'भारतातील लोकशाहीच्या स्थितीवर आम्हाला कुणाचं सर्टिफिकेट नको' - एस. जयशंकर

'देशात लोकशाहीच्या स्थितीवर आम्हाला कुणाचं सर्टिफिकेट नको', असं म्हटलंय देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी. इंडिया टुडे या माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रंटफूटवर खेळत असल्याचंही ते म्हणाले. याच ओघात त्यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांचंही नाव घेतलं.

'नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारतात लोकशाही कमकुवत झाल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. हे भारताच्या प्रतिमेसाठी घातक आहे का?', असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना एस. जयशंकर म्हणाले, "तुम्ही ज्या रिपोर्टबद्दल बोलताय त्यात लोकशाही (डेमोक्रसी) आणि निरंकुश शासन (ऑटोक्रसी) यांचा उल्लेख आहे. मात्र, हा डेमोक्रसी किंवा ऑटोक्रसीचा मुद्दाच नाही. तुम्हाला खरं उत्तर हवंय? खरं उत्तर आहे ही हिप्पोक्रसी (ढोंग) आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्या मनासारख्या गोष्ट झाल्या नाही तर त्यांना पोटशूळ उठतो."

"हे लोक स्वतःला जगाचे कस्टोडियन (रक्षक) मानतात आणि त्यांनी काहींची नियुक्ती केली आहे. भारतात असं कुणीतरी आहे जो त्यांच्या परवानगीची वाट बघत नाही, त्यांनी रचलेला खेळ त्यांच्या इच्छेनुसार खेळत नाही, याचा त्यांना त्रास होतो. या लोकांनी स्वतःचेच नियम ठरवले, निकष ठरवले आणि हेच स्वतःच्या मर्जीने निर्णयही देतात, जणू ही एखादी 'ग्लोबल एक्सरसाईज' आहे."

'होय, आम्ही राष्ट्रवादी आहोत'

डॉ. एस. जयशंकर म्हणाले, "ते आम्हाला हिंदू राष्ट्रवादी पक्ष म्हणतात. होय, आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत. आम्ही 70 देशांना कोव्हिड लस पुरवली आहे आणि जे स्वतःला आंतरराष्ट्रीयवादाचे समर्थक म्हणवून घेतात त्यांनी किती देशांना लस पुरवली? त्यांनी सांगावं. असे किती जण आहेत जे म्हणाले की कोव्हिड लशीची जेवढी गरज आमच्या जनतेला आहे तेवढीच गरज इतर देशांनाही आहे. तेव्हा हे कुठे जातात."

परराष्ट्र मंत्री म्हणाले, "आमच्याही आस्था आहेत, श्रद्धा आहेत, मूल्यं आहेत. तरीही आम्ही हातात धार्मिक पुस्तक घेऊन शपथ घेत नाही. असं कुठल्या देशात होतं, सांगा? आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा सगळ्या विषयांमध्ये स्वतःला आश्वस्त करण्याची गरज आहे. आपल्याला देशातल्या लोकशाहीच्या स्थितीबाबत कुणाचं सर्टिफिकेट नकोय. खासकरून त्या लोकांकडून तर अजिबातच नाही ज्यांचा एक स्पष्ट अजेंडा आहे."

भाजपने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं हे वक्तव्य पक्षाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शेअर केलंय.

फ्रीडम हाउसचा अहवाल

काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन येथील प्रतिष्ठित थिंक टँक 'फ्रीडम हाउस'ने 2021 च्या आपल्या अहवालात भारताचा 'फ्रीडम स्कोअर' कमी केला होता.

गेल्या वर्षीच्या अहवालात भारताला 'फ्री' म्हणजेच स्वतंत्र हा दर्जा देण्यात आला होता. मात्र, यावर्षीच्या अहवालात 'पार्टली फ्री' म्हणजेच अंशतः स्वतंत्र हा दर्जा देण्यात आला आहे.

भारताबाबत लिहिताना या संस्थेने म्हटलं आहे, "भारतात एक बहुपक्षीय लोकशाही आहे. असं असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी भाजप सरकारने भेदभाव करणारी धोरणं आणि मुस्लीम समाजावर परिणाम करणाऱ्या वाढत्या हिंसेचं नेतृत्त्व केलं."

रिपोर्टमध्ये म्हटलंय, "भारताची राज्यघटना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचा अंतर्भाव असणाऱ्या नागरी स्वातंत्र्याची हमी देते. मात्र, मोदी सरकारच्या काळात पत्रकार, एनजीओ आणि सरकारवर टीका करणाऱ्या इतर लोकांना त्रास देणाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे."

डॉ. एस. जयशंकर यांचं उत्तर त्यांच्याच संदर्भात असल्याचं मानलं जातंय.

