You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणच्या भूमिगत अणुकेंद्रावरील घातपातामागे कुणाचा हात?
इराणमधील नतांज आण्विक केंद्राचं 'दहशतवादी कारवायांमुळे' नुकसान झालं आहे. इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
या घटनेच्या एक दिवस आधीच इराणने युरेनियमचे अधिक वेगाने संवर्धन करणारे सेंट्रीफ्यूज सुरू केले होते.
आण्विक केंद्रातील घातपातासाठी कोण जबाबदार आहे, हे अधिकाऱ्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. पण त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला 'आण्विक दहशतवाद' या गोष्टीवर विचार करण्यासाठी आवाहन केले आहे. इराणमधील नतांज शहरात उभे राहिलेले हे आण्विक केंद्र भूमिगत आहे.
इस्रायलमधील मीडिया आण्विक केंद्राची झालेली हानी हा इस्त्रायली सायबर हल्ल्याचा परिणाम असल्याचे सांगत आहे.
गेल्यावर्षी अणुकेंद्राला लागलेली आग
गेल्यावर्षी इराणच्या याच भूमिगत अणुकेंद्राला आग लागली होती. इराणी अधिकाऱ्यांनी हा सायबर हल्ल्याचा परिणाम असल्याचे सांगितले होते.
2015 चा अणुकरार पुन्हा सुरू करण्यासाठी सध्या अमेरिकेतील बायडन प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत आणि अशा वेळी इराणच्या या केंद्राला लक्ष्य करण्यात आलं आहे.
शनिवारी (10 एप्रिल) इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी नतांज सेंटरमध्ये युरेनियमचे संवर्धन अधिक जलद गतीने करणाऱ्या सेंट्रीफ्यूजचे उद्घाटन केले.
इराणच्या आण्विक संवर्धनासाठी सेंट्रीफ्यूज महत्त्वाचे आहेत. याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात आला होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून इराणने 2015 च्या कराराची एक अट मोडत असल्याचे संकेत दिले. या अणुकरारानुसार इराण केवळ मर्यादित प्रमाणातच संवर्धन केलेल्या युरेनियमचे उत्पादन करू शकतो आणि मर्यादित प्रमाणात साठवू शकतो.
याशिवाय करारानुसार संवर्धन केलेल्या युरेनियमचा वापर केवळ व्यावसायिक अणुप्रकल्पांसाठीच केला गेला पाहिजे.
काय आहे इराणचं म्हणणं?
रविवारी (11 एप्रिल) अणूकेंद्राच्या वीज नेटवर्कमध्ये एक घटना घडल्याचे इराणच्या अटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशन ऑफ इराण (एईओआय) या अणुऊर्जा संघटनेचे प्रवक्ते बेहरुझ कमालवंदी यांनी सांगितलं.
बेहरुझ यांनी अधिक तपशील दिलेला नाही. पण या घटनेमुळे कोणतेही मोठे नुकसान किंवा काहीही लीक झालेले नाही अशी माहिती त्यांनी इराणी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
त्यानंतर अटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशन ऑफ इराण (एईओआय) याच संघटनेचे प्रमुख अली अकबर सलेही यांनी इराणच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर प्रतिक्रिया देत ही घटना म्हणजे 'हल्ला' आणि 'आण्विक दहशतवाद' असल्यचे म्हटले.
ते पुढे म्हणाले, "इराण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. या आण्विक दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला आवाहन करतो."
आम्हाला या घटनेची कल्पना असून सध्यातरी आम्ही यावर भाष्य करू इच्छित नाही असं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने स्पष्ट केलं.
यामागे इस्रायलचा हात?
इस्रायलमधील पब्लिक ब्रॉडकास्टर कॅनच्या मते इराणच्या अणुकेंद्रावर झालेला हल्ला हा इस्रायलच्या सायबर ऑपरेशनचा परिणाम असू शकतो.
कॅन टीव्हीच्या मते 2010 मध्ये अमेरिका आणि इस्रायलनं तयार केलेल्या स्टक्सनेट कॉम्प्युटर व्हायरसच्या मदतीने इराणमधील नतांज अणुकेंद्रातील सेंट्रीफ्युज नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
इस्रायलमधील एका वृत्तपत्रानेही इराणच्या अणुकेंद्रातील घातपात हा इस्रायलच्या सायबर हल्ल्याचा परिणाम असल्याची शक्यता वर्तवली आहे.
इस्रायलमधील संरक्षणविषयक तज्ज्ञ बेन-यिशाई यांनी वाय नेट या वेबसाइटशी बोलताना म्हटलं की, इराण अण्वस्त्र विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असू शकतो, असा तर्क करता येईल.
त्यांनी म्हटलं, "अणु केंद्राचं नुकसान हा कोणताही अपघात नसून विचारपूर्वक केलेला हल्ला आहे, जेणेकरून अमेरिकेसोबत अणुकराराबद्दलच्या प्रयत्नात खंड पडेल."
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जॉइंट कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन ऑफ अक्शन या नावानं ओळखल्या जाणारा इराणसोबतचा अणु करार स्थगित केला होता. तेव्हापासून हा करार पडूनच होता.
आता बायडन प्रशासनानं इराणसोबतच्या या करारावर पुन्हा विचार करत आहे. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या कराराविरुद्ध इशारा दिला होता. इस्रायल इराणसोबतच्या या करारात सहभागी होण्यासाठी बांधील नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)