You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्विस लष्करातील महिला सैनिकांना महिलांची अंतर्वस्त्र घालण्याची अखेर परवानगी
स्वित्झर्लंडसारख्या पुढारलेल्या देशात महिला सैनिकांना महिलांचे अंतर्वस्त्रही मिळत नाही, हे ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, ही परिस्थिती आता बदलणार आहे.
स्वित्झर्लंड सैन्यात महिला सैनिकांच्या भरतीला चालना मिळावी, यासाठी महिला सैनिकांना महिलांचे अंतर्वस्त्र घालण्याची परवानगी देण्यात आल्याचं वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे.
स्विस सैनिकांसाठीच्या सध्याच्या गणवेशात केवळ पुरुषांच्याच अंतर्वस्त्राचा समावेश होता. मात्र, यापुढे महिला सैनिकांना महिलांचेच अंतर्वस्त्र पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढच्या महिन्यापासून त्यासाठीचे ट्रायल्स सुरू होतील.
सध्या स्वित्झर्लंडच्या सैन्यात महिला सैनिकांचं प्रमाण 1 टक्का आहे. 2030 पर्यंत हे प्रमाण 10 टक्क्यांवर नेण्याचा स्विस सरकारचा विचार आहे.
महिला जवानांना अधिक सोयीस्कर अंतर्वस्त्र दिल्यास महिलांना सैन्यात भरती होण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल, असं स्विस संसदेचं कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल काउंसिलच्या सदस्य मॅरिअॅने बिंडेर यांनी म्हटलं आहे.
त्या म्हणाल्या, "आतापर्यंतचा सैनिकी गणवेश हा पुरुषांसाठी तयार करण्यात आला होता. मात्र, सैन्याला खरोखरीच महिलांना समान वागणूक द्यायची असेल तर योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे."
स्विस सैन्यात आतापर्यंत महिला जवानांनाही गणवेशामध्ये पुरुषांचीच अंतर्वस्त्र मिळायची. बरेचदा त्यांचा साईझही मोठा असायचा. त्यामुळे महिला जवानांसांठी अशाप्रकारचे कपडे त्रासदायक ठरायचे.
गणवेश झाला कालबाह्य
सैन्याकडून पुरवण्यात येत असलेले गणवेश आणि इतरही काही वस्तू आता आउटडेटेड झाल्या आहेत, असं लष्कराचे प्रवक्ते कॅज-गुन्नार सिव्हर्ट यांनी म्हटलं आहे. मात्र, यापुढे महिला जवानांना त्यांची गरज लक्षात घेऊन उन्हाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी वेगवगळ्या प्रकारचे लेडीज गार्मेंट्स पुरवले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.
केवळ अंतर्वस्त्रच नव्हे तर लढाऊ कपडे, प्रोटेक्टिव्ह व्हेस्ट आणि बॅकपॅक यातही महिलांसाठी काही विशेष बदल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "यापुढे जवानांना त्यांना सोयीचे आणि त्यांना फिट बसतील, असे कपडे पुरण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही" सिव्हर्ट यांनी सांगितलं.
'सुसंगततेत' सुधारणा करायलाच हवी, असं म्हणत स्वित्झरलँडच्या संरक्षण मंत्र्यांनीही या नव्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
स्विसइन्फो या मीडिया आउटलेच्या वृत्तानुसार 1980 च्या दशकाच्या मध्यात स्विस लष्कराच्या गणवेशाची सुरुवात झाली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)