शरद बोबडे यांचं ‘तू तिच्याशी लग्न करशील का’ या वक्तव्यावर स्पष्टीकरण

एक संस्था तसंच न्यायालय म्हणून, "आम्हाला महिलांविषयी अतिशय आदर आहे," असं स्पष्टीकरण सरन्यायधीश शरद बोबडे यांनी सोमवारी, 8 मार्च रोजी बोलताना दिलं. "आम्ही बलात्काऱ्याला पीडितेशी लग्न करशील का असं विचारलेलं नाही," असंही ते म्हणाले.

तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोर बलात्काराच्या प्रकरणाची सुनावणी चालू असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं चुकीच्या पद्धतीने वार्तांकन केल्याचं ते म्हणाले.

एका दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सरन्यायधीशांनी यावर टिप्पणी केली.

त्यांनी म्हटलं की आपण जो प्रश्न विचारला, "तिच्याशी लग्न करशील का?" तो आरोपीला तिच्याशी "लग्न कर" असं सुचवण्यासाठी नव्हता.

"या कोर्टाने महिलांना नेहमीच आदर दिला आहे. सुनावणी दरम्यानही आम्ही कधी हे सुचवलं नाही की आरोपीने पीडितेशी लग्न करावं. आम्ही हे विचारलं की तू तिच्याशी लग्न करणार आहेस का? त्यांचं अत्यंत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आलं."

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सध्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा खटला सुरू आहे. यातला आरोपी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत आहे. यावर बोलताना बोबडे म्हणाले की 'तू तिच्याशी लग्न करशील का?'

2014-15 साली या खटल्यातील पीडितेवर कथित बलात्कार झाला होता. त्यावेळी ती 16 वर्षांची होती. कथित बलात्काराचा आरोप असणारा आरोपी तिचा दूरचा नातेवाईक आहे. आरोपीने अमानुष छळ केल्याचे आरोपही पीडितेने केले आहेत.

यानंतर वाद होऊन देशभरातल्या 5000 स्त्रीवादी कार्यकर्ते आणि नागरिकांनी सरन्यायाधीशांना 'खुलं पत्र' लिहून संताप व्यक्त केला आहे आणि सरन्यायाधीशांनी तात्काळ आपलं वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी, अशी मागणी केली होती. सरन्यायधीशांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली होती.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं की कोर्टाच्या वक्तव्यांची मोडतोड करून संदर्भाशिवाय मांडली गेली ज्यामुळे त्यातून वेगळा अर्थ प्रतित झाला.

14-वर्षीय बलात्कार पीडितेच्या 26 आठवड्यांचा गर्भपात करण्याची सुनावणी कोर्टासमोर सुरू असताना कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं.

या मुलीच्या वतीने बोलताना अॅडव्होट व्ही. के. बीजू यांनी खंडपीठाला सांगितलं की काही लोक न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना तोंड देण्यासाठी एक यंत्रणा उभी करायला हवी.

या प्रकरणी पुढची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. याआधी कोर्टाने हरियाणा सरकारला विचारलं होत की 26 आठवड्यांची गरोदर असणाऱ्या 14 वर्षांच्या मुलीचा गर्भपात करणं सुरक्षित आहे का, याबाबत अहवाल सादर करायला सांगितलं होतं.

या मुलीने आपल्या याचिकेत म्हटलंय की तिच्यावर तिच्या चुलत भावाने बलात्कार केलाय ज्यामुळे ती गर्भवती राहिली. आपल्याला गर्भपात करायला परवानगी मिळावी म्हणून तिने कोर्टात याचिका दाखल केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)