सौदी अरामको : इराण आणि सौदी अरेबिया एकमेकांचे शत्रू का आहेत ?

    • Author, जोनाथन मार्कस
    • Role, संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे बातमीदार

सौदी अरेबिया आणि इराणमधला संघर्ष फार जुना आहे. वर्षानुवर्षं हे देश एकमेकांचे विरोधक आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये या दोन देशांतला तणाव वाढला आहे.

प्रादेशिक प्रभुत्वासाठी या दोन्ही शक्तिशाली शेजारी देशांमध्ये दीर्घ काळापासून हा संघर्ष सुरू आहे. त्याचबरोबर या अनेक दशकं जुन्या संघर्षाचं एक महत्त्वाचं कारण धर्म हे देखील आहे. दोन्ही मुस्लीम देश आहेत. इथे सुन्नी आणि शिया दोन्हींचं वर्चस्व आहे.

इराण शियाबहुल आहे तर सौदी अरेबिया सुन्नीबहुल आहे.

संपूर्ण मध्य पूर्वेतच असं धार्मिक विभाजन पहायला मिळतं. इथले काही देश शियाबहुल आहेत तर काही सुन्नीबहुल. यातले काही देश पाठिंबा आणि सल्ल्यासाठी इराणकडे वळतात तर काही सौदी अरेबियाकडे.

सौदी अरेबियामध्ये राजेशाही आहे. सुन्नीबहुल सौदीमध्येच इस्लामचा उदय झाला आणि इस्लामच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या जागांमध्ये सौदीचा समावेश होतो. म्हणूनच हा देश स्वतःला मुस्लिम जगताचा पुढारी समजतो.

पण 1979 मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि सौदीच्या नेतृत्त्वाला आव्हान मिळालं. एका नव्या धर्तीवरच्या देशाची निर्मिती झाली. धर्मावर आधारित शासन प्रणाली असणाऱ्या या देशाला आपल्या मॉडेलचा जगभरामध्ये प्रसार करायचा होता.

पण गेल्या १५ वर्षांमध्ये सौदी अरेबिया आणि इराणमध्ये कोणत्याना कोणत्या घटनांमुळे मतभेद वाढत गेलेत.

अमेरिकेने 2003 मध्ये इराणचा मुख्य शत्रू असणाऱ्या इराकवर हल्ला केला आणि सद्दाम हुसेन यांची सत्ता उलथवली. यानंतर इथे शिया बहुल सरकारसाठी मार्ग खुला झाला आणि या देशावरचा इराणचा प्रभाव तेव्हापासून झपाट्याने वाढला.

2011 पर्यंत अनेक अरब देशांमधली बंडखोरी वाढली आणि यामुळे या एकूणच भागात राजकीय अस्थिरता निर्माण झाली.

या उलथापालथीचा फायदा घेत इराण आणि सौदी अरेबियाने सीरिया, बहारीन आणि येमेनमध्ये आपला विस्तार करायला सुरुवात केली. यामुळे देखील या दोन देशांमधला तणाव जास्त वाढला.

इराणला या संपूर्ण भागामध्ये स्वतःचा किंवा स्वतःच्या मित्रराष्ट्रांचा दबदबा वाढवायचा होता, असं इराणच्या टीकाकारांचं म्हणणं आहे. यामुळे इराणपासून भूमध्य सागरापर्यंत पसरलेला भूभाग त्यांच्या नियंत्रणात आला असता.

परिस्थिती का चिघळली?

अनेक दृष्टींनी इराण या संघर्षात बाजी मारत असल्याचं दिसत असल्याने आता राजकीय वातावरण पुन्हा तापतंय.

सीरियाचे राष्ट्रपती असणाऱ्या बशर अल्-असद यांना इराण आणि रशियाचा पाठिंबा आहे. याच्याच जोरावर त्यांची सेना सौदी अरेबियाचं समर्थन असणाऱ्या बंडखोर गटांना मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे.

सौदी अरेबियाला इराणची मक्तेदारी रोखायची आहे. सौदीचे तरूण आणि उत्साही शासक राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याकडून करण्यात येणाऱ्या सैन्याच्या वापरामुळे या भागामधला तणाव चिघळत चाललाय.

शेजारच्या येमेनमधल्या हुथी बंडखोरांच्या विरुद्ध गेल्या चार वर्षांपासून सौदीनं युद्ध छेडलेलं आहे. तिथं इराणचा प्रभाव वाढू नये यासाठी सौदीकडून ही कारवाई होत आहे. पण आता चार वर्षं उलटून गेल्यावर त्यांच्यासाठी ही गोष्ट कठीण ठरतेय.

हुथी बंडखोरांना हत्यारं पुरवत असल्याचा आरोप इराणवर केला जातोय. पण इराणने हे सगळे आरोप फेटाळून लावलेत.

पण हुथी बंडखोरांना हत्यारं आणि तंत्रज्ञान या दोन्हींचा पुरवठा तेहरानकडून होत असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटलंय.

तर दुसरीकडे इराणचा मित्रदेश असणाऱ्या लेबनॉनमध्ये शिया मिलिशिया गट - हिजबुल्लाह हा राजकीयदृष्ट्या ताकदवान गटाचं नेतृत्त्व करतो. या गटाकडे मोठ्या प्रमाणावर सशस्त्र सैनिक आहेत.

सौदी अरेबियाने याच हिजबुल्लांच्या जोरावर 2017 मध्ये लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खुद्दं सौदी अरेबियाचं हरीरी यांना समर्थन होतं.

लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी दोन आठवड्यांसाठी सौदी अरेबियाला गेलेले असताना अचानक त्यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथून टीव्हीवरूनच राजीनामा जाहीर केला. लेबनॉनसोबतच इराण इतरही अनेक देशांमध्ये 'भीती आणि विध्वंस' पसरवत असल्याचे आरोप करत त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं.

त्याचवेळी त्यांनी इराणचं समर्थन असणाऱ्या हिजबुल्लाहवरही टीका केली.

पण ते स्वतः येऊन राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार नसल्याचं लेबनॉनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं. यानंतर साद हरीरी यांनी लेबनॉनला परतून राजीनामा दिला पण तो स्वीकारण्यात आला नाही.

याशिवाय तणाव वाढण्याची इतरही काही कारणं आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा सौदी अरेबियाला पाठिंबा आहे. तर दुसरीकडे इराण आपल्यासाठी धोकादायक असल्याचं इस्त्रायलला वाटतंय आणि इराणला थांबवण्यासाठी ते एक प्रकारे सौदी अरेबियाच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहेत.

ज्यू बहुल इस्त्रायलला आपल्या सीमेला लागून असणाऱ्या सीरियातल्या इराण समर्थक बंडखोरांच्या हल्ल्याची भीती आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमांना 2015 मध्ये विरोध करणाऱ्यांमध्ये इस्त्रायल आणि सौदी अरेबिया आघाडीवर होते.

मध्य पूर्वेतले कोणते देश कोणाच्या बाजूने?

ढोबळपणे असं म्हणता येईल, की सध्याची राजकीय परिस्थिती या भागातलं शिया - सुन्नी विभाजन दाखवते.

सुन्नींचं प्राबल्य असणाऱ्या सौदी अरेबियाला युएई, बहारीन, इजिप्त आणि जॉर्डनसारख्या आखाती देशांचा पाठिंबा आहे.

तर सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांचा इराणला पाठिंबा आहे.

इराकमधलं शिया प्राबल्य असणारं सरकारही इराणच्या बाजूने आहे. पण विरोधाभासाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपले अमेरिकेसोबतचे संबंधही कायम ठेवले आहेत. इस्लामिक स्टेट्स विरुद्धच्या लढाईमध्ये मदतीसाठी ते अमेरिकेवर अवलंबून आहेत.

शीतयुद्धासारखी परिस्थिती

या दोन्ही देशांमधलं हे वैर अनेक दृष्ट्या शीतयुद्धासारखंच आहे. अमेरिका आणि सोव्हिएत संघामध्ये अनेक वर्षं असाच तणाव होता.

इराण आणि सौदी अरेबिया थेट युद्ध करत नसले तरी अनेक मार्गांनी त्यांच्यात प्रॉक्सी वॉर (छुपं युद्ध) सुरू आहे, असा संघर्षं जिथे हे देश दुसऱ्या देशातल्या बंडखोरीला पाठिंबा देतात.

याचं स्पष्ट उदाहरण म्हणजे सीरिया. इराण येमेनमधल्या बंडखोर हुथींना बॅलिस्टिक मिसाईल्स देत असल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला आहे. हे क्षेपणास्त्र सौदीच्या सीमेवर डागण्यात आलं होतं.

आखातातल्या महत्त्वाच्या जलमार्गांवरचं आपलं वर्चस्वंही इराणने दाखवून दिलंय. या जलमार्गांनी सौदी अरेबियाकडून तेलाचा पुरवठा केला जातो. परदेशी ऑईल टँकर्सवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे इराणाचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केलाय. पण इराणने हे आरोप फेटाळले आहेत.

इराण आणि सौदी अरेबियात थेट युद्ध होणार का?

इराण आणि सौदी अरेबियात सध्या छुपं युद्ध सुरू आहे. पण सौदी अरेबियाच्या ऑईल रिफायनरीवर हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता ही परिस्थिती चिघळू शकते.

आखातातल्या या समुद्रात इराण आणि सौदी अरेबियाच्या सीमा एकमेकांच्या समोर आहेत आणि वाढत्या तणावामुळे या दोघांमधली युद्धाची शक्यता वाढतेय.

अमेरिका आणि पश्चिमेतल्या इतर मोठ्या देशांसाठी आखातामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि तेलाच्या जहाजांचा स्वतंत्र वावर सुरू राहणं महत्त्वाचं आहे.

पण युद्ध झाल्यास हा वावर थांबेल हे उघड आहे. म्हणून अशी परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं नौदल आणि वायुदलही या युद्धात उरतण्याची शक्यता आहे.

इराण हे एक अस्थिर राष्ट्र असल्याचं अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना गेल्या काही काळापासून वाटतंय. इराणचं अस्तित्त्वं हे सौदी नेतृत्वासाठीही धोक्याचं आहे आणि इराणचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भावी राजे असणारे राजकुमार सलमान कोणत्याही थराला जाण्याच्या गोष्टी करत आहेत.

तेलाच्या प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर आता सौदी किती असुरक्षित आहे हे जगजाहीर झालंय. जर युद्ध सुरू झालंच तर ते ठरवून, आखणीकरून नाही तर कोणत्यातरी अनियोजित - अनपेक्षित घटनेमुळे सुरू होईल.

सौदी अरेबियाचं सक्रीय होणं, ट्रंप प्रशासनाला या भागामध्ये असलेला रस यासगळ्यामुळे या भागामध्ये पुढचा काही काळ अनिश्चितता असेल असे संकेत सध्या तरी मिळत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)