You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मिसेस श्रीलंका सौंदर्य स्पर्धेत स्टेजवर झालेल्या धक्काबुक्कीत स्पर्धेची विजेती जखमी
श्रीलंकेतील एका मोठ्या सौंदर्य स्पर्धेत पुरस्कारावरून जोरदार भांडण झालं. स्टेजवर रंगलेल्या मानापमान नाट्याचं रूपांतर हाणामारीत झालं, ज्यात 'मिसेस श्रीलंका' जखमी झाली. स्टेजवर झालेल्या बाचाबाचीत 'पुष्पिका डी-सिल्वा' यांच्या डोक्याला जबर मार लागलाय.
रविवारी श्रीलंकेत पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुष्पिका डी-सिल्वा ने मिसेस श्रीलंकाचा पुरस्कार पटकावला. पण, त्यानंतर घडलेली घटना सर्वांसाठी आश्चर्यचा धक्का होता.
पुष्पिका डी-सिल्वा ला विजयी घोषित केल्यानंतर स्टेजवर मानापमान नाट्य सुरू झालं. 2019 मध्ये हा पुरस्कार जिंकणाऱ्या महिलेने पुष्पिका घटस्फोटित असल्याने, तिला पुरस्कार दिला जाऊ शकत नाही, असा पवित्रा घेत विजयी मुकुट हिसकावून घेतला.
सौंदर्य स्पर्धेच्या आयोजकांनी पुष्पिका घटस्फोटित नाही, याची खात्री केल्यानंतर तिला पुरस्कार पुन्हा देण्यात आला. कोलंबोमध्ये झालेल्या या स्पर्धेत पुष्पिकाला 2021 ची 'मिसेस श्रीलंका' म्हणून घोषित करण्यात आलं.
पण, 2019 मध्ये 'मिसेस श्रीलंका' चा खिताब जिंकणाऱ्या कॅरोलिन जुरीने, स्पर्धेच्या नियमांवर बोट ठेवत पुष्पिका डी-सिल्वाकडून पुरस्कार हिरावून घेतला. स्पर्धक विवाहित असला पाहिजे, घटस्फोटित नाही, असा स्पर्धेचा नियम आहे असा दावा कॅरोलिन यांनी केला.
कॅरोलिन जुरी यांनी प्रेक्षकांना सांगितलं, "या स्पर्धेच्या नियमांप्रमाणे, लग्न झालेल्या किंवा घटस्फोटीत महिला यात भाग घेऊ शकत नाहीत. त्यामुळे मी हा पुरस्कार दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला देत आहे."
कॅरोलिन यांनी दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाच्या डोक्यावर विजेतेपदाचा मुकुट ठेवल्यानंतर पुष्पिका डी-सिल्वा स्टेज सोडून निघून गेल्या.
स्पर्धेच्या आयोजकांनी पुष्पिका यांची घडलेल्या घटनेबाबत माफी मागितली आहे. पुष्पिका यांच्या सांगण्यानुसार त्या पतीपासून वेगळ्या झाल्या आहेत, पण घटस्फोटित नाहीत.
फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, "मी डोक्याला झालेल्या जखमांवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते."
पत्रकारांशी बोलताना पुष्पिका म्हणाल्या, "श्रीलंकेत माझ्यासारख्या अनेक महिला, ज्या सिंगल मदर आहेत. त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय. विजेतेपदाचा मुकुट मी त्या सर्व महिलांना अर्पण करते. ज्या आपल्या मुलांचं एकट्याने पालनपोषण करत आहेत."
सौंदर्य स्पर्धा 'मिसेस श्रीलंका' वर्ल्डचे संचालक चांदिमल जयसिंघे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "विजेतेपदाचा मुकुट पुष्पिका डी-सिल्वा यांना परत दिला जाईल."
"आम्ही निराश झालोय. कॅरोलिन यांचं स्टेजवरील वागणं अत्यंत चुकीचं होतं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे," असं ते पुढे म्हणाले.
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. कॅरोलिन जुरी यांच्यासोबत 'मिसेस श्रीलंका' वर्ल्डचे संचालक चांदिमल जयसिंघे यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)