इलॉन मस्क यांचं चीनला उत्तर, 'टेस्ला वाहनं हेरगिरीसाठी वापरली तर कारखाना बंद करेन'

अमेरिकेतील टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी आपल्या वाहनांवरील हेरगिरीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

जर चीनमध्ये टेस्लाची वाहनं हेरगिरीसाठी वापरण्यात येत असतील तर तिथं आपला कारखाना बंद करण्यात येईल, असं स्पष्टीकरण मस्क यांनी दिलं.

चीनमधील एका व्यवसायसंबंधित संमेलनामध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाल्यावेळी मस्क बोलत होते. यावेळी चीनच्या लष्कराने टेस्ला वाहनांमधील काही सुविधांवर निर्बंध आणल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर इलॉन मस्क यांनी वरील स्पष्टीकरण दिलं.

टेस्ला वाहनांमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा वापर माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. याबाबत चीनच्या लष्करांनी सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

अमेरिकेनंतर चीन ही टेस्लाची मोठी बाजारपेठ मानली जाते. याठिकाणी टेस्ला वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

आपल्या वाहनांबाबत स्पष्टीकरण देताना शनिवारी इलॉन मस्क म्हणाले, "परदेशी सरकारची हेरगिरी करण्यासाठी या कारचा वापर होत असेल तर कंपनीवर त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम होतील. ही आपल्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे. कोणतीही माहिती गुप्त ठेवणं ही आपली जबाबदारी आहे."

चीनमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी टेस्ला वाहनांचा वापर हेरगिरीसाठी होणार असेल, तर आपल्याला आपली कंपनी बंद करावी लागेल, अशी भीती मस्क यांनी व्यक्त केली.

अमेरिकेच्या मोठ्या कंपन्यांना चीनमध्ये आपला व्यवसाय वाढवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

चीन आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. गेल्या काही वर्षांत ते आणखीनच नाजूक झाले आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये काही कुरबुरी झाल्याचं पाहायला मिळालं.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं प्रशासन आणि चीन सरकार यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत वादविवाद चांगलाच रंगला होता. दरम्यान, हे प्रकरण आता समोर आलं आहे.

इलॉन मस्क यांची कंपनी ही मूळची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहे. मस्क यांनी अमेरिकेसह चीनमध्येही आपली एक प्रतिमा बनवून लोकांचा विश्वास जिंकला आहे.

खासगी कंपन्यांकडून सरकारला पुरवण्यात येणाऱ्या माहितीसंदर्भात त्यांनी काळजी व्यक्त केलेली आहे. टिकटॉकसारख्या कंपन्यांकडून चीनला देण्यात येत असलेल्या माहितीच्या संदर्भातही त्यांनी टीका केली होती.

इलॉन मस्क यांच्या चीनमधील शांघाय येथील कारच्या कारखान्याला 2018 मध्ये परवानगी मिळाली होती. त्यावेळी चीनमध्ये स्वतःचा कारखाना टाकण्याची परवानगी मिळवणारी पहिली कंपनी म्हणून टेस्लाची ओळख बनली होती.

सध्या चीन ही जगातील कार उद्योगाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथील सरकार इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार प्रोत्साहन देत आहे.

इथं टेस्लाच्या कारला चांगलीच मागणी आहे. याच बळावर गेल्या वर्षी टेस्लाने 721 मिलियन डॉलरचा घसघशीत नफा कमावला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)