सौदी अरामको: तेल कंपनी अरामकोला कोरोना लॉकडाउन काळात मोठा फटका

सौदी तेल कंपनी अरामकोने गेल्या वर्षी नफ्यात कमालीची घट झाल्याचं जाहीर केलं आहे. कोरोना आरोग्य संकटात जगभरात लॉकडॉऊन होते यामुळे तेलाची मागणी कमी झाली.

2019 या वर्षात झालेल्या कंपनीच्या एकूण कमाईपेक्षा 2020 या वर्षी 45 टक्क्यांनी नुकसान झाले आहे.

या परिस्थितीतही जगातील बड्या कंपन्यांपैकी एक कंपनी 'सौदी अरामको'ने 49 अरब डॉलरचा नफा कामवला आहे.

कंपनीच्या समभागधारक (शेअर होल्डर्स) यांना नफ्यातला वाटा (डिव्हिडंड) दिला जाईल असंही सौदी अरामकोने स्पष्ट केलं आहे. ही रक्कम 75 अरब डॉलर एवढी असणार आहे.

सर्वांत मोठी शेअरधारक

अरामकोचे सर्वांत मोठे समभागधारक सौदी अरब सरकार आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं की, अलीकडच्या इतिहासातील कंपनीसाठी हे सर्वात आव्हानात्मक वर्ष होते. गेल्या वर्षी कोरोना साथीचा आजार रोखण्यासाठी जगभरात निर्बंध लादण्यात आले. उद्योग बंद होते, प्रवास ठप्प होता, जनजीवन विस्कळीत झाले होते.

याचा फटका तेल आणि ऊर्जा व्यवसायाला बसला आहे. तेल आणि ऊर्जेच्या मागणीवर परिणाम झाला असून तेलाच्या किंमती पाच पटींनी घसरल्याचे दिसून आले.

तेल आणि वायू व्यवसायाशी संबंधित रॉयल डच शेल आणि ब्रिटिश पेट्रोलियम सारख्या मोठ्या कंपन्यांच्या नफ्यातही घट नोंदवण्यात आली आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी एक्सॉन मोबिलला गेल्या वर्षी पहिल्यांदाच व्यवसायात तोटा सहन करावा लागला आहे.

रियादचा रिफायनरी हल्ला

कोरोनाची लस आल्यानंतर डिसेंबरपासून कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

सौदी अरामकोचे चीफ एक्झिक्युटिव्ह अमीन नासीर यांनी सांगितलं, "आशियात तेलाच्या किमती वाढत आहेत, इतर ठिकाणांहूनही सकारात्मक संकेत मिळत आहेत."

"विविधी सरकारी व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणा अर्थव्यवस्था खुली करत आहेत. त्यानुसार आता व्यवसाय वाढेल अशी आम्हाला आशा आहे,"

पण अरामको समोर इतर अडचणीही आहेत. येमेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात सौदी सहभागी झाल्यामुळे कंपनीच्या अनेक आस्थापनांवर ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे.

गेल्या शुक्रवारी (19 मार्च) रियादच्या रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यामुळे आग लागली होती. दरम्यान, रिफायनरी काही तासांनंतर तात्काळ कार्यरत झाली आणि अशा हल्ल्यांसाठी कंपनीकडे आपत्कालीन व्यवस्थापन आहे अशी माहिती नासीर यांनी दिली.

सौदी अरामको आहे तरी काय?

1933 साली सौदी अरेबिया आणि स्टँडर्ड ऑईल कंपनी ऑफ कॅलिफोर्निया यांच्यातील व्यवहार पणाला लागलेला असताना सौदी अरामको कंपनीनं आपले हातपाय पसरले. यानंतर ही कंपनी शेवरन बनली, सर्वेक्षण करणारी आणि ऑइल खणणारी नवी फर्म तयार करण्यात आली.

1973 आणि 1980 या कालावधीत सौदी अरेबिया सरकारनं संपूर्ण कंपनी विकत घेतली.

व्हेनेझुएलानंतर सौदी अरेबिया दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठा तेलसाठा असणारा देश आहे, अशी माहिती ऊर्जा माहिती प्राधिकरणातर्फे देण्यात आली आहे. याशिवाय अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावरील उत्पादन कंपनी आहे. परंतु सर्व तेल काढणाऱ्या देशांमध्ये वर्चस्व असल्यानं या देशाला प्राधान्य दिलं जातं, अर्थात या देशात सर्वांत स्वस्त तेल मिळतं.

"ही कंपनी सुरुवातीला स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणीकृत नव्हती; परंतु तरीही ही जागतिक स्तरावर सर्वात जास्त तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. अरामको कंपनी सर्व तेल कंपन्या आणि गॅस कंपन्यांची मुख्य कंपनी आहे.'' असं स्कनिदर इलेक्ट्रिकच्या मार्केट स्टडीजचे संचालक डेव्हिड हंटर म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)