या अर्थव्यवस्थेने हळूहळू वेग पकडला. विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी योग्य नियोजन करून तसंच उद्योगांना आणीबाणीची मदतही करण्यात आली होती.
2020 च्या पहिल्या तिमाहीतील वाईट कामगिरीनंतरही चीनची अर्थव्यवस्था वेगाने पुढे आली. 2020 मध्ये अर्थव्यवस्थेत वृद्धी नोंदवणारी चीन ही जगातली एकमेव अर्थव्यवस्था होती.
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनची 2020 मधील वृद्धी केवळ 2.3 टक्के इतकी होती. गेल्या कित्येक वर्षातील हा सर्वांत निचांकी आकडा आहे.
गेल्या वर्षी संकटाला तोंड दिल्यानंतर चीनने 2021 मध्ये आर्थिक वृद्धीदर 6 टक्के राखण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)