You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना साथीनंतर शी जिनपिंग यांची ताकद कशी वाढली?
कोरोना संकटादरम्यान पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व कमी होत जाईल, पण दुसरीकडे चीन मात्र उगवत्या सूर्याप्रमाणे झळाळून पुढे येईल, असा विचार कुणी केला नव्हता. पण कोरोना संकट संपता-संपता ही गोष्ट स्पष्ट झाल्याचं दिसून आलं.
चीनने ज्या पद्धतीने कोरोना संकटाचा सामना केला. ते पाहता पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत चीन याबाबतीत वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं.
अमेरिका आणि युरोप कोरोना साथीच्या काळात लॉकडाऊन वगैरे गोष्टींचं नुकसान सहन करत होते. त्याच वेळी चीनमधलं आयुष्य पुन्हा सुरळीत होताना दिसत होतं.
तिथं हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडू लागली. लोक कॉन्सर्टमध्ये सहभाग घेऊ लागले, पर्यटनाचं नियोजन करू लागले.
कोरोना संकटानंतर सर्वप्रथम चीनमध्ये कामकाज पूर्ववत होऊ लागलं. इतकंच नव्हे तर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांचा विचार केल्यास फक्त चीनचाच विकास दर 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत पाच टक्के इतका होता. लवकरच चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.
रशियानंतर कोरोना व्हायरसवरची लस तयार करण्यात यश मिळवणारा चीन हा दुसरा देश ठरला.
आपल्या देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याआधी चीनने इतर देशांना ही लस निर्यात करणंही सुरू केलं.
विशेष म्हणजे, यामध्ये काही देश लॅटीन अमेरिकेतीलसुद्धा आहेत.
सत्तेवर मजबूत पकड
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या संचालक बॉनी ग्लेजर सांगतात, "कठोर आणि निर्दयी पद्धतींचा वापर करून शि जिनपिंग कोरोना संकटावर नियंत्रण आणण्यात यशस्वी ठरले. कोरोना संकट थोपवण्यात अमेरिकेच्या तुलनेत चीन जास्त यशस्वी ठरला. लोकशाही यंत्रणेपेक्षाही साम्यवादी यंत्रणा कशी यशस्वी ठरू शकते, अशा अर्थाने हे यश मांडण्यात आलं.
बीबीसी मुंडोने बॉनी ग्लेजर आणि इतर काही तज्ज्ञांशीही चर्चा केली. त्या सर्वांच्या मते चीनच्या या यशाचं श्रेय फक्त आणि फक्त शि जिनपिंग यांनाच जातं.
चीनसारख्या देशात आजही लोक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ झेडाँग यांच्या नावाने जप करतात. तिथं शी जिनपिंग यांनी आपली वेगळी छबी निर्माण केली आहे.
सॅन डियागो युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील प्रा. सुझैन शिर्क यांच्या मते, जिनपिंग यांनी कोरोना साथीच्या पूर्वीपासूनच सत्तेवर आपली मजबूत पकड निर्माण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. पण कोरोना संकटाने त्यांच्या उद्दीष्टांना मतदच केली. हे संकट आलं नसतं तर त्यांच्यासाठी हे काम आणखीनच गुंतागुंतीचं झालं असतं.
पण, शी जिनपिंग यांना हे कसं शक्य झालं? सध्याच्या काळात जिनपिंग यांच्याकडे सर्वात जास्त राजकीय बळ आहे, असं का म्हटलं जात आहे?
सुरुवातीच्या अपयशानंतर सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास
मार्च महिन्याच्या सुरुवातीला कम्युनिस्ट पक्षाची व्हर्चुअल परिषद भरवण्यात आली होती. यामध्ये चीनच्या सरकारने पहिल्यांदाच आपल्या कोरोनावरील विजयाचा जल्लोष सार्वजनिकरित्या केला.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या ग्लोबल टाईम्स या मुखपत्राने यावेळी जिनपिंग यांच्या नेतृत्वाचं तोंड भरून कौतुक केलं.
शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाशिवाय चीन कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत पाश्चिमात्य देशांच्या पुढे जाऊ शकला नसता, असं त्यांनी लिहिलं आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनाच याचं श्रेय दिलं आहे. चीनी तरूण इतर देशांमध्ये गेल्यास त्याची छाती गर्वाने फुलेल. पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं, असं त्यांनी म्हटलं.
