You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘तिच्याशी लग्न करशील का?’ बलात्काराच्या आरोपीला सुप्रीम कोर्टाने विचारलं
सर्वोच्च न्यायालयाने जळगावातील एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला पीडितेशी लग्न करणार का? अशी विचारणा केली आहे. तसंच पुढील चार आठवडे आरोपीला अटक न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयाने आरोपीला पीडितेशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला.
सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरोपीला विचारले, "तुला (पीडितेशी) लग्न करायचे असल्यास आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तू तसं केलं नाही तर तुझी नोकरी गमवशील तसंच तू तुरुंगात जाशील. तू मुलीवर बलात्कार केला आहेस."
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक प्रॉडक्शन कंपनीत (एमएसईपीसी) तंत्रज्ञ म्हणून काम करणारा आरोपी मोहित सुभाष चव्हाण याच्या जामीन अर्जावर सरन्यायाधीश बोबडे सुनावणी करत होते. एका मुलीने आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की आरोपीची नोकरी जाऊ शकते. "कृपया याचा विचार करा आणि आम्हाला दिलासा द्या," अशी विनंती वकीलांनी कोर्टाला केली.
याचिकाकर्त्याने न्यायालयाला असंही सांगितलं की, पीडित मुलीने पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा आरोपीच्या आईने मुलीला लग्नासाठी विचारणा केली पण पीडित मुलीने नकार दिला.
सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी वकीलाला सांगितलं, "लहान मुलीची छेडछाड आणि बलात्कार करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. तुम्ही सरकारी कर्मचारी आहात याची कल्पना तुम्हाला होती."
लग्नाचं खोटं आश्वासन देऊन बलात्कार केलेल्या आरोपीला अटक करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांची अंतरिम सवलत दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)