You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान : मौलानांच्या अटकेनंतर का धुमसत आहे पाकिस्तान?
- Author, शुमायला जाफरी
- Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
पाकिस्तानातले धार्मिक नेते साद हुसैन रिझवी आणि त्यांच्या अनेक सहकऱ्यांना अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानातल्या अनेक भागांत तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी साद रिझवींसोबत तहरीक - ए - लब्बैक पाकिस्तान या पक्षाच्या (TLP) अनेक नेत्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
तहरीक - ए - लब्बैक पाकिस्तानचे प्रमुख साद हुसैन रिझवी आणि इतर नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांवर लाहोर पोलिसांनी पाकिस्तान दंड संहितेच्या विविध कलमांखाली, दहशतवाद विरोधी कायदा आणि लोक व्यवस्था अध्यादेशानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
या सगळ्यांनी संपूर्ण पाकिस्तानातल्या लोकांना चिथावत हिंसा करण्यासाठी आणि चक्काजाम करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केल्याचं FIR मध्ये म्हटलंय. लाऊडस्पीकरवरून यासाठी आवाहन करणं, सोशल मीडियावरून पोस्ट करण्याचे आरोपही लावण्यात आले आहेत.
नेत्यांच्या अटकेचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जीव घेण्याच्या उद्देशाने दगडफेक केली आणि पोलिसांवर हल्ले केल्याचं FIR मध्ये म्हटलंय. आंदोलकांनी पोलिसांना मारहाण केली आणि यात एकाचा मृत्यू झाल्याचंही यात म्हटलंय.
पाकिस्तानातल्या पोलिसांनी सोमवारी (12 एप्रिल) साद रिझवींना अटक केल्यानंतर देशामध्ये निदर्शनांना सुरुवात झाली. याने अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं.
रिझवींच्या अटकेनंतर इस्लामाबाद आणि रावळपिंडीतल्या आंदोलनस्थळांवरचं इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. तर गुजरांवाला भागामध्ये निदर्शकांना काबूत आणण्यासाठी पोलिसांच्या कबड्डी टीमला बोलवण्यात आलं होतं.
लाहोरमध्ये या निदर्शनांचा सर्वात जास्त परिणाम झालाय.
अटक करण्यात आलेल्यांना सोडून देण्यात येणार नसल्याचं पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी म्हटलंय. पाकिस्तानात सोशल मीडियावर घायाळ झाल्याचे खात्री न झालेले व्हीडिओ शेअर करण्यात येताहेत. प्रशासनाने या अशांत भागांमधलं इंटरनेट बंद केलंय.
कोण आहेत साद रिझवी आणि का झाली अटक?
साद रिझवींचे वडील खादिम रिझवीं यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पक्षांच्या समितीने मग साद हुसैन रिझवींना तहरीक - ए - लब्बैक पाकिस्तान या पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडलं होतं.
साद रिझवींना का ताब्यात घेण्यात आलं, याचं कारण पोलिसांनी सांगितलं नव्हतं. पण 20 एप्रिलला होऊ घातलेल्या इस्लामाबाद मार्चला थांबवण्याच्या प्रयत्नात हे करण्यात आल्याचं तहरीक - ए - लब्बैक पाकिस्तान पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
साद रिझवी एका दफन विधीमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या अटकेची बातमी पसरताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये निदर्शनं करायला सुरुवात केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)