मिथुन चक्रवर्ती म्हणतात, 'मी असली कोब्रा, एका दंशात संपवून टाकेन' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) मी असली कोब्रा, एका दंशात संपवून टाकेन - मिथुन चक्रवर्ती

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी काल (7 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर झालेल्या सभेमधून त्यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

"मी असली कोब्रा आहे. दंश केला तर तुमचा फोटो घरात लागेल. मी फक्त एक साप नाही, मी कोब्रा आहे. एका दंशात संपवून टाकेन," असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर स्थान मिळाल्याबद्दल आभारही मानले.

ते म्हणाले, "काहीतरी मोठं काम करण्याचं स्वप्न मी एकदा पाहिलं होतं. पण एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आणि पंतप्रधान मोदी उपस्थित आहेत, असं इतकं मोठं स्वप्नही कधी बघितलं नाही."

"मला जीवनात काहीतरी मोठं काम करायचं होतं. पण कधी इतक्या मोठ्या सभेचा भाग असेल याची कल्पना केली नव्हती. 17 वर्षांचा असल्यापासून मला समाजातील गरिबांसाठी काम करण्याची इच्छा होती आणि आता ही इच्छा आता पूर्ण होणार आहे," असंही मिथुन चक्रवर्ती म्हणाले.

2) लवकरच काँग्रेस राज्यातील सत्तेतून बाहेर पडेल - रामदास आठवले

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीवर नाराज असल्याने लवकरच सत्तेतून बाहेर पडेल, असं भाकित केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

तसंच, काँग्रेस बाहेर पडल्यानंतर भाजप महाराष्ट्रात सत्तेत येईल, असंही ते म्हणाले.

"हे सरकार किती दिवस चालेल याबाबत आम्ही साशंक आहोत. काँग्रेसला सरकारमध्ये पाहिजे तेव्हा सन्मान मिळत नाहीय. त्यामुळे महाविकास आघाडी किती दिवस सत्तेत राहिल हे सांगता येत नाही," असं आठवले म्हणाले.

"भाजपाच्या संपर्कात राज्यातील अनेक आमदार आहेत. भाजपाला सत्तेवर येण्यासाठी 28 आमदारांची गरज आहे. निवडणूक टाळण्यासाठी राज्यातील अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, त्यामुळे लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल," असा दावाही रामदास आठवले यांनी केला.

3) भाजपकडे केंद्रातली सत्ता गेल्यानंतर देशात धार्मिक तेढ वाढली - शरद पवार

केंद्रातील सत्ता भाजपच्या हातात गेल्यानंतर देशात धार्मिक तेढ वाढला, असल्याचं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते झारखंडची राजधानी रांची इथं राष्ट्रवादीच्या सभेत बोलत होते. सकाळ वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

"पश्चिम बंगालमध्ये एक महिलेला जनतेनं मुख्यमंत्री बनवलं. त्यांच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. त्यामुळे या लोकांच्या हातात सत्ता येऊ द्यायची नाही, हे आपल्याला निश्चित करावं लागेल," असं पवार या सभेत म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही मोदींवर टीका केली. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम बंगालमध्ये जायला वेळ आहे, पण दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही."

4) धर्मनिरपेक्षता भारतीय परंपरेला धोकादायक - योगी आदित्यनाथ

भारतीय परंपरेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवताना धर्मनिरपेक्षतेचा सर्वाधिक अडसर निर्माण होत असल्याचं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगदी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलं आहे. न्यूज 18 ने ही बातमी दिली आहे.

देशहिताशी प्रतारणा करून चुकीचा प्रसार करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही, असंही यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले.

'ग्लोबल इन्सायक्लोपेडिया ऑफ रामायणा' या ई-पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

"रामायण- महाभारतातून आपणास केवळ जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले जात नाही, तर भारतीय सीमांच्या विस्ताराची माहितीही मिळते," असंही आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

5) सिमीशी संबंधावरून अटकेत असलेल्या 127 जणांची 19 वर्षांनंतर निर्दोष सुटका

स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 127 जणांची 19 वर्षांनंतर निर्दोष सुटका करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

या 127 जणांविरोधात समाधानाकारक आणि विश्वासार्ह पुरावने नसल्याचं सुरतमधील मॅजिस्ट्रेट कोर्टानं म्हटलं आहे.

या सर्वजणांवर अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) कायद्याअंतर्गत 2001 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीमी संघटनेच्या एका बैठकीत हे सर्वजण जमले होते, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

मुख्य न्यायदंडाधिकारी अमितकुमार दवे म्हणाले, बंदी असलेल्या संघटनेचे हे सदस्य असल्याचे किंवा त्या संघटनेच्या एखाद्या चळवळीसाठी हे सर्वजण गोळा झाले होते, हे तपासाधिकारी सिद्ध करू शकले नाहीत. हे सर्व निशस्त्र होते आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी गोळा झाले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)