'सैतानी बुटांच्या' खटल्याचा निकाल नायके कंपनीच्या बाजूने

बूट आणि खेळासाठीचं सामान तयार करणाऱ्या नायके या आंतरराष्ट्रीय कंपनीने MSCHF या ब्रुकलिनमधल्या आर्ट कलेक्टिव्हच्या विरोधातला 'सैतानी बुटांचा' खटला जिंकलाय. या बुटांच्या सोलमध्ये मानवी रक्त घालण्यात आलं होतं.

नायके कंपनीने तयार केलेल्या Max 97s या बुटांमध्ये सुधारणा करून MSCHF या कलाकारांच्या गटाने हे बूट तयार केले होते. यावर उलटा क्रॉस, पेंटाग्रामच्या खुणा होत्या आणि बुटांवर 'Luke 10:18' हे शब्द लिहिण्यात आले होते. या बुटांची किंमत 1,018 डॉलर्स (अंदाजे 75,000 रुपये) आहे. या बुटांना सैतानाचे बूट असं नाव देण्यात आलं.

MSCHF या कंपनीने लिल नॅस एक्स (Lil Nas X) या रॅपरसोबत हे बूट तयार केले होते.

अशा प्रकारच्या बुटांच्या 666 जोड्या तयार करण्यात आल्या आणि यातली फक्त 1 जोडी शिल्लक आहे.

पण हे आपल्या ट्रेडमार्कचं उल्लंघन असल्याचं म्हणत नायके कंपनीने न्यूयॉर्कमधल्या फेडरल कोर्टात धाव घेतली होती. आपल्या बुटांमध्ये सुधारणा करून तयार करण्यात आलेले हे बूट विकण्यापासून आणि नायके कंपनीचा लोगो - स्वूश वापरण्यापासून MSCHF ला थांबवावं अशी मागणी नायकेने केली होती.

"MSCHF आणि त्यांच्या बेकायदेशीर सैतानी बुटांमुळे गोंधळ निर्माण होण्याची, चुकीची माहिती पसरण्याची शक्यता आहे आणि MSCHFच्या उत्पादनांचा नायकेशी संबंध असल्याचं चुकीचं चित्र यातून उभं राहतंय," नायके कंपनीने ही याचिका दाखल करताना म्हटलं.

पण आपण तयार केलेल्या 666 बुटांच्या जोड्या या 'नेहमीचे बूट नसून कलेचे एकेक नमुने आहेत आणि ते कलेक्टर्सना प्रत्येकी 1,018 डॉलर्स'ना विकल्याचं MSCHFच्या वकिलांनी सांगितलं.

पण कोर्टाने नायकेच्या बाजूने निकाल देत गुरुवारी या बुटांची विक्री तात्पुरती थांबवली.

अशा प्रकारचे आणखी बूट बनवण्याचा आपला इरादा नसल्याचं MSCHFने आधीच स्पष्ट केलं होतं.

सोमवारी (29 मार्च) MSCHFने हे बूट बाजारात आणले. याच्या दोनच दिवस आधी रॅपर लिल नॅस एक्सचं नवं गाणं - माँटेरोही रिलीज झालं होतं.

आपण गे असल्याचं या रॅपरने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.

या गाण्याच्या व्हिडिओमध्ये हा गायक सैतानासोबत नाचत स्वर्गातून नरकात जाणाऱ्या एका पोलवरून घसरत खाली येतो आणि नंतर त्याची शिंग चोरतो.

हे चित्रण आणि बूट या दोन्हींचा संदर्भ बायबलच्या Luke 10:18 मधल्या ओळींशी आहे. यात म्हटलंय, "म्हणून मी त्याला सांगितलं, मी सैतानाला एखाद्या विजेप्रमाणे स्वर्गातून कोसळताना पाहिलं."

या प्रत्येक बुटात नायकेचा खास एअर-बबल कुशनिंग सोल आहे. यामध्ये 60 क्युबिक सेंटीमीटर लाल शाई आहे आणि मानवी रक्ताचा एक थेंब आहे. MSCHF आर्ट कलेक्टिव्हच्या सदस्यांनी हे रक्त दान केलंय.

पण आपल्या बुटांमध्ये असे बदल करण्यासाठी परवानगी दिली नसल्याचं नायके कंपनीने म्हटलंय.

"बाजारपेठेमध्ये यामुळे गोंधळ आणि चुकीचं चित्र निर्माण होत असल्याचं दिसून आलयं. या Satan Shoes उत्पादनाला नायकेने परवानगी वा मान्यता दिल्याच्या भावनेतून नायकेवर बहिष्काराचं आवाहन करण्यात आलंय," नायके कंपनीने म्हटलं.

सोशल मीडियावर विविध बुटांविषयी माहिती देणाऱ्या @Saint ने या येऊ घातलेल्या बुटांविषयी एक ट्वीट केलं. त्यानंतर या बुटांची जाहिरातही करण्यात आली.

साऊथ डकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांच्यासह काही धार्मिक विचारसरणीच्या लोकांनी या बुटांवर आक्षेप घेत ट्विटरवरून लिल नॅस एक्स आणि MSCHF वर टीका केली.

यानंतर लिल नॅस एक्सने या गव्हर्नर आणि इतर टीकाकारांना उत्तरं देताना नायकेच्या या खटल्याबद्दलची मीम्स शेअर केली.

टेनेसी मधल्या जोसेफ रॅश यांनी या बुटांसाठी 1,080 डॉलर्स मोजले. पण आता या वादामुळे आपले पैसे बुडण्याची भीती त्यांना वाटतेय.

"बहुतांश ख्रिश्चन समाज असणाऱ्या या देशामध्ये वेगळं काही सांगू पाहणाऱ्या या कृष्णवर्णीय गे कलाकाराला मला पाठिंबा द्यायचा होता. या देशातल्या कृष्णवर्णीयांना सध्या अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतंय. मग त्याने तयार केलेल्या बुटांची खरेदी करत पाठिंबा दर्शवण्याचा दुसरा चांगला मार्ग कोणता?" जोसेफ सांगतात.

तर हेच बूट घेणाऱ्या साऊथ कॅरोलिनामधल्या मॅकेन्झी नॉरीस यांचा हे बूट eBay वर दुप्पट किंमतीला विकायचा बेत होता. त्यांनी त्यासाठी 2500 डॉलर्सला हे बूट विकण्यासाठी नोंदवले, पण खटल्यानंतर त्यांचं हे लिस्टिंग काढून टाकण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)