'भारत विरोधी अजेंड्याचा भाग'

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याआधी भाजपचे राज्यसभा खासदार प्रा. राकेश सिन्हा यांनी या अहवालावर प्रतिक्रिया दिली होती.

ते म्हणाले, "ही साम्राज्यवादी लबाडी आहे. देशातून भौगोलिक साम्राज्यावादी गेला. मात्र, वैचारिक साम्राज्यवाद अजूनही शाबूत आहे. भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून जनता मुक्तपणे सरकारी धोरणं आणि न्यायपालिकेवर टीका करू शकत आहेत."

"मात्र, पश्चिमेकडची एक शक्ती आहे जी भारताची त्यांच्या दृष्टीने व्याख्या करू इच्छिते. त्यामुळे हा अहवाल पूर्णपणे भारतविरोधी अजेंड्याचा एक भाग आहे. दररोज भारतात शेकडो टिव्ही चॅनल्सवर स्वतंत्रपणे डिबेट होतात, वृत्तपत्रांवर कुठलंच नियंत्रण नाही, सोशल मीडियाला संपूर्ण सूट आहे. हे स्वातंत्र्य नाही तर आणखी काय आहे? यावरूनच त्यांची दृष्टी किती बाधित आहे, हे कळतं."

मोदींचं कौतुक

या मुलाखतीत परराष्ट्र मंत्री. डॉ. एस. जयशंकर यांनी 'भारतीय लोकशाहीच्या जागतिक रँकिंगमध्ये घसरण' याव्यतिरिक्त पॉप गायिका रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टीकेपासून चीन, क्वाड आणि श्रीलंकेच्या मुद्द्यांवर आपलं म्हणणं मांडलं.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कणखर नेता असल्याचं' ते म्हणाले. ते म्हणाले, "ते फ्रंटफूटवर येऊन खेळतात आणि हे अत्यंत गरजेचं आहे."

चीनबरोबर दिर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षावर मत व्यक्त करताना ते म्हणाले, "हा काळ बराच कठीण होता. अजूनही विषय पूर्णपणे मिटलेला नाही आणि चर्चा अजूनही सुरूच आहे. देशाची सार्वभौमता आणि अखंडता याला कुणी आव्हान देत असेल आणि तुम्ही सरकारचा भाग असाल तर तुम्ही त्याचा सामना करता. याला कशाप्रकारे उत्तर देता येईल, हे तुम्ही बघता.

"गेल्या पाच वर्षात आपण सीमेवर पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत. 2020 साली आपण सीमेवर ज्या प्रकारे सामना केला ते पाच वर्षांपूर्वीपर्यंत शक्य नव्हतं. कारण, शस्त्रास्त्रांमध्ये आपण कमी पडायचो. आपण राफेल खरेदीही केली. आपण परिस्थिती आत्मविश्वासाने हाताळली. राजकीय नेतृत्त्वाकडून आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळालं. भारत जसजसा पुढे जाईल तसतशी आव्हानंही येतील. मग ती शेजारून येईल किंवा कुठूनही. अडचणी पुढेही आहेतच."

ते म्हणाले, "सीमेवर शांतता असेल तरच चीनबरोबरचे संबंध सामान्य असू शकतात. चीनने मैत्रीचा हात पुढे केल्यास आपणही करू. मात्र, त्यांनी बंदूक पुढे केली तर आपणही तसंच प्रत्युत्तर देऊ."

'क्वाड'वर काय म्हणाले?

क्वाड राष्ट्रांच्या पहिल्या बैठकीविषयी बोलताना जयशंकर म्हणाले, "क्वाडची स्वतःची उद्दिष्टं आहेत आणि ती सकारात्मक आहेत. लोकशाही असलेल्या, बहुसांस्कृतिक आणि समान विचारधारा असणाऱ्या देशांसोबत काम करायची आपली इच्छा असणं स्वाभाविक आहे."

ते म्हणाले, "चीनबरोबर सीमावाद होण्याआधी 2017 आणि 2019 सालीदेखील क्वाडची बैठक झाली होती."

पॉप गायिका रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्या ट्वीटवर भारत ओव्हर-रिअॅक्ट झाला का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "हे काही खाजगी प्रकरण नव्हतं. सोशल मीडियावर भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनासंबंधी बोललं जात होतं. ही भाबडेपणाने केलेली कृती नव्हती. दूतावासाची जबाबदारी आमची आहे. लंडनमध्ये भारतीय उच्चायोगावर हल्ला झाला. हल्ल्यावेळी जे उच्चायोगाच्या आत असतात त्यांना काय वाटतं, याची कल्पना आहे तुम्हाला? दिल्लीत बसून तुम्हाला ते कळणार नाही. आपले दूतावास सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्या लोकांची सुरक्षा धोक्यात येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)