वॉशिंग्टन येथील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूट या थिंक टँकमध्ये चीनविषयक घडामोडींचे तज्ज्ञ रेयान हँस सांगतात, "चीन कित्येक महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या संदर्भाने जिनपिंग यांच्या यशाची कहाणी रचण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या नेतृत्वाने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशकथेत बदलण्याचे अनेक प्रयत्न केले. याची तुलना लोकशाही देशांसोबत होईल, अशी सोयही त्यांनी करून ठेवली."
कॅनडाच्या कार्लटन युनिव्हर्सिटीत चीनविषयक घडामोडींच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या जेरेमी पॅल्टील यांच मतही एकसारखंच आहे.
कोरोना साथीने चीनला आपला राष्ट्रवादी प्रपोगंडा मांडण्यास मदत केली. त्याचा उद्देश जिनपिंग आणि पक्षाचं नेतृत्व मजबूत करणं हा होता.
एक चुकीचा निर्णय
जेरेमी पॅल्टील यांच्या मते, "कोरोना साथीच्या दरम्यान, चीनच्या माध्यमांनी विशेषतः अमेरिकेतील परिस्थितीची रोजच्या रोज रिपोर्टिंग केलं.
यामुळे चीनच्या जनतेच्या मनात चीनची प्रतिमा उंचावली गेली. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेच चीनची साम्यवादी यंत्रणा किती चांगली आहे, याचा विश्वास निर्माण करण्यात आला.
जेव्हा चीनचे पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंध बिघडले आणि चीनविरोधी भावना वाढू लागली तेव्हा चिनी नागरिकांचा सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाप्रति पाठिंबाही वाढू लागला होता.
चीन कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरला पण सुरुवातीच्या काळात त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
कोरोना साथ पसरत असताना चीनने ती लपवण्याचा प्रयत्न का केला, असे प्रश्न विचारण्यात आले. वुहानमध्ये काय होत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर, पत्रकारांचं तोंड बंद करण्यात आलं.
प्रा. सुझैन शिर्क सांगतात, कोरोना संकटाच्या सुरुवातीला वुहानमधील घडामोडी लपवण्याचा प्रयत्न चीनचं सरकार करत होतं. सोशल मीडिया आणि इंटरनेटवर लोकांची बंडखोर भूमिका पाहायला मिळाली. पण त्यानंतर सेन्सॉरशीप आणि बातम्या दाबण्याची प्रक्रिया सुरू झाली.
या कालावधीत जिनपिंग आणि त्यांच्या पक्षाची लोकप्रियता घटू लागली होती. पण जिनपिंग यांनी सुरुवातीच्या काळात कोरोना नियंत्रणाचं काम पंतप्रधानांकडे सोपवलं. काही आठवडे ते लोकांच्या नजरेआड झाले होते.
कमान जिनपिंग यांच्या हातात नाही, असं त्यावेळी वाटू लागलं. ते समोर येताच परिस्थिती नियंत्रणात आली. एक परिणामकारक यंत्रणा तयार करण्यात आली.
शी जिनपिंग यांची भूमिका
चीनने कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर किंबहुना निर्दयी पद्धत अवलंबली. तिथं मानवाधिकारांचं उल्लंगन होण्याच्या तक्रारी आल्या. तरीही चीनने जे यश मिळवलं ते अद्याप पाश्चिमात्य देश मिळवू शकले नाहीत.
जेरेमी पॅल्टील सांगतात, सुरुवातीच्या चुकांमधून बोध घेत चीनने लॉकडाऊन टेस्टिंग, ट्रेसिंग आणि क्वारंटाईन आदी निर्णय घेतले. मृत्यूदरावर नियंत्रण मिळवलं. तसंच आर्थिक चक्रही थांबू दिलं नाही.
लोकांचं आयुष्य पूर्ववत झालं तसंच अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली. दरम्यान त्याचवेळी पाश्चिमात्य देश संकटाच्या नियोजनावरच काम करत होते.
प्रा. सुझैन यांच्या मते, या कामगिरीमुळे जिनपिंग यांची पक्षातील स्थितीही मजबूत झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिनपिंग यांच्याकडेच तिसऱ्यांदा कारभार सोपवला जाऊ शकतो.
माओ आणि डेंग शियाओपिंग यांच्यानंतर कोणताच नेता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेत राहिलेला नाही. त्यामुळे जिनपिंग यांच्या रस्त्यात अडथळा ठरू शकणाऱ्या लोकांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो.
हाँगकाँगचं उदाहरण
प्रा. सुझैन सांगतात, सत्तेत आल्यापासूनच शि जिनपिंग याची तयारी करत होते. सरकारी संस्था, लष्कर आणि पोलीस यंत्रणेवर त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. विरोधी नेत्यांना अलगद बाजूला केलं. कोरोना आला नसता तर त्यांच्यासाठी पक्षातून अडचणी निर्माण झाल्या असत्या.
त्यांच्या मते, शि जिनपिंग यांच्या आधीच्या राज्यकर्त्यांनी ठराविक कालावधीनंतर नेतृत्व बदल करण्याची परंपरा स्थापन केलेली आहे. त्यामुळे जिनपिंग यांची तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यास पक्षातूनच विरोध होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर पक्षात तणावपूर्ण वातावरण आहे.
पण पॅल्टील पुढे सांगतात, कोरोना संकटानंतर येथील परिस्थिती बदलली आहे. ज्या धोरणावर आधी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, ते बरोबरच होते, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे. ज्या सर्व्हिलन्सच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला जात होता. तीच पद्धत कोरोना नियंत्रणासाठी उपयोगी ठरली. ,सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तो निर्णय बरोबर होता, अशी चर्चा आता केली जाते.
कोरोना संकटादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत चीनने हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा लागू केला, असं सुझैन शिर्क यांना वाटतं. हा निर्णय घेण्यात जोखीम होती. पण यामुळे 1997 पासून लागू असलेली एक देश दोन कायदे ही यंत्रणा संपुष्टात आली, असं त्या म्हणतात.
लस आणि आंतरराष्ट्रीय संबंधकोरोना आरोग्य संकटाविरोधात लढण्यात चीनला यश आलं असलं तरी त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी चीनला त्याची मदत झाली नाही. ऑक्टोबर 2020 मध्ये पिऊ रिसर्चच्या एका अहवालानुसार, विकसनशील देशांमध्ये गेल्यावर्षी चीनची प्रतिमा अनेक पटींनी नकारात्मक बनली.ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूटमधील चीनचे तज्ज्ञ रेयान हैस सांगतात, "गेल्या एका वर्षातच अनेक विकसित देशांमध्ये चीनच्या सार्वजनिक प्रतिमेला धक्का बसला. चीनचे नेतृत्व आपल्या लोकांसाठी काय करत आहे याबाबत देशांतर्गत लोकांपर्यंत संदेश पोहचत आहे. पण बाहेरील लोकांपर्यंत एक नकारात्मक प्रतिमा उभी राहताना दिसत आहे."यामागे अनेक कारणं असल्याचं रेयान हैस सांगतात. यात चीनने सुरुवातीला कोरोना साथीचा आजार लपवण्याचा प्रयत्न, शी जिनपिंग यांचे हाँगकाँगसंदर्भातील धोरण आणि चीनने तैवानला दिलेली धमकी, तसंच शिनजियांगमधील विगर मुस्लिमांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या बातम्यांचा समावेश आहे.या आरोग्य संकटाने खरं तर चीनला जागतिक पातळीवर आपला प्रभाव अधिक वाढवण्याची संधी दिली असं सुजैन शिर्क यांना वाटते. न्यू सिल्क रोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर चीनने अनेक देशांना मास्क, संरक्षक उपकरणांचे किट देण्यास सुरुवात केली. पण निकृष्ट दर्जाच्या वस्तू असल्याने काही देशांनी त्या परत केल्या. अनेक आरोग्य संघटनांनीही त्यावर टीका केली.ही परिस्थिती असताना चीनसाठी कोरोना लस मात्र गेम चेंजर ठरली. कोरोना लसीचे पेटंट घेणारा चीन हा सुरुवातीच्या देशांपैकी एक आहे. चीनची लस मॉडर्ना किंवा फायझरच्या तुलनेत प्रभावी नसली तरी जगातील अनेक देशांसाठी चीनची लस एक मोठा पर्याय आहे. सुजैन शिर्क सांगतात, "साथीच्या रोगाच्या सुरुवातीला शी जिनपिंग यांची अवस्था नाजूक होती. पण पूर्वीच्या तुलनेत आता ते ताकदीचे नेते आहेत. कदाचित ते असे एकमेव नेते आहेत ज्यांची तुलना माओंशी केली जाऊ शकते. आरोग्य संकटाने त्यांच्यासाठी तिसऱ्या कार्यकाळासाठीही मार्ग मोकळा केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)